व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मार्ग हाच आहे. याने चला”

“मार्ग हाच आहे. याने चला”

“मार्ग हाच आहे. याने चला”

अमिलिया पिडरसन यांची जीवनकथा

रूथ ई. पॅपस यांच्याद्वारे कथित

माझी आई अमिलिया पिडरसन हिचा जन्म १८७८ मध्ये झाला. ती एक शिक्षिका होती. पण खरं तर, लोकांना देवाबद्दल जाणून घेण्यास मदत करण्याची तिची मनस्वी इच्छा होती. याचा एक पुरावा म्हणजे अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील जॅस्पर नावाच्या लहानशा शहरातील आमच्या घरात ठेवलेली एक भली मोठी पेटी. आईनं ती पेटी आपलं सामान चीनला नेण्यासाठी आणली होती. तिथं जाऊन मिशनरी म्हणून सेवा करण्याचं तिचं स्वप्न होतं. पण, तिच्या आईचा मृत्यू झाल्यामुळे धाकट्या भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. त्यामुळे चीनला जाण्याचा विचार तिला सोडून द्यावा लागला. १९०७ मध्ये थिअडोर होलीन यांच्याशी तिचा विवाह झाला. २ डिसेंबर, १९२५ रोजी माझा जन्म झाला. सात भावंडांपैकी मी सर्वात धाकटी.

आईच्या मनात बायबलविषयी अनेक प्रश्‍न होते. आणि ती या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्यास अतिशय उत्सुक होती. यांपैकी एक प्रश्‍न, नरकाच्या अग्नीत दुष्ट लोकांना यातना दिल्या जातात या शिकवणीसंबंधी होता. ही शिकवण खरंच बायबलमध्ये आहे का असं तिनं आमच्या शहरात आलेल्या लुथरन चर्चच्या एका पाळकाला विचारलं. तेव्हा त्यानं एवढंच सांगितलं की बायबलची शिकवण काहीही असो, पण नरकाग्नीविषयी शिकवणं आवश्‍यक आहे.

सत्य जाणून घेण्याची तिची इच्छा पूर्ण झाली

विसावं शतक सुरू झाल्यावर काही काळानं माझी मावशी एमा, मिनेसोटातील नॉर्थफिल्ड येथे संगीत शिकण्यास गेली. तिथं ती आपले संगीत शिक्षक मिल्यूस क्रिस्चनसन यांच्या घरी राहत होती. क्रिस्चनसन यांची पत्नी बायबल विद्यार्थ्यांपैकी एक होती, ज्यांना आज यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखलं जातं. आपली एक बहीण भक्‍तिभावानं बायबल वाचते असं एमानं त्यांना सांगितलं. त्याच्या काही दिवसांनंतर श्रीमती क्रिस्चनसन यांनी आईला एक पत्र लिहून तिला बायबलबद्दल असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं दिली.

एके दिवशी, लॉरा ओथाउट नावाची एक बायबल विद्यार्थी जॅस्पर मध्ये प्रचार करण्यासाठी दक्षिण डकोटा राज्यातील सू फॉल्झ येथून रेल्वेनं आली. तिनं दिलेल्या बायबल साहित्याचा आईनं अभ्यास केला. आणि १९१५ मध्ये, बायबलमधील सत्यांविषयी ती इतरांना सांगू लागली आणि लॉरानं आणलेलं बायबलवर आधारित साहित्य वाटू लागली.

१९१६ मध्ये, आयोवातील सू सिटी येथे चार्ल्‌झ टेझ रस्सल अधिवेशनासाठी येत असल्याचं आईनं ऐकलं. तिला या अधिवेशनाला उपस्थित राहायचं होतं. एव्हाना, माझ्या पाच भावंडांचा जन्म झाला होता. धाकटा मार्वन तर फक्‍त पाच महिन्यांचा होता. तरीही, आईनं सर्व मुलांना घेऊन सू सिटीतील अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी रेल्वेनं १६० किलोमीटरचा प्रवास केला. तिथं तिला बंधू रस्सल यांची भाषणं ऐकायला मिळाली, तसंच “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” हा चित्रपटही तिनं पाहिला. याच अधिवेशनात तिचा बाप्तिस्मा झाला. घरी परतल्यावर, तिनं या अधिवेशनाबद्दल एक लेख लिहिला जो जॅस्पर जर्नल या बातमीपत्रात प्रकाशित करण्यात आला.

