व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक कळप, एक मेंढपाळ

एक कळप, एक मेंढपाळ

एक कळप, एक मेंढपाळ

“माझ्यामागे आलेले तुम्हीहि बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.”—मत्त. १९:२८.

१. यहोवाने अब्राहामाच्या वंशजांशी कशा प्रकारे व्यवहार केला आणि त्याने इतर राष्ट्रांकडे दुर्लक्ष केले असा याचा अर्थ का होत नाही?

 यहोवाचे अब्राहामावर प्रेम होते आणि त्यामुळे त्याने अब्राहामाच्या वंशजांबद्दल एकनिष्ठ प्रीती व्यक्‍त केली. १,५०० वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत त्याने अब्राहामाच्या वंशजांपासून उत्पन्‍न झालेल्या इस्राएल राष्ट्राला आपले निवडलेले लोक किंवा “खास प्रजा” मानले. (अनुवाद ७:६ वाचा.) पण, इतर राष्ट्रांकडे यहोवाने पूर्णपणे दुर्लक्ष केले असा याचा अर्थ होतो का? नाही. त्या काळात, इस्राएल राष्ट्राचा भाग नसलेल्या व्यक्‍तींना यहोवाची उपासना करायची इच्छा असल्यास, त्यांना यहोवाच्या या खास राष्ट्राशी स्वतःला जोडून घेण्याची परवानगी होती. यहोवाचे उपासक बनलेल्या या इतर राष्ट्रांतील सदस्यांना किंवा मतानुसाऱ्‍यांना इस्राएलचाच भाग मानले जायचे. त्यांच्याशी बांधवांप्रमाणे व्यवहार केला जावा असे सांगण्यात आले होते. (लेवी. १९:३३, ३४) आणि त्यांनी देखील यहोवाच्या सर्व आज्ञांचे पालन करणे जरुरीचे होते.—लेवी. २४:२२.

२. येशूने कोणती आश्‍चर्यजनक गोष्ट घडणार असल्याचे सांगितले आणि यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

पण, येशूने आपल्या काळातील यहुद्यांना एक आश्‍चर्यजनक गोष्ट घडणार असल्याचे सांगितले. त्याने म्हटले: “देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा [किंवा, राष्ट्र] त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.” (मत्त. २१:४३) या नव्या राष्ट्राचे सदस्य कोण असणार होते आणि हा बदल घडून आल्यामुळे आज आपल्यावर कोणता परिणाम होतो?

नवे राष्ट्र

३, ४. (क) नवे राष्ट्र कोणास सूचित करते हे प्रेषित पेत्राने कसे स्पष्ट केले? (ख) हे नवे राष्ट्र कोणापासून बनले आहे?

हे नवे राष्ट्र कोणास सूचित करते हे प्रेषित पेत्राने स्पष्ट केले. आपल्या ख्रिस्ती बांधवांना लिहिताना त्याने असे म्हटले: “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वतःचे लोक’ असे आहा; ह्‍यासाठी की, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.’” (१ पेत्र २:९) पूर्वीच भाकीत करण्यात आल्याप्रमाणे, जन्माने यहुदी असलेल्यांपैकी ज्यांनी येशूला मशीहा म्हणून स्वीकारले ते या नव्या राष्ट्राचे पहिले सदस्य बनले. (दानी. ९:२७क; मत्त. १०:६) नंतर, इस्राएल राष्ट्रापैकी नसलेल्या अनेकांचाही या राष्ट्रात समावेश करण्यात आला, कारण पेत्राने पुढे असे म्हटले: “तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहा.”—१ पेत्र २:१०.

