धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
‘तुम्हाला सुवार्ता सांगण्याचे धैर्य आम्हास देवाकडून मिळाले.’—१ थेस्सलनी. २:२.
१. देवाच्या राज्याची सुवार्ता ही सर्वात चांगली बातमी आहे असे का म्हणता येईल?
एखादी चांगली बातमी ऐकल्यावर आपल्याला किती आनंद होतो! आणि देवाच्या राज्याच्या सुवार्तेपेक्षा चांगली बातमी आणखी कोणती असू शकते? दुःख-कष्ट, वेदना, आजारपण आणि मृत्यू यांचा अंत होईल असे आश्वासन आपल्याला या सुवार्तेमुळे मिळते. ही सुवार्ता सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवते, देवाचा उद्देश प्रकट करते आणि देवासोबत चांगला नातेसंबंध कसा जोडता येईल हे देखील दाखवते. येशूने सांगितलेली ही सुवार्ता ऐकून सर्वांनाच आनंद होईल असे कदाचित तुम्हाला वाटेल. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, वस्तुस्थिती वेगळी आहे.
२. “फूट पाडण्यास मी आलो आहे,” हे येशूचे विधान स्पष्ट करून सांगा.
२ येशूने आपल्या शिष्यांना असे म्हटले: “मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो आहे. कारण मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे; आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.” (मत्त. १०:३४-३६) राज्याच्या सुवार्तेचा आनंदाने स्वीकार करण्याऐवजी पुष्कळ लोक ही सुवार्ता नाकारतात. काही लोक तर सुवार्तेची घोषणा करणाऱ्यांचे शत्रू बनतात, मग ते त्यांचे स्वतःचे कुटुंबीय असले तरी.
३. प्रचार करण्याची आपल्याला मिळालेली नेमणूक पूर्ण करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे?
३ येशूने ज्या सत्यांविषयी लोकांना सांगितले, तीच सत्ये आज आपणही लोकांना सांगतो. आणि ती सत्ये ऐकल्यावर योहा. १५:२०) आज बऱ्याच देशांमध्ये आपल्याला उघडपणे छळाला तोंड द्यावे लागत नसले, तरी लोक आपली थट्टा करतात आणि आपल्या संदेशात आवड दाखवत नाहीत. म्हणून, निर्भयपणे सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आपल्याला विश्वास आणि धैर्याची गरज आहे.—२ पेत्र १:५-८ वाचा.
येशूच्या काळातील बहुतेक लोकांची जशी प्रतिक्रिया होती, तशीच प्रतिक्रिया आजही लोक दाखवतात. अर्थात, हे अपेक्षितच आहे. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले: “दास धन्यापेक्षा मोठा नाही हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याहि पाठीस लागतील.” (४. प्रचार करण्यासाठी पौलाला “धैर्य” एकवटण्याची गरज का होती?
४ तुम्हालाही सेवाकार्यात भाग घेणे कधीकधी कठीण वाटत असेल किंवा सेवाकार्याचा एखादा विशिष्ट पैलू कठीण वाटत असेल. असे असल्यास निराश होऊ नका, कारण अशी समस्या असणारे यहोवाच्या विश्वासू सेवकांपैकी तुम्ही एकटेच नाही. उदाहरणार्थ, प्रेषित पौल एक धाडसी व निर्भय प्रचारक होता व त्याला सत्याविषयीचे उत्तम ज्ञान होते. तरीही, त्याला देखील प्रचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. थेस्सलनीका येथील ख्रिश्चनांना पौलाने असे लिहिले: “पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, (हे तुम्हाला माहीतच आहे,) मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.” (१ थेस्सलनी. २:२) फिलिप्पैमध्ये पौल व त्याचा सहकारी सीला याला अधिकाऱ्यांनी फटके मारले, तुरुंगात टाकले आणि खोड्यांत अडकवले. (प्रे. कृत्ये १६:१६-२४) तरीही, पौल व सीला यांनी प्रचार कार्य करत राहण्यासाठी “धैर्य” एकवटले. आपणही असे करू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी, प्राचीन काळातील देवाच्या सेवकांना यहोवाबद्दलचे सत्य धैर्याने सांगण्याचे सामर्थ्य कसे मिळाले याची आपण चर्चा करू या. आणि त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण आपण कशा प्रकारे करू शकतो हे शिकू या.
शत्रुत्वाचा सामना करण्यास धैर्य आवश्यक होते
५. यहोवाप्रती विश्वासू राहणाऱ्या सर्वांनाच धैर्य का दाखवावे लागले आहे?