१९२२ मध्ये, ओहायोतील सीडर पॉईंट येथे झालेल्या अधिवेशनात हजर राहिलेल्या १८,००० जणांपैकी आई देखील एक होती. त्या अधिवेशनानंतर तिनं देवाच्या राज्याची घोषणा करण्याचं कधीही थांबवलं नाही. तिच्या आदर्शामुळे आम्हाला पुढील सल्ल्याचं पालन करण्याचं प्रोत्साहान मिळालं: “हाच मार्ग आहे. याने चला.”—यश. ३०:२१.

साक्षकार्याचे चांगले परिणाम

१९२० च्या दशकाच्या सुरुवातीला, आईबाबांनी जॅस्परच्या बाहेर एक नवीन घर घेतलं. बाबांचा व्यवसाय उत्तम चालला होता. शिवाय, त्यांच्यावर एका मोठ्या कुटुंबाची जबाबदारी होती. आईप्रमाणे ते जरी बायबलचा जास्त अभ्यास करत नसले, तरी आमच्या प्रचार कार्याला त्यांचा पाठिंबा होता. शिवाय, आमच्या घरी पिलग्रिम्सचं नेहमीच स्वागत केलं जात असे. त्या काळी प्रवासी पर्यवेक्षकांना पिलग्रिम्स म्हणत. प्रवासी बांधव जेव्हा कधी आमच्या घरी एखादं भाषण देत, तेव्हा शंभराच्या वर लोक हजर राहत आणि आमच्या घराची बैठक, डाईनिंग रूम, आणि बेडरूम खचाखच भरून जात असे.

मी जवळजवळ सात वर्षांची असताना माझी मावशी लेटी हिनं तिचे शेजारी एड लार्सन आणि त्यांची पत्नी यांना बायबल अभ्यास करण्याची इच्छा असल्याचं आईला फोन करून सांगितलं. त्यांनी उत्सुकतेनं बायबलमधील सत्ये स्वीकारली. नंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्‍या मार्था वॅन डॉलन हिलाही आपल्यासोबत बायबल अभ्यासात सहभागी होण्यास त्यांनी बोलावलं. मार्थाला आठ मुलं होती. ती व तिचं सबंध कुटुंब बायबल विद्यार्थी बनले. *

त्याच सुमारास, आमच्या घरापासून काही मैलांवर राहणारा गॉर्डन कॅमरूड हा तरुण बाबांबरोबर काम करू लागला. गॉर्डनला कुणीतरी आधीच बजावलं होतं: “साहेबांच्या मुलींपासून जरा सांभाळूनच राहा. त्या कोणतातरी विचित्र धर्म मानतात.” तरीसुद्धा, गॉर्डन बायबलचा अभ्यास करू लागला आणि हेच सत्य आहे अशी त्याला लवकरच खातरी पटली. तीन महिन्यांनी त्याचा बाप्तिस्मा झाला. त्याच्या आईवडिलांनीही सत्य स्वीकारलं. आमच्यात, म्हणजेच होलीन, कॅमरूड आणि वॅन डॉलन या कुटुंबांमध्ये चांगलाच घरोबा निर्माण झाला.

अधिवेशनांतून मिळालेलं प्रोत्साहन

सीडर पॉईंट येथील अधिवेशनामुळे आईला इतकं प्रोत्साहन मिळालं की एकही अधिवेशन कधी चुकवायचं नाही असं तिनं ठरवून टाकलं. लहानपणी आम्ही दूरदूर प्रवास करून अधिवेशनांना उपस्थित राहिल्याचं मला आठवतं. १९३१ साली ओहायोतील कलंबस इथं झालेलं अधिवेशन खास आठवणीत राहिलं. कारण, तिथंच यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारण्यात आलं होतं. (यश. ४३:१०-१२) १९३५ साली वॉशिंग्टन डी. सी. मध्ये झालेलं अधिवेशन देखील मला चांगलंच आठवतं. या अधिवेशनातील एका ऐतिहासिक भाषणात प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेला “मोठा लोकसमुदाय” कुणाला सूचित करतो हे स्पष्ट करण्यात आलं होतं. (प्रकटी. ७:९) त्या अधिवेशनात बाप्तिस्मा झालेल्या ८०० जणांमध्ये लिलियन व युनिस या माझ्या दोन बहिणीसुद्धा होत्या.