पेत्र येथे कोणाशी बोलत होता? त्याच्या पत्राच्या सुरुवातीला त्याने म्हटले: ‘जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, देवाने येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. तुम्हासाठी ते वतन स्वर्गांत राखून ठेवले आहे.’ (१ पेत्र १:३, ४) त्याअर्थी, हे नवे राष्ट्र स्वर्गीय जीवनाची आशा असलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी बनले आहे. त्यांना ‘देवाचे इस्राएल’ म्हणण्यात आले आहे. (गलती. ६:१६) प्रेषित योहानाने एका दृष्टान्तात या आत्मिक इस्राएलांची संख्या १,४४,००० असल्याचे पाहिले. त्यांनी “याजक” म्हणून सेवा करावी आणि ‘येशूबरोबर एक हजार वर्षे राज्य करावे’ म्हणून त्यांना “देवासाठी व कोकऱ्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले” आहे.—प्रकटी. ५:१०; ७:४; १४:१, ४; २०:६; याको. १:१८.

नव्या राष्ट्रात इतरांचाही समावेश आहे का?

५. (क) ‘देवाचे इस्राएल’ ही संज्ञा कोणाला लागू होते? (ख) “इस्राएल” असे म्हणताना अभिषिक्‍त जनांसोबत इतरांचाही समावेश होऊ शकतो असे का म्हणता येईल?

गलतीकर ६:१६ यातील ‘देवाचे इस्राएल’ ही संज्ञा केवळ अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होते हे स्पष्टच आहे. पण, बायबलमध्ये असेही काही उल्लेख सापडतात का, ज्यांत यहोवाने इस्राएल राष्ट्राचा एक रूपक किंवा उदाहरण म्हणून उपयोग करताना अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांव्यतिरिक्‍त इतरांचाही समावेश केला? याचे उत्तर येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना उद्देशून बोललेल्या या शब्दांतून मिळते: “जसा माझ्या पित्याने माझ्याशी एका राज्याकरता करार केला तसा मीही तुमच्याशी करार करतो. ह्‍यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.” (लूक २२:२८-३०, NW) हे “पुनरुत्पत्तीत” अर्थात ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान घडेल.मत्तय १९:२८ वाचा.

६, ७. मत्तय १९:२८ आणि लूक २२:३० या वचनांच्या संदर्भात ‘इस्राएलचे बारा वंश’ ही संज्ञा कोणाला लागू होते?

येशूच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान १,४४,००० अभिषिक्‍त जन स्वर्गात राजे, याजक व न्यायाधीश म्हणून कार्य करतील. (प्रकटी. २०:४) पण ते कोणाचा न्याय करतील आणि कोणावर राज्य करतील? मत्तय १९:२८ आणि लूक २२:३० यात असे सांगितले आहे की ते “इस्राएलच्या बारा वंशांचा” न्याय करतील. या वचनांत ‘इस्राएलचे बारा वंश’ कोणास सूचित करतात? ते पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या सर्वांना सूचित करतात. हे असे लोक आहेत, जे येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवतात पण जे येशूसोबत राजे व याजक म्हणून कार्य करणाऱ्‍या वर्गात सामील नाहीत. (प्राचीन इस्राएल राष्ट्राच्या १२ वंशांच्या यादीत लेवी वंशाचा समावेश नव्हता.) तर या संदर्भात इस्राएलचे बारा वंश ही संज्ञा, १,४४,००० जनांच्या याजकीय सेवेमुळे ज्यांना आध्यात्मिक दृष्टीने लाभ प्राप्त होतील अशा लोकांना लागू होते. याजकवर्गात सामील नसलेले पण त्याच्यापासून लाभ मिळवणारे हे लोक देखील देवाचे लोक आहेत आणि तो त्यांच्यावर प्रेम करतो व त्यांचा स्वीकार करतो. त्यांची तुलना प्राचीन काळातील देवाच्या लोकांशी केली जावी हे योग्यच आहे.

