सर्वांना गरज आहे अशी सुवार्ता
सर्वांना गरज आहे अशी सुवार्ता
‘तारणासाठी सुवार्ता देवाचे सामर्थ्य आहे.’—रोम. १:१६.
१, २. तुम्ही ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार का करता, आणि सुवार्ता सांगताना तुम्ही कोणत्या गोष्टींवर भर देता?
‘मला इतरांना सुवार्ता सांगायला खूप आवडते.’ असे अनेकदा तुम्हाला वाटले असेल किंवा तुम्ही बोलून दाखवले असेल. तुम्ही यहोवाचे एक साक्षीदार असल्यामुळे, “राज्याची ही सुवार्ता” इतरांना सांगणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. सुवार्तेची घोषणा करण्यासंबंधी येशूने केलेली भविष्यवाणीही कदाचित तुम्हाला तोंडपाठ असेल.—मत्त. २४:१४.
२ तुम्ही ‘राज्याच्या सुवार्तेचा’ प्रचार करता, तेव्हा येशूने सुरू केलेले कार्य तुम्ही पुढे चालवत असता. (लूक ४:४३ वाचा.) इतरांना सुवार्ता सांगत असताना, तुम्ही बहुधा या गोष्टीवर भर देता, की देव लवकरच मानवी घडामोडींमध्ये हस्तक्षेप करेल. ‘मोठ्या संकटाद्वारे’ तो खोट्या धर्माचा अंत करेल व पृथ्वीवरून दुष्टाई नाहीशी करेल. (मत्त. २४:२१) तसेच, तुम्ही या गोष्टीवरही बहुधा भर देता, की देवाचे राज्य पृथ्वीवर नंदनवनाची पुनःस्थापना करेल, ज्यात सुखशांती नांदेल. खरेतर, “राज्याची ही सुवार्ता,” “तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल” अशी “अब्राहामाला पूर्वीच [जी] सुवार्ता सांगितली” होती त्या सुवार्तेचा भाग आहे.—गलती. ३:८.
३. प्रेषित पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात सुवार्तेवर भर दिला असे आपण का म्हणू शकतो?
३ पण सुवार्ता सांगत असताना, लोकांना गरज असलेल्या सुवार्तेच्या एका महत्त्वपूर्ण पैलूकडे आपण दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे का? प्रेषित पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात केवळ एकदाच ‘देवाच्या राज्याचा’ उल्लेख केला. पण, ‘सुवार्तेचा’ त्याने १२ वेळा (मूळ भाषेत) उल्लेख केला. (रोमकर १४:१७ वाचा.) पौलाने त्या पुस्तकात सुवार्तेच्या कोणत्या पैलूचा वारंवार उल्लेख केला? ती विशिष्ट सुवार्ता इतकी महत्त्वाची का आहे? आणि आपल्या क्षेत्रातील लोकांना “देवाची सुवार्ता” सांगत असताना आपण त्या पैलूकडे लक्ष का दिले पाहिजे?—मार्क १:१४; रोम. १५:१६; १ थेस्सलनी. २:२.
रोममध्ये असलेल्यांना कशाची गरज होती?
४. पौलाला रोममध्ये पहिल्यांदा तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा त्याने कशाचा प्रचार केला?
४ पौलाला रोममध्ये पहिल्यांदा तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा तो ज्या विषयांवर बोलला त्यांकडे लक्ष दिल्याने आपण खूप काही शिकू शकतो. रोमकरांस पत्र यात आपल्याला वाचायला मिळते, की पौलाला भेटायला आलेल्या अनेक यहुद्यांना ‘त्याने (१) देवाच्या राज्याविषयी साक्ष दिली आणि (२) येशूविषयी त्यांची खातरी केली.’ याचा परिणाम काय झाला? “त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्वास ठेविनात.” त्यानंतर, ‘जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे स्वागत करून तो त्यांना (१) देवाच्या राज्याची घोषणा करीत असे, आणि (२) प्रभु येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवीत असे.’ (प्रे. कृत्ये २८:१७, २३-३१) स्पष्टच आहे, की पौलाने देवाच्या राज्याकडे लक्ष दिले. पण, त्याने आणखी कोणत्या गोष्टीवर भर दिला? देवाच्या राज्याचा केंद्रबिंदू असलेल्या गोष्टीवर, म्हणजेच देवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशूची जी भूमिका आहे त्यावर.
५. रोमकरांस पत्र यात पौल कोणत्या महत्त्वाच्या गरजेविषयी बोलला?
