व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपली सचोटी कायम का राखावी?

आपली सचोटी कायम का राखावी?

आपली सचोटी कायम का राखावी?

“माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सचोटीप्रमाणे, हे परमेश्‍वरा, माझा न्याय कर.”—स्तो. ७:८, NW.

१, २. असे कोणते काही प्रसंग आहेत ज्यामध्ये एका ख्रिस्ती व्यक्‍तीला आपली सचोटी टिकवून ठेवणे कठीण होऊ शकते?

पुढे दिलेल्या तीन वेगवेगळ्या प्रसंगांचा विचार करा. एका मुलाचे शाळासोबती त्याची खिल्ली उडवत आहेत. तो त्यांच्याशी भांडेल की स्वतःला आवरून तेथून निघून जाईल? एक पती घरात एकटा असताना इंटरनेटवर काहीतरी रिसर्च करत आहे. अचानक अश्‍लील वेबसाईटची जाहीरात असलेला एक बॉक्स त्याच्या कंप्यूटर स्क्रीनवर येतो. तो या मोहाला बळी पडून त्या साईटवर जाईल की बॉक्स लगेच बंद करेल? एक ख्रिस्ती स्त्री इतर बहिणींसोबत गप्पा मारत आहे आणि हळूहळू गप्पांचा ओघ मंडळीतल्या एका बहिणीबद्दल नकारात्मक व घातक चहाड्यांकडे वळतो. ती अशा प्रकारच्या गप्पांमध्ये सामील होईल की विषय बदलण्याचा प्रयत्न करेल?

हे प्रसंग जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक समान धागा आहे: ते सगळेच जण ख्रिस्ती या नात्याने आपली सचोटी कायम राखण्यासाठी धडपड करत आहेत. तुम्हीही आपल्या चिंता-विवंचनांना तोंड देत असताना, तसेच आपल्या गरजा आणि ध्येये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना, आपली सचोटी कशी टिकवून ठेवायची याचा विचार करता का? आपले स्वरूप, आरोग्य, पोटापाण्याची सोय कशी करायची, नात्यांमधील चढउतार, या सगळ्या गोष्टींबद्दल लोक रोज विचार करतात. या आवश्‍यक गोष्टींबद्दल विचार करणे रास्तच आहे. पण, यहोवा आपले हृदय पारखताना नेमके काय पाहतो? (स्तो. १३९:२३, २४) आपण सचोटी दाखवत आहोत की नाही हे तो पाहतो.

३. यहोवाने आपल्याला काय करण्याचा सुहक्क दिला आहे आणि या लेखात आपण कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत?

“प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्‍या यहोवाने आपल्या प्रत्येकावर कितीतरी दानांचा वर्षाव केला आहे. (याको. १:१७) यहोवाने आपल्याला एक शरीर, एक मन, बऱ्‍यापैकी आरोग्य आणि इतर क्षमता दिल्याबद्दल आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. (१ करिंथ. ४:७) पण, आपण सचोटीने वागण्यासाठी तो आपल्याला बळजबरी करत नाही. आपण हा गुण निर्माण करणार की नाही हे त्याने आपल्यावर सोडले आहे. (अनु. ३०:१९) म्हणून, सचोटी म्हणजे काय याचे आपण परीक्षण करणे गरजेचे आहे. आणि हा गुण विकसित करणे इतके महत्त्वाचे का आहे याच्या तीन कारणांचाही आपण विचार करणार आहोत.

सचोटी काय आहे?

४. सचोटी या गुणात कशाचा समावेश होतो, आणि पशू बलिदानाच्या बाबतीत यहोवाने दिलेल्या नियमातून आपण काय शिकू शकतो?