५ येशू हा निर्भयता व धैर्याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. खरेतर, मानवजातीच्या सुरुवातीपासूनच, यहोवाच्या सर्व विश्वासू सेवकांना धैर्य दाखवावे लागले आहे. का? कारण, एदेन बागेतील बंडाळीनंतर यहोवाने पूर्वभाकीत केले होते की त्याची सेवा करणाऱ्यांमध्ये व सैतानाची सेवा करणाऱ्यांमध्ये शत्रुत्व असेल. (उत्प. ३:१५) हे शत्रुत्व नीतिमान मनुष्य हाबेल याची त्याच्या भावाने हत्या केल्यावर स्पष्ट झाले. त्यानंतर, जलप्रलयाआधीच्या हनोख या आणखी एका विश्वासू सेवकालाही अशाच प्रकारच्या शत्रुत्वाला तोंड द्यावे लागले. देव त्याच्या लाखो पवित्र जनांसोबत येईल व भक्तीहीन लोकांचा न्यायनिवाडा करेल अशी भविष्यवाणी त्याने केली होती. (यहू. १४, १५) हा संदेश निश्चितच लोकांना आवडणारा नव्हता. त्यामुळे लोकांनी हनोखाचा द्वेष केला आणि यहोवाने जर त्याचे जीवन संपवले नसते, तर त्यांनी त्याला मारून टाकले असते. खरेच, हनोख किती धैर्यवान होता!—उत्प. ५:२१-२४.
६. फारोशी बोलण्याकरता मोशेला धैर्याची गरज का होती?
६ तसेच, फारोशी बोलताना मोशेला किती धैर्य दाखवावे लागले असेल याचाही विचार करा. कारण, लोक फारोला केवळ दैवतांचा प्रतिनिधी मानत नव्हते, तर तो सूर्य देवाचा पुत्र आणि त्याअर्थी स्वतःच देव आहे असे मानत. कदाचित इतर फारोंप्रमाणे तो देखील स्वतःच्याच मूर्तीची उपासना करत असावा. फारोचा शब्द हाच कायदा होता. शक्तिमान, मगरूर, हेकेखोर फारोचा हुकूम जणू काळ्या दगडावरची रेघ होती. अशा या मनुष्यापुढे मोशेला, एका नम्र मेंढपाळाला वारंवार जावे लागले आणि ते सुद्धा बोलावणे नसताना आगंतुकासारखे. फारोपुढे जाऊन मोशेने कशाविषयी भविष्यवाणी केली? भयानक पीडांविषयी. आणि त्याने कशाची मागणी केली? फारोच्या लाखो गुलामांना देश सोडून जाऊ देण्याची! यासाठी मोशेला धैर्याची गरज होती का? निश्चितच!—गण. १२:३; इब्री ११:२७.
७, ८. (क) ख्रिस्तापूर्वीच्या विश्वासू सेवकांवर कोणती संकटे आली होती? (ख) ख्रिस्तापूर्वीच्या देवाच्या सेवकांना शुद्ध उपासनेची बाजू घेण्याचे व त्यास बढावा देण्याचे धैर्य दाखवणे कशामुळे शक्य झाले?
७ त्यानंतरच्या शतकांतही, संदेष्टे आणि देवाचे इतर विश्वासू सेवक खऱ्या उपासनेच्या बाजूने निर्भयपणे उभे राहिले. सैतानाच्या जगाने त्यांना प्रेमळ वागणूक दिली नाही. पौलाने म्हटले: “त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले, असे होते.” (इब्री ११:३७) देवाच्या या विश्वासू सेवकांना खंबीरपणे उभे राहण्यासाठी कोणत्या गोष्टीने साहाय्य केले? हाबेल, अब्राहाम, सारा आणि देवाच्या इतर सेवकांना कशामुळे धैर्य दाखवण्यास मदत मिळाली होती त्याबद्दल प्रेषित पौलाने आधीच्या काही वचनांत सांगितले. त्याने म्हटले: “त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती, तर त्यांनी ती [विश्वासाने] दुरून पाहिली व तिला वंदन केले.” (इब्री ११:१३) एलीया, यिर्मया आणि ख्रिस्तापूर्वीच्या इतर विश्वासू सेवकांनाही, यहोवाने वचन दिलेल्या गोष्टींवर आपली दृष्टी केंद्रित केल्यामुळे खऱ्या उपासनेच्या बाजूने धैर्याने उभे राहण्यास मदत मिळाली.—तीत १:२.
