यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यास झटा
यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यास झटा
“[देवाचा] शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.
१, २. (क) आज अनेक लोक कोणत्या मार्गांनी देवाचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात? (ख) आपण यहोवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न का केले पाहिजेत?
“देव तुला आशीर्वाद देवो.” जगातील काही देशांत, एखादी व्यक्ती शिंकली की अगदी अनोळखी व्यक्तीच्या तोंडून हे शब्द ऐकायला मिळतात. निरनिराळ्या धर्मांतील धार्मिक पुढारी लोकांना, प्राण्यांना, इतकेच नव्हे, तर अगदी निर्जीव वस्तूंनाही आशीर्वाद देत असल्याचे पाहायला मिळते. आशीर्वाद मिळवण्याच्या आशेने यात्रेकरूंची पावले आपसूकच धार्मिक स्थळांकडे वळतात. आपल्या देशावर देवाचा आशीर्वाद असावा म्हणून राजकीय पुढारी नित्यनियमाने देवाला प्रार्थना करतात. पण, आशीर्वाद मिळवण्यासाठी केलेल्या अशा प्रार्थना योग्य असतात, असे तुम्हाला वाटते का? त्या कितपत प्रभावी असतात? वास्तवात देवाचा आशीर्वाद कोणाला लाभतो आणि का?
२ यहोवाने भाकीत केले होते, की शेवटल्या काळी, सर्व राष्ट्रांतील त्याचे शुद्ध व शांतीप्रिय लोक छळ व विरोध होत असतानाही पृथ्वीच्या शेवटापर्यंत राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करतील. (यश. २:२-४; मत्त. २४:१४; प्रकटी. ७:९, १४) आपल्यापैकी ज्यांनी, या देवप्रेरित वर्णनानुसार जीवन जगण्याची जबाबदारी स्वीकारली आहे अशांना देवाचा आशीर्वाद हवा आहे, किंबहुना त्यांना त्याची गरज आहे. कारण देवाच्या आशीर्वादाशिवाय जीवनात यशस्वी होणे मुळीच शक्य नाही. (स्तो. १२७:१) पण, आपण देवाचा आशीर्वाद कसा प्राप्त करू शकतो?
आज्ञाधारक लोकांकडे आशीर्वाद धावत येतात
३. इस्राएल लोक यहोवाला आज्ञाधारक राहिल्यास त्यांना काय मिळणार होते?
३ नीतिसूत्रे १०:६, ७ वाचा. इस्राएल राष्ट्राने प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या काही काळाआधी यहोवाने त्यांना सांगितले होते, की त्यांनी त्याची वाणी ऐकली तर तो उल्लेखनीय रीतीने त्यांना समृद्ध करेल व त्यांचे संरक्षण करेल. (अनु. २८:१, २) यहोवा आपल्या लोकांना केवळ आशीर्वाद देणार नव्हता, तर त्याचे आशीर्वाद त्यांच्याकडे “धावत” येणार होते. होय, देवाच्या आज्ञांचे पालन केल्यास त्यांना निश्चितच आशीर्वाद लाभणार होते.
४. मनापासून आज्ञापालन करण्यात काय समाविष्ट आहे?
४ इस्राएल लोकांनी कोणत्या मनोवृत्तीने देवाच्या आज्ञांचे पालन करायचे होते? देवाने इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात सांगितले होते, की त्याच्या लोकांनी “आनंदाने व उल्हासित मनाने” त्याची सेवा केली पाहिजे. त्यांनी असे न केल्यास देव नाखूष होणार होता. (अनुवाद २८:४५-४७ वाचा.) प्राणी व दुरात्मे यांत्रिकपणे आज्ञांचे पालन करतात तशा स्वरूपाची आज्ञाधारकता यहोवा आपल्याकडून अपेक्षित नाही. तर, आपण मनापासून त्याच्या आज्ञांचे पालन करावे अशी तो अपेक्षा करतो. (मार्क १:२७; याको. ३:३) आपण असे करतो तेव्हा त्याच्यावर आपले किती प्रेम आहे हे दाखवतो. देवाच्या आज्ञा कठीण नाहीत आणि “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे” असा विश्वास असल्यामुळे आपण आनंदाने त्याच्या आज्ञांचे पालन करतो.—इब्री ११:६; १ योहा. ५:३.