म्हणूनच की काय, प्रेषित योहानाने दृष्टान्तात १,४४,००० आत्मिक इस्राएलांवर मोठ्या संकटाआधी शेवटचा शिक्का मारला जाताना पाहिला, तेव्हा त्याला ‘सर्व राष्ट्रांतून’ आलेला, कोणाला मोजता आला नाही असा “मोठा लोकसमुदाय” देखील दिसला. (प्रकटी. ७:९) हे लोक मोठ्या संकटातून बचावून ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात जीवन उपभोगतील. शिवाय, पुनरुत्थान झालेल्या कोट्यवधी लोकांचीही त्यांच्यात भर पडेल. (योहा. ५:२८, २९; प्रकटी. २०:१३) या सर्वांचे मिळून लाक्षणिक ‘इस्राएलचे बारा वंश’ बनतात, ज्यांचा न्याय येशू व त्याचे १,४४,००० सहराजे करतील.—प्रे. कृत्ये १७:३१; २४:१५; प्रकटी. २०:१२.

८. प्राचीन काळी दर वर्षी साजरा होणाऱ्‍या प्रायश्‍चित्ताच्या दिवशी जे विधी पार पाडले जायचे, त्यांतून कशा प्रकारे १,४४,००० व बाकीची मानवजात यांच्यातील संबंधाची पूर्वझलक पाहायला मिळते?

प्राचीन इस्राएलात होणाऱ्‍या प्रायश्‍चित्ताच्या दिवशी जे विधी पार पाडले जायचे, त्यांतून १,४४,००० व बाकीची मानवजात यांच्यातील संबंधाची पूर्वझलक पाहायला मिळते. (लेवी. १६:६-१०) त्या दिवशी, महायाजकाला सर्वप्रथम “स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी” पापार्पणाचा गोऱ्‍हा सादर करावा लागे. त्यानुसार, येशूच्या बलिदानाचा उपयोग सर्वप्रथम त्याच्या घराण्यासाठी म्हणजेच त्याच्या हाताखाली याजक म्हणून कार्य करणाऱ्‍यांसाठी केला जातो, जे स्वर्गात त्याच्यासोबत सेवा करतील. प्राचीन काळातील प्रायश्‍चित्ताच्या दिवशी इतर इस्राएल लोकांच्या पापांसाठी दोन बकरेही दिले जायचे. या विशिष्ट संदर्भात, जेथे याजकीय वंश १,४४,००० जनांना चित्रित करतो, तेथे बाकीचे इस्राएल लोक पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांना चित्रित करतात. यावरून मत्तय १९:२८ या वचनात ‘इस्राएलचे बारा वंश’ अशी जी संज्ञा वापरण्यात आली आहे ती येशूच्या हाताखाली सेवा करणाऱ्‍या व आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या याजकांना नव्हे, तर येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांना सूचित करते. *

९. यहेज्केलाला देण्यात आलेल्या मंदिराच्या दृष्टान्तात याजक कोणास सूचित करतात, आणि गैरयाजकीय वंशांचे इस्राएल लोक कोणास सूचित करतात?

आणखी एक उदाहरण लक्षात घ्या. यहेज्केल संदेष्ट्याला यहोवाच्या मंदिराविषयी एक सविस्तर दृष्टान्त देण्यात आला होता. (यहे., अध्याय ४०-४८) त्या दृष्टान्तात, याजक मंदिरात कार्य करत होते. ते देवाच्या लोकांना शिक्षण द्यायचे आणि त्यांनासुद्धा देवाकडून मार्गदर्शन व सूचना मिळत असत. (यहे. ४४:२३-३१) त्याच दृष्टान्तात, निरनिराळ्या वंशांचे इस्राएली मंदिरात उपासना करण्यासाठी व बलिदाने अर्पण करण्यासाठी येतात असे यहेज्केलाला दिसते. (यहे. ४५:१६, १७) तर मग, या दृष्टान्ताच्या संदर्भात, याजक हे अभिषिक्‍त जनांना तर गैरयाजकीय वंशांचे इस्राएल लोक हे पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांना सूचित करतात. हे दोन्ही गट मिळूनमिसळून कार्य करतात आणि याजकीय वर्ग खऱ्‍या उपासनेत पुढाकार घेतो, यावर या दृष्टान्तात भर दिला आहे.

