यहोवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम!
यहोवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम!
“मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे.”—दानी. ४:१७.
१, २. मानवी शासन अयशस्वी ठरण्यामागे कोणती काही कारणे आहेत?
मानवी शासन अयशस्वी ठरले आहे! याबद्दल काहीही शंका नाही. या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे, यशस्वीपणे राज्य करण्यासाठी लागणारी बुद्धी त्यांच्याजवळ नाही. मानव सरकारांचे अपयश खासकरून आज स्पष्टपणे दिसून येते. कारण, आजच्या शासकांपैकी बहुतेक जण, ‘स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, अपवित्र, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे, विश्वासघातकी, गर्वाने फुगलेले’ असे आहेत हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले आहे.—२ तीम. ३:२-४.
२ हजारो वर्षांपूर्वी, आपल्या पहिल्या आईवडिलांनी देवाचे आधिपत्य नाकारले. असे केल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असे त्यांना वाटले असावे. पण खरेतर, असे करण्याद्वारे त्यांनी स्वतःला सैतानाच्या शासनाच्या अधीन करून घेतले. “ह्या जगाचा अधिकारी” असलेल्या सैतानाच्या जोरदार प्रभावाखाली मागील सहा हजार वर्षांदरम्यान मानवांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच आपण मानव इतिहासातील सध्याच्या दयनीय स्थितीला येऊन पोचलो आहोत. (योहा. १२:३१) मानवजातीच्या या अवस्थेबद्दल टिप्पणी करताना, दि ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ द ट्वेंटीयथ सेंच्युरी मध्ये म्हटले आहे की “समस्यांपासून पूर्णपणे मुक्त असे आदर्श जग निर्माण करण्याचा प्रयत्न” व्यर्थ आहे. पुढे हे पुस्तक असा खुलासा करते: “असे जग निर्माण करणे तर आपल्या हातात नाहीच, उलट तसे करण्याच्या प्रयत्नात आपण अधिकच संकटे, अत्याचार, आणि अतिशय विनाशकारी युद्धांना आमंत्रण देतो.” मानवी शासन कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकत नाही याची ही उघडपणे दिलेली कबुलीच नाही का?
३. आदाम आणि हव्वा यांनी पाप केले नसते तर देवाने कशा प्रकारे शासन केले असते याविषयी काय म्हणता येईल?
३ आपल्या पहिल्या आईवडिलांनी देवाचे शासन—यशस्वीपणे राज्य करू शकणारे एकमेव शासन नाकारले ही किती दुःखाची गोष्ट आहे! अर्थात, आदाम आणि हव्वा यहोवाला विश्वासू राहिले असते, तर यहोवाने कशा प्रकारच्या व्यवस्थेद्वारे पृथ्वीवर शासन केले असते हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. तरीसुद्धा, एक गोष्ट मात्र नक्की की त्याने प्रेमळपणे व अपक्षपातीपणे शासन केले असते. (प्रे. कृत्ये १०:३४; १ योहा. ४:८) देवाची अतुलनीय बुद्धी विचारात घेता, आपण आणखी एक गोष्ट खातरीने सांगू शकतो. ती अशी की मानव यहोवाच्या शासनाच्या अधीन असते, तर मानवी शासनाच्या समर्थकांनी आजवर केलेल्या सर्व चुका टाळता आल्या असत्या. आणि देवाच्या शासनाने सर्व ‘प्राणिमात्रांची इच्छा पुरी केली’ असती. (स्तो. १४५:१६) थोडक्यात, हे शासन एक परिपूर्ण शासन असते. (अनु. ३२:४) मानवांनी अशा या शासनाचा अव्हेर केला ही खरोखर किती दुःखाची गोष्ट आहे!
४. सैतानाला मानवजातीवर शासन करण्याची अनुमती देण्यात आली असली तरी ती कोणत्या अर्थाने मर्यादित आहे?