५. यहोवाच्या अभिवचनावर भरवसा असल्यामुळे एका व्यक्तीला अनुवाद १५:७, ८ मधील आज्ञेचे पालन करणे कसे शक्य होणार होते?
५ देवाच्या आज्ञांचे मनापासून पालन करणाऱ्यांना तो नक्कीच प्रतिफळ देतो हा भरवसा अनुवाद १५:७, ८ (वाचा.) मध्ये दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे कशा प्रकारे दिसून आला असेल याचा विचार करा. या आज्ञेचे, इस्राएल लोकांनी रडतखडत पालन केले तेव्हा कदाचित गरिबांना थोडाफार दिलासा मिळाला असेल. पण, मनापासून या आज्ञेचे पालन न केल्यामुळे त्यांच्यात चांगले नातेसंबंध वाढीस लागले असते का? यामुळे देवाच्या लोकांमध्ये प्रेमळ वातावरण निर्माण झाले असते का? सर्वात मुख्य म्हणजे, यहोवा आपल्या सेवकांच्या गरजा तृप्त करू शकतो यावर त्यांचा विश्वास असल्याचे, तसेच देवासारखी उदारता दाखवण्याची संधी मिळाल्याबद्दल ते कृतज्ञ असल्याचे दिसून आले असते का? मुळीच नाही! मनापासून उदारता दाखवणाऱ्या व्यक्तीचे मन देवाने पाहिले आणि अशा व्यक्तीची प्रत्येक कृती व त्याने हाती घेतलेले प्रत्येक कार्य आशीर्वादित करण्याचे अभिवचन त्याने दिले. (अनु. १५:१०) या अभिवचनावरील विश्वासामुळे एक व्यक्ती कार्य करण्यास प्रवृत्त होत असे आणि परिणामस्वरूप देवाकडून विपुल आशीर्वाद अनुभवत असे.—नीति. २८:२०.
६. इब्री लोकांस ११:६ या वचनातून आपल्याला कोणती खातरी मिळाली पाहिजे?
६ यहोवा प्रतिफळ देणारा देव आहे यावर आपला विश्वास असला पाहिजे इतकेच इब्री लोकांस ११:६ आपल्याला सांगत नाही, तर देवाचे आशीर्वाद मिळवण्यास आवश्यक असलेल्या आणखी एका गुणावर ते प्रकाश टाकते. यहोवा, “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना” प्रतिफळ देतो असे जे म्हटले आहे त्याकडे लक्ष द्या. या वाक्यांशासाठी मूळ भाषेत वापरण्यात आलेल्या शब्दाचा अर्थ तीव्रता व नेटाचा प्रयत्न असा होतो. यावरून आपल्याला हे आश्वासन मिळते, की आपण नेटाने प्रयत्न केल्यास आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळतील. या आशीर्वादांचा स्रोत एकमेव खरा देव आहे, जो केव्हाही खोटे बोलत नाही. (तीत १:२) गेल्या हजारो वर्षांच्या काळादरम्यान त्याने दाखवून दिले आहे की त्याची अभिवचने अत्यंत भरवशालायक आहेत. त्याचे शब्द कधीच विफल ठरत नाहीत; ते नेहमी खरे ठरतात. (यश. ५५:११) तेव्हा, आपण पक्की खातरी बाळगू शकतो की आपण खरा विश्वास दाखवला तर तो आपल्यासाठी प्रतिफळ देणारा ठरेल.
७. काय केल्याने आपण अब्राहामाच्या ‘संततीद्वारे’ आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा करू शकतो?