१०, ११. (क) येशूच्या शब्दांच्या पूर्णतेमुळे कशा प्रकारे आपल्या विश्‍वासाला पुष्टी मिळाली आहे? (ख) दुसऱ्‍या मेंढरांच्या संदर्भात कोणता प्रश्‍न उपस्थित होतो?

१० येशूने आपल्या अभिषिक्‍त अनुयायांनी बनलेल्या ‘लहान कळपाच्या’ मेंढवाड्यातली नव्हेत अशी “दुसरी मेंढरे” असल्याचे सांगितले. (योहा. १०:१६; लूक १२:३२) त्यांच्याविषयी त्याने असे म्हटले: “तीहि मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.” या शब्दांची पूर्णता होताना पाहणे हा खरोखर आपल्या विश्‍वासाला किती पुष्टी देणारा अनुभव ठरला आहे! अभिषिक्‍त जनांचा लहान समूह व दुसऱ्‍या मेंढरांचा मोठा लोकसमुदाय, या दोन्ही गटांतील सदस्यांना एकत्र आणण्यात आले आहे. (जखऱ्‍या ८:२३ वाचा.) दुसरी मेंढरे आत्मिक मंदिराच्या आतील अंगणात लाक्षणिक अर्थाने सेवा करत नसली, तरी ती या मंदिराच्या बाहेरील अंगणात नक्कीच सेवा करत आहेत.

११ पण, या दुसऱ्‍या मेंढरांना सूचित करण्यासाठी यहोवाने काही वेळा गैरयाजकीय वंशांच्या इस्राएल लोकांचा उपयोग केला आहे, त्याअर्थी पृथ्वीवरील जीवनाची आशा असणाऱ्‍यांनी देखील स्मारक विधीच्या बोधचिन्हांचे सेवन करावे का? या प्रश्‍नाचे उत्तर आता आपण पाहू या.

नवा करार

१२. यहोवाने कोणत्या नव्या व्यवस्थेबद्दल भाकीत केले होते?

१२ यहोवाने आपल्या लोकांकरता एक नवी व्यवस्था अस्तित्वात आणण्याविषयी भाकीत केले होते. त्याने म्हटले: “त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा: मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.” (यिर्म. ३१:३१-३३) या नव्या कराराद्वारे यहोवाने अब्राहामाला दिलेले वचन वैभवी रीत्या कायमचे पूर्ण होणार होते.उत्पत्ति २२:१८ वाचा.

१३, १४. (क) नव्या करारात कोण भागीदार आहेत? (ख) नव्या करारापासून लाभ प्राप्त करणारे कोण आहेत आणि ते कशा प्रकारे या करारास “दृढ धरून राहतात”?

१३ या नव्या कराराचा उल्लेख करून येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हटले: “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे, ते रक्‍त तुम्हासाठी ओतिले जात आहे.” (लूक २२:२०; १ करिंथ. ११:२५) या नव्या करारात ख्रिस्ताच्या सर्व अनुयायांचा समावेश आहे का? नाही. त्या रात्री येशूने दिलेल्या प्याल्यातून पिणाऱ्‍या प्रेषितांप्रमाणे केवळ काही जण या नव्या करारात भागीदार आहेत. * येशूने त्यांच्यासोबत आणखी एक करार केला. त्याच्या राज्यात त्याच्यासोबत राज्य करण्याचा करार. (लूक २२:२८-३०) ते येशूच्या राज्यात त्याच्यासोबत सहभागी होतील.—लूक २२:१५, १६.

१४ त्याच्या राज्याच्या शासनाखाली जे पृथ्वीवर राहतील त्यांच्याविषयी काय? हे नव्या करारापासून लाभ प्राप्त करणारे आहेत. (गलती. ३:८, ९) भागीदार नसले तरी ते या कराराच्या अटींचे पालन करण्याद्वारे, यशया संदेष्ट्याने भाकीत केले होते त्याप्रमाणे या करारास “दृढ धरून राहतात.” यशयाने लिहिले: “परमेश्‍वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यातील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात, त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांस हर्षित करीन.” यहोवा पुढे म्हणतो: “कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.”—यश. ५६:६, ७.

