ख्रिस्ती कुटुंबांनो—तयार असा
ख्रिस्ती कुटुंबांनो—तयार असा
“सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—लूक १२:४०.
१, २. “सिद्ध” किंवा तयार असण्याविषयी येशूने दिलेल्या सल्ल्याचे मनापासून पालन करणे का महत्त्वाचे आहे?
‘मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल’ आणि लोकांना “एकमेकांपासून” वेगळे करेल, तेव्हा तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे काय होईल? (मत्त. २५:३१, ३२) ही घटना, आपण कल्पनासुद्धा केली नसेल अशा घटकेस घडणार असल्यामुळे, “सिद्ध” किंवा तयार असण्याविषयी येशूने दिलेल्या सल्ल्याचे मनापासून पालन करणे किती महत्त्वाचे आहे!—लूक १२:४०.
२ कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून संपूर्ण कुटुंबाला आध्यात्मिक रीत्या जागे राहण्यास कशा प्रकारे मदत करू शकतो याची चर्चा आधीच्या लेखात करण्यात आली होती. आता आपण, आणखी काही मार्गांची चर्चा करू या, ज्यांद्वारे आपण आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक कल्याणाला हातभार लावू शकतो.
आपला डोळा “निर्दोष” ठेवा
३, ४. (क) ख्रिस्ती कुटुंबांनी कशापासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे? (ख) आपला डोळा “निर्दोष” ठेवणे याचा काय अर्थ होतो?
३ ख्रिस्ताच्या येण्यासाठी तयार असण्याकरता ख्रिस्ती कुटुंबांनी खऱ्या उपासनेशी संबंधित गोष्टींपासून विकर्षित न होण्याची काळजी घेतली पाहिजे. अशा विकर्षणांपासून त्यांनी स्वतःचे संरक्षण करण्याची गरज आहे. भौतिकवाद हा एक पाश असून अनेक कुटुंबे या पाशाला बळी पडली आहेत. तेव्हा, आपला डोळा “निर्दोष” ठेवण्यासंबंधी येशूने काय म्हटले ते विचारात घ्या. (मत्तय ६:२२, २३ वाचा.) ज्याप्रमाणे, एक दिवा आपला मार्ग प्रकाशित करू शकतो व न अडखळता चालण्यास आपल्याला साहाय्य करू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या लाक्षणिक ‘अंतःचक्षूंद्वारे’ आपण जे काही आत्मसात करतो त्यामुळे आपले ज्ञान वाढू शकते आणि न अडखळता जीवन जगण्यास आपल्याला मदत मिळू शकते.—इफिस. १:१८.
४ आपल्याला स्पष्ट दिसावे म्हणून आपली दृष्टी चांगली असली पाहिजे व आपण जे काही पाहतो त्यावर आपल्याला आपली नजर केंद्रित करता आली पाहिजे. हीच गोष्ट, आपल्या अंतःचक्षूंच्या बाबतीतही खरी आहे. आपला लाक्षणिक डोळा निर्दोष ठेवणे याचा अर्थ एकाच उद्देशावर आपले लक्ष केंद्रित करणे. भौतिक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करण्याऐवजी व आपल्या कुटुंबाच्या केवळ भौतिक गरजा तृप्त करण्याची अवाजवी चिंता करण्याऐवजी आपण आध्यात्मिक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करतो. (मत्त. ६:३३) याचा अर्थ, देवाने आपल्याला ज्या भौतिक गोष्टी पुरवल्या आहेत त्यांत संतुष्ट असणे आणि आपल्या जीवनात त्याच्या सेवेला प्राधान्य देणे असा होतो.—इब्री १३:५.
५. एका किशोरवयीन मुलीने कशा प्रकारे दाखवून दिले की तिचा “डोळा” अर्थात लक्ष, देवाची सेवा करण्यावर केंद्रित होते?