४ तरीपण, आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की यहोवाने मनुष्यांना स्वतः शासन करण्याची अनुमती दिली असली, तरी प्राणिमात्रांवर राज्य करण्याच्या आपल्या अधिकाराचा त्याने कधीही त्याग केला नाही. बॅबिलोनच्या शक्तिशाली राजालाही हे मान्य करावेच लागले की शेवटी “मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे.” (दानी. ४:१७) हे खरे आहे की, एदेन बागेत लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे कायमचे सिद्ध करण्यासाठी यहोवाने सैतानाला काही काळ ‘ह्या युगाचे दैवत’ होण्याची अनुमती दिली आहे. (२ करिंथ. ४:४; १ योहा. ५:१९) पण, सरतेशेवटी देवाच्या राज्यामार्फत त्याचीच इच्छा पूर्ण होईल. (मत्त. ६:१०) शिवाय, यहोवाने ज्या मर्यादेपर्यंत सैतानाला अनुमती दिली त्याच्या पलीकडे तो कधीही जाऊ शकला नाही. (२ इति. २०:६; ईयोब १:११, १२; २:३-६ पडताळून पाहा.) आणि मानव इतिहासात नेहमीच असे काही लोक होते ज्यांनी देवाचा मुख्य शत्रू असलेल्या सैतानाच्या जगात राहत असूनही देवाच्या अधीन राहण्याची निवड केली.
इस्राएल लोकांवर देवाचे शासन
५. इस्राएल लोकांनी देवाला कोणते वचन दिले?
५ हाबेलाच्या काळापासून ते इस्राएल लोकांचे एक राष्ट्र बनले त्या काळापर्यंत अनेक विश्वासू व्यक्तींनी यहोवाची उपासना केली आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले. (इब्री ११:४-२२) हे राष्ट्र कसे अस्तित्वात आले? मोशेच्या दिवसांत देवाने कुलपिता याकोब याच्या वंशजांशी एक करार केला आणि अशा प्रकारे त्यांचे इस्राएल राष्ट्र बनले. सा.यु.पू. १५१३ मध्ये इस्राएल लोकांनी व त्यांच्या वंशजांनी यहोवाला आपला शासक म्हणून स्वीकारण्याचे वचन दिले. त्यांनी म्हटले: “परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.”—निर्ग. १९:८.
६, ७. इस्राएल लोकांवरील देवाचे शासन कशा प्रकारे उल्लेखनीय होते?
६ इस्राएलांना आपले लोक होण्याकरता निवडण्यामागे यहोवाचा एक उद्देश होता. (अनुवाद ७:७, ८ वाचा.) केवळ इस्राएल लोकांचे कल्याण करण्याकरता देवाने त्यांना निवडले नव्हते. तर, जास्त महत्त्वाचे म्हणजे त्याचे नाव व सार्वभौमत्व देखील यात गोवलेले होते. इस्राएल लोक याची साक्ष ठरणार होते की यहोवा हाच एकमेव खरा देव आहे. (यश. ४३:१०; ४४:६-८) म्हणूनच यहोवाने या राष्ट्राला उद्देशून म्हटले: “तुम्ही आपला देव परमेश्वर [यहोवा] ह्याची पवित्र प्रजा आहा आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रांतून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे.”—अनु. १४:२.
७ इस्राएल लोकांवर शासन करताना ते अपरिपूर्ण आहेत हे यहोवाने लक्षात घेतले. पण, त्याचे नियम परिपूर्ण होते व त्यांतून त्याचे गुण प्रदर्शित झाले. यहोवाने मोशेद्वारे दिलेल्या नियमांतून त्याची पवित्रता, न्यायप्रियता, क्षमाशीलता आणि सहनशीलता स्पष्टपणे दिसून आली. नंतर, यहोशवाच्या काळात, इस्राएल राष्ट्राने यहोवाच्या आज्ञांचे पालन केले आणि शांती व आध्यात्मिक आशीर्वाद अनुभवले. (यहो. २४:२१, २२, ३१) इस्राएल राष्ट्राच्या इतिहासातील त्या काळावरून दिसून येते की यहोवाची शासन करण्याची पद्धत सर्वश्रेष्ठ आहे.
मानवी शासन निवडण्याचे दुष्परिणाम
८, ९. इस्राएल लोकांनी कोणती मागणी करण्याची चूक केली आणि त्याचा परिणाम काय झाला?
८ काळाच्या ओघात, इस्राएल लोकांनी वारंवार देवाच्या शासनाकडे पाठ फिरवली आणि देवाकडून मिळणारे संरक्षण गमावले. कालांतराने, शमुवेल संदेष्ट्याद्वारे त्यांनी एका दृश्य, मानवी राजाची मागणी केली. यहोवाने शमुवेलाला त्यांची मागणी मान्य करण्यास सांगितले. पण, यहोवाने पुढे असे म्हटले: “ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहेत.” (१ शमु. ८:७) इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी यहोवाने एका राजाची अनुमती दिली असली, तरी मानवी राजाच्या शासनामुळे ओढवणारे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील याची यहोवाने त्यांना ताकीद दिली.—१ शमुवेल ८:९-१८ वाचा.
