‘त्यांनी केलेली कृत्ये त्यांच्याबरोबर गेली आहेत’
‘त्यांनी केलेली कृत्ये त्यांच्याबरोबर गेली आहेत’
यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य असलेल्या थिओडोर जॅरझ यांचे पृथ्वीवरील जीवन ९ जून २०१० रोजी, बुधवारी सकाळी संपुष्टात आले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मेलीटा आहे. या दोघांनी ५३ वर्षे एकत्र संसार केला. पत्नीशिवाय, त्यांच्या मागे त्यांची एक थोरली बहीण, एक भाचा व दोन भाच्या आहेत.
बंधू जॅरझ यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२५ रोजी अमेरिकच्या केन्टकी राज्यातील पाइकी काउन्टीत झाला होता. त्यांनी १० ऑगस्ट १९४१ रोजी, वयाच्या १५ व्या वर्षी यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला. त्याच्या दोन वर्षांनी, वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी सामान्य पायनियर सेवा सुरू केली. आणि अशा प्रकारे, त्यांच्या ६७ वर्षांच्या पूर्ण वेळ सेवेच्या प्रदीर्घ कारकीर्दीची सुरुवात झाली.
सन १९४६ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी बंधू जॅरझ वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या सातव्या वर्गाला उपस्थित राहिले. पदवीधर झाल्यानंतर, बंधू जॅरझ यांना अमेरिकेतील ओहायो राज्याच्या क्लीवलँड या क्षेत्रात प्रवासी पर्यवेक्षक म्हणून पाठवण्यात आले. १९५१ मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया शाखा कार्यालयातील कार्याची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले. बंधू जॅरझबद्दल यहोवाच्या साक्षीदारांच्या १९८३ वार्षिक पुस्तकात असा अहवाल देण्यात आला होता, की “त्यांनी ईश्वरशासित व्यवस्थेसाठी आवेश दाखवण्याद्वारे व क्षेत्रात उत्तम नेतृत्व करण्याद्वारे संपूर्ण देशभरातील बांधवांना खूप प्रोत्साहन दिले.”
अमेरिकेला परतल्यावर, बंधू जॅरझ यांचा १० डिसेंबर १९५६ रोजी मेलीटा लास्कोशी विवाह झाला. आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात त्यांनी प्रवासी कार्याद्वारे केली. अमेरिकेच्या एका मोठ्या प्रदेशातील निरनिराळ्या विभागांना व प्रांतांना भेटी देण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. बंधू जॅरझ यांना १९७४ च्या उत्तरार्धात यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून कार्य करण्याकरता आमंत्रित करण्यात आले.
बंधू जॅरझ हे यहोवाचे समर्पित आणि एकनिष्ठ सेवक होते आणि त्यांचे लक्ष पूर्णपणे ईश्वरशासित कार्यांवर केंद्रित होते. यासाठी ते नेहमी सर्वांच्या आठवणीत राहतील. ते एक प्रेमळ व काळजीवाहू पती होते. शिवाय, ते आध्यात्मिक वृत्तीचे असून त्यांनी नेहमी स्वतःचा नव्हे, तर इतरांचा विचार केला. (१ करिंथ. १३:४, ५) इतरांबद्दलची त्यांची ही प्रामाणिक आस्था, सर्वांना एकसारखे व दयाळूपणे वागवले जावे या त्यांच्या मनस्वी इच्छेतून दिसून आली. याव्यतिरिक्त, लोकांबद्दल त्यांना वाटणारे अथक प्रेम व कळकळ क्षेत्र सेवेतील त्यांच्या आवेशातून दिसून आली.
बेथेल कुटुंबाच्या व जगभरातील बंधुसमाजाच्या एका प्रिय व मेहनती सदस्याला गमावल्यामुळे आपल्याला दुःख होत असले, तरी बंधू जॅरझ यांनी अनेक दशके यहोवाची एकनिष्ठपणे सेवा केल्याबद्दल आपल्याला आनंद होतो. आपल्याला हा भरवसा आहे की ते त्यांच्या मृत्यूपर्यंत देवाला ‘विश्वासू राहिले’ व त्यांना “जीवनाचा मुगूट” मिळाला. (प्रकटी. २:१०) आपल्याला याचीही खातरी आहे की ‘त्यांनी केलेली कृत्ये त्यांच्याबरोबर गेली आहेत.’—प्रकटी. १४:१३.