५ मुलांना आपला डोळा निर्दोष ठेवण्याचे प्रशिक्षण दिल्याचे अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतात. इथियोपिया या देशात राहणाऱ्या एका किशोरवयीन मुलीचे उदाहरण विचारात घ्या. शाळेत असताना, ती अभ्यासात इतकी हुशार होती, की तिचे मूलभूत शिक्षण संपल्यानंतर तिने उच्च शिक्षण प्राप्त करावे म्हणून तिला शिष्यवृत्ती देण्यात आली. पण तिने ती शिष्यवृत्ती नाकारली, कारण तिचे लक्ष यहोवाची सेवा करण्यावर केंद्रित होते. त्यानंतर काही काळातच, तिला नोकरीची एक संधी चालून आली; दरमहा ३,००० युरो (सुमारे दोन लाख रुपये) इतक्या पगाराची ही नोकरी होती. तिच्या देशात सर्वसामान्यपणे मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत ही रक्कम नक्कीच खूप मोठी होती. पण, त्या मुलीचा “डोळा” अर्थात लक्ष, पायनियर सेवेवर केंद्रित होते. नोकरीची ही संधी नाकारण्यासाठी तिला आपल्या पालकांचा सल्ला घ्यावा लागला नाही. आपल्या मुलीने जे काही केले होते ते तिच्या पालकांना समजले तेव्हा त्यांना कसे वाटले? त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना तिचा किती अभिमान वाटतो हे त्यांनी तिला सांगितले.
६, ७. आपण कोणत्या धोक्यापासून ‘सांभाळून’ राहिले पाहिजे?
६ मत्तय ६:२२, २३ यात नमूद असलेल्या येशूच्या शब्दांतून लोभासंबंधीचा इशाराही सूचित होतो. येशूने एका “निर्दोष” डोळ्याची तुलना “सदोष” डोळ्याशी केली आहे. मूळ भाषेत, ‘सदोष डोळा’ असे भाषांतर केलेल्या वाक्यांशाचा अर्थ वाईट, मत्सरी किंवा लोभिष्ट असलेला डोळा असा होऊ शकतो. लोभ किंवा हव्यास याविषयी यहोवाला कसे वाटते? बायबल म्हणते: “जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.”—इफिस. ५:३.
७ आपल्याला कदाचित इतरांमधील लोभाचे लक्षण चटकन दिसून येईल. पण, आपल्या स्वतःमध्ये मात्र ते इतक्या सहजासहजी दिसणार नाही. तेव्हा, येशूच्या पुढील सल्ल्याचे पालन करणे बुद्धिमानीचे ठरेल: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा.” (लूक १२:१५) असे करण्यासाठी आपण आत्मपरीक्षण करून आपले मन कशावर केंद्रित आहे ते पाहिले पाहिजे. मनोरंजनावर, करमणुकीवर आणि भौतिक गोष्टी मिळवण्यावर आपण किती वेळ व पैसा खर्च करतो याचा ख्रिस्ती कुटुंबांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
८. आपण ‘सांभाळून’ खरेदी का केली पाहिजे?
८ एखादी वस्तू खरेदी करण्याआधी ती विकत घेण्याची आपली ऐपत आहे की नाही फक्त एवढाच विचार करू नका; तर ‘ती वस्तू नियमितपणे वापरण्यासाठी व त्याची देखभाल करण्यासाठी मला वेळ मिळेल का? ती नीट वापरायला शिकण्यासाठी मला किती वेळ लागेल?,’ यांसारख्या बाबींचाही विचार करा. मुलांनो, जाहिरातींमध्ये दाखवल्या जाणाऱ्या वस्तूंवर भाळून महागड्या ब्रँडचे कपडे किंवा इतर महागड्या वस्तू खरेदी करण्याची अवाजवी मागणी करू नका. संयम बाळगा. शिवाय, तुम्हाला हवी असलेली एखादी वस्तू खरेदी केल्यामुळे, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा तुमच्या कुटुंबाला तयार असणे शक्य होईल का याचाही विचार करा. यहोवाने दिलेल्या पुढील अभिवचनावर विश्वास ठेवा: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री १३:५.
आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करा
९. आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न केल्याने एका कुटुंबाला काय पाहण्यास मदत मिळू शकते?
९ कौटुंबिक सदस्य आणखी एका मार्गाने आपला विश्वास दृढ करू शकतात व संपूर्ण कुटुंबाच्या आध्यात्मिक कल्याणाला हातभार लावू शकतात. तो मार्ग म्हणजे, आध्यात्मिक ध्येये ठेवणे व ती गाठण्याचा प्रयत्न करणे. असे केल्याने, यहोवाच्या सेवेत आपण कितपत प्रगती करत आहोत, तसेच आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व दिले पाहिजे हे पाहण्यास कुटुंबांना मदत मिळेल.—फिलिप्पैकर १:१० वाचा.
१०, ११. कुटुंब या नात्याने तुम्ही कोणती ध्येये गाठण्याचा प्रयत्न करत आहात, आणि भविष्यासाठी तुम्ही कोणती ध्येये ठेवू इच्छिता?
१० कुटुंबातील प्रत्येक सदस्याला गाठता येतील अशी छोटी-छोटी व्यावहारिक ध्येये ठेवल्यानेसुद्धा खूप फायदा होऊ शकतो. दररोज दैनिक वचनावर चर्चा करण्याच्या ध्येयाचेच उदाहरण घ्या. कौटुंबिक सदस्यांच्या उत्तरांवरून त्यांनी आध्यात्मिक रीत्या कितपत प्रगती केली आहे हे समजण्यास कुटुंबप्रमुखांना मदत मिळू शकते. संपूर्ण कुटुंबाने मिळून नियमितपणे बायबलचे वाचन करण्याचे ध्येय ठेवल्याने मुलांना आपले वाचन-कौशल्य सुधारण्याची व बायबलमधील संदेशाची समज वाढवण्याची उत्तम संधी मिळते. (स्तो. १:१, २) तसेच, आपण आपल्या प्रार्थनांचा दर्जा सुधारण्याचे ध्येय ठेवू नये का? आपण आपल्या जीवनात, मोठ्या प्रमाणात आत्म्याच्या फळाचे पैलू विकसित करण्याचे उत्तम ध्येयही ठेवू शकतो. (गलती. ५:२२, २३) किंवा सेवाकार्यात आपल्याला भेटणाऱ्या लोकांना निरनिराळ्या मार्गांनी सहानुभूती दाखवण्याविषयी काय म्हणता येईल? संपूर्ण कुटुंब मिळून असे करण्याचा प्रयत्न केल्याने मुलांना दयाळू असण्यास मदत मिळू शकते व त्यांच्या मनात सामान्य पायनियर किंवा मिशनरी या नात्याने सेवा करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.
११ तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला गाठता येतील अशा काही ध्येयांचा तुम्ही विचार करू शकता का? तुमचे कुटुंब सेवाकार्यात अधिक वेळ खर्च करण्याचे ध्येय ठेवू शकते का? टेलिफोनद्वारे साक्ष देण्याच्या, रस्त्यावर किंवा व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्याच्या भीतीवर मात करण्यासाठी तुम्ही पावले उचलू शकता का? राज्य प्रचारकांची नितान्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन कार्य करण्याविषयी काय म्हणता येईल? दुसरी भाषा बोलणाऱ्या लोकांना सुवार्ता सांगता यावी म्हणून कुटुंबातील एक सदस्य एखादी नवीन भाषा शिकू शकतो का?
१२. आपल्या कुटुंबांना आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यास मदत करण्यासाठी कुटुंबप्रमुख काय करू शकतात?
