मुलांनो—मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करा
मुलांनो—मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करा
“तुमचे बोलणे . . . कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.”—कलस्सै. ४:६.
१, २. अनेक मुले आपल्या मित्रांसारखे वागत नसल्यामुळे त्यांना कसे वाटते, आणि का?
“मित्रांचा दबाव,” याविषयी तुम्ही नक्कीच ऐकले असेल. किंबहुना, त्याचा प्रत्यक्ष अनुभवही तुम्हाला आला असेल. आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला कोणीतरी एखादे चुकीचे कृत्य करण्याची गळ घातली असेल. असे घडल्यास तुम्हाला कसे वाटते? चौदा वर्षांचा क्रिस्टफर म्हणतो: “अशा वेळी मला अक्षरशः कुठंतरी पळून जावंसं वाटतं. किंवा मग, आपण आपल्या मित्रांपैकीच एक आहोत हे दाखवण्यासाठी मला त्यांच्यासारखंच वागावंसं वाटतं.”
२ तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्यावर जबरदस्त प्रभाव पडतात का? असल्यास, त्याचे कारण काय असू शकते? त्यांनी तुम्हाला त्यांच्यापैकीच एक समजून तुमच्याशी वागावे असे तुम्हाला वाटत असल्यामुळे तर नसेल? खरेतर, इतरांनी आपल्याला आपलेसे करावे अशी इच्छा बाळगणे चुकीचे नाही. किंबहुना, मोठ्यांनासुद्धा असेच वाटते. कारण कोणालाही—मग तो लहान असो अथवा मोठा—मित्रांकडून नाकारले जाणे मुळीच आवडत नाही. पण वस्तुस्थिती ही आहे, की जीवनात योग्य ते करण्यासाठी तुम्ही ठाम भूमिका घेता तेव्हा सर्वच जण तुमच्यावर खूष होतील असे नाही. येशूलादेखील याचा सामना करावा लागला. असे असले तरी त्याने नेहमी योग्य तेच केले. त्यामुळे, काही जण त्याचे अनुसरण करून त्याचे शिष्य बनले, तर इतर काहींनी देवाच्या या पुत्राला तुच्छ लेखले व ‘त्याला मानले नाही.’—यश. ५३:३.
इतरांसारखे वागण्याचा दबाव—किती जबरदस्त?
३. मित्रांच्या म्हणण्यानुसार वागणे चुकीचे का आहे?
३ काही वेळा, केवळ मित्रांचे मन राखण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासारखे वागण्याचा मोह होऊ शकतो. पण, असे करणे चुकीचे ठरेल. ख्रिश्चनांनी ‘बाळांसारखे असू नये, त्यांनी हेलकावणारे असे होऊ नये.’ (इफिस. ४:१४) लहान मुले अगदी सहजासहजी इतरांच्या बहकाव्यात येऊ शकतात. पण, तुम्ही मुले प्रौढ होण्याच्या मार्गावर आहात. तेव्हा, देवाचे स्तर तुमच्या भल्यासाठीच आहेत हे तुम्ही मानले व तुमच्या धार्मिक विश्वासानुसार तुम्ही जीवन जगलात, तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. (अनु. १०:१२, १३) असे न करण्याचा अर्थ, जीवनावरचे नियंत्रण गमावून बसणे असा आहे. खरेतर, तुम्ही इतरांच्या दबावांना बळी पडता तेव्हा तुम्ही त्यांच्या हातातील कळसूत्री बाहुल्यांसारखे बनता.—२ पेत्र २:१९ वाचा.
४, ५. (क) अहरोन कशा प्रकारे साथीदारांच्या दबावाला वश झाला, आणि त्यातून तुम्ही कोणते धडे शिकू शकता? (ख) तुमच्यावर दबाव आणण्यासाठी तुमचे मित्र कोणत्या मार्गांचा अवलंब करू शकतात?