८ ख्रिस्तापूर्वीच्या या विश्वासू सेवकांचे डोळे एका अद्भुत व उज्ज्वल भविष्याकडे लागले होते. त्यांचे पुनरुत्थान झाल्यावर, ते कालांतराने परिपूर्ण होतील आणि ख्रिस्त येशू व त्याच्या १,४४,००० सहयाजकांच्या याजकीय सेवेद्वारे त्यांना “नश्वरतेच्या दास्यातून मुक्त” करण्यात येईल. (रोम. ८:२१) शिवाय, यिर्मया व प्राचीन काळातील यहोवाच्या इतर धाडसी सेवकांना, यहोवाने यिर्मयाला दिलेल्या वचनामुळे धैर्य मिळाले. यहोवाने त्याला म्हटले: “ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” (यिर्म. १:१९) देवाने आपल्या भविष्याबद्दल दिलेल्या वचनांवर व आध्यात्मिक संरक्षणाच्या आश्वासनावर आज आपण मनन करतो, तेव्हा आपल्यालाही धैर्य मिळते.—नीति. २:७; २ करिंथकर ४:१७, १८ वाचा.
प्रेमामुळेच येशूने धैर्याने प्रचार केला
९, १०. (क) धर्मपुढाऱ्यांसमोर, (ख) सैनिकांसमोर, (ग) महायाजकासमोर आणि (घ) पिलातासमोर येशूने कशा प्रकारे धैर्य दाखवले?
९ आपला आदर्श असलेल्या येशूने वेगवेगळ्या प्रकारे धैर्य दाखवले होते. उदाहरणार्थ, त्या काळातील सत्ताधारी व प्रभावशाली लोकांनी त्याचा द्वेष केला, तरी त्याने लोकांना देवाबद्दलचा संदेश अगदी स्पष्टपणे सांगितला. याबाबतीत त्याने कोणतीही तडजोड केली नाही. स्वतःला नीतिमान मानणाऱ्या शक्तिशाली धर्मपुढाऱ्यांचा व त्यांच्या खोट्या शिकवणींचा त्याने निर्भयपणे पर्दाफाश केला. त्याने स्पष्ट व सडेतोड शब्दांत त्यांची निर्भर्त्सना केली. एके प्रसंगी त्याने त्यांना असे म्हटले: “अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत; तसे तुम्हीहि बाहेरून लोकांना नीतिमान् दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहा.”—मत्त. २३:२७, २८.
१० गेथशेमाने बागेत सैनिक येशूच्या शोधात आले, तेव्हा त्याने मीच तो आहे असे धैर्याने सांगितले. (योहा. १८:३-८) नंतर त्याला धर्मसभेपुढे हजर करण्यात आले व महायाजकाद्वारे त्याची न्यायचौकशी करण्यात आली. महायाजक आपल्याला मारून टाकण्यासाठी निमित्त शोधत आहे हे माहीत असूनही, येशूने न घाबरता आपण ख्रिस्त असल्याचे व देवाचा पुत्र असल्याचे मान्य केले. आणि “मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघासह येत असलेला असा पाहाल” असेही त्याने म्हटले. (मार्क १४:५३, ५७-६५) त्यानंतर, त्याला पिलातासमोर नेण्यात आले ज्याला येशूची सुटका करण्याचा अधिकार होता. पण, इथे मात्र येशूवर आरोप लावण्यात आले तेव्हा तो शांतच राहिला. (मार्क १५:१-५) निश्चितच, हे सर्व करण्यासाठी खूप धैर्याची गरज होती.
११. धैर्य दाखवणे हे कशा प्रकारे प्रेमाशी संबंधित आहे?
११ पण, येशूने पिलाताला एक गोष्ट मात्र सांगितली: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहा. १८:३७) यहोवाने येशूवर सुवार्तेचा प्रचार करण्याची कामगिरी सोपवली होती आणि यहोवावर येशूचे प्रेम असल्यामुळे त्याने ही कामगिरी आनंदाने पार पाडली. (लूक ४:१८, १९) येशूचे लोकांवरही प्रेम होते. लोकांना कठीण परिस्थितीत जगावे लागत आहे हे त्याला माहीत होते. येशूप्रमाणेच, आज आपणही देवावर व आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम असल्यामुळेच धैर्याने व निडरतेने प्रचार करतो.—मत्त. २२:३६-४०.
आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळते
१२. पहिल्या शतकातील शिष्यांना कशामुळे आनंद झाला?