१२ कुटुंबप्रमुख या नात्याने, तुमच्या कुटुंबाला कोणत्या क्षेत्रात आध्यात्मिक प्रगती करायची गरज आहे हे ओळखा. मग, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशिष्ट ध्येये ठेवा. कुटुंब या नात्याने तुम्ही ठेवलेली ध्येये व्यावहारिक आणि तुमच्या परिस्थितीनुसार व क्षमतेनुसार साध्य करता येण्याजोगी असली पाहिजेत. (नीति. १३:१२) अर्थात, अर्थपूर्ण ध्येये गाठण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तेव्हा, टीव्ही पाहण्यासाठी तुम्ही खर्च करत असलेल्या वेळातून वेळ काढा व त्याचा उपयोग आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी करा. (इफिस. ५:१५, १६) कुटुंबासाठी ठेवलेली ध्येये गाठण्याकरता परिश्रम करा. (गलती. ६:९) आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाची आध्यात्मिक प्रगती ‘सर्वांस दिसून येईल.’—१ तीम. ४:१५.
नियमितपणे कौटुंबिक उपासना करा
१३. मंडळीच्या साप्ताहिक सभांच्या वेळापत्रकात कोणता फेरबदल करण्यात आला होता, आणि आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजे?
१३ मंडळीच्या साप्ताहिक सभांच्या वेळापत्रकात, १ जानेवारी २००९ पासून एक महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आला होता. या फेरबदलामुळे, ख्रिस्ती कुटुंबांना मनुष्याच्या पुत्राच्या येण्याकरता “सिद्ध” किंवा तयार असण्याची उत्तम संधी लाभली आहे. पूर्वी ज्याला मंडळीचा पुस्तक अभ्यास म्हटले जायचे त्यासाठी आपण एका ठराविक दिवशी एकत्र यायचो. आता तीच सभा ईश्वरशासित सेवा प्रशाला व सेवा सभा यांच्यासोबत जोडण्यात आली आहे. दर आठवडी एक विशिष्ट संध्याकाळ कौटुंबिक उपासना करण्यासाठी राखून ठेवण्याद्वारे ख्रिस्ती कुटुंबांना आपली आध्यात्मिकता दृढ करण्याची संधी मिळावी या उद्दिष्टाने हा फेरबदल करण्यात आला होता. हा बदल होऊन आता बराच काळ लोटला आहे. तेव्हा, आपण स्वतःला असे विचारू शकतो: ‘आठवड्यातल्या एका विशिष्ट संध्याकाळी कौटुंबिक उपासना किंवा वैयक्तिक अभ्यास करण्यासाठी आपल्याला जो वेळ उपलब्ध करून दिला आहे त्याचा मी उपयोग करत आहे का? या व्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मी यशस्वी झालो आहे का?’
१४. (क) नियमितपणे कौटुंबिक उपासना किंवा वैयक्तिक अभ्यास करण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट काय आहे? (ख) आठवड्यातील एक विशिष्ट संध्याकाळ अभ्यासासाठी राखून ठेवणे अत्यावश्यक का आहे?
१४ आठवड्यातील एका विशिष्ट संध्याकाळी नियमितपणे कौटुंबिक उपासना करण्याचे किंवा वैयक्तिक अभ्यासासाठी विशिष्ट वेळ राखून ठेवण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. ते म्हणजे यहोवाशी जवळीक साधणे. (याको. ४:८) आपण नियमितपणे बायबलचा अभ्यास करण्यासाठी वेळ खर्च करतो तेव्हा सृष्टिकर्त्याबद्दलचे आपले ज्ञान वाढते आणि त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी दृढ होतो. आपण जितके अधिक यहोवाच्या समीप जातो तितकी अधिक आपल्याला “संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने” त्याच्यावर प्रेम करण्याची प्रेरणा मिळते. (मार्क १२:३०) देवाच्या आज्ञांचे पालन करण्यास व त्याचे अनुकरण करण्यास आपण नक्कीच उत्सुक आहोत. (इफिस. ५:१) होय, पूर्वभाकीत केलेल्या ‘मोठ्या संकटाची’ आपण वाट पाहत असताना कुटुंबातील सर्व सदस्यांना आध्यात्मिक रीत्या “सिद्ध” किंवा तयार असण्यास मदत करण्यासाठी नियमितपणे कौटुंबिक उपासना करणे अत्यावश्यक आहे. (मत्त. २४:२१) किंबहुना, मोठ्या संकटातून सुखरूप वाचण्याकरता कौटुंबिक उपासना अत्यंत महत्त्वाची आहे.