४ एका प्रसंगी, मोशेचा भाऊ अहरोन हासुद्धा साथीदारांच्या दबावाला बळी पडला. इस्राएल लोकांनी त्यांच्यासाठी एक देव बनवण्याची त्याला गळ घातली तेव्हा त्याने त्यांच्या म्हणण्यानुसार केले. अहरोन हा दुबळ्या मनाचा नव्हता. यापूर्वी, त्याने मोशेच्या पाठीशी उभे राहून इजिप्तच्या सगळ्यात शक्तीशाली पुरुषाचा अर्थात फारोचा सामना केला होता. त्या वेळी त्याने निधड्या छातीने फारोला देवाचा संदेश सांगितला होता. पण, त्याच्या इस्राएली बांधवांनी त्याच्यावर दबाव आणला तेव्हा मात्र तो त्यांच्या दबावाला वश झाला. खरेच, साथीदारांचा दबाव खूप जबरदस्त असू शकतो. अहरोनाला आपल्या इस्राएली बांधवांपेक्षा इजिप्तच्या राजाविरुद्ध उभे राहणे सोपे वाटले होते.—निर्ग. ७:१, २; ३२:१-४.
५ अहरोनाच्या उदाहरणावरून दिसून येते, की केवळ मुलांवर किंवा वाईट गोष्टी करण्याची प्रवृत्ती असलेल्यांवरच साथीदारांचा दबाव येऊ शकतो असे नाही. तर, जीवनात योग्य ते करण्याचा मनापासून प्रयत्न करणाऱ्यांवर, अगदी तुमच्यावरदेखील हा दबाव येऊ शकतो. तुमचे मित्र तुम्हाला आव्हान करण्याद्वारे, तुमच्यावर खोटे आरोप लावण्याद्वारे किंवा तुमची टिंगलटवाळी करण्याद्वारे कदाचित तुम्हाला एखादे चुकीचे कृत्य करण्यास भाग पाडू शकतात. मित्रांकडून येणारा दबाव कोणत्याही स्वरूपाचा असो, त्याचा सामना करणे कठीण असते. पण, त्याचा यशस्वी रीत्या प्रतिकार करण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या धार्मिक विश्वासाची खातरी होणे महत्त्वाचे आहे.
“आपली प्रतीति पाहा”
६, ७. (क) तुमच्या धार्मिक विश्वासाची पक्की खातरी करणे का महत्त्वाचे आहे आणि तुम्ही हे कसे करू शकता? (ख) तुमच्या विश्वासाची पक्की खातरी करण्यासाठी तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकता?
६ मित्रांच्या दबावाचा सामना करण्यासाठी, तुमच्या धार्मिक शिकवणी व स्तर योग्य आहेत याची प्रथम तुम्हाला स्वतःला खातरी पटली पाहिजे. (२ करिंथकर १३:५ वाचा.) याची खातरी पटल्यास, तुम्ही स्वभावाने लाजरेबुजरे असला, तरी धैर्याने बोलण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. (२ तीम. १:७, ८) दुसरीकडे पाहता, एक व्यक्ती स्वभावतःच धैर्यवान असेल, पण तिच्या धार्मिक शिकवणींची व स्तरांची तिला पूर्णपणे खातरी पटली नसेल, तर त्यांचे समर्थन करणे तिला अतिशय कठीण जाऊ शकते. तर मग, बायबलमधून तुम्हाला जे काही शिकवण्यात आले आहे तेच सत्य आहे याची प्रतीती पाहा किंवा स्वतःला खातरी पटवून द्या. बायबलच्या मूलभूत शिकवणींपासून सुरुवात करा. उदाहरणार्थ, देवावर तुमचा विश्वास आहे, आणि देव अस्तित्वात आहे यावर इतर जण का विश्वास ठेवतात हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकले आहे. पण, आता स्वतःला विचारा, ‘देव अस्तित्वात आहे असा मी का विश्वास ठेवतो?’ या प्रश्नाचा उद्देश, देवाच्या अस्तित्वावर शंका घेणे नव्हे, तर तुमचा विश्वास दृढ करणे हा आहे. त्याचप्रमाणे, स्वतःला असेही विचारा, ‘बायबल हे ईश्वरप्रेरित वचन आहे हे मी कसं सांगू शकतो?’ (२ तीम. ३:१६) ‘आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे मी कशावरून म्हणू शकतो?’ (२ तीम. ३:१-५) ‘यहोवाचे स्तर माझ्या भल्यासाठीच आहेत हे मी का मानतो?’—यश. ४८:१७, १८.
७ अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येणार नाहीत या भीतीने तुम्ही कदाचित स्वतःला हे प्रश्न विचारण्यास कचराल. पण, असे करण्याचा अर्थ, तुमच्या कारची पेट्रोल टाकी “रिकामी!” आहे असे पेट्रोल गेजचा काटा दाखवेल या भीतीने त्याकडे पाहण्यास कचरण्यासारखे आहे. कारची पेट्रोल टाकी रिकामी आहे हे तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही त्याबद्दल काहीतरी करू शकता. त्याचप्रमाणे, तुमचा विश्वास नेमका कोठे कमी पडत आहे हे जाणून घेणे व आपल्या विश्वासाची पक्की खातरी करणे महत्त्वाचे आहे.—प्रे. कृत्ये १७:११.
८. जारकर्मापासून पळ काढण्याविषयी देवाच्या आज्ञेचे पालन करणे सुज्ञपणाचे आहे यावरील तुमचा विश्वास तुम्ही दृढ कसा करू शकता हे स्पष्ट करा.
८ एक उदाहरण विचारात घ्या. बायबल तुम्हाला, “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा” असा आर्जव करते. स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘या आज्ञेचे पालन करणे सुज्ञतेचे का आहे?’ तुमचे मित्र अशी कृत्ये का करतात त्या सर्व कारणांचा विचार करा. तसेच, जारकर्म करणारी व्यक्ती ‘आपल्या शरीराबाबत पाप करते’ असे बायबल का म्हणते त्या विविध कारणांचाही विचार करा. (१ करिंथ. ६:१८) मग, त्या कारणांचे विश्लेषण करा आणि स्वतःला विचारा: ‘यापैकी कोणता मार्ग अवलंबणे सगळ्यात योग्य आहे? लैंगिक गैरवर्तन करणं खरंच शहाणपणाचं ठरेल का?’ स्वतःला पुढील प्रश्न विचारून सदर विषयावर आणखी विचार करा, ‘मी एखादं अनैतिक कृत्य केलं तर नंतर मला कसं वाटेल?’ सुरुवातीला कदाचित तुमचे मित्र तुमच्यावर खूष होतील. पण नंतर, तुम्ही तुमच्या पालकांसोबत किंवा ख्रिस्ती बंधुभगिनींसोबत राज्य सभागृहात असता तेव्हा तुम्हाला कसे वाटेल? तुम्ही देवाला प्रार्थना करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या भावना कशा असतील? केवळ मित्रांना खूष करण्यासाठी देवासोबत असलेला तुमचा घनिष्ठ नातेसंबंध त्याग करण्यास तुम्ही खरोखर तयार असाल का?
९, १०. मित्रांच्या सहवासात आत्मविश्वासाने वागण्यास, बायबलच्या शिकवणींवरील तुमचा विश्वास तुम्हाला कसा मदत करू शकेल?
९ तुम्ही तरुण असल्यास, तुम्ही जीवनातील अशा एका वळणावर आहात जेव्हा तुमची समजशक्ती अतिशय वेगाने विकसित होत आहे. (रोमकर १२:१, २ वाचा.) तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे का आहे यावर विचार करण्यासाठी या वेळेचा उपयोग करा. असा सखोल विचार केल्याने बायबलच्या शिकवणींवरील तुमचा विश्वास आणखी दृढ होईल. मग, मित्रांकडून तुमच्यावर दबाव येईल तेव्हा त्यांना तत्परतेने व आत्मविश्वासाने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही तयार असाल. एका तरुण ख्रिस्ती बहिणीप्रमाणेच तुम्हालासुद्धा वाटेल. ती म्हणते: “मी मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करते तेव्हा माझा धार्मिक विश्वास काय आहे हे मी इतरांना दाखवून देत असते. हा केवळ ‘कुठलातरी धर्म’ नाही. तर माझ्या विचारांवर, ध्येयांवर, नैतिक मूल्यांवर आणि माझ्या संपूर्ण जीवनावरच त्याचा प्रभाव आहे.”
