नीतिमान सर्वकाळ देवाची स्तुती करतील
नीतिमान सर्वकाळ देवाची स्तुती करतील
“नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. . . . त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील.” —स्तो. ११२:६, ९.
१. (क) यहोवाच्या नजरेत नीतिमान असणाऱ्या मानवांसमोर कोणते भवितव्य आहे? (ख) पण आपल्या मनात कोणता प्रश्न निर्माण होऊ शकतो?
देवाच्या नजरेत नीतिमान असलेल्या सर्व मानवांसमोर किती उज्ज्वल भवितव्य! यहोवाच्या उत्कृष्ट गुणांविषयी शिकण्याचा त्यांना कधीही कंटाळा येणार नाही. उलट देवाच्या सृष्टीकार्यांविषयी ते जितके अधिक शिकतात तितके अधिक ते देवाची स्तुती करण्यास उत्साहित होतात. या उज्ज्वल भवितव्याचा लाभ घेण्यासाठी आपण “नीतिमान” असणे अत्यंत जरूरीचे आहे, असे स्तोत्र ११२ यात सांगितले आहे. पण पवित्र व नीतिमान असलेल्या यहोवा देवाच्या नजरेत, पापी मानव नीतिमान कसे ठरू शकतात? कारण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याकडून चुका होतातच. आणि कधीकधी तर आपल्या हातून गंभीर पापही घडते.—रोम. ३:२३; याको. ३:२.
२. पापी असतानाही आपण यहोवा देवाच्या नजरेत नीतिमान ठरावे म्हणून त्याने कोणते दोन चमत्कार घडवून आणले?
२ पापी असतानाही यहोवाच्या नजरेत आपण नीतिमान ठरावे म्हणून त्याने काय केले? त्याने यावर एक अगदी प्रेमळ उपाय काढला. सर्वात प्रथम, त्याने आपल्या परमप्रिय स्वर्गीय पुत्राचे जीवन एका कुमारिकेच्या पोटी चमत्कारिकपणे स्थलांतरित केले. आपल्या पुत्राचा एक परिपूर्ण मानव लूक १:३०-३५) पुढे, येशूच्या वैऱ्यांनी त्याला ठार मारले तेव्हा यहोवाने आणखीन एक विलक्षण चमत्कार केला. एक गौरवशाली आत्मिक प्राणी म्हणून देवाने त्याला पुन्हा जिवंत केले.—१ पेत्र ३:१८.
म्हणून जन्म व्हावा म्हणून त्याने हे पाऊल उचलले. (३. आपल्या पुत्राला अविनाशी स्वर्गीय जीवन बहाल करण्यास यहोवा आनंदित का होता?
३ यहोवाने आपल्या पुत्राला त्याच्या मानवपूर्व अस्तित्वात असताना त्याच्याजवळ जे नव्हते ते त्याला दिले अर्थात अविनाशी स्वर्गीय जीवन बहाल केले. (इब्री ७:१५-१७, २८) असे करण्यास यहोवाला आनंद वाटला कारण सगळ्यात खडतर परीक्षेतही येशू शेवटपर्यंत विश्वासू राहिला होता. मानव, देवावर असलेल्या अतूट प्रेमामुळे नव्हे तर केवळ स्वार्थी कारणांसाठी त्याची उपासना करतात असा खोटा दावा सैतानाने केला होता. परंतु, येशू शेवटपर्यंत विश्वासू राहिल्यामुळे यहोवा, सैतानाच्या या खोट्या दाव्यास अगदी चोख प्रत्युत्तर देऊ शकला.—नीति. २७:११.
४. (क) स्वर्गात गेल्यानंतर येशूने आपल्यासाठी काय केले आणि त्यावर यहोवाची काय प्रतिक्रिया होती? (ख) यहोवा आणि येशू यांनी तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल वैयक्तिकपणे तुम्हाला कसे वाटते?