९ यहोवाने दिलेली ताकीद किती खरी होती हे इतिहासावरून दिसून येते. मानवी राजांच्या, विशेषकरून, देवाला विश्वासू न राहिलेल्या राजांच्या शासनामुळे इस्राएल लोकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले. इस्राएल राष्ट्राचे उदाहरण लक्षात घेतल्यास, यहोवाला न ओळखणारे शासक आजपर्यंत खरी शांती व सुरक्षितता आणण्यात अयशस्वी ठरले आहेत याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. हे खरे आहे की काही राजकारणी आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद द्यावा म्हणून देवाला प्रार्थना करतात. पण, जे स्वतः देवाच्या शासनाच्या अधीन होत नाहीत त्यांना देव कसे आशीर्वादित करेल?—स्तो. २:१०-१२.
देवाच्या शासनाखाली एक नवीन राष्ट्र
१०. देवाने इस्राएल राष्ट्राला नाकारून एका नव्या राष्ट्राची निवड का केली?
१० इस्राएल राष्ट्राने यहोवाची विश्वासूपणे उपासना करण्यास आपण इच्छुक नसल्याचे दाखवले. शेवटी, त्यांनी देवाने नियुक्त केलेल्या मशीहाला नाकारले. म्हणून, देवानेही त्यांना नाकारले आणि त्यांच्या जागी अशा एका समूहाला नियुक्त करण्याचे ठरवले, ज्यापासून एक नवीन राष्ट्र बनले. परिणामस्वरूप, सा.यु. ३३ साली यहोवाच्या अभिषिक्त उपासकांची मिळून बनलेली ख्रिस्ती मंडळी अस्तित्वात आली. ही ख्रिस्ती मंडळी, यहोवाच्या शासनाखाली असलेले ते नवे राष्ट्र होते. पौलाने या राष्ट्राला ‘देवाचे इस्राएल’ असे म्हटले.—गलती. ६:१६.
११, १२. देखरेख करण्याबद्दल प्राचीन इस्राएल व ‘देवाचे इस्राएल’ यांमध्ये कोणत्या गोष्टी समान आहेत?
११ मूळ इस्राएल राष्ट्र आणि ‘देवाचे इस्राएल’ या नवीन राष्ट्रामध्ये काही फरक व काही समानता देखील आहेत. इस्राएल राष्ट्राप्रमाणे ख्रिस्ती मंडळीवर मानवी राजांचे शासन नाही आणि पापी लोकांकरता पशुबलिदाने देखील देण्याची गरज नाही. इस्राएल राष्ट्र व ख्रिस्ती मंडळीमध्ये पाहायला मिळणारी एक समानता म्हणजे वडिलांची व्यवस्था. (निर्ग. १९:३-८) हे ख्रिस्ती वडील कळपावर शासन करत नाहीत. तर, ते मंडळीची देखभाल करतात आणि ख्रिस्ती कार्यांत पुढाकार घेण्यासाठी अथक परिश्रम घेतात. मंडळीतील प्रत्येकाशी ते प्रेमळपणे वागतात व सर्वांचा आदर व सन्मान करतात.—२ करिंथ. १:२४; १ पेत्र ५:२, ३.
१२ यहोवाने इस्राएल लोकांशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावर मनन केल्याने, ‘देवाच्या इस्राएलचे’ सदस्य व त्यांचे साथीदार असलेली “दुसरी मेंढरे” यांना यहोवाबद्दल व त्याच्या शासनाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत मिळते. (योहा. १०:१६) उदाहरणार्थ, इतिहासावरून दिसून येते की इस्राएलच्या मानवी शासकांनी मांडलेल्या चांगल्या किंवा वाईट उदाहरणाचा त्यांच्या प्रजेवर जबरदस्त प्रभाव पडला. आज मंडळीत पुढाकार घेणारे वडील प्राचीन इस्राएलातील राजांप्रमाणे ख्रिस्ती मंडळीवर शासन करत नसले, तरी विश्वासाच्या बाबतीत नेहमी उत्तम उदाहरण मांडणे किती जरुरीचे आहे हे त्यांना यावरून समजते.—इब्री १३:७.
आज यहोवा कशा प्रकारे शासन करतो?