१९३७ साली ओहायोतील कलंबस; १९३८ साली वॉशिंग्टन मधील सिॲटल; आणि १९३९ साली न्यूयॉर्क सिटी इथं झालेल्या अधिवेशनांना आमचं कुटुंब उपस्थित राहिलं. वॅन डॉलन आणि कॅमरूड ही कुटंबं, शिवाय आणखी काही जण आमच्यासोबत होते. वाटेत ठिकठिकाणी मुक्काम करत आम्ही प्रवास केला. १९४० साली युनिसचं लग्न लीओ वॅन डॉलन याच्याशी झालं. ते दोघेही नंतर पायनियरिंग करू लागले. त्याच वर्षी, लिलियनचं लग्न गॉर्डन कॅमरूड याच्याशी झालं आणि त्यांनीही पायनियर सेवा सुरू केली.

१९४१ साली मिझूरीतील सेंट लुइस इथं झालेलं अधिवेशन खास होतं. त्यात हजारो मुलांना चिल्ड्‌रन (इंग्रजी) हे पुस्तक मिळालं. या अधिवेशनामुळे माझ्या जीवनाला एक वेगळंच वळण लागलं. त्यानंतर, १ सप्टेंबर, १९४१ रोजी माझा भाऊ मार्वन, त्याची पत्नी जॉइस आणि मी पायनियर सेवा सुरू केली. तेव्हा मी १५ वर्षांची होते.

त्या काळी, अधिवेशनं सहसा कापणीच्या काळात असायची. पण बहुतेक बांधवाची घरची शेती असल्यामुळे, सर्वांनाच अधिवेशनाला उपस्थित राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे, जे हजर राहू शकले नाहीत त्यांनाही फायदा व्हावा म्हणून, अधिवेशनानंतर घरामागच्या अंगणात एकत्र जमून आम्ही अधिवेशनाची उजळणी करायचो. त्या चर्चा किती आनंददायक असायच्या!

गिलियड प्रशिक्षण आणि परदेशातील नेमणुका

पायनियरांना मिशनरी सेवेचे प्रशिक्षण देण्यासाठी, १९४३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात गिलियड प्रशालेची स्थापना करण्यात आली. पहिल्या वर्गात वॅन डॉलन कुटुंबाच्या सहा सदस्यांचा समावेश होता. एमील, आर्थर, होमर, आणि लीओ; त्यांचा चुलत भाऊ डॉनल्ड; आणि लीओची पत्नी म्हणजेच माझी बहीण युनिस. या सर्वांशी परत कधी भेट होईल हे माहीत नसल्यामुळे, आम्ही जड हृदयानं त्यांचा निरोप घेतला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सहाही जणांना प्वेर्टोरिको या देशात सेवा करण्यास नेमण्यात आलं. तेव्हा तिथं बोटांवर मोजण्याइतके साक्षीदार होते.

एका वर्षानंतर, लिलियन आणि गॉर्डन तसेच, मार्वन आणि जॉइस हे गिलियडच्या तिसऱ्‍या वर्गाला उपस्थित राहिले. त्यांनाही प्वेर्टोरिकोला पाठवण्यात आलं. नंतर, सप्टेंबर १९४४ मध्ये, वयाच्या १८ व्या वर्षी, मी गिलियडच्या ४ थ्या वर्गाला उपस्थित राहिले. १९४५ सालच्या फेब्रुवारी महिन्यात, गिलियड प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मला देखील प्वेर्टोरिकोला माझ्या भावंडांकडं पाठवण्यात आलं. माझ्यापुढं जणू अनेक नव्या संधींचं दालनच उघडलं. तसं, स्पॅनिश भाषा शिकणं एक आव्हान होतं. तरीही, लवकरच आमच्यापैकी काही जण २० पेक्षा जास्त बायबल अभ्यास चालवू लागले. यहोवानं आमच्या कार्याला आशीर्वाद दिला. आज प्वेर्टोरिकोत २५,००० पेक्षा जास्त साक्षीदार आहेत.

