या कठीण काळात “मनाची शुद्धता” टिकवून ठेवा
या कठीण काळात “मनाची शुद्धता” टिकवून ठेवा
“नैतिक शुद्धता ही आज चर्चसमोर एक समस्या बनली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.” कॅथलिक पत्रकार व्हीटॉर्यो मेस्सोरी यांनी हे विधान केले. अलीकडच्या काळात इटलीमध्ये चर्चशी संबंधित लैंगिक अनैतिकतेची जी प्रकरणे उघडकीस आली, त्यांच्या संदर्भात ते बोलत होते. “शिवाय, पाळकांना लग्न करण्याची परवानगी दिल्याने ही समस्या सुटणार नाही,” असेही ते म्हणाले. “कारण ८० टक्के प्रकरणे ही समलिंगी व्यक्तींशी संबंधित, म्हणजेच पाळकांनी इतर पुरुषांशी व मुलांशी केलेल्या लैंगिक गैरकृत्यांची आहेत.”—ला स्टाम्पा.
सर्वत्र माजलेली दुष्टाई हे निश्चितच सध्याच्या जगाच्या ‘शेवटल्या काळाचे’ चिन्ह आहे. (२ तीम. ३:१-५) आणि बातमीपत्रांतील वृत्तांवरून दिसून येते त्याप्रमाणे या शेवटल्या काळातील नैतिक ऱ्हासाचा दुष्प्रभाव केवळ सर्वसामान्य लोकांवरच नव्हे, तर स्वतःला देवाचे सेवक म्हणवून घेणाऱ्यांवरही पडतो. त्यांची नीतिभ्रष्ट व अशुद्ध मने त्यांना घृणास्पद कृत्ये करण्यास प्रवृत्त करतात. (इफिस. २:२) म्हणूनच, येशूने अशी ताकीद दिली होती की “अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात.” (मत्त. १५:१९) पण यहोवा देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या सेवकांनी “मनाची शुद्धता” राखावी. (नीति. २२:११) तर मग, या कठीण काळात एक ख्रिस्ती व्यक्ती कशा प्रकारे मनाची शुद्धता टिकवून ठेवू शकते?
“मनाची शुद्धता” म्हणजे नेमके काय?
एका संदर्भ ग्रंथानुसार बायबलमध्ये “मन” हा शब्द, “मनुष्यामधील सर्वात अंतस्थ भाग” या अर्थाने वापरण्यात आला आहे. “देव मानवाकडे पाहतो तेव्हा तो त्याचे मनच पाहतो. देवासोबतचा नातेसंबंध जेथे जोडला जातो आणि नैतिक वर्तनाची प्रेरणा जेथून मिळते, ते म्हणजे मन.” दुसऱ्या शब्दांत, मन हे आपण आतून खरोखर कशा प्रकारची व्यक्ती आहोत यास सूचित करते. वरील संदर्भ ग्रंथात सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्या सेवकांकडे पाहतो तेव्हा तो त्यांच्या मनाचे परीक्षण करतो आणि त्याची कदरही करतो.—१ पेत्र ३:४.
बायबलमध्ये काही ठिकाणी, “शुद्ध” व “स्वच्छ” हे शब्द शारीरिक दृष्टीने निर्मळ गोष्टींना सूचित करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. पण हेच शब्द नैतिक किंवा धार्मिक संदर्भात अदूष्य, अर्थात कोणतीही भेसळ, कलंक किंवा भ्रष्टता नसलेल्या गोष्टींसाठीही वापरले जातात. डोंगरावरील प्रवचनात येशूने म्हटले: “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य.” तो अशा लोकांबद्दल बोलत होता, जे आतून शुद्ध असतात. (मत्त. ५:८) त्यांच्या आवडीनिवडी, इच्छा-आकांक्षा व हेतू शुद्ध असतात. ते यहोवावर अगदी मनापासून, प्रामाणिकपणे प्रेम करतात, त्यात कोणताही ढोंगीपणा नसतो. केवळ प्रेम व कृतज्ञतेने ते प्रेरित झालेले असतात. (लूक १०:२७) तुम्हालाही या अर्थाने शुद्ध असण्याची इच्छा नाही का?