४ स्वर्गात गेल्यानंतर येशूने आणखीनही काही गोष्टी केल्या. ‘स्वतःच्या रक्ताचे’ मोल घेऊन तो “आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” येशूने, “आपल्या पापांबद्दल प्रायश्चित” म्हणून केलेले हे मौल्यवान अर्पण आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने स्वीकारले. त्यामुळे ‘शुद्ध सद्सद्विवेकबुद्धिने’ आपण ‘जिवंत देवाची सेवा’ करू शकतो. यास्तव, स्तोत्र ११२ च्या सुरुवातीच्या शब्दांत म्हटल्याप्रमाणे आपणही “परमेशाचे स्तवन करा,” असे म्हणण्यास प्रवृत्त होत नाही का?—इब्री ९:१२-१४, २४; १ योहा. २:२.
५. (क) यहोवाच्या नजरेत आपली नीतिमत्ता टिकवून ठेवण्याकरता आपण काय केले पाहिजे? (ख) मूळ हिब्रू भाषेत स्तोत्र १११ आणि स्तोत्र ११२ यांची मांडणी कशी करण्यात आली आहे?
५ यहोवाच्या नजरेत आपली नीतिमत्ता टिकवून ठेवण्याकरता येशूने आपल्याकरता वाहिलेल्या रक्तावर आपला कायम विश्वास असला पाहिजे. यहोवाने आपल्यावर केलेल्या या अपार प्रेमाबद्दल आपण दररोज न चुकता त्याचे आभार मानले पाहिजेत. (योहा. ३:१६) तसेच, आपण नेहमी देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे व त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे. देवासमोर एक शुद्ध विवेक बाळगण्यासाठी स्तोत्र ११२ यात उत्कृष्ट सल्ला दिला आहे. या स्तोत्राचा स्तोत्र १११ शी फार जवळचा सबंध आहे. मूळ हिब्रू भाषेत, या दोन्ही स्तोत्रांची सुरुवात “हालेलूया” या उद्गारांनी होते व त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक २२ वाक्यांची सुरुवात हिब्रू वर्णमालेतील २२ मूळाक्षरांनी होते. *
आनंदी होण्याचे कारण
६. स्तोत्र ११२ यातील परमेश्वराचे भय धरणारा “मनुष्य” कोणत्या अर्थाने धन्य आहे?
६“परमेशाचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतति पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.” (स्तो. ११२:१, २) पहिल्या वचनाच्या सुरुवातीला स्तोत्रकर्ता केवळ एका ‘मनुष्याचा’ उल्लेख करतो पण दुसऱ्या वचनाच्या शेवटी तो “सरळ जनांचा” असा अनेकवचनीय उल्लेख करतो हे लक्षात घ्या. यावरून, ११२ व्या स्तोत्रातील माहिती अनेक लोकांच्या समूहास लागू होऊ शकते हे सूचित होते. म्हणूनच, प्रेषित पौलानेही प्रेरित होऊन स्तोत्र ११२:९ हे वचन, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना लागू केले. (२ करिंथकर ९:८, ९ वाचा.) पृथ्वीवरील येशूचे अनुयायी आनंदी कसे राहू शकतात याचे या स्तोत्रात किती उत्तम वर्णन करण्यात आले आहे!
७. देवाच्या सेवकांनी त्याच्याबद्दलचे हितकर भय का बाळगले पाहिजे, आणि देवाच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी तुम्हाला कसे वाटले पाहिजे?
७स्तोत्र ११२:१ यात सूचित केल्यानुसार, खरे ख्रिश्चन “देवाचे भय” धरून आपले जीवन व्यतीत करतात तेव्हा ते हर्षित होतात. देवाबद्दल हितकर भय बाळगणे म्हणजे त्याला नाराज करणाऱ्या सर्व गोष्टी टाळणे. अशा प्रकारचे भय त्यांना सैतानी जगाच्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करण्यास मदत करते. आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यास व त्यातील आज्ञांचे पालन करण्यास ते ‘हर्षित’ होतात. या आज्ञांमध्ये, सबंध पृथ्वीवर देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याच्या आज्ञेचाही समावेश होतो. दुष्ट लोकांना देवाच्या न्यायदंडाच्या दिवसाविषयीचा इशारा देण्यासोबतच सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवण्याचा ते प्रयत्न करतात.—यहे. ३:१७, १८; मत्त. २८:१९, २०.