बोधचिन्हांचे सेवन कोणी करावे?

१५, १६. (क) प्रेषित पौलाने नव्या कराराच्या भागीदारांचा कोणत्या विशेषाधिकाराशी संबंध जोडला? (ख) पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांनी स्मारक विधीच्या बोधचिन्हांचे सेवन का करू नये?

१५ जे नव्या करारात भागीदार आहेत त्यांना ‘पवित्रस्थानात प्रवेश करण्याचे धैर्य आहे.’ (इब्री लोकांस १०:१५-२० वाचा.) हेच ते आहेत ज्यांना ‘न हलविता येणारे राज्य मिळणार आहे.’ (इब्री १२:२८) तेव्हा, जे येशू ख्रिस्तासोबत स्वर्गात राजे व याजक बनतील, केवळ त्यांनीच नव्या कराराचे चिन्ह असलेल्या ‘प्याल्यातून’ पिणे योग्य आहे. नव्या करारातील या भागीदारांना कोकऱ्‍याची वधू होण्याकरता निवडण्यात आले आहे. (२ करिंथ. ११:२; प्रकटी. २१:२, ९) वार्षिक स्मारक विधीला उपस्थित राहणारे इतर सर्व जण या विधीचे आदरपूर्वक दर्शक असतात, ते बोधचिन्हांचे सेवन करत नाहीत.

१६ पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले स्मारक विधीची बोधचिन्हे घेत नाहीत हे समजण्यास प्रेषित पौलही आपल्याला मदत करतो. त्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना असे म्हटले: “जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता.” (१ करिंथ. ११:२६) प्रभू “येईपर्यंत” याचा काय अर्थ होतो? तो आपल्या अभिषिक्‍त वधू वर्गातील शेवटल्या सदस्याला त्याच्या स्वर्गीय निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी येईल तोपर्यंत, असा याचा अर्थ होतो. (योहा. १४:२, ३) यावरून, प्रभूचे सांज भोजन हा वार्षिक विधी सर्वकाळ पाळला जाणार नाही हे स्पष्ट होते. स्त्रीच्या संततीतील अद्याप पृथ्वीवर असलेले “शेषजन,” त्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वर्गातील प्रतिफळ प्राप्त होईपर्यंत या भोजनाचे सेवन करत राहतील. (प्रकटी. १२:१७) जर पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांना बोधचिन्हांचे सेवन करण्याचा अधिकार असता, तर मग स्मारक भोजनाचा विधी सर्वकाळ चालू राहिला असता.

‘बहुत राष्ट्रे माझी प्रजा बनतील’

१७, १८. यहेज्केल ३७:२६, २७ यातील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली आहे?

१७ यहोवाने आपल्या लोकांमधील ऐक्याविषयी अशा प्रकारे वर्णन केले: “मी त्यांजबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांस वसवीन, त्यांची संख्या वाढवीन, आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये स्थापीन. माझा निवासमंडप त्यांच्यावर राहील; मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल.”—यहे. ३७:२६, २७.

१८ या अद्‌भुत प्रतिज्ञेची, अर्थात ख्रिस्ती शांततेच्या कराराची पूर्णता अनुभवण्याचा व त्यामुळे मिळणारे लाभ प्राप्त करण्याचा सुहक्क देवाच्या सर्व लोकांजवळ आहे. देवाच्या आज्ञांचे पालन करणाऱ्‍या त्याच्या सर्व सेवकांना त्याने शांती देण्याचे वचन दिले आहे. देवाच्या लोकांमध्ये त्याच्या आत्म्याचे फळ स्पष्टपणे दिसून येते. शुद्ध ख्रिस्ती उपासनेला चित्रित करणारे त्याचे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये आहे. ते खऱ्‍या अर्थाने देवाचे लोक बनले आहेत, कारण त्यांनी सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेचा त्याग केला आहे आणि यहोवाला आपला एकच खरा देव मानून ते त्याची उपासना करत आहेत.