५ सर्व लोकांना येशूविषयी जाणून घेण्याची व त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. याच गरजेबद्दल, रोमकरांस लिहिलेल्या पत्रात पौलाने सांगितले. या पत्राच्या सुरुवातीला त्याने देवाबद्दल असे लिहिले, की “देवाची सेवा मी आपल्या आत्म्याने त्याच्या पुत्राच्या सुवार्तेच्या कार्यात करितो.” त्याने पुढे म्हटले: “मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला—प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला—तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.” नंतर त्याने त्या काळाचा उल्लेख केला जेव्हा “देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील.” आणि त्याने म्हटले: “यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.” * (रोम. १:१०, १६; २:१६; १५:१८, १९) तुम्हाला काय वाटते, पौलाने रोमकरांना लिहिले तेव्हा त्याने येशू ख्रिस्तावर भर का दिला?
६, ७. रोममधील मंडळीच्या स्थापनेविषयी व त्यातील सदस्यांविषयी काय म्हणता येईल?
६ रोममधील मंडळीची स्थापना कशी झाली हे आपल्याला माहीत नाही. जे यहुदी किंवा यहुदीयमतानुसारी इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी उपस्थित होते ते ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर रोमला परतले असावेत का? (प्रे. कृत्ये २:१०) किंवा ख्रिस्ती व्यापाऱ्यांनी आणि प्रवाशांनी रोममध्ये सत्याचा प्रसार केला असावा का? ते काहीही असो, इ.स. ५६ मध्ये पौलाने रोमकरांस पत्र लिहिले तोपर्यंत, रोममधील मंडळीची स्थापना होऊन बराच काळ लोटला होता. (रोम. १:८) त्या मंडळीत कोणकोणत्या पार्श्वभूमीचे लोक होते?
७ रोमच्या मंडळीतील काही जण यहुदी होते. पौलाने अंद्रोनिक व युनिया यांना “माझे नातेवाईक” असे म्हटले, त्यावरून ते बहुधा यहुदी असून त्याचे नातेवाईक होते असे दिसते. रोममध्ये राहणारे व तंबू बनवण्याचे काम करणारे अक्विल्ला व प्रिस्किल्ला हेदेखील यहुदी होते. (रोम. ४:१; ९:३, ४; १६:३, ७; प्रे. कृत्ये १८:२) पण पौलाने ज्या अनेक बंधुभगिनींना सलाम सांगितला ते बहुधा गैर-यहुदी होते. त्यांच्यापैकी काही कदाचित “कैसराच्या घरचे” म्हणजे कैसराचे दास आणि कनिष्ठ अधिकारी असावेत.—फिलिप्पै. ४:२२; रोम. १:६; ११:१३.
८. रोममधील प्रत्येक ख्रिस्ती कोणत्या बिकट स्थितीत होता?
८ रोममधील प्रत्येक ख्रिस्ती एका बिकट स्थितीत होता, आणि आज आपणही त्याच स्थितीत आहोत. या स्थितीबद्दल पौलाने असे म्हटले: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोम. ३:२३) यावरून स्पष्टपणे दिसते की पौलाने ज्या सर्वांना लिहिले होते त्यांनी हे मान्य करण्याची गरज होती, की ते पापी आहेत आणि ही गरज पूर्ण करण्याच्या देवाच्या माध्यमावर त्यांनी विश्वास ठेवायचा होता.
पापी असल्याचे मान्य करणे
९. सुवार्तेमुळे घडून येऊ शकणाऱ्या कोणत्या परिणामाकडे पौलाने लक्ष वेधले?
९ पौलाने वारंवार उल्लेख केलेल्या सुवार्तेमुळे कोणता अद्भुत परिणाम घडून येणार होता याकडे, त्याने रोमकरांना लिहिलेल्या पत्राच्या सुरुवातीला लक्ष वेधले. त्याने म्हटले: “मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला—प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला—तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.” होय, तारण होणे शक्य होते. पण, “नीतिमान विश्वासाने जगेल,” या गहन सत्याच्या सामंजस्यात विश्वास ठेवणे आवश्यक होते, जे हबक्कूक २:४ मधून उल्लेख करण्यात आले आहे. (रोम. १:१६, १७; गलती. ३:११; इब्री १०:३८) पण, तारणाकडे नेऊ शकणाऱ्या या सुवार्तेवरून कशा प्रकारे दिसून येते की “सर्वांनी पाप केले आहे”?
१०, ११. रोमकर ३:२३ मध्ये जे म्हटले आहे ते काही लोकांना विचित्र वाटत नसले, तरी इतरांना का वाटते?