१० होय, जे योग्य आहे त्यासाठी खंबीरपणे उभे राहण्यास खूप प्रयास करावे लागतात. (लूक १३:२४) आणि असे करणे खरोखरच फायद्याचे आहे का असा कदाचित तुम्ही विचार कराल. पण, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या: तुम्ही घेतलेल्या भूमिकेबाबत तुम्हाला स्वतःलाच अपराध्यासारखे वाटते किंवा लाज वाटते असे जर तुम्ही दाखवले, तर ते इतरांच्या लक्षात येईल आणि ते तुमच्यावर आणखी दबाव आणण्याची शक्यता आहे. याउलट, तुम्ही आत्मविश्वासाने बोललात तर तुमचे मित्र किती लवकर तुमचा पिच्छा सोडतील हे पाहून तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल.—लूक ४:१२, १३ पडताळून पाहा.
‘विचार करून उत्तर द्या’
११. मित्रांच्या दबावाचा सामना करण्यासाठी आधीच तयारी केल्याने काय फायदा होऊ शकतो?
११ मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करण्याचा आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे तयारी करणे. (नीतिसूत्रे १५:२८ वाचा.) तयारी करण्याचा अर्थ, कोणकोणते प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे याचा आधीच विचार करणे. काही वेळा, थोडासा पूर्वविचार केल्याने मोठा प्रसंग टळू शकतो. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुमच्या शाळेतील काही मुले सिगारेट ओढत असल्याचे तुम्ही पाहता. ते तुम्हालाही सिगारेट ओढण्याची गळ घालतील याची कितपत शक्यता आहे? तुम्ही अडचणीत पडण्याची शक्यता आहे असे वाटल्यास तुम्ही काय करू शकता? नीतिसूत्रे २२:३ म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” अशा वेळी दुसऱ्या वाटेने जाऊन तुम्ही तो प्रसंग पूर्णपणे टाळू शकता. हे भित्रेपणाचे नव्हे, तर शहाणपणाचे लक्षण आहे.
१२. मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता आहे?
१२ पण, एखादा प्रसंग जर तुम्ही टाळूच शकत नसला तर काय? समजा तुमच्या एका मित्राने मोठ्या आश्चर्याने तुम्हाला विचारले: “काय बोलतोस! तू अजूनपर्यंत कोणत्या मुलीला स्पर्श केला नाहीस? म्हणजे तू अजूनपर्यंत जीवनाची ‘ती’ मजा लुटली नाहीस?” अशा वेळी कलस्सैकर ४:६ मध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे बुद्धिमानीचे ठरेल: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” या शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे, अशा एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कसे देता हे परिस्थितीवर अवलंबून असेल. अशा वेळी बायबलविषयी लांबलचक भाषण देण्याची बहुधा गरज नाही. कदाचित, थोडक्यात पण अगदी ठामपणे दिलेले उत्तर पुरेसे असेल. उदाहरणार्थ, ‘तुम्ही जीवनात अजूनपर्यंत “ती” मजा घेतली नाही का?’ या प्रश्नाचे उत्तर तुम्ही केवळ “नाही” किंवा “हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे” असे देऊ शकता.
१३. मित्र तुमची थट्टा करतात तेव्हा समजबुद्धी दाखवणे का महत्त्वाचे आहे?
१३ बरेचदा, लांबलचक भाषण देण्याचा काहीच उपयोग झाला नसता अशा वेळी येशूने थोडक्यात उत्तर दिले. खरेतर, हेरोदाने येशूला प्रश्न विचारले तेव्हा त्याने काहीच उत्तर दिले नाही. (लूक २३:८, ९) नको ते प्रश्न विचारले जातात तेव्हा शांत राहणे सहसा सगळ्यात चांगले. (नीति. २६:४; उप. ३:१, ७) दुसरीकडे पाहता, एखाद्या गोष्टीसंबंधी—उदाहरणार्थ, लैंगिक अनैतिकतेसंबंधी—तुम्ही घेतलेल्या भूमिकेमुळे एखाद्या व्यक्तीने तुमची थट्टा केली असेल, पण तुम्ही असे का वागता असा त्या व्यक्तीला खरोखरच प्रश्न पडला असेल. (१ पेत्र ४:४) अशा वेळी, बायबल तत्त्वांनुसार तुम्ही घेतलेल्या भूमिकेविषयी सविस्तर माहिती देणे उपयुक्त ठरेल. असा प्रसंग कधी उद्भवला तर सविस्तर स्पष्टीकरण देण्यापासून माघार घेऊ नका. उलट, “प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा.”—१ पेत्र ३:१५.