“मनाची शुद्धता” टिकवून ठेवण्याचे आव्हान
यहोवाच्या सेवकाचे “हात स्वच्छ” असण्यासोबतच त्याचे ‘मनही शुद्ध’ असणे गरजेचे आहे. (स्तो. २४:३, ४) पण, देवाच्या सेवकांना आपले “मन शुद्ध” ठेवणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे. सैतान व त्याच्या प्रभावाखालील जग, तसेच आपले स्वतःचे अपरिपूर्ण शरीर आपल्यावर यहोवापासून दूर जाण्याचा जोरदार दबाव आणत असतात. या दबावांवर मात करण्यासाठी आपण ‘मनाच्या शुद्धतेची’ आवड धरणे आणि ही शुद्धता टिकवून ठेवण्याचा पक्का निर्धार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. असे केल्यामुळे आपले संरक्षण तर होईलच पण देवाशी आपली मैत्री टिकून राहण्यासही यामुळे मदत होईल. तर मग, आपण मनाची शुद्धता कशी टिकवून ठेवू शकतो?
इब्री लोकांस ३:१२ यात अशी ताकीद देण्यात आली आहे: “बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेहि असू नये [“कोणातही उत्पन्न होऊ नये,” NW] म्हणून जपा.” जर आपल्यात “अविश्वासाचे” मन उत्पन्न झाले तर आपल्याला “मनाची शुद्धता” टिकवून ठेवता येणार नाही. देवावरील आपला विश्वास कमकुवत करण्यासाठी दियाबल सैतानाने कोणत्या प्रकारचे विचार पसरवले आहेत? याची काही उदाहरणे म्हणजे, उत्क्रांतीवादाची शिकवण, नैतिक व धार्मिक सापेक्षतावाद, अर्थात, ‘कोणतीही गोष्ट योग्य किंवा अयोग्य नसते, हा ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो’ ही कल्पना, तसेच, बायबल देवाने प्रेरित केले आहे याबद्दल शंका घेणे. अशा घातक विचारसरणीचा प्रभाव आपण स्वतःवर पडू देता कामा नये. (कलस्सै. २:८) दररोज बायबल वाचण्याद्वारे आणि तन्मयतेने मनन करण्याद्वारे आपण अशा विचारांचा प्रतिकार करू शकतो. देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेतल्यामुळे यहोवावरील आपले प्रेम आणि त्याच्या मार्गांबद्दल आपली कदर वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि हे प्रेम व ही कदर उत्पन्न केली तरच आपल्याला खोट्या विचारसरणीचा धिक्कार करून यहोवावरील आपला विश्वास भक्कम ठेवता येईल आणि त्याद्वारे मनाची शुद्धता टिकवून ठेवणे शक्य होईल.—१ तीम. १:३-५.
शारीरिक वासनांशी झगडताना
“मनाची शुद्धता” टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ज्या आणखी एका हल्ल्याला तोंड द्यावे लागते तो शारीरिक वासना व पैशाच्या लोभाशी संबंधित आहे. (१ योहा. २:१५, १६) पैशाचा लोभ किंवा अमाप धनसंपत्ती व चैनीच्या वस्तू मिळवण्याची इच्छा आपल्या मनाला भ्रष्ट करू शकते आणि एका ख्रिस्ती व्यक्तीला देवाच्या इच्छेविरुद्ध वागण्यास प्रवृत्त करू शकते. अशा प्रकारच्या इच्छांमुळेच काही जण आपल्या कामाच्या ठिकाणी अप्रामाणिकपणे वागतात, इतरांची फसवणूक करतात किंवा इतरांच्या मालकीचे पैसे किंवा वस्तू चोरतात.—१ तीम. ६:९, १०.