७ येशू ख्रिस्त हा अब्राहामाच्या ‘संततीचा’ प्राथमिक भाग असल्याचे सिद्ध झाले आहे. तर अभिषिक्त ख्रिस्ती त्या प्रतिज्ञात ‘संततीचा’ दुय्यम भाग आहेत. या अभिषिक्त ख्रिश्चनांवर एक कामगिरी सोपवण्यात आली आहे. ती म्हणजे ‘ज्याने [यांना] अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण प्रसिद्ध करण्याची’ कामगिरी. (गलती. ३:७-९, १४, १६, २६-२९; १ पेत्र २:९) येशूने ज्यांना आपल्या सर्वस्वाची देखभाल करण्यासाठी नेमले आहे अशांकडे आपण दुर्लक्ष केले, तर यहोवासोबत चांगला नातेसंबंध जोडणे आपल्याला मुळीच शक्य होणार नाही. ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ मदतीशिवाय आपल्याला बायबलमधील माहिती पूर्णपणे समजली नसती किंवा जीवनात ही माहिती कशी लागू करावी हेदेखील आपल्याला समजले नसते. (मत्त. २४:४५-४७) शास्त्रवचनांतून आपण जे काही शिकतो त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनात अवलंब केल्याने देवाकडून आशीर्वाद मिळण्याची आपण अपेक्षा करू शकतो.
देवाची इच्छा डोळ्यांसमोर ठेवणे
८, ९. कुलपिता याकोबाचा देवाच्या अभिवचनावर विश्वास असल्यामुळे त्याने कोणते प्रयत्न केले?
८ देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी नेटाने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे जे बायबल म्हणते त्यावरून आपल्याला कदाचित कुलपिता याकोबाची आठवण होईल. देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन तो कशा प्रकारे पूर्ण करणार होता याची याकोबाला कल्पना नव्हती. पण, यहोवा आपल्या आजोबांची संतती बहुगुणित करेल आणि त्यांच्या वंशजांपासून एक मोठे राष्ट्र तयार होईल यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे, सा.यु.पू. १७८१ मध्ये याकोब एक पत्नी मिळवण्याकरता हारान देशात गेला. आपले जीवन आनंदी करेल अशी पत्नी निवडण्यावरच त्याने भर दिला नाही, तर यहोवाची उपासना करणारी आध्यात्मिक मनोवृत्तीची व आपल्या मुलाबाळांसाठी एक आदर्श आई ठरेल अशी पत्नी निवडण्यावर त्याने अधिक भर दिला.
९ आपल्याला माहीत आहे, की याकोबाला त्याची नातलग राहेल भेटली. त्याचे तिच्यावर प्रेम जडले आणि तिला पत्नी करून घेण्यासाठी तो तिच्या वडिलांजवळ अर्थात लाबानाजवळ सात वर्षे काम करण्यास तयार झाला. ही काही प्रसिद्ध प्रेमकथा नव्हती. सर्वसमर्थ देवाने याकोबाच्या आजोबांना अर्थात अब्राहामाला आणि नंतर याकोबाचा पिता इसहाक याला दिलेले अभिवचन याकोबाला नक्कीच माहीत होते. (उत्प. १८:१८; २२:१७, १८; २६:३-५, २४, २५) इसहाकाने आपला पुत्र याकोब यास असे सांगितले: “सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रुप करून तुझी वंशवृद्धि अशी करो की तुजपासून राष्ट्रसमुदाय उद्भवो. तो तुला व तुजबरोबर तुझ्या संततीला अब्राहामास दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहामास दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरी आहेस, तो तुझे वतन होईल.” (उत्प. २८:३, ४) त्यामुळे एक योग्य पत्नी शोधण्यासाठी व आपले कुटुंब वाढवण्यासाठी याकोबाने जे प्रयत्न केले त्यांवरून यहोवाने दिलेल्या अभिवचनावर त्याचा भरवसा असल्याचे दिसून आले.
१०. याकोबाने केलेल्या विनवणीनुसार त्याला आशीर्वाद देण्यास यहोवा उत्सुक का होता?