आमच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं

लीओ व युनिस यांच्या मुलाचा, म्हणजे मार्कचा, १९५० मध्ये जन्म झाल्यावर ते प्वेर्टोरिकोतच राहिले. १९५२ मध्ये नातेवाईकांना भेटायला घरी परत जाण्याचा त्यांचा बेत होता. ११ एप्रिल रोजी ते विमानानं निघाले. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, विमानानं उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात ते समुद्रात कोसळलं. लीओ व युनिस यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. दोन वर्षांचा मार्क मात्र समुद्रात पाण्यावर तरंगत असलेला सापडला. दुर्घटनेतून बचावलेल्या एकानं त्याला एका जीवनरक्षक नौकेत फेकलं. कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वास दिल्यानंतर तो वाचला. *

पाच वर्षांनंतर, ७ मार्च, १९५७ रोजी आईबाबा किंगडम हॉलला जात असताना त्यांची कार पंक्चर झाली. रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून टायर बदलत असताना, वेगानं येणाऱ्‍या एका कारनं बाबांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. समाजातील बरेच लोक बाबांचा आदर करत असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीच्या भाषणाला जवळजवळ ६०० जण उपस्थित होते. या सर्वांना चांगली साक्ष मिळाली.

नवीन नेमणुका

बाबांच्या मृत्यूच्या काही दिवसांअगोदर, मला अर्जेंटिनामध्ये सेवा करण्यास नेमण्यात आलं होतं. ऑगस्ट १९५७ मध्ये, अँडीज पर्वतांच्या पायथ्याशी वसलेल्या मेन्डोझा शहरात मी आले. १९५८ मध्ये, गिलियड प्रशालेच्या ३० व्या वर्गातून पदवीधर झालेल्या जॉर्ज पॅपस यांनाही अर्जेंटिनात नेमण्यात आलं. जॉर्ज आणि माझी चांगली मैत्री जमली. आणि एप्रिल १९६० मध्ये आमचं लग्न झालं. १९६१ मध्ये, वयाच्या ८३ व्या वर्षी आईचं निधन झालं. खऱ्‍या उपासनेच्या मार्गात ती शेवटपर्यंत विश्‍वासूपणे चालत राहिली. आणि कितीतरी लोकांना या मार्गावर येण्यास तिनं मदत केली.

दहा वर्षं जॉर्ज व मी निरनिराळ्या मिशनरी गृहांत इतर मिशनऱ्‍यांसोबत सेवा केली. त्यानंतर, सात वर्षं आम्ही विभागातील मंडळ्यांना भेटी देण्याचं काम केलं. १९७५ साली आजारी असलेल्या आमच्या काही कुटुंबियांना मदत करण्यासाठी आम्ही अमेरिकेला परतलो. १९८० साली माझ्या पतींना स्पॅनिश भाषिक मंडळ्यांना भेटी देण्यास नेमण्यात आलं. त्या काळी अमेरिकेत जवळजवळ ६०० स्पॅनिश मंडळ्या होत्या. पुढच्या २६ वर्षांत त्यांपैकी अनेक मंडळ्यांना आम्ही भेटी दिल्या. हळूहळू या मंडळ्यांची संख्या वाढत जाऊन ३,००० पर्यंत पोचली.