दुसरीकडे पाहता, आपण यहोवाच्या इच्छेविरुद्ध वागण्याचे सुदृढ भय उत्पन्न करतो, न्यायीपणाची आवड धरतो आणि चांगला विवेक टिकवून ठेवण्याचा संकल्प करतो, तेव्हा आपल्याला “मनाची शुद्धता” टिकवून ठेवण्याची इच्छा आहे हे दिसून येते. आणि यामुळेच आपल्याला “सर्व बाबतीत चांगले [प्रामाणिकपणे] वागण्याची” प्रेरणा मिळते. (इब्री १३:१८) आपल्या चांगल्या व प्रामाणिक वागणुकीमुळे इतरांना उत्तम साक्ष मिळू शकते. उदाहरणार्थ, इटलीत राहणारा एमील्यो नावाचा एक साक्षीदार एका सार्वजनिक वाहतूक कंपनीत ड्रायव्हरचे काम करतो. एकदा त्याला ४७० युरो (जवळजवळ ३४,००० रुपये) असलेले एक पाकीट सापडले. त्याने ते पाकीट आपल्या सुपरव्हायजरला दिले आणि त्यांनी ज्या व्यक्तीचे पाकीट हरवले होते तिच्या सुपूर्द ते केले. एमील्योने पाकीट परत दिले याचे त्याच्या सहकाऱ्यांना खूपच आश्चर्य वाटले. काही जण त्याच्या या कृतीमुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी बायबलविषयी आस्था व्यक्त केली आणि बायबल अभ्यास करण्यास सुरुवात केली. परिणामस्वरूप, दोन कुटुंबांतील सात सदस्यांनी सत्य स्वीकारले आहे. खरोखर, शुद्ध मनाने प्रामाणिकपणे वागल्यामुळे इतरांना देवाची स्तुती करण्याची प्रेरणा मिळू शकते.—तीत. २:१०.
एका ख्रिस्ती व्यक्तीच्या शुद्ध मनावर नकारात्मक प्रभाव पाडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे लैंगिक संबंधांविषयी विकृत, अनैतिक दृष्टिकोन असणे. आज बहुतेकांना विवाहपूर्व, विवाहबाह्य व समलिंगी संबंध ठेवण्यात काहीही गैर वाटत नाही. अशा दृष्टिकोनामुळे ख्रिस्ती व्यक्तीचे मन भ्रष्ट होऊ शकते. लैंगिक अनैतिकतेच्या आहारी जाणारी व्यक्ती कदाचित आपले पाप लपवण्याच्या प्रयत्नात दुटप्पी जीवन जगत असेल. पण हे निश्चितच ‘मनाच्या शुद्धतेचे’ लक्षण नाही.
गॅब्रीएली १५ वर्षांचा असताना त्याचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्म्यानंतर त्याने लगेच पायनियर सेवा सुरू केली. पण कालांतराने, त्याने काही वाईट लोकांची संगत धरली आणि तो नाईटक्लब्समध्ये जाऊ लागला. (स्तो. २६:४) ही त्याच्या अनैतिक व दुटप्पी जीवनशैलीची केवळ सुरुवात होती. कालांतराने त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. यहोवाकडून हे ताडन मिळाल्यानंतर मात्र तो गांभीर्याने विचार करू लागला. गॅब्रीएली तेव्हाच्या आपल्या भावना सांगतो: “मी पूर्वी ज्या गोष्टींकडे जराही लक्ष दिलं नव्हतं त्या सर्व गोष्टी मी करू लागलो. बायबल दररोज वाचू लागलो, यहोवा मला खरोखर काय सांगत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो आणि बायबल आधारित प्रकाशनांचा लक्षपूर्वक अभ्यास करू लागलो. वैयक्तिक अभ्यास किती समाधानदायक व आनंददायक असू शकतो याची मला प्रचिती आली. तसेच, बायबल वाचन व कळकळीची प्रार्थना केल्यामुळे किती मनोधैर्य मिळतं हेही मी प्रत्यक्ष अनुभवलं.” या गोष्टींमुळे गॅब्रीएली अनैतिक वर्तन सोडून यहोवासोबत नव्याने नाते जोडू शकला.