१४. मित्रांनी तुमच्यावर टाकलेला दबाव तुम्ही हुशारीने परतावून कसा लावू शकता?
१४ काही प्रसंगी, मित्राने तुमच्यावर आणलेला दबाव तुम्ही परतावून लावू शकता. पण, तुम्ही हे अतिशय हुशारीने केले पाहिजे. उदाहरणार्थ, “हिम्मत असेल तर ओढून दाखव सिगारेट,” असे शाळेतील मित्राने तुम्हाला चेतवले तर तुम्ही शांतपणे फक्त असे म्हणू शकता: “नको रे, पण तू सिगारेट ओढत असशील असं मला वाटलं नव्हतं.” तुमच्यावर टाकलेला दबाव कशा प्रकारे परतावून लावला गेला हे तुम्ही पाहिले का? यामुळे, तुम्ही सिगारेट का ओढत नाही याविषयी तुम्हाला काही बोलण्याची गरजच पडणार नाही. उलट, आपण का सिगारेट ओढतो यावर विचार करण्यास तुमचा मित्रच प्रवृत्त होईल.
१५. मित्र तुमच्यावर दबाव टाकतात तेव्हा तेथून निघून जाणे केव्हा योग्य आहे, आणि का?
१५ तुम्ही प्रयत्न करूनसुद्धा मित्र तुमच्यावर दबाव टाकत असतील तर काय? अशा वेळी तेथून काढता पाय घेणे सगळ्यात उत्तम. तुम्ही जास्त वेळ तेथे थांबल्यास कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्ही त्यांच्या दबावाला बळी पडण्याची शक्यता आहे. तेव्हा, तेथून लगेच निघून जा. आपण हरलो असे न वाटता तुम्ही हे करू शकता. शेवटी, तुम्ही ती परिस्थिती व्यवस्थित हाताळली. तुमच्या मित्रांच्या हातात तुम्ही कळसूत्री बाहुली बनला नाहीत, तर तुम्ही यहोवाचे मन आनंदित केले.—नीति. २७:११.
आधीच “विचार” करणे लाभदायक
१६. ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांकडूनसुद्धा कशा प्रकारे दबाव येऊ शकतो?
१६ काही वेळा, आध्यात्मिकदृष्ट्या हानिकारक ठरेल असे कृत्य करण्याचा दबाव, यहोवाचे सेवक असल्याचा दावा करणाऱ्या युवकांकडूनसुद्धा येऊ शकतो. अशी कल्पना करा, की अशाच एखाद्या व्यक्तीने आयोजित केलेल्या पार्टीला तुम्ही जाता. पण तेथे गेल्यानंतर पार्टीची देखरेख करण्यासाठी कोणीही प्रौढ व्यक्ती नाही ही गोष्ट तुमच्या लक्षात येते तेव्हा काय? किंवा मग, ख्रिस्ती असल्याचा दावा करणारी एखादी व्यक्ती पार्टीत मद्याची व्यवस्था करते. पण, पार्टीला उपस्थित असलेले कोणीही मद्यपान करण्याच्या अधिकृत वयाचे नसतील तर काय? तुम्हाला तुमच्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार वागण्याची गरज असेल असे अनेक प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. एक १६ वर्षांची ख्रिस्ती बहीण म्हणते: “एकदा आम्ही चित्रपट पाहायला गेलो होतो. पण, चित्रपटाची भाषा इतकी गलिच्छ होती की मी आणि माझी बहीण मधूनच उठून बाहेर गेलो. आमच्यासोबत असलेले आमचे इतर मित्रमैत्रिणी मात्र चित्रपट पाहत राहिले. मी आणि माझ्या बहिणीने जे केले त्याबद्दल आमच्या आईवडिलांनी आमची प्रशंसा केली. पण, आमच्यासोबत आलेले इतर जण काहीतरी चुकीचं करत आहेत हे आम्ही आमच्या कृतीतून त्यांना दाखवलं असं वाटल्यामुळे त्यांना आमचा खूप राग आला.”