१० एका व्यक्तीने, जीवन वाचवणारा विश्वास विकसित करण्याआधी आपण पापी आहोत हे मान्य केले पाहिजे. ही गोष्ट, लहानपणापासून देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना आणि काही प्रमाणात बायबलशी परिचित असणाऱ्यांना विचित्र वाटणार नाही. (उपदेशक ७:२० वाचा.) “सर्वांनी पाप केले आहे,” असे जे पौलाने म्हटले हे त्यांना मान्य असो अगर नसो, पण निदान याचा काय अर्थ होतो याची थोडीफार तरी कल्पना त्यांना असते. (रोम. ३:२३) पण, सेवाकार्य करत असताना आपल्याला कदाचित असे अनेक लोक भेटतील ज्यांना पौलाच्या विधानाचा अर्थ समजत नाही.
११ काही देशांमध्ये, लोकांना अशी शिकवण दिली जात नाही की ते जन्मतःच पापी आहेत किंवा त्यांना वारशाने पाप मिळाले आहे. आपण चुका करतो, आपल्यामध्ये दुर्गुण आहेत, आणि आपण काही वाईट गोष्टी केल्या असतील हे कदाचित ते कबूल करतील. आणि इतर जणही अशाच स्थितीत आहेत हेदेखील ते पाहतात. पण त्यांच्या पार्श्वभूमीमुळे, आपण स्वतः व इतर जण असे का आहोत हे त्यांना समजत नाही. खरेतर, काही भाषांमध्ये, एक व्यक्ती पापी आहे असे जर तुम्ही म्हणालात, तर इतर जण असा विचार करतील की त्या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केला आहे किंवा निदान कोणता तरी नियम भंग केला आहे. यावरून स्पष्टपणे दिसते, की अशा वातावरणात राहणारी व्यक्ती, पौलाने म्हटले त्या अर्थाने आपण पापी आहोत असा कदाचित स्वतःविषयी विचार करणार नाही.
१२. आपण सर्व पापी आहोत ही गोष्ट बहुतेक जण का मान्य करत नाहीत?
१२ ज्या देशांत ख्रिस्ती धर्माला प्रामुख्याने मानले जाते, अशा देशांमध्येसुद्धा बहुतेक लोक आपण सर्व पापी आहोत ही गोष्ट मान्य करत नाहीत. का बरे? ते काही प्रसंगी जरी चर्चला जात असले, तरी आदाम व हव्वा यांच्याबद्दल असलेला बायबलमधील वृत्तान्त त्यांना निव्वळ एक काल्पनिक कथा किंवा दंतकथा वाटते. इतर जण अशा वातावरणात लहानाचे मोठे होतात जेथे देवाला मानले जात नाही. देव खरोखर अस्तित्वात आहे याबद्दल ते शंका घेतात आणि त्यामुळे एका सर्वोच्च व्यक्तीने मानवांकरता नैतिक स्तर बनवले आहेत आणि त्या स्तरांचे पालन न करणे म्हणजेच पाप करणे आहे हे त्यांना समजत नाही. एका अर्थी, ते पहिल्या शतकातील त्या लोकांप्रमाणे आहेत, ज्यांचे वर्णन पौलाने “आशाहीन व देवविरहित” असे केले.—इफिस. २:१२.
१३, १४. (क) जे देवावर विश्वास ठेवत नाहीत आणि आपण पापी आहोत हे मान्य करत नाहीत ते कसलीही सबब देऊ शकत नाहीत याचे एक कारण काय आहे? (ख) देवाचे अस्तित्व नाकारणाऱ्या अनेकांनी काय केले आहे?
१३ अशा प्रकारच्या पार्श्वभूमीमुळे देवाचे अस्तित्व नाकारणे तेव्हाही उचित नव्हते व आजही उचित का असू शकत नाही याची दोन कारणे पौलाने रोमकरांना लिहिलेल्या पत्रात सांगितली. पहिले कारण म्हणजे, खुद्द सृष्टीच सृष्टिकर्त्याच्या अस्तित्वाचे प्रमाण देते. (रोमकर १:१९, २० वाचा.) ही गोष्ट, पौलाने रोममधून इब्रीकरांना लिहिताना केलेल्या निरीक्षणाच्या सामंजस्यात आहे. त्याने म्हटले: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री ३:४) या तर्कावरून सूचित होते की एक सृष्टिकर्ता आहे, ज्याने संपूर्ण विश्व अस्तित्वात आणले आहे.