८. (क) देवाच्या लोकांना त्याच्या आज्ञांचे उत्साहाने पालन केल्यामुळे काय प्रतिफळ मिळाले आहे? (ख) पृथ्वीवरील जीवनाची आशा असणाऱ्या लोकांना भवितव्यात कोण-कोणते आशीर्वाद लाभतील?
८ अशा आज्ञांचे पालन केल्यामुळे आज पृथ्वीवरील देवाच्या सेवकांची संख्या सुमारे ७० लाखांच्या घरात गेली आहे. देवाचे लोक “पृथ्वीवर पराक्रमी” झाले आहेत यात कोणतीही शंका नाही. (योहा. १०:१६; प्रकटी. ७:९, १४) देव आपला उद्देश पूर्ण करील तेव्हा ते आणखीन किती ‘आशीर्वादित’ होतील! पृथ्वीवरील जीवनाची आशा असणारे लोक एक समूह या नात्याने येणाऱ्या “मोठ्या संकटातून” बचावतील व यांचीच मिळून एक “नवी पृथ्वी” तयार होईल ‘ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करेल.’ हर्मगिदोनातून बचावलेल्या लोकांना याहून अधिक ‘आशीर्वाद’ लाभतील. लाखो पुनरुत्थित लोकांचे स्वागत करण्यासाठी ते तयार असतील. खरोखर ते किती रोमांचकारी भवितव्य असेल! सरतेशेवटी, देवाच्या आज्ञांचे पालन करण्यात ज्यांना “हर्ष” होतो ते हळूहळू परिपूर्णता गाठतील व सदासर्वकाळ “देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता” अनुभवतील.—२ पेत्र ३:१३; रोम. ८:२१.
धनसंपत्तीचा सुज्ञ उपयोग
९, १०. खऱ्या ख्रिश्चनांनी आपल्या आध्यात्मिक धनसंपत्तीचा उपयोग कसा केला आहे आणि त्यांचे हे नीतिमान कार्य सर्वकाळ कसे टिकेल?
९“धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. सरळ जनांस अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही आहेत.” (स्तो. ११२:३, ४) बायबलच्या काळात, देवाचे काही सेवक श्रीमंत म्हणून ओळखले जायचे. पण, ज्यांच्यावर देवाचा अनुग्रह असतो असे लोक भौतिकरित्या श्रीमंत नसले तरी दुसऱ्या एका अर्थाने ते नक्कीच श्रीमंत होतात. खरे तर, देवाच्या नजरेत नम्र असलेले लोक येशूच्या दिवसांतील काही लोकांप्रमाणे कदाचित आर्थिकरित्या गरीब व लोकांच्या नजरेत तुच्छ असावेत. (लूक ४:१८; ७:२२; योहा. ७:४९) आपण आर्थिकरित्या श्रीमंत असोत अथवा गरीब, आध्यात्मिकरित्या श्रीमंत होणे शक्य आहे.—मत्त. ६:२०; १ तीम. ६:१८, १९; याकोब २:५ वाचा.
१० अभिषिक्त ख्रिस्ती व त्यांचे सोबती आपली आध्यात्मिक धनसंपत्ती स्वतःजवळच ठेवत नाहीत. तर सैतानाच्या अंधकारमय जगात त्यांनी “सरळ जनांस” “प्रकाश” दिला आहे. देवाच्या बुद्धीच्या व ज्ञानाच्या आध्यात्मिक धनसंपत्तीतून इतरांना लाभ घेण्यास मदत करण्याद्वारे ते असे करतात. विरोधकांनी राज्याचे प्रचारकार्य थांबवण्याचे बरेच प्रयत्न केले पण त्यांना यात काही यश आले नाही. उलट हे नीतिमान कार्य ‘सर्वकाळ टिकेल.’ परिक्षांमध्ये टिकून राहिल्यास देवाचे सेवक कायम जगण्याची, ‘सर्वकाळ टिकण्याची’ खात्री बाळगू शकतात.