१९, २०. यहोवा ज्यांना “माझी प्रजा” म्हणतो त्यांत कोणाचा समावेश आहे आणि नव्या करारामुळे काय शक्य झाले आहे?

१९ आज आपल्या काळात, अभिषिक्‍त जन व मोठा लोकसमुदाय या दोन समूहांमधील ऐक्य पाहणे व अनुभवणे किती रोमहर्षक आहे! दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायाला स्वर्गीय जीवनाची आशा नसली, तरी ज्यांना ही आशा आहे त्यांच्यासोबत सहकार्य करण्यास त्यांना अभिमान वाटतो. त्यांनी स्वतःला देवाच्या इस्राएलाशी जोडून घेतले आहे. असे केल्यामुळे, देव ज्यांना “माझी प्रजा” म्हणतो त्यांच्यामध्ये त्यांचाही समावेश झाला आहे. त्यांच्या बाबतीत पुढील भविष्यवादाची पूर्णता होत आहे: “त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्‍वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन.”—जख. २:११; ८:२१; यशया ६५:२२; प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.

२० या सर्व गोष्टी यहोवाने नव्या कराराच्या माध्यमाने घडवून आणल्या आहेत. ज्यांना आध्यात्मिक अर्थाने विदेशी म्हणता येईल असे लाखो लोक आज यहोवाची कृपादृष्टी असलेल्या राष्ट्राचा भाग बनले आहेत. (मीखा ४:१-५) नव्या कराराच्या तरतुदींचा स्वीकार करून व त्याच्या अटींचे पालन करून त्यास दृढ धरून राहण्याचा त्यांनी पक्का निर्धार केला आहे. (यश. ५६:६, ७) असे केल्यामुळे देवाच्या इस्राएलसोबत ते स्थायी स्वरूपाची शांती आणि या शांतीमुळे मिळणारे समृद्ध आशीर्वाद अनुभवत आहेत. तुम्हालाही हे आशीर्वाद, केवळ आजच नव्हे तर सर्वकाळ अनुभवायला मिळोत!

[तळटीपा]

^ परि. 8 त्याच प्रकारे, “मंडळी” ही संज्ञा खासकरून अभिषिक्‍त जनांच्या संदर्भात वापरण्यात आली आहे. (इब्री १२:२३) पण “मंडळी” या संज्ञेचा, सर्व ख्रिस्ती, मग त्यांची स्वर्गीय जीवनाची आशा असो अथवा पृथ्वीवरील, असा दुसरा अर्थही होऊ शकतो.—टेहळणी बुरूज, मे १, २००७, पृष्ठे ९-११ पाहा.

^ परि. 13 येशू या कराराचा भागीदार नसून मध्यस्थ आहे. मध्यस्थ या नात्याने त्याने भाकरी व द्राक्षारसाचे सेवन केले नाही असे दिसते.

तुम्हाला आठवते का?

• ज्यांचा न्याय १,४४,००० जन करतील ते ‘इस्राएलचे बारा वंश’ कोणाला सूचित करतात?

• नव्या कराराशी अभिषिक्‍त जनांचा आणि दुसऱ्‍या मेंढरांचा काय संबंध आहे?

• सर्व ख्रिश्‍चनांनी स्मारक विधीच्या बोधचिन्हांचे सेवन करावे का?

• आपल्या काळातील कोणत्या ऐक्याबद्दल पूर्वभाकीत करण्यात आले होते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२५ पानांवरील आलेख/चित्रे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

आज अनेक जण देवाच्या इस्राएलासोबत सेवा करत आहेत

७३,१३,१७३

४०,१७,२१३

१४,८३,४३०

३,७३,४३०

१९५० १९७० १९९० २००९