१४ म्हणूनच निर्जीव मूर्तींची उपासना करणाऱ्या कोणालाही—प्राचीन इस्राएल लोकांनासुद्धा—‘कसलीही सबब नाही’ असे पौलाने रोमकरांना लिहिताना म्हटले त्याला भक्कम आधार होता. ज्या स्त्री-पुरुषांनी आपल्या शरीरांचा नैसर्गिक उपभोग सोडून अनैतिक लैंगिक कृत्ये केली त्यांनाही कसलीच सबब नाही असे म्हणता येईल. (रोम. १:२२-२७) म्हणूनच, “यहूदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत,” असे जे पौलाने म्हटले ते उचित आहे.—रोम. ३:९.
‘साक्ष देणारा’
१५. सर्व लोकांजवळ काय आहे, आणि त्यामुळे ते काय करतात?
१५ आपण पापी आहोत आणि आपल्याला या बिकट स्थितीतून बाहेर पडण्याची गरज आहे हे लोकांनी का मान्य केले पाहिजे याचे आणखी एक कारण रोमकरांस पत्रात सांगितले आहे. देवाने प्राचीन इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्राविषयी पौलाने असे लिहिले: “नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल.” (रोम. २:१२) पौल पुढे तर्क करून म्हणतो, की ज्यांना नियमशास्त्राची माहिती नाही असे परराष्ट्रांतील लोक किंवा वांशिक समूह, “नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात.” हे लोक सर्वसाधारणपणे, जवळच्या नात्यातील व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणे, खून करणे, आणि चोरी करणे यांसारख्या गोष्टींचा अव्हेर का करतात? याचे कारण, त्यांच्याजवळ विवेक आहे असे पौलाने म्हटले.—रोमकर २:१४, १५ वाचा.
१६. एका व्यक्तीजवळ विवेक असला म्हणजे ती पाप करण्याचे टाळेल असा त्याचा अर्थ का होत नाही?
१६ पण, तुम्ही हे पाहिलेच असेल, की एका व्यक्तीजवळ आंतरिक साक्ष देणारा विवेक आहे याचा अर्थ, ती आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतेच असे नाही. हे प्राचीन इस्राएल लोकांच्या उदाहरणावरून दिसून येते. इस्राएल लोकांजवळ देवाकडून मिळालेला विवेक असला आणि चोरी व व्यभिचार न करण्याबद्दल त्यांना देवाकडून विशिष्ट नियम देण्यात आले असले, तरीही त्यांनी वारंवार आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाचे व यहोवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले. (रोम. २:२१-२३) देवाच्या स्तरांचे पालन व त्याची इच्छा पूर्ण करण्याच्या बाबतीत उणे पडल्यामुळे, ते दुप्पट दोषी ठरले आणि ते निश्चितच पापी होते. यामुळे निर्माणकर्त्यासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध मोठ्या प्रमाणात धोक्यात आला.—लेवी. १९:११; २०:१०; रोम. ३:२०.
१७. रोमकरांस पत्रातून आपल्याला कोणते प्रोत्साहन मिळते?
१७ रोमकरांस पत्रातून चर्चा केलेल्या गोष्टींवरून आपल्याला असे वाटू शकते की सर्वशक्तिमान देवासमोर मानवांना—ज्यात आपलादेखील समावेश होतो—कोणतीच आशा नाही. पण, पौलाने येथेच विषय संपवला नाही. त्याने स्तोत्र ३२:१, २ यातून दाविदाच्या शब्दांचा उल्लेख करून असे लिहिले: “ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाला हिशेबी प्रभु पाप लावीत नाही, तो धन्य.” (रोम. ४:७, ८) होय, देवाने आपल्या नीतिमान स्तरांचे उल्लंघन न करता पापांची क्षमा करण्याची व्यवस्था केली आहे.
येशूवर केंद्रित असलेली सुवार्ता
१८, १९. (क) पौलाने रोमकरांस लिहिलेले पत्र सुवार्तेच्या कोणत्या पैलूवर केंद्रित आहे? (ख) देवाच्या राज्याच्या अधीन मिळणारे आशीर्वाद अनुभवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
१८ “ही तर खरोखर सुवार्ता आहे!” असे कदाचित तुम्ही म्हणाल. होय, ही नक्कीच सुवार्ता आहे आणि ही सुवार्ता, पौलाने रोमकरांस पत्रात भर दिलेल्या सुवार्तेच्या पैलूकडे पुन्हा एकदा आपले लक्ष वेधते. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे, पौलाने लिहिले: ‘मला सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.’—रोम. १:१५, १६.