१५. कुटुंबातील सदस्यांना एकमेकांविषयी काय वाटते यावर कौटुंबिक उपासनेचा काय प्रभाव पडतो?
१५ कौटुंबिक उपासनेच्या व्यवस्थेचे आणखी एक उद्दिष्ट आहे. ते म्हणजे, कौटुंबिक सदस्यांना एकमेकांच्या जवळ येण्यास मदत करणे. दर आठवडी संपूर्ण कुटुंब मिळून आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्यासाठी वेळ काढल्याने कौटुंबिक सदस्यांना एकमेकांविषयी काय वाटते यावर विलक्षण प्रभाव पडतो. वैवाहिक जोडप्यांना, बायबलचा एकत्र अभ्यास करताना एखादा नवीन मुद्दा शिकायला मिळाल्यामुळे नक्कीच अत्यानंद होतो व त्यांचे वैवाहिक बंधन आणखी मजबूत होते. (उपदेशक ४:१२ वाचा.) ज्या कुटुंबात पालक व मुले एकत्र उपासना करतात त्यांच्यात, प्रेमामुळे अर्थात ‘पूर्णता करणाऱ्या बंधनामुळे’ एकता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.—कलस्सै. ३:१४.
१६. बायबलचा अभ्यास करण्यासाठी दर आठवडी एक विशिष्ट संध्याकाळ राखून ठेवल्यामुळे तीन आध्यात्मिक बहिणींना कसा फायदा होत आहे ते सांगा.
१६ बायबल अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट संध्याकाळ राखून ठेवण्याच्या व्यवस्थेमुळे तीन आध्यात्मिक बहिणींना कसा फायदा झाला ते विचारात घ्या. या तीन वयस्क विधवा बहिणी एकमेकांच्या नातेवाईक नसल्या, तरी एकाच शहरात राहत असल्यामुळे त्या अनेक वर्षांपासून चांगल्या मैत्रिणी आहेत. एकमेकांशी अधिक सहवास करता यावा आणि त्याच वेळी त्यांचा सहवास केवळ सामाजिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा असावा म्हणून त्यांनी एकत्र येण्यासाठी व बायबलचा अभ्यास करण्यासाठी दर आठवडी एक विशिष्ट संध्याकाळ राखून ठेवण्याचे ठरवले. त्यांनी, “बेअरिंग थरो विटनेस” अबाउट गॉड्स किंग्डम या पुस्तकाचा उपयोग करून असे करण्यास सुरुवात केली. त्यांच्यापैकी एक बहीण म्हणते: “आम्हाला ही वेळ इतकी आवडते, की आमचा अभ्यास सहसा एका तासापेक्षा जास्त वेळ चालतो. आम्ही, पहिल्या शतकातील आपले बंधुभगिनी कोणत्या परिस्थितींत होते याची कल्पना करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्या परिस्थितींत असतो, तर आपण काय केलं असतं याची चर्चा करतो. मग, आमच्या चर्चेत आम्ही जे काही मुद्दे शिकलो ते आम्ही सेवाकार्यात लागू करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आमचं राज्य प्रचाराचं व शिष्य बनवण्याचं कार्य पूर्वीपेक्षा अधिक आनंददायक व परिणामकारक बनलं आहे.” वैयक्तिक अभ्यासाच्या किंवा कौटुंबिक उपासनेच्या या व्यवस्थेमुळे या तीन चांगल्या मैत्रिणी आध्यात्मिक रीत्या दृढ होण्यासोबतच एकमेकांच्या अधिक जवळ आल्या आहेत. “या व्यवस्थेची आम्ही मनापासून कदर करतो” असे त्या बहिणी म्हणतात.
१७. कोणत्या गोष्टी कौटुंबिक उपासनेच्या यशाला हातभार लावतात?