१० याकोबाने आपल्या कुटुंबासाठी धनसंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचे मन आध्यात्मिक वारशावर अर्थात त्याच्या वंशजांसंबंधी देवाने दिलेल्या अभिवचनावर होते. त्याचे लक्ष देवाच्या इच्छेच्या पूर्णतेवर केंद्रित होते. त्यामुळे कितीही अडथळे आले तरी देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या परीने शक्य ते सर्व करण्याचा याकोबाचा दृढनिश्चय होता. हीच मनोवृत्ती त्याने वयोवृद्ध झाल्यानंतरही दाखवली आणि त्यासाठी यहोवाने त्याला आशीर्वादित केले.—उत्पत्ति ३२:२४-२९ वाचा.
११. देवाने प्रकट केलेल्या त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजेत?
११ यहोवा आपला उद्देश कसा पूर्ण करेल याचा प्रत्येक तपशील याकोबाला माहीत नव्हता, तसा आपल्यालाही माहीत नाही. तरीसुद्धा, देवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने, “प्रभूचा दिवस” कसा असेल याची थोडीफार कल्पना आपल्याला येऊ शकते. (२ पेत्र ३:१०, १७) उदाहरणार्थ, तो दिवस नेमका केव्हा येईल हे आपल्याला माहीत नसले, तरी तो दिवस जवळ आहे हे नक्कीच आपल्याला माहीत आहे. त्यामुळे उरलेल्या कमी वेळात, लोकांना साक्ष देण्यात आपण कसलीच कसूर केली नाही तर आपण आपले स्वतःचे आणि आपले ऐकणाऱ्यांचेही जीवन वाचवू शकतो असे जे बायबलमध्ये म्हटले आहे त्यावर आपला विश्वास असल्याचे आपण दाखवतो.—१ तीम. ४:१६.
१२. आपण कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतो?
१२ आपल्याला माहीत आहे, की अंत कोणत्याही क्षणी येऊ शकतो. पृथ्वीवरील प्रत्येकाला वैयक्तिक साक्ष मिळेपर्यंत यहोवाला थांबून राहण्याची गरज नाही. (मत्त. १०:२३) शिवाय, प्रचार कार्य परिणामकारक रीत्या कसे करावे यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन मिळते. आपण पूर्ण विश्वासाने या कार्यात होईल तितका सहभाग घेतो व आपल्याजवळ असलेल्या साधनांचा या कार्यात उपयोग करतो. आपल्या क्षेत्रातील बहुतेक लोक आपल्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देतील का? अर्थात, आपण हे आधीच कसे सांगू शकतो? (उपदेशक ११:५, ६ वाचा.) आपले काम फक्त प्रचार करत राहण्याचे आहे आणि हे करत असताना यहोवा आपल्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल असा भरवसा आपण बाळगू शकतो. (१ करिंथ. ३:६, ७) आपण मनापासून केलेल्या परिश्रमांची यहोवा दखल घेतो आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला आवश्यक असलेले विशिष्ट मार्गदर्शन पुरवतो याची खातरी आपण बाळगू शकतो.—स्तो. ३२:८.
पवित्र आत्म्यासाठी विनंती करणे
१३, १४. पवित्र आत्मा देवाच्या सेवकांना पात्र करू शकतो हे कशावरून दिसून येते?
१३ आपल्यावर सोपवलेली एखादी आध्यात्मिक कामगिरी पूर्ण करण्यास किंवा प्रचार कार्यात सहभाग घेण्यास आपण पात्र नाहीत असे आपल्याला वाटत असल्यास काय? यहोवाच्या सेवेत उपयोग करण्याजोग्या ज्या क्षमता आपल्यात आहेत त्या अधिक वाढवण्यासाठी आपण त्याच्या पवित्र आत्म्याची मदत मागितली पाहिजे. (लूक ११:१३ वाचा.) एखाद्या व्यक्तीची आधीची परिस्थिती किंवा अनुभव काहीही असो, तिच्यावर सोपवण्यात आलेली कोणतीही कामगिरी पूर्ण करण्यास देवाचा पवित्र आत्मा तिला पात्र बनवू शकतो. उदाहरणार्थ, मिसर देशातून बाहेर आल्यानंतर देवाच्या आत्म्याने, युद्धाचा काहीएक अनुभव नसलेल्या मेंढपाळांना व गुलामांना आपल्या शत्रूंचा पराभव करण्यास समर्थ केले. (निर्ग. १७:८-१३) यानंतर लवकरच याच आत्म्याने, देवाकडून मिळालेल्या सर्वोत्कृष्ट रचनेनुसार निवासमंडपाचे बांधकाम करण्यासाठी बसालेल आणि अहलियाब यांना समर्थ केले.—निर्ग. ३१:२-६; ३५:३०-३५.