आज गॅब्रीएली पुन्हा एकदा, आणि आता तर आपल्या पत्नीसोबत, पायनियर म्हणून सेवा करत आहे. बायबलच्या व ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांच्या अभ्यासामुळे कशा प्रकारे एका व्यक्तीला मनाची शुद्धता राखणे आणि अनैतिकतेकडे पाठ फिरवणे शक्य होते हे गॅब्रीएलीच्या उदाहरणावरून दिसून येते.—मत्त. २४:४५; स्तो. १४३:१०.
कठीण परिस्थितीला तोंड देताना “मनाची शुद्धता”
विरोध करणाऱ्यांचा दबाव, आर्थिक अडचणी व गंभीर आजारपण यांसारख्या समस्या देवाच्या सेवकांपैकी काहींच्या समोर येतात. कधीकधी अशा समस्यांचा त्यांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो. दावीद राजालाही असा अनुभव आला होता. त्याने म्हटले: “माझा आत्मा माझ्या ठायी व्याकुळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.” (स्तो. १४३:४) अशा वेळी त्याला कोणत्या गोष्टीने धैर्य दिले? देवाने कशा प्रकारे त्याच्या सेवकांसोबत व्यवहार केला व कशा प्रकारे आपल्याला निरनिराळ्या संकटांतून सोडवले याबद्दल दाविदाने विचार केला. यहोवाने आपल्या महान नावाखातर काय काय केले आहे याबद्दलही दाविदाने मनन केले. देवाच्या कार्यांबद्दल दावीद सतत विचार करत राहिला. (स्तो. १४३:५) दाविदाप्रमाणेच आपणही आपल्या निर्माणकर्त्याबद्दल, त्याने आजपर्यंत काय काय केले आहे आणि आजही तो आपल्याकरता काय काय करत आहे याबद्दल मनन केल्यास आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांना तोंड देणे आपल्याला शक्य होईल.
आपल्यावर अन्याय होतो, किंवा अन्याय झाला आहे असे आपल्याला वाटते तेव्हा आपल्या मनात कडवटपणा निर्माण होण्याची शक्यता असते. सतत त्या घटनेविषयी विचार करत राहिल्यास आपल्या बांधवांविषयी नकारात्मक भावना आपल्या मनात घर करू शकतात. असे झाल्यास कदाचित आपल्याला इतरांशी संबंध तोडून टाकावेसे वाटतील, एकटे राहावेसे वाटेल. इतरांशी काही घेणे देणे नको, अशी वृत्ती आपल्यात निर्माण होईल. पण आपल्याला “मनाची शुद्धता” राखण्याची इच्छा असल्यास, अशी प्रतिक्रिया दाखवणे योग्य ठरेल का? मन शुद्ध राखण्यासाठी, आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांशी कसे वागतो-बोलतो व कसा व्यवहार करतो याचाही विचार करणे निश्चितच महत्त्वाचे आहे.
दिवसेंदिवस अधिकच भ्रष्ट होत चाललेल्या व नैतिकदृष्ट्या खालावत चाललेल्या या जगात खरे ख्रिस्ती या नात्याने आपण वेगळे आहोत हे स्पष्टपणे दिसून येते कारण आपल्याला “मनाची शुद्धता” टिकवून ठेवण्याची इच्छा आहे. देवाच्या इच्छेनुसार वागल्यामुळे आपल्याला खरी मनःशांती लाभते आणि याचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “शुद्ध मनाच्या” लोकांवर प्रेम करणारा आपला निर्माणकर्ता यहोवा देव याच्यासोबत एक जवळचा नातेसंबंध आपण अनुभवतो. (स्तो. ७३:१) जे “अंतःकरणाचे शुद्ध” आहेत त्यांना येशूने धन्य म्हटले. त्यांच्याविषयी त्याने असे आश्वासन दिले की “ते देवाला पाहतील,” म्हणजेच, ‘मनाच्या शुद्धतेची’ आवड धरणाऱ्यांच्या वतीने देव कार्य करील तेव्हा ते पाहतील. आपणही त्या धन्य लोकांमध्ये गणले जाऊ शकतो.—मत्त. ५:८.