कुटुंबातील इतर जणही खऱ्‍या उपासनेच्या ‘मार्गावर’

आपल्या कुटुंबातील तरुण सदस्यांना पूर्ण वेळेच्या सेवेत उतरताना पाहण्याचा आनंदही आईनं अनुभवला. उदाहरणार्थ, माझी सर्वात मोठी बहीण एस्टर हिची मुलगी कॅरल १९५३ पासून पायनियर सेवा करू लागली. डेनिस ट्रम्बोरशी तिचं लग्न झालं आणि तेव्हापासून ते दोघंही पूर्ण वेळेची सेवा करत आहेत. एस्टरची दुसरी मुलगी लोइस हिचं वेन्डल जेन्सनशी लग्न झालं. ते दोघं गिलियडच्या ४१ व्या वर्गाला उपस्थित राहिले आणि नायजीरियात त्यांनी १५ वर्षं मिशनरी सेवा केली. विमान दुर्घटनेत मार्कच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर, लीओची बहीण रूथ ले लाँड व तिचे पती कर्टिस यांनी त्याला दत्तक घेतलं व वाढवलं. मार्क आणि त्याची पत्नी लवॉन यांनी कित्येक वर्षं पायनियर सेवा केली आणि आपल्या चार मुलांचं संगोपन खऱ्‍या उपासनेच्या ‘मार्गातच’ केलं.—यश. ३०:२१.

माझ्या भावंडांपैकी एकटाच उरलेला माझा भाऊ ऑर्लन यानं आता नव्वदी पार केली आहे. तो अजूनही विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहे. जॉर्ज आणि मीसुद्धा आनंदानं पूर्ण वेळेची सेवा करत आहोत.

आईची एक मौल्यवान ठेव

आईच्या प्रिय वस्तुंपैकी एक माझ्याजवळ आहे—तिचा लिहिण्याचा टेबल. हा टेबल बाबांनी तिला लग्नाच्या वेळी भेट म्हणून दिला होता. टेबलाच्या एका ड्रॉवरमध्ये तिचं एक जुनं स्क्रॅपबुक (कात्रणं चिकटवण्याची वही) आहे. त्यात तिनं लिहिलेली पत्रं व वृत्तपत्रांत प्रकाशित झालेले तिचे लेख आहेत. या लेखांद्वारे तिला देवाच्या राज्याबद्दल साक्ष देता आली. यांपैकी काही लेख तर १९०० च्या दशकाच्या अगदी सुरुवातीला लिहिलेली आहेत. या टेबलातील ड्रॉवरमध्ये तिच्या मिशनरी मुलांनी लिहिलेली व तिनं अतिशय जपून ठेवलेली पत्रंही आहेत. ही पत्रं पुन्हा पुन्हा वाचायला मला खूप आवडतं! तिनं आम्हाला लिहिलेली पत्रं देखील सकारात्मक विचारांनी भरलेली व अतिशय प्रोत्साहनदायक असायची. मिशनरी बनण्याचं आईचं स्वप्न तर अपूरंच राहिलं, पण मिशनरी सेवेसाठी असलेल्या तिच्या आवेशामुळे, येणाऱ्‍या पिढ्यांतील कितीतरी जणांना प्रेरणा मिळाली. पृथ्वीवरील नंदनवनात आईबाबांना, तसंच माझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना मला भेटता येईल त्या दिवसाची मी आतुरतेनं वाट पाहत आहे!—प्रकटी. २१:३, ४.

[तळटीपा]

^ परि. 13 एमील एच. वॅन डॉलन यांची जीवनकथा टेहळणी बुरूज, जून १५, १९८३ (इंग्रजी) यातील पृष्ठे २७-३० वर सापडेल.

^ परि. 24 सावध राहा! जून २२, १९५२ (इंग्रजी) या अंकातील पृष्ठे ३-४ वरील माहिती पाहा.

[१७ पानांवरील चित्र]

अमिलिया पिडरसन

[१८ पानांवरील चित्र]

१९१६: आई, बाबा (मार्वनला घेऊन); खाली, डावीकडून उजवीकडे: ऑर्लन, एस्टर, लिलियन, मिल्ड्रड

[१९ पानांवरील चित्र]

लीओ आणि युनिस, मृत्यूच्या थोड्याच काळाआधी

[२० पानांवरील चित्र]

१९५०: डावीकडून उजवीकडे, वर: एस्टर, मिल्ड्रड, लिलियन, युनिस, रूथ; खाली: ऑर्लन, आई, बाबा, आणि मार्वन

[२० पानांवरील चित्र]

२००१ साली, जॉर्ज आणि रूथ पॅपस विभागीय कार्यात