बांधवांनो—आत्म्यासाठी पेरा आणि मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यास पुढे या!
बांधवांनो—आत्म्यासाठी पेरा आणि मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यास पुढे या!
“जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.”—गलती. ६:८.
१, २. मत्तय ९:३७, ३८ यातील शब्दांची आज कशा प्रकारे पूर्णता होताना दिसते आणि यामुळे मंडळ्यांमध्ये कोणती गरज निर्माण झाली आहे?
आज आपण ऐतिहासिक दृष्ट्या एका अतिशय विलक्षण काळात राहत आहोत! येशूने भाकीत केलेले एक कार्य आज मोठ्या प्रमाणात, सबंध पृथ्वीवर केले जाताना आपण पाहत आहोत. येशूने म्हटले होते: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३७, ३८) आज यहोवा अशा प्रकारच्या प्रार्थनांचे अभूतपूर्व प्रमाणात उत्तर देत आहे. २००९ सालच्या सेवा वर्षादरम्यान जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांच्या संख्येत २,०३१ नव्या मंडळ्यांची भर पडली. आता त्यांच्या मंडळ्यांची एकूण संख्या १,०५,२९८ झाली आहे. याचा अर्थ या विशिष्ट सेवा वर्षात दररोज सरासरी ७५७ व्यक्तींचा बाप्तिस्मा झाला!
२ ही अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे साहजिकच मंडळ्यांमध्ये मार्गदर्शन करण्याकरता आणि मंडळ्यांतील सदस्यांवर देखरेख करण्याकरता आवश्यक पात्रता असलेल्या सुयोग्य बांधवांची गरज निर्माण झाली आहे. (इफिस. ४:११) मागील दशकांत यहोवाने आपल्या मेंढरांची काळजी घेण्याकरता, त्यांच्या गरजा पुरवण्याकरता सुयोग्य पुरुषांची व्यवस्था केली आणि पुढेही तो असे करत राहील यात शंका नाही. मीखा ५:५ यातील भविष्यवाणीत असे आश्वासन देण्यात आले आहे की शेवटल्या काळात यहोवाच्या लोकांमध्ये “सात मेंढपाळ व आठ लोकनायक” असतील. यावरून, देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्याकरता बरेच कार्यक्षम पुरुष असतील असे सूचित होते.
३. ‘आत्म्यासाठी पेरण्याचा’ काय अर्थ होतो हे स्पष्ट करा.
३ जर तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांतील बाप्तिस्माप्राप्त पुरुषांपैकी एक असाल, तर मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यास पुढे येण्याची प्रेरणा तुम्हाला कशामुळे मिळू शकते? याकरता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आत्म्यासाठी पेरणे.’ (गलती. ६:८) याचा अर्थ, अशा रीतीने जीवन जगणे जेणेकरून देवाचा पवित्र आत्मा तुमच्या जीवनात सक्रियपणे कार्य करू शकेल. त्यासोबतच, ‘देहस्वभावासाठी न पेरण्याचा’ दृढ निश्चय करा. म्हणजेच, ऐषआराम, चैन, मनोरंजन यांसारख्या गोष्टींच्या ओढीमुळे देवाच्या सेवेकरता खपण्याची आपली इच्छा मंदावू देऊ नका. खरे पाहता, सर्वच ख्रिस्ती व्यक्तींनी ‘आत्म्यासाठी पेरले’ पाहिजे. आणि जे बांधव असे करतात, त्यांना कालांतराने मंडळीतील जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. सध्याच्या काळात सेवा सेवकांची आणि वडिलांची नितांत गरज असल्यामुळे हा लेख खासकरून ख्रिस्ती पुरुषांना उद्देशून आहे. म्हणून बांधवांनो, यातील माहितीवर तुम्ही प्रार्थनापूर्वक विचार करावा असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो.
एक चांगले काम करण्यास पुढे या
४, ५. (क) बाप्तिस्मा झालेल्या बांधवांना मंडळीत कोणत्या जबाबदाऱ्या मिळवण्यास पुढे येण्याचे प्रोत्साहन दिले जाते? (ख) एक बांधव कशा प्रकारे पुढे येऊ शकतो?
