व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘जागृत राहणे’ इतके महत्त्वाचे का?

‘जागृत राहणे’ इतके महत्त्वाचे का?

‘जागृत राहणे’ इतके महत्त्वाचे का?

“आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” असा प्रश्‍न येशूच्या शिष्यांनी त्याला विचारला. (मत्त. २४:३) या प्रश्‍नाचे उत्तर देताना येशूने त्यांना सुस्पष्ट, तपशीलवार, ओळखण्याजोगे, आणि अचूक असे चिन्ह दिले. हे चिन्ह, मत्तय अध्याय २४, मार्क अध्याय १३ आणि लूक अध्याय २१ मध्ये नमूद करण्यात आले आहे. येशूने पुढे असेही म्हटले: “जागृत राहा.”—मत्त. २४:४२.

ते चिन्ह जर इतके सुस्पष्ट असणार होते, तर मग येशूने त्यांना ‘जागृत राहण्याचा’ सल्ला का दिला? याची दोन कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे, विकर्षणांमुळे काहींचे त्या चिन्हाकडे दुर्लक्ष होऊन, ते आपली आध्यात्मिकता गमावण्याची व बेसावध होण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे, येशूने सांगितलेल्या गोष्टी इतर ठिकाणी घडत असल्याचे एका ख्रिस्ती व्यक्‍तीला माहीत असेल, पण त्या गोष्टी तिच्या परिसरात घडत नसल्यामुळे, त्यांचा आपल्यावर काहीच परिणाम होऊ शकणार नाही असा कदाचित ती विचार करेल. त्यामुळे, मग ती असा तर्क करेल, की येशूच्या भविष्यवाणीत सांगितलेले “मोठे संकट” यायला अजून बराच अवकाश आहे; तेव्हा, आता ‘जागृत राहण्याची’ काही गरज नाही.—मत्त. २४:२१.

त्यांनी लक्ष दिले नाही

येशूने आपल्या अनुयायांना नोहाच्या दिवसांतील लोकांची आठवण करून दिली. नोहाचे प्रचार कार्य, तो बनवत असलेले अवाढव्य जहाज, आणि त्याच्या दिवसांतील हिंसाचार हे त्याच्या काळातील लोकांनी नक्कीच पाहिले असेल. पण तरीसुद्धा, अनेकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. (मत्त. २४:३७-३९) आज धोक्याचे इशारे दिले जातात तेव्हा लोक अशीच मनोवृत्ती दाखवतात. उदाहरणार्थ, रस्त्यांवर वाहनांची गती-मर्यादा दाखवणारे चिन्ह लोकांना दिसत असले, तरीसुद्धा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच, अधिकाऱ्‍यांना रस्त्यांवर गतिरोधक बसवावे लागतात. त्याच प्रकारे, एका ख्रिस्ती व्यक्‍तीला शेवटल्या दिवसांचे चिन्ह दिसत असेल, पण त्या चिन्हाचा आपल्या जीवनावर काहीच परिणाम होणार नाही असे समजून ती व्यक्‍ती आपल्या वैयक्‍तिक कार्यांमध्ये गुरफटून जाऊ शकते. पश्‍चिम आफ्रिकेत राहणाऱ्‍या ऑरीएल नावाच्या एका किशोरवयीन बहिणीच्या बाबतीत नेमके हेच घडले.

ऑरीएलला टीव्हीवर महिलांचा हँडबॉल खेळ पाहायला खूप आवडायचे. तिच्या शाळेत हँडबॉल खेळण्यासाठी एक संघ बनवण्यात आला, तेव्हा त्या संघात खेळण्याच्या स्वप्नापायी तिने संभाव्य आध्यात्मिक धोक्यांकडे दुर्लक्ष केले. संघात गोल-कीपर म्हणून खेळण्यास ती तयार झाली. पुढे काय झाले? ती म्हणते: “माझ्या संघातील काही मुलींची मादक पदार्थ व धुम्रपान करणाऱ्‍या मुलांशी मैत्री होती. मी त्यांच्यासारखी नसल्यामुळे ते माझी थट्टा करायचे. पण, मी ही परिस्थिती हाताळू शकेन असं मला वाटलं होतं. या खेळामुळे माझी आध्यात्मिकता ढासळू लागली. असं होईल याची मी कल्पनादेखील केली नव्हती. हा खेळ माझ्या नसानसात इतका भिनला होता, की ख्रिस्ती सभांमध्ये असताना माझं मन बरेचदा राज्य सभागृहातून खेळाच्या मैदानावर भरकटायचं. या खेळाचा माझ्या ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्वावरही परिणाम झाला. सुरुवातीला मला फक्‍त खेळायची आवड होती, पण आता जिंकण्याच्या जिद्दीनं मी पेटले होते. आणि त्यासाठी मी जीव तोडून सराव करू लागले. यामुळे माझ्या मनावरील ताण वाढला. इतकंच नव्हे, तर हँडबॉलच्या या खेळासाठी मी माझ्या मित्र-मैत्रिणींनाही सोडून दिलं.