सचोटी म्हणजे काय आहे याची पुष्कळ लोकांना स्पष्ट कल्पना नाही. उदाहरणार्थ, जेव्हा राजकीय पुढारी आपल्या सचोटीबद्दल फुशारकी मारतात, तेव्हा ते बहुतेकदा स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल बोलत असतात. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, पण तो सचोटी या गुणाचा केवळ एक भाग आहे. बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे, सचोटी या गुणात नैतिक पूर्णता आणि दोषहीनता यांचा समावेश होतो. “सचोटी” या शब्दाशी संबंधित असलेल्या मूळ हिब्रू शब्दांचा अर्थ दोषहीन, पूर्ण, किंवा निष्कलंक असा आहे. यांपैकी एक शब्द यहोवाला अर्पण केल्या जाणाऱ्‍या बलिदानांच्या बाबतीत वापरलेला आहे. पशू बलिदान करणाऱ्‍यावर यहोवा प्रसन्‍न होण्यासाठी बलिदानाचा पशू दोषहीन किंवा पूर्ण असणे आवश्‍यक होते. (लेवीय २२:१९, २० वाचा.) जाणूनबुजून या आज्ञेचे उल्लंघन करून लुळेपांगळे, रोगी किंवा आंधळे पशू अर्पण करणाऱ्‍यांची यहोवाने कडक शब्दांत निर्भर्त्सना केली.—मला. १:६-८.

५, ६. (क) उत्तम प्रतीच्या किंवा संपूर्ण असलेल्या गोष्टी आपल्याला मौल्यवान वाटतात हे कोणत्या उदाहरणांवरून दिसते? (ख) अपरिपूर्ण मानवांच्या बाबतीत, सचोटी राखणे म्हणजे परिपूर्ण असणे असा अर्थ होतो का? स्पष्ट करा.

उत्तम प्रतीच्या किंवा संपूर्ण असलेल्या गोष्टींचा शोध घेणे आणि त्यांचे मोल जाणणे ही काही नवीन गोष्ट नाही. उदाहरणार्थ, पुस्तकांचा संग्रह करणाऱ्‍या एका माणसाला खूप शोधाशोध केल्यावर एक मौल्यवान पुस्तक सापडते, पण त्यातली महत्त्वाची पानेच गायब असतात. निराश होऊन तो ते पुस्तक परत तेथेच ठेवेल. एक स्त्री दुकानातून अंडी विकत घेत आहे. ती कशा प्रकारची अंडी घेईल? दुकानदाराने दिलेली अंडी ती न तपासताच घेईल का? नाही. ती प्रत्येक अंडे, ते पिचकलेले तर नाही किंवा नासलेले तर नाही हे नीट तपासून पाहील. सर्व अंडी शाबूत आहेत याची ती खात्री करूनच मग ती ते विकत घेईल. त्याच प्रकारे, देवही अशा लोकांना शोधतो ज्यांना पूर्णत्वाची जाणीव आहे.—२ इति. १६:९.

पण, सचोटी राखण्यासाठी परिपूर्ण असणे आवश्‍यक आहे असे तुम्हाला वाटत असेल. पापामुळे व अपरिपूर्णतेमुळे, आपण एका अपुऱ्‍या पुस्तकाप्रमाणे किंवा पिचकलेल्या अंड्याप्रमाणे आहोत असा कदाचित आपण विचार करण्याची शक्यता आहे. कधीकधी तुम्हालाही असे वाटते का? आपण सर्वार्थाने परिपूर्ण असावे अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही हे जाणून तुम्हाला दिलासा मिळेल. आपल्याला जमणार नाही अशा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा तो आपल्याकडून कधीही करत नाही. * (स्तो. १०३:१४; याको. ३:२) पण, आपण सचोटी राखावी अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. तर मग, परिपूर्णता आणि सचोटी यात काही फरक आहे का? होय. उदाहरणार्थ, एका तरुणाचे एका तरुणीवर प्रेम आहे आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे. त्याने जर तिच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा केली तर हा मूर्खपणाच ठरेल. पण, तिने केवळ आपल्यावर संपूर्ण मनाने प्रेम करावे अशी अपेक्षा करण्यात काहीही वावगे नाही. त्याच प्रकारे, यहोवा “ईर्ष्यावान्‌ [“अनन्य भक्‍तीची अपेक्षा करणारा,” NW] देव आहे.” (निर्ग. २०:५) आपण परिपूर्ण असावे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करत नाही, पण आपण संपूर्ण मनाने त्याच्यावर प्रेम करावे, केवळ त्याचीच उपासना करावी अशी तो अपेक्षा करतो.