१२ येशूच्या मृत्यूनंतरच्या काही आठवड्यांत, यहोवा आपल्यात नवीन शिष्यांची भर घालत आहे हे पाहून त्याच्या शिष्यांना खूप आनंद झाला. केवळ एकाच दिवशी, पेन्टेकॉस्टचा सण साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या देशांतून जेरूसलेममध्ये आलेल्या ३,००० यहुदी व यहुदी मतानुसाऱ्यांनी बाप्तिस्मा घेतला! यामुळे यहुदी धर्माचा बालेकिल्ला असलेल्या जेरूसलेमध्ये केवढी खळबळ माजली असेल याची कल्पना करा! बायबलमध्ये याबद्दल असे म्हटले आहे: “प्रत्येक मनुष्याला भय वाटले; आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती.”—प्रे. कृत्ये २:४१, ४३.
१३. बांधवांनी धैर्य मिळण्यासाठी का प्रार्थना केली आणि त्याचा परिणाम काय झाला?
१३ हे पाहून यहुदी धर्मपुढारी इतके संतप्त झाले की त्यांनी पेत्राला व योहानाला अटक करून रात्रभर तुरुंगात ठेवले आणि यापुढे येशूबद्दल प्रचार न करण्याची त्यांना ताकीद दिली. सुटका झाल्यावर, पेत्राने व योहानाने बांधवांना घडलेली सर्व हकीगत सांगितली. आणि त्या सर्वांनी मिळून त्यांना होत असलेल्या या विरोधाबद्दल यहोवाला अशी प्रार्थना केली: “हे प्रभो, . . . आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर.” याचा परिणाम काय झाला? “ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.”—प्रे. कृत्ये ४:२४-३१.
१४. आपल्या प्रचार कार्यात पवित्र आत्मा आपल्याला कशा प्रकारे मदत करतो?
१४ येशूच्या शिष्यांना देवाचे वचन धैर्याने बोलण्यासाठी यहोवाच्या पवित्र आत्म्याने साहाय्य केले होते याकडे लक्ष द्या. आपण स्वतःच्या बळावर इतरांशी आणि आपल्या विरोधकांशीही सत्याविषयी धैर्याने बोलू शकत नाही, तर यहोवापासून आपल्याला हे बळ मिळते. आपल्याला पवित्र आत्मा देण्यासाठी आपण त्याला प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्याला त्याचा आत्मा देऊ शकतो आणि अवश्य देईल. आपल्याला विरोधाचा सामना करावा लागतो तेव्हा यहोवाच्या मदतीने आपणही धैर्य दाखवू शकतो व कोणत्याही विरोधाला यशस्वीपणे तोंड देऊ शकतो.—स्तोत्र १३८:३ वाचा.
आज ख्रिस्ती लोक धैर्याने प्रचार करतात
१५. आज सत्य कशा प्रकारे लोकांमध्ये फूट पाडत आहे?
१५ गतकाळाप्रमाणेच, आजही सत्य लोकांमध्ये फूट पाडत आहे. काही लोक सत्यामध्ये आवड दाखवतात, तर इतर लोकांना आपल्या उपासनेची पद्धत समजत नाही व ते तिची कदरही करत नाहीत. आणि येशूने भाकीत केल्याप्रमाणे, काही लोक आपली टीका करतात, थट्टा करतात किंवा आपला द्वेषही करतात. (मत्त. १०:२२) कधीकधी प्रसार माध्यमांद्वारे आपल्याबद्दल खोटी व द्वेषपूर्ण माहिती पसरवली जाते. (स्तो. १०९:१-३) तरीसुद्धा, संपूर्ण पृथ्वीवर यहोवाचे लोक धैर्याने सुवार्तेचा प्रचार करत आहेत.
१६. आपण धैर्याने प्रचार केल्यामुळे लोकांचे मत बदलू शकते हे कोणत्या उदाहरणावरून दिसते?