११, १२. देवाचे लोक त्यांच्या जवळ असलेल्या भौतिक गोष्टींचा उपयोग कोण-कोणत्या प्रकारे करतात?
११ देवाच्या लोकांनी अर्थात अभिषिक्त दास वर्ग व “मोठा लोकसमुदाय” यांनी भौतिक धनसंपत्तीच्या बाबतीतही उदारता दाखवली आहे. स्तोत्र ११२:९ म्हणते: “त्याने सढळ हाताने गरिबास दान दिले आहे.” खरे ख्रिश्चन वेळोवेळी गरजवंत सहबांधवांना, इतकेच नव्हे तर शेजाऱ्यांनाही भौतिकरित्या मदत करतात. तसेच विपत्तीकाळात केल्या जाणाऱ्या मदत कार्यास ते मोठा हातभार लावतात. असे केल्यामुळे त्यांना आनंद होईल हे येशूने आधीच सुचवले होते.—प्रे. कृत्ये २०:३५; २ करिंथ. ९:७ वाचा.
१२ याशिवाय, तुमच्या हातात असलेल्या या नियतकालिकाचाही विचार करा. हे नियतकालिक १७२ भाषांमध्ये प्रकाशित करण्यासाठी बराच खर्च होतो. या भाषांपैकी बहुतेक भाषा बोलणारे लोक गरीब आहेत. तसेच, हे नियतकालिक मूकबधीर लोकांसाठी विविध संकेत भाषेत व अंधांसाठी ब्रेलमध्ये उपलब्ध केले जाते हेही लक्षात घ्या.
दयाळू व न्यायी
१३. दयाळूपणे देण्याच्या बाबतीत आपल्यासमोर कोणती सर्वोत्तम उदाहरणे आहेत आणि आपण त्यांचे अनुकरण कसे करू शकतो?
१३“जो मनुष्य दया करितो व उसने देतो त्याचे कल्याण होते.” (स्तो. ११२:५) तुमच्या कदाचित पाहण्यात आले असेल की दानधर्म करणारे लोक नेहमीच दयाळू असतात असे नाही. काहीजण केवळ आपल्या श्रीमंतीचा दिखावा करण्यासाठी दान देतात किंवा मग ते चांगल्या मनाने देत नाहीत. तुम्हाला कमीपणा दाखवणाऱ्या किंवा मग इतरांसाठी तुम्ही एक बोजा आहात अशी जाणीव करून देणाऱ्या लोकांकडून मदत घेणे कुणालाही आवडत नाही. याच्या अगदी उलट, आपल्यावर दया दाखवणाऱ्या व्यक्तीकडून मदत स्वीकारणे आपल्याला किती बरे वाटते. दया दाखवण्याच्या व संतोषाने देण्याच्या बाबतीत यहोवाने एक उत्तम उदाहरण मांडले आहे. (१ तीम. १:११; याको. १:५, १७) येशूने दया दाखवणाऱ्या आपल्या पित्याचे अगदी हुबेहूब अनुकरण केले. (मार्क १:४०-४२) तेव्हा, देवाच्या नजरेत नीतिमान ठरण्याकरता आपणही विशेषकरून क्षेत्र सेवेत इतरांना उदार मनाने व दयाळूपणे आध्यात्मिक मदत करतो.
१४. आपण कोण-कोणत्या मार्गांनी “न्यायाने व्यवसाय” करू शकतो?