७, ८. (क) सचोटी राखण्याच्या बाबतीत येशूने कोणता कित्ता घालून दिला? (ख) शास्त्रवचनानुसार सचोटीचा काय अर्थ होतो?

सर्व नियमांमध्ये सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती, असे जेव्हा येशूला विचारण्यात आले तेव्हा त्याने दिलेले उत्तर आपल्याला आठवत असेल. (मार्क १२:२८-३० वाचा.) त्याने फक्‍त उत्तरच दिले नाही तर, दिलेल्या उत्तरानुसार तो वागला देखील. संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने यहोवावर प्रीति करण्याच्या बाबतीत त्याने आपल्यासाठी एक कित्ता घालून दिला. सचोटी केवळ बोलण्यात नव्हे तर शुद्ध हेतू बाळगून केलेल्या कृतींद्वारे दिसून येते, हे त्याने दाखवून दिले. आपणही जर सचोटी राखू इच्छितो तर आपण येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे.—१ पेत्र २:२१.

तेव्हा, शास्त्रवचनानुसार हाच सचोटीचा अर्थ होतो: स्वर्गीय देव यहोवा याची संपूर्ण मनाने अनन्य भक्‍ती करणे व त्याने प्रकट केलेली इच्छा व उद्देश पूर्ण करणे. दैनंदिन जीवनात सचोटी राखण्याचा अर्थ, आपण सर्व गोष्टींमध्ये सर्वात आधी यहोवा देवाला संतुष्ट करायचा प्रयत्न करू. तो ज्या गोष्टींना महत्त्वाच्या समजतो त्या गोष्टींना आपणही आपल्या जीवनात प्राधान्य देऊ. असे करणे महत्त्वाचे का आहे याची तीन कारणे आपण पाहू या.

१. आपली सचोटी आणि यहोवाच्या सार्वभौमत्वाचा वादविषय

९. आपली सचोटी आणि विश्‍वव्यापी सार्वभौमत्वाचा वादविषय यांच्यात काय संबंध आहे?

आपल्या सचोटीवर यहोवाचे सार्वभौमत्व अवलंबून नाही. त्याचे सार्वभौमत्व न्याय्य, चिरकाल व सर्वव्यापी आहे. कोणीही काहीही म्हटले किंवा केले तरी ते असेच राहील. पण, स्वर्गात व पृथ्वीवर देवाच्या सार्वभौमत्वावर खूप मोठा कलंक लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्य करण्याचा देवाचा अधिकार, उचित, न्याय्य व प्रेमळ आहे हे सर्व बुद्धिमान प्राण्यांपुढे शाबीत झाले पाहिजे. देवाला आपल्या सृष्टीवर राज्य करण्याचा हक्क आहे याविषयी जे ऐकू इच्छितात त्या सर्व लोकांना यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण ही गोष्ट समजावून सांगण्याकरता संधी शोधत असतो. पण आपण स्वतः यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या बाजूने कसे उभे राहू शकतो? यहोवाला आपण आपला सार्वभौम राजा म्हणून निवडले आहे हे आपण कसे दाखवून देऊ शकतो? सचोटी राखण्याद्वारे!

१०. मानवजातीच्या सचोटीविषयी सैतानाने कोणता आरोप लावला आहे व या आरोपाला तुम्ही कशा प्रकारे प्रतिसाद द्याल?