१६ आपल्या धैर्यामुळे, राज्य संदेशाबद्दल असलेले त्यांचे मत बदलण्यास लोक प्रेरित होऊ शकतात. किर्गिझस्तानमधील एक बहीण सांगते: “प्रचार कार्य करत असताना एका घरमालकानं मला म्हटलं: ‘माझा देवावर विश्वास आहे, पण ख्रिस्ती लोकांच्या देवावर नाही. पुन्हा कधी माझ्या घरी आलात, तर तुमच्यावर मी माझा कुत्रा सोडीन!’ त्याच्यामागे भयानक दिसणारा एक मोठा कुत्रा बांधलेला होता. पण, राज्य वार्ता क्र. ३७, ‘धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या दुष्ट कृत्यांचा कधी अंत होईल का?’ ही पत्रिका वाटण्याच्या मोहिमेदरम्यान, त्या घरातील इतर सदस्याला भेटण्याच्या आशेनं मी पुन्हा एकदा त्याच घरी जाण्याचा निर्धार केला. पण, त्याच माणसानं दरवाजा उघडला. लगेच यहोवाला प्रार्थना करून मी म्हटलं: ‘नमस्कार, तीन दिवसांपूर्वीचं आपलं संभाषण माझ्या आठवणीत आहे आणि तुमचा कुत्रा देखील. पण, मला ही
पत्रिका तुम्हाला द्यायची होती, कारण तुमच्यासारखीच मीही एकाच खऱ्या देवाला मानते. देव लवकरच त्याचा अनादर करणाऱ्या सर्व धर्मांविरुद्ध न्यायदंड बजावणार आहे. या पत्रिकेतून तुम्हाला याविषयी आणखी जाणून घेता येईल.’ आश्चर्य म्हणजे, त्या माणसानं राज्य वार्ता स्वीकारली. नंतर मी दुसऱ्या घरी गेले. काही मिनिटांनंतर, तो माणूस हातात राज्य वार्ता घेऊन माझ्यामागं धावत आला. तो म्हणाला: ‘माझं वाचून झालंय. देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी मला काय करावं लागेल?’” त्या माणसाबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला आणि तो ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागला.१७. एका बहिणीच्या धैर्यामुळे कशा प्रकारे बायबलचा अभ्यास करणाऱ्या एका स्त्रीला सभांना उपस्थित राहण्याचे धैर्य मिळाले?
१७ आपल्या धैर्यामुळे इतरांनाही धैर्य दाखवण्याची प्रेरणा मिळू शकते. रशियात एका बसमधून प्रवास करणाऱ्या एका बहिणीने सोबत प्रवास करणाऱ्या एका स्त्रीला एक नियतकालिक दिले. हे पाहून, एक माणूस अचानक त्याच्या सीटवरून उठला आणि त्याने बहिणीच्या हातातून नियतकालिक हिसकावून घेतले व ते चोळामोळा करून जमिनीवर फेकले. जोरजोराने शिव्या देत त्याने बहिणीचा पत्ता विचारला आणि गावात पुन्हा प्रचार न करण्याची ताकीद दिली. बहिणीने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली आणि स्वतःला येशूच्या या शब्दांची आठवण करून दिली: “जे शरीराचा घात करितात . . . त्यांना भिऊ नका.” (मत्त. १०:२८) ती शांतपणे उभी राहून त्या माणसाला म्हणाली, “माझा पत्ता मी तुम्हाला सांगणार नाही आणि गावात प्रचार करण्याचंही थांबवणार नाही.” असे म्हणून ती बसमधून उतरली. त्याच बसमध्ये बहिणीची एक बायबल विद्यार्थी प्रवास करत होती हे तिला माहीत नव्हते. या स्त्रीने मनुष्याच्या भीतीला बळी पडून सभांना येण्याचे आजवर टाळले होते. पण, आपल्या बहिणीचे धैर्य पाहून तिने यापुढे सभांना उपस्थित राहण्याचा निर्धार केला.
१८. येशूप्रमाणे धैर्याने प्रचार करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?
१८ देवापासून दुरावलेल्या या जगात येशूप्रमाणे प्रचार करण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज आहे. असे करण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट मदत करेल? उज्ज्वल भविष्याकडे डोळे लावा. देवाबद्दल व शेजाऱ्यांबद्दल असलेले प्रेम वाढवण्याचा प्रयत्न करा. धैर्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. या कार्यात तुम्ही एकटे नाही, येशू तुमच्यासोबत आहे हे नेहमी लक्षात असू द्या. (मत्त. २८:२०) पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देईल. आणि यहोवा तुम्हाला साहाय्य करेल व आशीर्वाद देईल. म्हणून, आपण धैर्याने असे म्हणू या: “प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”—इब्री १३:६.
तुमचे उत्तर काय असेल?
• देवाच्या सेवकांना धैर्याची गरज का आहे?
• धैर्य दाखवण्याबद्दल . . .
ख्रिस्तापूर्वीच्या विश्वासू सेवकांपासून आपण काय शिकू शकतो?
येशूपासून आपण काय शिकू शकतो?
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांपासून आपण काय शिकू शकतो?
आज आपल्या ख्रिस्ती बांधवांपासून आपण काय शिकू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२१ पानांवरील चित्र]
येशूने निर्भयपणे धर्मपुढाऱ्यांचा पर्दाफाश केला
[२३ पानांवरील चित्र]
यहोवा आपल्याला प्रचार करण्यासाठी धैर्य देतो