१४ आधुनिक काळात देवाच्या संघटनेला आपला स्वतःचा छापखाना सुरू करण्याची गरज निर्माण झाली, तेव्हा ही गरज पूर्ण करण्यासाठी देवाच्या शक्तीशाली आत्म्याने त्याच्या सेवकांना समर्थ केले. सन १९२७ पर्यंत संघटनेने काय साध्य केले होते यावर छापखान्याचे त्या वेळचे पर्यवेक्षक बंधू आर. जे. मार्टीन यांनी एका पत्रात खुलासा केला. “अगदी नेमक्या वेळी प्रभूने मार्ग मोकळा केला; एक मोठं रोटरी [छपाई यंत्र] आम्ही विकत घेतलं. यंत्राच्या रचनेविषयी आणि ते कसं चालवायचं याविषयी आम्हाला काहीच ज्ञान नव्हतं. पण, प्रभूला आपलं सर्वस्व देणाऱ्यांच्या विचारशक्तीला चालना कशी द्यायची हे त्याला माहीत आहे. . . . काही आठवड्यांतच आम्ही ते छपाई यंत्र सुरू केलं; आणि आजपर्यंत ते सुरळीतपणे काम करत आहे. विशेष म्हणजे, हे यंत्र इतकं काम करू शकतं याची यंत्र बनवणाऱ्यांनीसुद्धा कधी कल्पना केली नसेल.” मनापासून केलेल्या अशा प्रयत्नांवर आजही यहोवा आशीर्वाद देत आहे.
१५. प्रलोभनांचा सामना करणाऱ्यांना रोमकर ८:११ यातील शब्द कसे प्रोत्साहनदायक ठरू शकतात?
१५ यहोवाचा आत्मा निरनिराळ्या मार्गांनी कार्य करतो. देवाच्या सर्व सेवकांना हा आत्मा मिळू शकतो आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी पार करण्यास त्यांना मदत करतो. आपल्याला एखादे वाईट कृत्य करण्याचा अनावर मोह होत असल्यास काय? अशा वेळी, रोमकर ७:२१, २५ आणि ८:११ यातील प्रेषित पौलाच्या शब्दांतून आपण बळ मिळवू शकतो. “ज्याने येशूला मेलेल्यांतून उठविले, त्याचा आत्मा” आपल्यावर कार्य करू शकतो व दैहिक वासनांवर मात करण्यास आपल्याला आध्यात्मिक रीत्या बलिष्ठ करू शकतो. बायबलमधील हा उतारा आत्म्याने अभिषिक्त असलेल्या ख्रिश्चनांना उद्देशून लिहिलेला असला, तरी त्यातील तत्त्वे देवाच्या सर्वच सेवकांना लागू होतात. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने, चुकीच्या इच्छा मारून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याने व देवाच्या मार्गदर्शनानुसार जगल्याने आपल्या सर्वांना जीवन प्राप्त होते.
१६. देवाचा पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
१६ पण, कोणतेही प्रयत्न न करता देवाने आपल्याला त्याची सक्रीय शक्ती द्यावी अशी अपेक्षा आपण करू शकतो का? नाही. देवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करण्यासोबतच आपण त्याच्या प्रेरित वचनाचा चांगला अभ्यासही केला पाहिजे. (नीति. २:१-६) देवाचा आत्मा ख्रिस्ती मंडळीवरसुद्धा कार्य करतो. त्यामुळे आपण नियमितपणे सभांना उपस्थित राहतो तेव्हा ‘आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ऐकण्यास’ आपण उत्सुक आहोत हे दिसून येते. (प्रकटी. ३:६) तसेच, आपण जे काही ऐकतो ते नम्रपणे स्वीकारून त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनात अवलंब केला पाहिजे. नीतिसूत्रे १:२३ असा सल्ला देते: “माझा वाग्दंड ऐकून वळा; पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन.” स्पष्टच आहे, की देव “आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना” आपला पवित्र आत्मा देतो.—प्रे. कृत्ये ५:३२.