१३. सन १९१४ मध्ये कोणती महत्त्वपूर्ण घटना घडली?
१३ आज खरे ख्रिस्ती मानवी शासनाचा लवकरच अंत होणार अशी घोषणा सर्व जगभरात करत आहेत. यहोवाने १९१४ मध्ये, येशू ख्रिस्ताला राजा नियुक्त करून स्वर्गात आपल्या राज्याची स्थापना केली. त्या वेळी, यहोवाने येशूला ‘विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्याचा’ अधिकार दिला. (प्रकटी. ६:२) सिंहासनावर बसलेल्या या नव्या राजाला असे सांगण्यात आले: “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.” (स्तो. ११०:२) दुःखाची गोष्ट म्हणजे, या शत्रुंनी अर्थात सध्याच्या मानवी राष्ट्रांनी वारंवार यहोवाच्या शासनाच्या अधीन होण्यास नकार दिला आहे. ते अशा प्रकारे वागत आले आहेत जणू “देव नाही.”—स्तो. १४:१.
१४, १५. (क) आज आपल्यावर देवाचे राज्य कशा प्रकारे शासन करत आहे, आणि हे लक्षात ठेवून आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? (ख) देवाचे शासन सर्वोत्तम असल्याचे आजही कशावरून दिसून येते?
१४ ‘देवाच्या इस्राएलचे’ काही अभिषिक्त सदस्य आजही पृथ्वीवर उरलेले आहेत आणि येशूचे बांधव या नात्याने ते आजही “ख्रिस्ताचे राजदूत” म्हणून कार्य करत आहेत. (२ करिंथ. ५:२०, ईझी टू रीड व्हर्शन) त्यांना विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्ग या नात्याने अभिषिक्त जनांची आणि पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची आशा असलेल्या ख्रिश्चनांची—ज्यांची संख्या आज लाखोंच्या घरात आहे आणि दिवसेंदिवस वाढत चालली आहे—काळजी घेण्यास आणि त्यांना आध्यात्मिक अन्न पुरवण्यास नियुक्त करण्यात आले आहे. (मत्त. २४:४५-४७; प्रकटी. ७:९-१५) यहोवा या व्यवस्थेवर आशीर्वाद देत आहे हे आज त्याचे खरे उपासक अनुभवत असलेल्या आध्यात्मिक समृद्धीवरून स्पष्टपणे दिसून येते.
१५ आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘मला ख्रिस्ती मंडळीतील कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत हे मी पूर्णपणे जाणतो का? शासन करण्याच्या यहोवाच्या पद्धतीचे मी उचितपणे समर्थन करत आहे का? यहोवाच्या राज्याच्या प्रजेपैकी एक असण्याचा मला अभिमान वाटतो का? माझ्याकडून होईल तितके देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगत राहण्याचा मी निर्धार केला आहे का?’ एक समूह या नात्याने, आपण नियमन मंडळ देत असलेले मार्गदर्शन स्वीकारतो आणि मंडळीतील नियुक्त वडिलांना सहकार्य करतो. असे केल्याने, आपण देवाचे शासन स्वीकारले असल्याचे दाखवून देतो. (इब्री लोकांस १३:१७ वाचा.) आपण स्वेच्छेने देवाच्या शासनाच्या अधीन होतो तेव्हा सबंध जगातील आपल्या ख्रिस्ती बांधवांमध्ये, सध्याच्या मानव समाजात अभावानेच आढळणारे ऐक्य आपण अनुभवतो. आपल्या अधीनतेमुळे, शांती व नीतिमत्त्व देखील उत्पन्न होते आणि यहोवाचा गौरव होतो. आणि यातून यहोवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम आहे हे दिसून येते.
यहोवाची शासनपद्धतीच सर्वोत्तम
१६. आज कोणता निर्णय घेण्याची वेळ आहे?
१६ सैतानाने एदेन बागेत लावलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत हे कायमचे सिद्ध करण्याचा दिवस वेगाने जवळ येत आहे. म्हणून, योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. आपण यहोवाच्या शासनपद्धतीचा स्वीकार करणार की मानवी शासनाला जडून राहणार हे प्रत्येक व्यक्तीने ठरवले पाहिजे. आज नम्र मनाच्या लोकांना योग्य निर्णय घेण्यास मदत करण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. लवकरच, हर्मगिदोनात सैतानाच्या प्रभावाखाली असलेल्या मानवी सरकारांची जागा सदासर्वकाळासाठी यहोवाचे शासन घेईल. (दानी. २:४४; प्रकटी. १६:१६) मानवी शासनाचा अंत होईल आणि संपूर्ण पृथ्वीवर केवळ देवाचे राज्य अधिकार गाजवेल. तेव्हा यहोवाचीच शासनपद्धती सर्वात उत्तम आहे हे पूर्णार्थाने सिद्ध होईल.—प्रकटीकरण २१:३-५ वाचा.