४ मंडळीतील एखाद्या बांधवाला पर्यवेक्षक म्हणून असेच नियुक्त केले जात नाही. हे ‘चांगले काम’ करण्यासाठी त्याने पुढे आले पाहिजे, किंवा जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. (१ तीम. ३:१) यात मंडळीतील आपल्या बांधवांच्या गरजांबद्दल मनापासून कळकळ असणे आणि त्या गरजा पूर्ण करणे समाविष्ट आहे. (यशया ३२:१, २ वाचा.) मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्याकरता जो योग्य हेतूने पुढे येतो तो महत्त्वाकांक्षेपोटी असे करत नाही. तर, निःस्वार्थपणे इतरांची सेवा करायची त्याला मनस्वी इच्छा असते.
५ जो सेवा सेवक अथवा वडील म्हणून नियुक्त केले जाण्याकरता पुढे येऊ इच्छितो, त्याने बायबलमध्ये देण्यात आलेल्या अटी पूर्ण करण्यास प्रयत्नशील असले पाहिजे. (१ तीम. ३:१-१०, १२, १३; तीत १:५-९) जर तुम्ही एक समर्पित बांधव असाल तर स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘मी प्रचार कार्यात उत्साहाने सहभाग घेतो का आणि इतरांनाही असे करण्यास मदत करतो का? मंडळीतील बांधवांबद्दल आपुलकी दाखवण्याद्वारे मी त्यांना प्रगती करण्यास मदत करत आहे का? देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करणारा म्हणून मला ओळखले जाते का? माझ्या उत्तरांचा दर्जा सुधारण्याचा मी प्रयत्न करत आहे का? वडिलांनी सोपवलेली लहानमोठी कामे मी प्रामाणिकपणे पूर्ण करतो का?’ (२ तीम. ४:५) अशा प्रकारच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
६. मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यास पात्र ठरण्याकरता काय करणे महत्त्वाचे आहे?
६ मंडळीतील जबाबदाऱ्यांसाठी पात्र ठरण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, ‘[देवाच्या] आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न होणे.’ (इफिस. ३:१६) ख्रिस्ती मंडळीत सेवा सेवक किंवा वडील बनणे हे एका विशिष्ट पदाकरता बहुमताने निवडून येण्यासारखे नाही. हे विशेषाधिकार आध्यात्मिक जीवनात प्रगती केल्यानेच मिळवता येतात. ही प्रगती कशी केली जाऊ शकते? यासाठी तुम्ही ‘आत्म्याच्या प्रेरणेने चालत’ राहिले पाहिजे आणि आपल्या जीवनात आत्म्याचे फळ उत्पन्न केले पाहिजे. (गलती. ५:१६, २२, २३) मंडळीत अधिक जबाबदाऱ्या हाताळण्याकरता आवश्यक असलेले आध्यात्मिक गुण जसजसे तुमच्या वागण्याबोलण्यातून दिसून येऊ लागतील आणि सुधारणा करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तुम्ही जसजसे पालन कराल, तसतशी तुमची ‘प्रगती सर्वांस दिसून येईल.’—१ तीम. ४:१५.
स्वार्थत्यागी मनोवृत्तीची गरज
७. इतरांची सेवा करण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
७ इतरांची सेवा करणे म्हणजे कठीण परिश्रम हे आलेच आणि यासाठी स्वार्थत्यागी मनोवृत्तीची गरज आहे. ख्रिस्ती वडील हे आध्यात्मिक दृष्टीने मेंढपाळांसारखे असल्यामुळे कळपातील सदस्यांच्या समस्यांबद्दल त्यांना मनापासून कळकळ असते. कळपाची देखरेख करण्याच्या जबाबदारीविषयी प्रेषित पौलाच्या भावना काय होत्या ते विचारात घ्या. करिंथ येथील बांधवांना त्याने असे सांगितले: “मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रु गाळीत लिहिले होते; तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले.” (२ करिंथ. २:४) खरोखर, आपल्यावर सोपवलेले कार्य पौलाने जीव ओतून केले.