१० तुमची सचोटी कशी गोवलेली आहे ते पाहा. सैतानाने खरे तर असा दावा केला, की कोणताही मानव देवाच्या सार्वभौमत्वाच्या बाजूने उभा राहू शकत नाही व स्वतःचा स्वार्थ साधल्याशिवाय देवावर प्रेम करू शकत नाही. स्वर्गात जमलेल्या देवदूतांच्या एका मोठ्या समुदायापुढे त्याने यहोवाला म्हटले: “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” (ईयो. २:४) सैतानाने फक्‍त धार्मिक मनुष्य ईयोब याच्यावरच हा दोषारोप लावला नव्हता तर संपूर्ण मानवजातीवर लावला होता. म्हणूनच तर बायबलमध्ये सैतानाला “आमच्या बंधूंना दोष देणारा” असे संबोधले आहे. (प्रकटी. १२:१०) सर्व ख्रिस्ती—म्हणजे तुम्हीसुद्धा—यहोवाशी विश्‍वासू राहणार नाही, असा तो यहोवाला टोमणा देत आहे. वेळ आलीच तर तुम्ही यहोवाला सोडून द्याल, असा सैतानाचा दावा आहे. तुमच्यावर लावलेला हा आरोप ऐकून तुम्हाला कसे वाटते? सैतान खोटा आहे हे सिद्ध करण्याची तुम्ही संधी पाहाल, नाही का? सचोटी राखण्याद्वारे तुम्ही हे सिद्ध करू शकता.

११, १२. (क) आपण दररोज जे निर्णय घेतो त्यांचा आपल्या सचोटीच्या वादविषयाशी संबंध आहे हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते? (ख) सचोटी राखणे हा एक सुहक्क का आहे?

११ त्यामुळे सचोटी राखताना तुम्हाला तुमचे नेहमीचे वर्तन व तुम्ही करत असलेल्या निवडी याकडे लक्ष दिले पाहिजे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्या तीन प्रसंगांचा पुन्हा एकदा विचार करा. तिन्ही प्रसंगांतील व्यक्‍तींनी आपली सचोटी कशी राखली? त्या मुलाचे शाळासोबती त्याची खिल्ली उडवत असतात तेव्हा त्याला त्यांना अद्दल घडवण्याचा मोह होतो खरा पण त्याला बायबलमधला पुढील सल्ला आठवतो: “प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” (रोम. १२:१९) तो मुलगा तिथून निघून जातो. इंटरनेटचा उपयोग करत असताना तो पती, कामोत्तेजक साहित्य पाहू शकला असता, पण त्याला ईयोबाच्या शब्दांत दडलेले तत्त्व आठवते: “मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयो. ३१:१) यामुळे मग हा पती, ती बीभत्स चित्रे पाहण्याचे टाळतो; ती जणू विष आहेत, असा विचार तो करतो. इतर बहिणींसोबत गप्पा मारणारी भगिनी जेव्हा कोणाविषयी तरी चहाडी चाललेली आहे हे ऐकते तेव्हा तिला बायबलमधील हा सल्ला आठवतो: “आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्‍याची उन्‍नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.” (रोम. १५:२) तिनेही जर चहाडीत भाग घेतला तर त्यांच्या गप्पा निश्‍चित्तच उन्‍नतीकारक ठरणार नाहीत. अशा प्रकारच्या चहाडीमुळे तिच्या ख्रिस्ती भगिनीचे नाव खराब होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे तिचा स्वर्गीय पिता संतुष्ट होणार नाही. म्हणून ती स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवते आणि विषय बदलते.