१९ ही सुवार्ता, देवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशू जी भूमिका बजावतो त्याच्यावर केंद्रित आहे. ‘सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवसाची’ पौल वाट पाहू शकत होता. (रोम. २:१६) असे म्हणण्याद्वारे, तो ‘ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्याला’ किंवा देव आपल्या राज्याद्वारे काय करेल याला कमी लेखत नव्हता. (इफिस. ५:५) तर, त्याने हे दाखवले की देवाच्या राज्यात राहण्यासाठी व त्या शासनाखाली मिळणाऱ्या आशीर्वादांचा आनंद अनुभवण्यासाठी (१) आपण देवाच्या दृष्टीत पापी आहोत हे मान्य केले पाहिजे आणि (२) आपल्या पापांची क्षमा मिळण्यासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे का गरजेचे आहे हे ओळखले पाहिजे. एक व्यक्ती जेव्हा देवाच्या उद्देशाशी संबंधित असलेल्या या गोष्टी समजून घेते आणि असे केल्याने तिला कोणते भवितव्य मिळणार आहे हे तिला समजते, तेव्हा ती उचितपणे असे म्हणू शकते, “होय, ही नक्कीच सुवार्ता आहे!”
२०, २१. सेवाकार्य करत असताना, रोमकरांस पत्रात भर दिलेल्या सुवार्तेवर आपण लक्ष का दिले पाहिजे, आणि याचा परिणाम काय होऊ शकतो?
२० आपले ख्रिस्ती सेवाकार्य करत असताना सुवार्तेच्या या पैलूकडे आपण नक्कीच लक्ष दिले पाहिजे. पौलाने येशूच्या संदर्भात यशयाचे शब्द उद्धृत केले. त्याने म्हटले: “त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीहि फजित होणार नाही.” (रोम. १०:११; यश. २८:१६) पापाविषयी बायबल काय म्हणते याची माहिती असलेल्यांना येशूविषयीचा मूलभूत संदेश कदाचित विचित्र वाटणार नाही. पण, इतरांना याविषयी काहीच माहीत नसल्यामुळे किंवा त्यांच्या संस्कृतीत या संदेशावर विश्वास केला जात नसल्यामुळे, हा संदेश त्यांच्याकरता अगदीच नवीन असेल. असे लोक जेव्हा देवावर विश्वास ठेवतात व शास्त्रवचनांवर भरवसा ठेवतात, तेव्हा आपल्याला त्यांना येशूच्या भूमिकेविषयी स्पष्ट करून सांगावे लागेल. सुवार्तेच्या या पैलूविषयी रोमकरांस पत्र यात काय सांगितले आहे त्याबद्दल आपण पुढील लेखात चर्चा करणार आहोत. त्या लेखाचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला सेवाकार्यात मदत होऊ शकते.
२१ रोमकरांस पत्रात वारंवार उल्लेख केलेल्या सुवार्तेबद्दल, म्हणजे ‘विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला जी तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे’ त्या सुवार्तेबद्दल प्रामाणिक मनाच्या लोकांना स्पष्ट करून सांगणे किती आनंददायक गोष्ट आहे! (रोम. १:१६) याच्या व्यतिरिक्त, “चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत!” असे रोमकर १०:१५ मध्ये पौलाने व्यक्त केलेल्या भावनांशी इतर जण सहमत होत असल्याचे पाहूनही आपल्याला आनंद होतो.—यश. ५२:७.
[तळटीप]
^ यासारखे वाक्यांश इतर देवप्रेरित पुस्तकांमध्येदेखील आढळतात.—मार्क १:१; प्रे. कृत्ये ५:४२; १ करिंथ. ९:१२; फिलिप्पै. १:२७.
तुम्हाला आठवते का?
• रोमकरांस पत्रात सुवार्तेच्या कोणत्या पैलूवर भर देण्यात आला आहे?
• आपण इतरांना कोणती गोष्ट समजण्यास मदत केली पाहिजे?
• ‘ख्रिस्ताच्या सुवार्तेमुळे’ कशा प्रकारे आपल्याला व इतरांना आशीर्वाद मिळू शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील संक्षिप्त आशय]
रोमकरांस पत्रात भर दिलेली सुवार्ता, देवाचा उद्देश पूर्ण करण्यातील येशूच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल आहे
[९ पानांवरील चित्र]
आपण सर्व जण एका प्राणघातक दोषासहित—पापासहित जन्मलेलो आहोत!