वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
बायबलमध्ये ‘याशाराचा ग्रंथ’ व ‘परमेश्वराचे संग्राम नावाचा ग्रंथ’ या दोन पुस्तकांचा उल्लेख करण्यात आला आहे. (यहो. १०:१३; गण. २१:१४) परंतु, बायबल पुस्तकांच्या यादीत ही पुस्तके आढळत नाहीत. ही लिखाणे ईश्वरप्रेरित होती का? व नंतर ती हरवली असावीत का?
या दोन पुस्तकांचे लिखाण ईश्वर प्रेरणेने झाले होते व नंतर ती हरवली असावीत असे म्हणण्यास कोणताही आधार नाही. बायबलच्या प्रेरित लेखकांनी इतर बऱ्याच लिखाणांचा संदर्भ घेतला आहे. यांपैकी काहींचा बायबलमध्ये उल्लेख आढळतो. पण, आजच्या वाचकांना परिचित नसतील अशा नावांनी ती लिखाणे तेव्हा ओळखली जात होती. उदाहरणार्थ, १ इतिहास २९:२९ मध्ये ‘शमुवेल द्रष्टा याचा ग्रंथ,’ ‘नाथान संदेष्टा याचा ग्रंथ’ आणि ‘गाद द्रष्टा याचा ग्रंथ’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ही तिन्ही लिखाणे मिळून, आज आपल्या परिचयातली १ व २ शमुवेल ही पुस्तके किंवा शास्ते हे पुस्तके बनले असावे.
दुसरीकडे पाहता, काही वेळा बायबलमध्ये, बायबल पुस्तकांसारखीच नावे असलेल्या, परंतु वास्तवात बायबलचा भाग नसलेल्या पुस्तकांचा उल्लेख आढळतो. त्याकरता पुढील चार प्राचीन पुस्तकांचे उदाहरण लक्षात घ्या: ‘यहूदाच्या राजांची बखर,’ ‘यहूदा व इस्राएल यांच्या राजांची बखर,’ ‘इस्राएलाच्या राजांचा ग्रंथ,’ आणि ‘इस्राएल व यहूदी यांच्या राजांची बखर.’ ही नावे आपल्या परिचयात असलेल्या १ राजे व २ राजे या बायबल पुस्तकांशी मिळतीजुळती असली तरी ही चार पुस्तके ईश्वरप्रेरित नव्हती किंवा बायबलमध्येही ती आढळत नाहीत. (१ राजे १४:२९; २ इति. १६:११; २०:३४; २७:७) संदेष्टा यिर्मया आणि एज्रा यांनी, आज बायबलमध्ये समाविष्ट असलेली त्यांच्या नावाची पुस्तके लिहिली तेव्हा वर उल्लेखित चार पुस्तके त्या वेळी उपलब्ध असलेली केवळ ऐतिहासिक लिखाणे असावीत.
अशा प्रकारे, काही बायबल लेखकांनी तेव्हा उपलब्ध असलेल्या परंतु ईश्वरप्रेरित नसलेल्या इतिवृत्तांचा किंवा लिखाणांचा उल्लेख केला किंवा त्यांचा संदर्भ घेतला. एस्तेर १०:२ मध्ये, ‘मेदी व पारसी यांच्या इतिहासाच्या ग्रंथाचा’ उल्लेख आढळतो. त्याच प्रमाणे, आपले शुभवर्तमान लिहिताना लूकने देखील, ‘सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केला.’ म्हणजेच, त्याच्या शुभवर्तमानात नमूद असलेली येशूची वंशावळ तयार करण्यासाठी त्याने त्या वेळी उपलब्ध असलेली लिखाणे पडताळून पाहिली असावीत. (लूक १:३; ३:२३-३८) लूकने पडताळून पाहिलेली लिखाणे ईश्वरप्रेरित नसली तरी त्याने लिहिलेले शुभवर्तमान नक्कीच ईश्वरप्रेरित होते. आणि ते शुभवर्तमान आज आपल्यासाठी देखील मोलाचे आहे.
सुरुवातीच्या प्रश्नात उल्लेख केलेली दोन पुस्तके अर्थात ‘याशाराचा ग्रंथ’ व ‘परमेश्वराचे संग्राम नावाचा ग्रंथ’ ही त्या काळी उपलब्ध असलेली लिखाणे असावीत. परंतु, ती ईश्वरप्रेरित नव्हती. त्यामुळे यहोवाने त्यांचे जतन केले नाही. बायबलमध्ये या दोन पुस्तकांचा उल्लेख आढळत असल्यामुळे काही विद्वानांचे असे म्हणणे आहे, की ही दोन पुस्तके इस्राएल आणि त्यांचे शत्रू यांच्यातील झगड्यांवर लिहिण्यात आलेल्या काव्यांचे अथवा गीतांचे संग्रह असावीत. (२ शमु. १:१७-२७) बायबलच्या एका विश्वकोशानुसार ही पुस्तके म्हणजे “प्राचीन इस्राएलच्या व्यावसायिक गायकांनी जतन केलेल्या काव्यांचा व गीतांचा सर्वांना परिचित असलेला संग्रह” असावा. यहोवाने ज्यांचा संदेष्टे अथवा द्रष्टे म्हणून उपयोग केला अशांनी देखील काही गोष्टींच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. परंतु यहोवाने त्या नोंदी प्रेरित केल्या नव्हत्या किंवा आज आपल्याला ‘सद्बोध करणाऱ्या, दोष दाखवणाऱ्या, सुधारणूक व नीतिशिक्षण देणाऱ्या’ शास्त्रवचनांमध्ये देखील त्यांचा समावेश केला नाही.—२ तीम. ३:१६; २ इति. ९:२९; १२:१५; १३:२२.
बायबलमध्ये काही पुस्तकांचा उल्लेख आढळत असला व बायबलच्या इतर लिखाणांत या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला असला तरीही ती ईश्वरप्रेरित लिखाणे होती असे नाही. पण, ‘आपल्या देवाच्या वचनात’ समाविष्ट असलेली सर्व लिखाणे यहोवा देवाने जतन करून ठेवली आहेत व ती ‘सर्वकाळ कायम राहतील.’ (यश. ४०:८) होय, आपण ‘पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे’ म्हणून आवश्यक असलेली सर्व माहिती यहोवाने आज उपलब्ध असलेल्या ६६ पुस्तकांमध्ये जतन करून ठेवली आहे.—२ तीम. ३:१६, १७.