१७. देव आपले प्रयत्न आशीर्वादित करतो याची तुलना आपण कशासोबत करू शकतो?
१७ देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक असले, तरी यहोवा आपल्या लोकांना मुबलकपणे पुरवत असलेल्या चांगल्या गोष्टी केवळ प्रामाणिक प्रयत्नांमुळेच मिळतात असे नाही. देव कशा प्रकारे आपले प्रयत्न आशीर्वादित करतो याची तुलना पौष्टिक आहारामुळे आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्याशी करता येईल. देवाने आपल्या शरीराची रचना अशा रीतीने केली आहे की आपण अन्नाचा आस्वाद घेऊ शकतो व त्यातून आवश्यक पौष्टिकता मिळवू शकतो. यासोबतच तो आपल्याला अन्नही पुरवतो. आपल्या अन्नात पोषक तत्त्वे कोठून येतात हे आपण अचूकपणे सांगू शकत नाही किंवा आपण सेवन केलेल्या अन्नातून आपल्याला ताकद कशी मिळते हेदेखील आपल्यापैकी फारसे लोक स्पष्ट करू शकत नाहीत. या प्रक्रियेमुळे आपल्या शरीराला फायदा होतो इतकेच आपल्याला माहीत असते आणि त्यामुळे अन्न सेवन करून आपण या प्रक्रियेशी सहकार्य करतो. आपण जितका अधिक पोषक आहार घेऊ तितका अधिक आपल्याला फायदा होईल. त्याचप्रमाणे, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे हे यहोवाने ठरवून दिले आहे व या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला मदतही करतो. यावरून स्पष्टच आहे, की आपल्याला मदत करण्यासाठी यहोवाच सर्वकाही करतो आणि त्यामुळे तो आपल्या स्तुतीस पात्र आहे. असे असले, तरी त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याच्या इच्छेनुसार कार्य करून आपण त्याच्याशी सहकार्य केले पाहिजे.—हाग्ग. २:१८, १९.
१८. तुम्ही काय करण्याचा दृढनिश्चय केला आहे व का?
१८ तर मग, तुम्हाला नेमून दिलेले प्रत्येक कार्य जीव ओतून करा. यशस्वी होण्यासाठी यहोवाच्या मदतीवर विसंबून राहा. (मार्क ११:२३, २४) असे करत असताना तुम्ही हा भरवसा बाळगू शकता की “जो शोधतो त्याला सापडते.” (मत्त. ७:८) आत्म्याने अभिषिक्त असलेल्यांना स्वर्गात “जीवनाचा मुगूट” देऊन आशीर्वादित केले जाईल. (याको. ) तर, अब्राहामाच्या संततीद्वारे आशीर्वाद मिळवण्यास झटणाऱ्या ख्रिस्ताच्या ‘दुसऱ्या मेंढरांना’ त्याचे हे शब्द ऐकून अतिशय आनंद होईल: “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” ( १:१२योहा. १०:१६; मत्त. २५:३४) होय, “ज्यांना [देवाचा] आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील; . . . तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तो. ३७:२२, २९.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
• मनापासून आज्ञापालन करण्यात काय समाविष्ट आहे?
• देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?
• आपण देवाचा आत्मा कसा मिळवू शकतो आणि तो कशा प्रकारे आपल्यावर कार्य करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्रे]
यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी याकोबाने देवदूताशी संघर्ष केला.
तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे झटता का?
[१० पानांवरील चित्र]
देवाच्या पवित्र आत्म्याने बसालेल व अहलियाब यांना उत्कृष्ट कामगिरी करण्यास समर्थ केले