८, ९. इतरांच्या गरजा पुरवण्याकरता झटणाऱ्यांची बायबलमधून काही उदाहरणे सांगा.
८ स्वार्थत्यागी मनोवृत्ती ही पूर्वीपासूनच, यहोवाच्या सेवकांच्या कल्याणाकरता झटणाऱ्यांचे ओळखचिन्ह आहे असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, नोहाने आपल्या कुटुंबीयांना कधी असे म्हटल्याची आपण कल्पना करू शकतो का, की “तारू बांधून झाल्यावर मला कळवा, मग मी येईन?” तसेच, मोशेने इजिप्तमध्ये इस्राएल लोकांना असे म्हटले नाही, “तुम्हाला योग्य वाटेल त्या वाटेनं तांबड्या समुद्रापाशी या, मी तुम्हाला तिथंच भेटेन.” यहोशवाने असे म्हटले नाही: ‘यरीहोचा तट कोसळल्यावर मला कळवा.’ आणि यशयाने दुसऱ्या कोणाकडे बोट दाखवून, ‘तो आहे ना! त्याला पाठीव’ असे म्हटले नाही.—यश. ६:८.
९ देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेला ज्याने प्रतिसाद दिला त्यांच्यापैकी सर्वात उत्तम उदाहरण नक्कीच येशू ख्रिस्ताचे आहे. मानवजातीचा तारणकर्ता म्हणून त्याच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी त्याने आनंदाने स्वीकारली. (योहा. ३:१६) येशूने दाखवलेले स्वार्थत्यागी प्रेम आपल्याला कृतज्ञतेने त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा देत नाही का? अनेक वर्षांपासून वडील म्हणून सेवा करणाऱ्या एका बांधवांनी कळपाचे पालन करण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना असे म्हटले: “माझी मेंढरं पाळ, या येशूनं पेत्राला बोललेल्या शब्दांचा मी जितक्यांदा विचार करतो, तितक्यांदा ते माझ्या अंतःकरणाला स्पर्श करतात. मागील अनेक वर्षांत मला याची जाणीव झाली आहे, की प्रेमाचे दोन शब्द किंवा एखाद्याला साहाय्य करण्यासाठी केलेलं प्रेमळ कृत्य, मग ते अगदी साधंसं असलं तरीही यामुळे त्या व्यक्तीला खूप उत्तेजन मिळू शकतं. खरोखर, देवाच्या कळपाचं पालन करणं हे अतिशय समाधान देणारं काम आहे.”—योहा. २१:१६.
१०. ख्रिस्ती बांधवांना इतरांची सेवा करण्याच्या येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची प्रेरणा कशामुळे मिळू शकते?
१० मंडळीतील समर्पित बांधव देवाच्या कळपाशी व्यवहार करतात तेव्हा त्यांच्या वागण्याबोलण्यातून येशूची मनोवृत्ती दिसून आली पाहिजे, ज्याने म्हटले: “मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्त. ११:२८) मंडळीत जबाबदाऱ्या हाताळणे हे खूप वेळखाऊ व त्रासदायक काम आहे असा विचार न करता, ख्रिस्ती बांधव देवावरील त्यांच्या विश्वासामुळे आणि मंडळीतील बांधवांवरील प्रेमामुळेच या चांगल्या कार्यासाठी पुढे येण्यास प्रेरित होतात. पण समजा एखाद्याला पुढे येण्याची इच्छाच नसेल तर काय? एक बांधव मंडळीत सेवा करण्याची इच्छा आपल्या मनात उत्पन्न करू शकतो का?
सेवा करण्याची इच्छा उत्पन्न करा
११. इतरांची सेवा करण्याची इच्छा कशी उत्पन्न केली जाऊ शकते?
११ मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळणे आपल्याला जमेल की नाही अशा शंकेमुळे जर तुम्ही पुढे येण्यास कचरत असाल, तर तुम्ही पवित्र आत्म्याच्या साहाय्याकरता प्रार्थना केली पाहिजे. (लूक ११:१३) यहोवाचा आत्मा तुम्हाला अशा शंकांवर मात करण्यास मदत करेल. मुळात मंडळीत सेवा करण्याची इच्छा देवाकडून मिळालेली असते, कारण यहोवाचा आत्माच एखाद्या बांधवाला मंडळीत सेवेचे विशेषाधिकार हाताळण्यासाठी पुढे येण्याची प्रेरणा देतो आणि मग त्याची पवित्र सेवा करण्याची शक्ती देतो. (फिलिप्पै. २:१३; ४:१३) तेव्हा, सेवेचे विशेषाधिकार स्वीकारण्याची इच्छा उत्पन्न करण्यास आपल्याला साहाय्य करावे अशी तुम्ही यहोवाजवळ प्रार्थना केली पाहिजे.—स्तोत्र २५:४, ५ वाचा.
१२. एखाद्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता आवश्यक ज्ञान व बुद्धी त्याला कोठून मिळू शकते?
१२ मंडळीतील बांधवांची काळजी घेणे ही वेळखाऊ व गुंतागुंतीची जबाबदारी भासत असल्यामुळे हे काम माझ्यासाठी नाही असे कदाचित एखादा ख्रिस्ती ठरवेल. किंवा मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्याकरता आवश्यक असलेले ज्ञान व बुद्धी आपल्याजवळ नाही असे कदाचित त्याला वाटत असेल. असे असल्यास, त्याने देवाच्या वचनाचा आणि त्यावर आधारित असलेल्या प्रकाशनांचा अधिक सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने स्वतःला असे विचारले पाहिजे, ‘देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याकरता मी खास वेळ काढतो का आणि देवाने मला सुबुद्धी द्यावी म्हणून त्याला प्रार्थना करतो का?’ शिष्य याकोबाने लिहिले: “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो.” (याको. १:५) या देवप्रेरित शब्दांवर तुमचा भरवसा आहे का? शलमोनाची प्रार्थना ऐकून देवाने त्याला “बुद्धिमान व विवेकी चित्त” दिले ज्यामुळे त्याला लोकांचा न्याय करताना बऱ्यावाइटाचा भेद करणे शक्य झाले. (१ राजे ३:७-१४) अर्थात, शलमोनाची गोष्ट निराळी होती हे खरे आहे. तरीसुद्धा, मंडळीत ज्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या जातात त्या बांधवांना देवाच्या मेंढरांची चांगल्या प्रकारे काळजी घेता यावी म्हणून तो त्यांनाही सुबुद्धी देईल याविषयी आपण खातरी बाळगू शकतो.—नीति. २:६.
१३, १४. (क) ‘ख्रिस्ताच्या प्रीतीचा’ पौलावर कसा प्रभाव पडला हे स्पष्ट करा. (ख) ‘ख्रिस्ताच्या प्रीतीचा’ आपल्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे?
१३ इतरांची सेवा करण्याची इच्छा उत्पन्न करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे यहोवाने व त्याच्या पुत्राने आपल्याकरता जे काही केले आहे त्यावर मनन करणे. उदाहरणार्थ, २ करिंथकर ५:१४, १५ या वचनांवर विचार करा. (वाचा.) या वचनांत सांगितल्याप्रमाणे “ख्रिस्ताची प्रीति आम्हाला आवरून धरते,” याचा काय अर्थ होतो? ख्रिस्ताने देवाच्या इच्छेनुसार आपल्याकरता त्याचे जीवन बलिदान करून जे प्रेम व्यक्त केले ते इतके अद्भुत आहे की या प्रेमाबद्दल जसजसे आपण अधिक समजून घेतो आणि त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटू लागते, तसतसा आपल्या अंतःकरणावर त्याचा गहिरा प्रभाव पडतो. ख्रिस्ताच्या या प्रेमाचा पौलाच्या जीवनावर पगडा होता. या प्रेमाने त्याला स्वार्थीपणे वागण्यापासून आवरले आणि देवाची व मानवांची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत केली.