१७ तुमच्याबद्दल काय? कौटुंबिक उपासना किंवा वैयक्तिक अभ्यास करण्यासाठी आठवड्यातील एक संध्याकाळ राखून ठेवल्यामुळे तुम्हाला काय फायदा होत आहे? तुमचा अभ्यास, केला तर केला, नाही तर नाही अशा स्वरूपाचा असेल, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ठरलेल्या वेळी अभ्यासासाठी तयार असले पाहिजे. कौटुंबिक उपासनेसाठी राखून ठेवलेल्या या वेळात किरकोळ गोष्टींना आड येऊ देऊ नका. शिवाय, अभ्यास सत्रांमध्ये चर्चा केलेल्या माहितीचा तुमच्या कुटुंबाला आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करता येईल अशा रीतीने अभ्यासाच्या साहित्याची निवड केली जावी. हा अभ्यास आनंददायक बनवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्यासाठी परिणामकारक शिक्षण पद्धतींचा उपयोग करा आणि अभ्यासादरम्यान आदरणीय व शांत वातावरण राखा.—याको. ३:१८. *
‘जागे राहा’ व तयार असा
१८, १९. मनुष्याचा पुत्र लवकरच येईल हे माहीत असल्यामुळे तुम्ही व तुमच्या कुटुंबाने काय केले पाहिजे?
१८ दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या जगाच्या परिस्थितीवरून हे स्पष्टपणे दिसून येते, की १९१४ पासून सैतानाच्या जगाचा शेवटला काळ सुरू झाला आहे. हर्मगिदोनाचे वादळी ढग क्षितिजावर स्पष्ट दिसत आहेत. लवकरच मनुष्याचा पुत्र अधर्मी लोकांवर यहोवाचा न्यायदंड बजावण्यासाठी येईल. (स्तो. ३७:१०; नीति. २:२१, २२) तेव्हा, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने जागृत असू नये का?
१९ आपला डोळा “निर्दोष” ठेवण्याबद्दल येशूने दिलेल्या सल्ल्याचे तुम्ही पालन करत आहात का? जगाचे लोक धनदौलत, प्रसिद्धी किंवा सत्ता या गोष्टींच्या मागे धावत असताना, तुमचे कुटुंब आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करत आहे का? कौटुंबिक उपासनेसाठी एक विशिष्ट संध्याकाळ किंवा वैयक्तिक अभ्यासासाठी एक ठराविक वेळ राखून ठेवण्याच्या व्यवस्थेचा तुम्ही फायदा घेत आहात का? या अभ्यासाची जी उद्दिष्टे आहेत ती तुम्ही साध्य करत आहात का? आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे एक पती, एक पत्नी किंवा एक मूल या नात्याने तुम्ही आपापली शास्त्रवचनीय जबाबदारी पार पाडत आहात का आणि असे करण्याद्वारे संपूर्ण कुटुंबाला ‘जागे राहण्यास’ मदत करत आहात का? (१ थेस्सलनी. ५:६) तसे असल्यास, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा तुम्ही नक्कीच तयार असाल.
[तळटीप]
^ कौटुंबिक उपासनेत कोणत्या साहित्याचा अभ्यास करावा व हा अभ्यास व्यावहारिक व आनंददायक कसा बनवावा यावरील माहितीकरता १५ ऑक्टोबर २००९ च्या टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे २९-३१ पाहा.
तुम्हाला काय शिकायला मिळाले?
• ख्रिस्ती कुटुंबे आपला डोळा “निर्दोष” ठेवण्याद्वारे कशी तयार असू शकतात?
• आध्यात्मिक ध्येये ठेवण्याद्वारे व ती गाठण्याद्वारे ख्रिस्ती कुटुंबे कशी तयार असू शकतात?
• नियमितपणे कौटुंबिक उपासना करण्याद्वारे ख्रिस्ती कुटुंबे कशी तयार असू शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
“निर्दोष” डोळा आपल्याला जगातील विकर्षणांचा प्रतिकार करण्यास प्रवृत्त करेल