१४“तो न्यायाने आपले व्यवसाय करील.” (स्तो. ११२:५) भाकीत केल्यानुसार, विश्वासू कारभारी वर्ग धन्याच्या ‘सर्वस्वाची’ काळजी घेतो. असे करून तो यहोवाच्या न्यायाचे अनुकरण करतो. (लूक १२:४२-४४ वाचा.) ही गोष्ट मंडळीतील वडिलांना दिल्या जाणाऱ्या शास्त्रवचनीय मार्गदर्शनावरून दिसून येते. कारण काही वेळा वडिलांना मंडळीतील गंभीर पापासंबंधीची प्रकरणे हाताळावी लागतात. तसेच, सर्व मंडळ्या, मिशनरी व बेथेल गृहे यांचे कामकाज कसे चालावे यावर दास वर्ग पुरवत असलेल्या बायबल-आधारित मार्गदर्शनावरूनही त्याचे न्यायीपण दिसून येते. न्यायीपणाची अपेक्षा केवळ वडिलांकडूनच नव्हे तर इतर ख्रिश्चनांकडूनही केली जाते. एकमेकांबरोबर तसेच बाहेरच्या लोकांबरोबरच्या कोणत्याही व्यवहारांमध्ये, मग ते व्यवसायाच्या संबंधाने असले तरीही त्यांनी न्यायीपण दाखवावे.—मीखा ६:८, ११ वाचा.
नीतिमानांना मिळणारे आशीर्वाद
१५, १६. (क) जगातल्या वाईट बातम्यांचा नीतिमानांवर काय परिणाम होतो? (ख) देवाच्या सेवकांचा काय करत राहण्याचा संकल्प आहे?
१५“तो कधीहि ढळणार नाही; नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंशी गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.” (स्तो. ११२:६-८) युद्धे, दहशतवाद, नवनवीन प्रकारच्या आजारांची सुरुवात व जुन्या आजारांचा पुन्हा उद्भव, गुन्हे, दारिद्र्य आणि घातक प्रदूषण यांसारख्या वाईट बातम्या पूर्वी कधी नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळतात. देवाच्या नजरेत नीतिमान असलेल्या लोकांवरही अशा वाईट बातम्यांचा परिणाम होतो, परंतु त्यामुळे ते घाबरून जात नाही. देवाचे नीतिमान नवीन जग अत्यंत जवळ आहे याची जाणीव त्यांना असल्यामुळे भवितव्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ते “अढळ” व “स्थिर” राहतात. एखाद्या वेळी त्यांच्यावर काही वाईट प्रसंग ओढवला तरी त्यात ते टिकून राहतात कारण मदतीसाठी ते सर्वस्वी यहोवावर विसंबून असतात. यहोवा आपल्या नीतिमान लोकांना ‘कधीही ढळू’ देत नाही. तर तो त्यांना टिकून राहण्याचे बळ देऊन मदत करतो.—फिलिप्पै. ४:१३.
१६ देवाच्या नीतिमान लोकांना, विरोधक करत असलेला द्वेष व ते पसरवत असलेल्या अफवा यांचाही सामना करावा लागतो. परंतु, यामुळे ख्रिश्चनांचे प्रचार कार्य बंद करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत व पुढेही ठरतील. त्यांच्या विरोधाला न जुमानता देवाच्या सेवकांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेले कार्य अर्थात राज्याची सुवार्ता सांगण्याचे व शिष्य बनवण्याचे कार्य स्थिर व अढळ राहून पुढे चालू ठेवण्याचा संकल्प केला आहे. जसजसा अंत जवळ येतो तसतसा नीतिमानांना विरोधाचा अधिकाधिक सामना करावा लागेल यात शंका नाही. आणि मागोगचा गोग, दियाबल सैतान जगव्याप्त पातळीवर देवाच्या सेवकांवर आक्रमण करील तेव्हा हा विरोध शिगेला पोचलेला असेल. शेवटी आपल्या ‘शत्रूंचा’ अपमानकारक पराभव होईल तेव्हा आपण त्यांची ‘गत पाहू.’ देवाच्या नावाचे पूर्णार्थाने पवित्रीकरण झाल्याचे पाहणे आपल्यासाठी किती सुखद अनुभव असेल!—यहे. ३८:१८, २२, २३.