१४ ख्रिस्ताला मानवांवर असलेल्या प्रेमाविषयी मनन केल्याने आपल्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून येते. परिणामस्वरूप, आपल्याला जाणीव होते की जीवनात स्वार्थी ध्येये मिळवण्याचा आणि केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे ‘देहस्वभावासाठी पेरणे’ निश्चितच योग्य ठरणार नाही. त्याऐवजी, देवाने आपल्याला जे कार्य दिले आहे त्याला प्राधान्य देण्यासाठी आपण आपल्या जीवनात आवश्यक फेरबदल करतो. प्रेमापोटी आपल्या बांधवांचे “दास” बनण्यास आपण प्रेरित होतो. (गलतीकर ५:१३ वाचा.) आपण यहोवाच्या समर्पित लोकांची सेवा करणारे दास आहोत असा स्वतःविषयी नम्र दृष्टिकोन बाळगला तर आपण त्यांच्याशी आदराने वागू. सैतानाच्या जगात जिला प्रोत्साहन दिले जाते अशा टीकात्मक वृत्तीचे आपण निश्चितच अनुकरण करणार नाही.—प्रकटी. १२:१०.
पूर्ण कुटुंबाचा सहयोग
१५, १६. एखाद्या बांधवाला सेवा सेवक अथवा वडील म्हणून नियुक्त केले जाण्यात त्याच्या कुटुंबातील सदस्यांची काय भूमिका आहे?
१५ एखादा बंधू विवाहित असेल व त्याला मुलेबाळे असतील, तर तो सेवा सेवक अथवा वडील म्हणून सेवा करण्यास पात्र आहे किंवा नाही हे ठरवताना त्याच्या कुटुंबाची स्थितीही विचारात घेतली जाते. किंबहुना, त्याच्या कुटुंबाची आध्यात्मिक स्थिती आणि मंडळीतील बांधवांमध्ये त्यांचे चांगले नाव आहे का, हे लक्षात घेऊनच त्याला नियुक्त केले जावे किंवा नाही हे ठरवले जाते. म्हणूनच, पती किंवा पिता मंडळीत सेवा सेवक अथवा वडील म्हणून सेवा करण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करत असताना, सबंध कुटुंबाने त्याला सहयोग देणे अतिशय महत्त्वाचे आहे हे यावरून दिसून येते.—१ तीमथ्य ३:४, ५, १२ वाचा.
१६ ख्रिस्ती कुटुंबातील सदस्य एकमेकांशी सहकार्य करतात तेव्हा यहोवाला आनंद होतो. (इफिस. ३:१४, १५) मंडळीच्या जबाबदाऱ्या हाताळत असताना कुटुंबप्रमुखाने आपल्या घरची “चांगली” व्यवस्था ठेवणेही आवश्यक आहे. याकरता, वडिलाने किंवा सेवा सेवकाने आपल्या पत्नी व मुलांसोबत दर आठवडी बायबलचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून कौटुंबिक उपासनेच्या तरतुदीचा सर्वांना फायदा होईल. त्याने नियमितपणे आपल्या कुटुंबासोबत क्षेत्र सेवाकार्यात सहभाग घेतला पाहिजे. त्याच प्रकारे, कुटुंबातील सदस्यांनीही कुटुंबप्रमुखाच्या प्रयत्नांना सहयोग दिला पाहिजे.
पुन्हा सेवा करण्यास आवडेल का?
१७, १८. (क) एखाद्या बांधवाने आपला सेवेचा विशेषाधिकार गमावला असल्यास त्याने काय केले पाहिजे? (ख) एके काळी वडील किंवा सेवा सेवक म्हणून कार्य करणाऱ्या बांधवाने कशा प्रकारची मनोवृत्ती बाळगली पाहिजे?