१७. कोणाचे शासन स्वीकारावे याबाबतीत निर्णय घेण्यासाठी नम्र लोकांना कोणत्या गोष्टी साहाय्यक ठरतील?
१७ आतापर्यंत ज्यांनी यहोवाचे शासन स्वीकारण्याचा पक्का निर्णय घेतलेला नाही त्यांनी देवाच्या राज्याकरवी मानवजातीला कोणकोणते आशीर्वाद मिळतील याचा प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. गुन्हेगारी व दहशतवादाच्या समस्या सोडवण्यात मानवी शासनाला आजपर्यंत यश आले नाही. पण, देवाचे शासन या पृथ्वीवरून सर्व दुष्टांना काढून टाकेल. (स्तो. ३७:१, २, ९) मानवी शासनामुळे निरंतर युद्धे होत आहेत. पण, देवाचे शासन ‘दिगंतापर्यंत लढाया बंद करेल.’ (स्तो. ४६:९) एवढेच काय, तर देवाच्या शासनाखाली मानवांना प्राण्यांची किंवा प्राण्यांना मानवांची भीती राहणार नाही. (यश. ११:६-९) गरीबी व उपासमार या हजारो वर्षांपासून मानवी शासनातील स्थायी स्वरूपाच्या समस्या आहेत. पण देवाच्या शासनात मात्र कोणीही गरीब किंवा उपाशी राहणार नाही. (यश. ६५:२१) मानवी शासकांपैकी ज्यांचे प्रामाणिक हेतू आहेत त्यांनाही रोगराई व मृत्यू काढून टाकण्यात यश आलेले नाही. पण, देवाच्या शासनाखाली म्हातारे व रोगी पुन्हा तरुण व सुदृढ होण्याचा आनंद अनुभवतील. (ईयो. ३३:२५; यश. ३५:५, ६) होय, संपूर्ण पृथ्वीचे एका नंदनवनात रूपांतर होईल आणि तेव्हा मेलेल्यांनाही पुन्हा जिवंत केले जाईल.—लूक २३:४३; प्रे. कृत्ये २४:१५.
१८. देवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम आहे यावर आपला भरवसा असल्याचे आपण कसे दाखवू शकतो?
१८ सैतानाने आदाम व हव्वेला सृष्टिकर्त्यापासून दूर होण्यास प्रवृत्त केल्यामुळे झालेले सर्व नुकसान देवाचे शासन भरून काढेल. आणि हेही विचारात घ्या: सैतानाने मागील ६,००० वर्षांपासून जे नुकसान केले आहे ते ख्रिस्ताद्वारे केवळ १,००० वर्षांच्या काळात देव भरून काढेल! देवाचीच शासनपद्धती सर्वोत्तम असल्याचा यापेक्षा मोठा पुरावा आणखी कोणता असू शकतो? देवाच्या वतीने साक्ष देणारे या नात्याने, आपण त्याला आपला शासक म्हणून स्वीकारले आहे. तेव्हा, आपण यहोवाचे उपासक आहोत, त्याच्या राज्याची प्रजा आहोत आणि त्याचे साक्षीदार असण्याचा आपल्याला अभिमान वाटतो हे प्रत्येक दिवशी, नव्हे प्रत्येक क्षणी आपण दाखवू या. तसेच, यहोवाची शासनपद्धतीच सर्वोत्तम आहे याबद्दल, जो कोणी ऐकून घेण्यास तयार असेल त्यास सांगण्याच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर उपयोग करू या.
खालील वचने वाचल्यावर देवाच्या शासनाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळाले?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९ पानांवरील चित्रे]
यहोवाने शासन करण्याच्या आपल्या अधिकाराचा कधीही त्याग केला नाही
[३१ पानांवरील चित्र]
मनापासून यहोवाच्या शासनाच्या अधीन झाल्याने जगभरातील बांधवांमध्ये ऐक्य निर्माण होते