“सन्मानपूर्वक उत्कर्ष”
१७. नीतिमानांचा “सन्मानपूर्वक उत्कर्ष” कसा होईल?
१७ दियाबल व त्याच्या जगाच्या विरोधाशिवाय यहोवाची सामूहिकरित्या स्तुती करणे किती आनंददायी असेल! देवाच्या नजरेत नीतिमान असलेले सर्व लोक यहोवाची सदासर्वकाळ स्तुती करतील. यहोवा त्यांचा “सन्मानपूर्वक उत्कर्ष” करण्याचे वचन देत असल्यामुळे त्यांना कधीही मान खाली घालावी लागणार नाही. (स्तो. ११२:९) यहोवाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या शत्रूंचे शेवटी पतन झाल्याचे पाहून यहोवाचे नीतिमान लोक विजयोत्सव करतील.
१८. स्तोत्र ११२ च्या शेवटच्या वचनांची पूर्णता कशी होईल?
१८“हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दांतओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल.” (स्तो. ११२:१०) देवाच्या लोकांचा विरोध करणारे सर्वजण मत्सरामुळे व द्वेषामुळे “विरघळून” जातील. आपले कार्य बंद पाडण्याची त्यांची इच्छा ‘मोठ्या संकटात’ त्यांच्याबरोबरच नष्ट होईल.—मत्त. २४:२१.
१९. आपण कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो?
१९ त्या मोठ्या विजयात सहभाग घेणाऱ्या आनंदी लोकांमध्ये तुम्हीही असाल का? किंवा मग, सैतानाच्या जगाचा अंत होण्यापूर्वी आजारपणामुळे किंवा उतार वयामुळे तुमचा मृत्यू झाला तर पुनरुत्थान केल्या जाणाऱ्या ‘नीतिमान’ लोकांमध्ये तुम्हीही असाल का? (प्रे. कृत्ये २४:१५) तुम्ही शेवटपर्यंत येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवला व स्तोत्र ११२ यात उल्लेख केलेल्या नीतिमान मनुष्याप्रमाणे यहोवाचे अनुकरण केले तर वरील प्रश्नांचे तुम्ही होय असे उत्तर देऊ शकाल. (इफिसकर ५:१, २ वाचा.) अशा नीतिमान लोकांचे “स्मरण” सर्वकाळ राहील आणि त्यांच्या नीतिमान कार्यांचे कधीही विस्मरण होणार नाही याची यहोवा खात्री करील. ते सदासर्वकाळ यहोवाच्या आठवणीत राहतील व तो त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करील.—स्तो. ११२:३, ६, ९.
[तळटीप]
^ परि. 5 या दोन स्तोत्रांची मांडणी आणि त्यांतील माहिती यांवरून त्यांच्यातील परस्पर संबंध दिसून येतो. स्तोत्र १११:३, ४ व स्तोत्र ११२:३, ४ यांची तुलना केल्यावर समजते की स्तोत्र १११ यात स्तुती करण्यात आलेल्या देवाच्या गुणांचा, स्तोत्र ११२ मधील देवभीरू मनुष्याने आपल्या जीवनात अवलंब केला आहे.
मनन करण्याकरता प्रश्न
• कोणकोणत्या कारणांमुळे आपण “हालेलूया” असे उद्गार काढण्यास प्रवृत्त होतो?
• आधुनिक काळातील कोणत्या वाढीमुळे खऱ्या ख्रिश्चनांना इतका आनंद झाला आहे?
• यहोवाला कशा प्रकारे दान केलेले आवडते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२५ पानांवरील चित्र]
यहोवाच्या नजरेत आपली नीतिमत्ता टिकवून ठेवण्याकरता येशूने आपल्याकरता वाहिलेल्या रक्तावर आपण कायम विश्वास ठेवला पाहिजे
[२६ पानांवरील चित्रे]
स्वेच्छेने दिलेल्या अनुदानांचा उपयोग विपत्तीकाळात मदत कार्य करण्यास व बायबल साहित्य छापण्यास केला जातो