१७ कदाचित तुम्ही एके काळी वडील किंवा सेवा सेवक या नात्याने कार्य करत असाल पण सध्या ती जबाबदारी हाताळत नसाल. असे असले तरी, यहोवावर तुमचे प्रेम आहे आणि तुम्ही ही खातरी बाळगू शकता की त्याला देखील तुमच्याविषयी आस्था आहे. (१ पेत्र ५:६, ७) तुम्हाला तुमच्या वागणुकीत काही बदल करण्याचा सल्ला देण्यात आला होता का? तर मग, आपला दोष पदरी घेऊन देवाच्या मदतीने त्यावर मात करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. नकारात्मक भावनांना आपल्या मनात घर करू देऊ नका. सुबुद्धीने आणि सकारात्मक मनोवृत्तीने वागा. अनेक वर्षे वडील म्हणून सेवा केल्यानंतर हा विशेषाधिकार गमावलेले एक बंधू सांगतात: “मी पूर्वीप्रमाणेच सभांना व क्षेत्र सेवेत तसंच वैयक्तिक बायबल वाचनात नियमित राहण्याचा निर्धार केला आणि हे ध्येय साध्य करण्यात मला यश आलं. गमावलेले विशेषाधिकार एखाददोन वर्षांत परत मिळतील असं मला वाटलं होतं, पण पुन्हा वडील म्हणून नियुक्त केले जाण्यास तब्बल सात वर्षं लागली. यामुळे मी धीर धरण्यास शिकलो. त्या काळादरम्यान, निराश न होता हे विशेषाधिकार पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे मला प्रोत्साहन देण्यात आले, ज्याचा मला खूप उपयोग झाला.”
१८ तुमचीही परिस्थिती या बांधवासारखी असल्यास निराश होऊ नका. यहोवा तुमच्या सेवाकार्यावर व कुटुंबावर कशा प्रकारे आशीर्वाद देत आहे हे लक्षात घ्या. आपल्या कुटुंबीयांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करा, मंडळीतील आजारी बांधवांना भेटी द्या आणि जे कमजोर झाले आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवाचे साक्षीदार या नात्याने त्याची स्तुती करण्याचा आणि त्याच्या राज्याची सुवार्ता गाजवण्याचा जो सुहक्क तुमच्याजवळ आहे त्याची मनापासून कदर करा. *—स्तो. १४५:१, २; यश. ४३:१०-१२.
नव्याने आढावा घ्या
१९, २०. (क) बाप्तिस्मा घेतलेल्या सर्व बांधवांना कोणते आवाहन केले जाते? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
१९ देवाच्या संघटनेत पूर्वी कधी नव्हती इतकी आज वडिलांची व सेवा सेवकांची गरज आहे. तेव्हा बाप्तिस्मा घेतलेल्या सर्व बांधवांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आपल्या परिस्थितीचा नव्याने आढावा घेऊन स्वतःला हा प्रश्न विचारावा: ‘मी सेवा सेवक किंवा वडील म्हणून सेवा करत नसल्यास, यामागे कोणती कारणे असावीत याबद्दल मी विचार केला पाहिजे का?’ या महत्त्वाच्या विषयावर योग्य मनोवृत्ती बाळगण्यास देवाच्या आत्म्याची मदत स्वीकारा.
२० देवाची सेवा करत असताना, बांधवांनी स्वार्थत्यागी मनोवृत्तीने केलेल्या सेवेचा मंडळीतील सर्वांनाच फायदा होईल. आपण प्रेमळ व निःस्वार्थ सेवा करतो, तेव्हा इतरांची सेवा केल्यामुळे आणि आत्म्यासाठी पेरल्यामुळे मिळणारा आनंद आपण अनुभवतो. पण, आपण देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न न करण्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे आणि आपण हे कसे करू शकतो, याविषयी पुढील लेखात आपण पाहणार आहोत.
[तळटीप]
^ परि. 18 टेहळणी बुरूज, ऑगस्ट १५, २००९, पृष्ठे ३०-३२ पाहा.
तुमचे उत्तर काय असेल?
• मीखा ५:५ यातील भविष्यवाणीतून आपल्याला कोणते आश्वासन मिळते?
• स्वार्थत्यागी मनोवृत्ती बाळगण्याचा काय अर्थ होतो हे स्पष्ट करा.
• इतरांची सेवा करण्याची इच्छा कशी उत्पन्न केली जाऊ शकते?
• सेवा सेवक किंवा वडील म्हणून नियुक्त केले जाण्याकरता कुटुंबाचा सहयोग कितपत महत्त्वाचा आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२५ पानांवरील चित्रे]
पुढे येण्यासाठी तुम्ही काय करू शकता?