१२ या तिन्ही प्रसंगी ख्रिस्ती व्यक्‍तीने एक निवड केली व आपल्या कार्यातून जणू काय असे बोलून दाखवले, की ‘यहोवा माझा शासक आहे. याबाबतीत तो ज्यामुळे संतुष्ट होईल तेच मी करायचा प्रयत्न करेन.’ तुम्ही देखील कोणतीही निवड करताना किंवा निर्णय घेताना, यहोवाला संतुष्ट करायचा प्रयत्न करता का? असल्यास तुम्हीही मग नीतिसूत्रे २७:११ मधील शब्दांचे पालन करीत आहात. तिथे असे म्हटले आहे: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” आपल्याला किती मोठा सुहक्क मिळाला आहे! आपण यहोवाचे मन आनंदित करू शकतो! तेव्हा, आपली सचोटी टिकवून ठेवण्याकरता आपल्याला कितीही त्याग करावे लागले तरी चालतील, नाही का?

२. आपल्या सचोटीच्या आधारावर यहोवा न्याय करतो

१३. आपल्या सचोटीच्या आधारावर यहोवा आपला न्याय करतो, हे आपल्याला ईयोब व दावीद यांच्या शब्दांवरून कसे कळते?

१३ सचोटी राखण्यामुळे आपण यहोवाच्या सार्वभौमत्वाची बाजू घेऊ शकतो. आणि याच आधारावर यहोवा आपला न्याय करू शकतो. ईयोबाला ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजली होती. (ईयोब ३१:६ वाचा.) ईयोबाला माहीत होते, की यहोवा देव सर्व मानवजातीला ‘न्यायाच्या ताजव्यात तोलतो;’ न्यायाच्या परिपूर्ण मापाने आपली सचोटी मोजतो. दाविदाने देखील असे म्हटले: “परमेश्‍वर लोकांचा न्याय करितो; माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्विकतेप्रमाणे [“सचोटीप्रमाणे,” NW] हे परमेश्‍वरा, माझा न्याय कर. . . . न्यायी देव मने व अंत:करणे पारखणारा आहे.” (स्तो. ७:८, ९) देव आपल्या अगदी अंतर्मनात डोकावून पाहू शकतो. आपल्या लाक्षणिक ‘मनात व अंतःकरणात’ काय चालले आहे हे त्याला माहीत आहे. पण तो नेमके काय पाहतो हे आपल्याला माहीत असले पाहिजे. दाविदाने म्हटले, की आपल्या सचोटीनुसार तो आपला न्याय करेल.

१४. आपल्या अपरिपूर्ण, पापी स्वभावामुळे आपण सचोटी राखू शकत नाही, असा आपण निष्कर्ष का काढू नये?

१४ कल्पना करा, यहोवा देव आज कोट्यवधी लोकांची अंतःकरणे पारखत आहे. (१ इति. २८:९) ख्रिस्ती सचोटी राखणारे असे किती लोक त्याला सापडतात? फार कमी! पण यावरून आपण असा निष्कर्ष काढू नये, की आपल्या अपरिपूर्णतेमुळे आपण सचोटी राखूच शकत नाही. उलट, दावीद आणि ईयोबाप्रमाणे आपणही असा भरवसा बाळगू शकतो, की यहोवा जेव्हा आपल्या हृदयांची पारख करेल तेव्हा आपण अपरिपूर्ण असूनही सचोटी राखतो हे त्याला दिसून येईल. आपण परिपूर्ण असतो तर आपण सचोटी राखली असती अशी आपण शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या पृथ्वीवर फक्‍त तीन परिपूर्ण मानव होते. त्यापैकी दोघे, आदाम व हव्वा सचोटी राखू शकले नाहीत. तरीपण, अनेक अपरिपूर्ण मानवांनी सचोटी राखली आहे. आणि तुम्हीही राखू शकता.

३. आपल्या आशेसाठी सचोटी आवश्‍यक

१५. सचोटी आपल्या भविष्याच्या आशेसाठी आवश्‍यक आहे, हे दाविदाने कसे दाखवून दिले?