१७. एखाद्या पार्टीला जाताना देवाच्या स्तरांनुसार वागण्यासाठी तुम्ही कोणती व्यावहारिक पावले उचलू शकता?
१७ वरील उदाहरणावरून दिसून येते, की तुम्ही तुमच्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार वागत असल्यामुळे काही वेळा कदाचित तुम्ही अडचणीत सापडू शकता. पण, तुमच्या मते जे योग्य आहे त्याला जडून राहा. नेहमी तयार असा. तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार असलात आणि तेथे गेल्यावर तुमच्या मनाला खटकणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला आढळून आल्यास पार्टीतून बाहेर कसे पडायचे याचा आधीच विचार करा. काही युवक आपल्या पालकांना आधीच हे सांगून ठेवतात, की पार्टीतून त्यांनी एक फोन करताच पालकांनी लगेच त्यांना घ्यायला यावे. (स्तो. २६:४, ५) अशा प्रकारे आधीच “विचार” करणे लाभदायक आहे.—नीति. २१:५.
‘आपल्या तारुण्यात आनंद करा’
१८, १९. (क) तुम्ही आनंदी असावे अशी यहोवाची इच्छा आहे असा विश्वास तुम्ही का बाळगू शकता? (ख) जे मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करतात अशांविषयी देवाला कसे वाटते?
१८ यहोवाने तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यासाठी निर्माण केले आणि तुम्ही आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. (उपदेशक ११:९ वाचा.) हे लक्षात ठेवा, की तुमचे अनेक मित्रमैत्रिणी जे काही उपभोगतात ते केवळ “पापाचे क्षणिक सुख” आहे. (इब्री ११:२५) पण, तुम्ही याहून अधिक काहीतरी अनुभवावे अशी खऱ्या देवाची इच्छा आहे. तुम्ही सदासर्वकाळ आनंदी असावे असे त्याला वाटते. त्यामुळे, देवाच्या दृष्टीने चुकीचे काहीतरी करण्याचा तुम्हाला मोह होतो तेव्हा नेहमी आठवणीत ठेवा की यहोवा तुमच्याकडून जे अपेक्षितो त्याचा पुढे तुम्हाला सदैव फायदाच होईल.
१९ युवक या नात्याने तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज तुम्ही तुमच्या मित्रांना खूष केले, तरी आजपासून पुढे अनेक वर्षांनंतर तुमच्या मित्रांपैकी अनेकांना तुमचे नावसुद्धा आठवणार नाही. याउलट, तुम्ही त्यांच्या दबावाचा प्रतिकार करता तेव्हा यहोवा स्वतः त्याची दखल घेतो आणि तो तुम्हाला व तुम्ही दाखवलेला विश्वासूपणा कधीच विसरणार नाही. तो ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर वर्षवेल.’ (मला. ३:१०) शिवाय, जेव्हा जेव्हा तुम्हाला कमजोर वाटते तेव्हा तेव्हा तो उदारपणे तुम्हाला त्याचा पवित्र आत्मा देईल. होय, मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करण्यास यहोवा नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो!
तुम्हाला आठवते का?
• मित्रांचा दबाव किती जबरदस्त असू शकतो?
• मित्रांच्या दबावाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या धार्मिक विश्वासाची खातरी असणे किती महत्त्वाचे आहे?
• मित्रांच्या दबावाचा सामना करण्यास तुम्ही आधीच कसे तयार असू शकता?
• यहोवा तुमच्या विश्वासूपणाची कदर करतो हे तुम्ही कशावरून सांगू शकता?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील चित्र]
सोन्याचे वासरू बनवण्यास अहरोन का तयार झाला?
[१० पानांवरील चित्र]
तयार असा—तुम्ही काय उत्तर द्याल याचा आधीच विचार करा