१५ आपल्या सचोटीच्या आधारावर यहोवा देव आपला न्याय करणार असल्यामुळे, भवितव्याच्या आशेसाठी आपण सचोटी राखण्याची गरज आहे. ही गोष्ट खरी आहे हे दाविदाला माहीत होते. (स्तोत्र ४१:१२ वाचा.) चिरकालासाठी देवाची संमती प्राप्त करण्याच्या आशेमुळे तो आनंदित होता. आजच्या अनेक विश्‍वासू खऱ्‍या ख्रिश्‍चनांप्रमाणे दाविदालाही अनंतकाळ जगण्याची, यहोवाची सेवा करता करता त्याच्या आणखी जवळ येण्याची आशा होती. ही आशा प्राप्त करण्याकरता आपल्याला सचोटी राखावी लागेल, हे दाविदाला माहीत होते. तसेच, आजही आपण सचोटी राखतो तेव्हा यहोवा आपल्या पाठीशी उभा राहतो. तो आपल्याला शिकवतो, शिवाय मार्गदर्शन व आशीर्वादही देतो.

१६, १७. (क) सचोटी राखण्याचा तुम्ही दृढ निश्‍चय का केला आहे? (ख) पुढील लेखात कोणत्या प्रश्‍नांची चर्चा करण्यात आली आहे?

१६ आत्ता आनंदी राहण्याकरताही आपल्याला आशेची गरज आहे. आपण जेव्हा कठीण परिस्थितीतून जात असतो तेव्हा ही आशा आपल्याला आनंदी ठेवते. या आशेमुळे आपल्या विचारांचे संरक्षण होते. बायबलमध्ये आशेची तुलना कशाशी केली आहे, आठवते का? (१ थेस्सलनी. ५:८) एक शिरस्त्राण जसे युद्धात लढायला गेलेल्या सैनिकाच्या डोक्याचे रक्षण करते तसेच आशा आपल्या मनाचे, या सैतानी जगाच्या नकारात्मक व निराशावादी विचारांपासून संरक्षण करते. या सैतानी जगाचा झपाट्याने ऱ्‍हास होत चालला आहे. आशा नसेल तर आपले जीवन निरर्थक बनते. यास्तव आपण अगदी प्रामाणिकपणे, आपली सचोटी आणि आपली आशा किती पक्की आहे हे वेळोवेळी तपासून पाहिले पाहिजे. सचोटी राखण्याद्वारे तुम्ही यहोवाचे सार्वभौमत्व उंचावता आणि भवितव्यासाठी असलेली मौल्यवान आशा जपून ठेवता ही गोष्ट विसरू नका. तेव्हा, आपली सचोटी कधीही कमी होऊ देऊ नका!

१७ सचोटी राखणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण, पुढे दिलेल्या काही प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे. आपण सचोटी कशी राखू शकतो? ती जपून कशी ठेवू शकतो? एखादा जर काही काळासाठी सचोटी राखू शकला नाही तर तो काय करू शकतो? पुढील लेखात या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली आहेत.

[तळटीप]

^ परि. 6 येशूने असे म्हटले होते: “ह्‍यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” (मत्त. ५:४८) एका अर्थाने, अपरिपूर्ण मानवसुद्धा संपूर्ण किंवा परिपूर्ण असू शकतात हे त्याला माहीत होते. इतरांवर उदारतेने प्रेम करण्याच्या आज्ञेचे पालन करून आपण देवाला आनंदित करू शकतो. पण, यहोवा सर्वार्थाने परिपूर्ण आहे. यहोवाच्या बाबतीत जेव्हा “सचोटी” हा शब्द वापरला जातो तेव्हा त्यात परिपूर्णतेचाही समावेश असतो.—स्तो. १८:३०.

तुमचे उत्तर काय?

• सचोटीचा काय अर्थ होतो?

• आपली सचोटी यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयाशी कशी संबंधित आहे?

• आपल्या सचोटीमुळे आपण आशा कशी बाळगू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[५ पानांवरील चित्रे]

दररोजच्या जीवनात आपल्या सचोटीची अनेक मार्गांनी परीक्षा होते