“माझी आध्यात्मिकता किती ढासळली होती हे एका सामन्यादरम्यान विरुद्ध संघाला पेनाल्टी शॉट मिळाला त्या वेळी माझ्या लक्षात आलं. मी गोल वाचवण्यासाठी अगदी सज्ज होते. गोल वाचवण्यास यहोवानं मला मदत करावी म्हणून मी नकळतपणे त्याला प्रार्थना केली! या घटनेमुळे मला याची जाणीव झाली की माझ्या आध्यात्मिकतेवर खूप वाईट परिणाम झाला आहे. मग, मी माझी आध्यात्मिकता परत कशी मिळवू शकले?

“यंग पीपल आस्क—वॉट विल आय डू विथ माय लाईफ? * ही डीव्हीडी मी पाहिली होती. तरीसुद्धा, मी ती पुन्हा पाहण्याचं व त्यावर गांभीर्यानं विचार करण्याचं ठरवलं. कारण, माझी स्थितीदेखील त्या नाटकातील अँड्रे नावाच्या तरुणासारखीच होती. अँड्रेला एका वडिलांनी जो सल्ला दिला होता त्याकडे मी विशेष लक्ष दिलं. त्यांनी अँड्रेला फिलिप्पैकर ३:८ हे वचन वाचून त्यावर मनन करण्यास सांगितलं. मीही तेच केलं आणि संघातून बाहेर पडले.

“त्यामुळे खूप फरक पडला. माझ्यातील स्पर्धात्मक वृत्ती आणि माझ्या मनावरचा ताण नाहीसा झाला. मला अधिक आनंदी वाटू लागलं आणि मला माझ्या ख्रिस्ती मित्र-मैत्रिणींच्या अधिक जवळ असल्याचं वाटू लागलं. आध्यात्मिक गोष्टींना मी अधिक महत्त्व देऊ लागले. सभांमध्ये लक्ष एकाग्र करणं मला शक्य झालं आणि मला पुन्हा एकदा सभा आवडू लागल्या. सेवाकार्यात मी अधिक सहभाग घेऊ लागले. आता मी नियमितपणे सहायक पायनियर सेवा करते.”

येशूने दिलेल्या चिन्हाकडे, एखाद्या विकर्षणामुळे दुर्लक्ष होत असेल, तर ऑरीएलप्रमाणे ठोस पावले उचला. तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता. तुम्ही वॉच टॉवर पब्लिकेशन्स इंडेक्सचा उपयोग करू शकता, ज्याला गुप्त धन शोधण्याचा नकाशा असे म्हटले आहे. इंडेक्समध्ये तुम्हाला तुमच्या विशिष्ट समस्येवर उत्तम सल्ला देणाऱ्‍या लेखांचे व तुमच्यासारख्याच परिस्थितीत असलेल्यांच्या अनुभवांचे संदर्भ मिळतील. ख्रिस्ती सभांसाठी चांगली तयारी करण्याद्वारे व टिपण्या घेण्याद्वारे सभांचा पूर्ण लाभ घ्या. सभागृहात पुढे बसल्यामुळे खूप फायदा होतो हे काहींनी अनुभवले आहे. सभेत प्रश्‍नोत्तरांचा भाग हाताळला जातो, तेव्हा सुरुवातीलाच उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तसेच, आज जगात घडत असलेल्या घटनांची, येशूने सांगितलेल्या चिन्हाशी व ‘शेवटल्या काळाविषयीच्या’ इतर भविष्यवाण्यांशी तुलना करण्याद्वारे आध्यात्मिक रीत्या जागृत राहा.—२ तीम. ३:१-५; २ पेत्र ३:३, ४; प्रकटी. ६:१-८.

“सिद्ध असा”

शेवटल्या दिवसांचे चिन्ह आंतरराष्ट्रीय स्तरावर, म्हणजे “सर्व जगात” पाहायला मिळत आहे. (मत्त. २४:७, १४) लाखो लोक अशा भागांत राहतात जेथे मऱ्‍या, दुष्काळ, भूकंप, आणि भविष्यवाणीत सांगितलेल्या इतर घटना घडत आहेत. पण, याच्या अगदी उलट, इतर अनेक जण शांतीपूर्ण जीवन जगत आहेत. येशूने दिलेल्या चिन्हाचे काही पैलू तुम्ही व्यक्‍तिशः कधीच अनुभवले नसेल, तर मोठे संकट यायला अजून बराच काळ आहे असा तर्क तुम्ही करावा का? असे करणे मुळीच सुज्ञपणाचे ठरणार नाही.

उदाहरणार्थ, येशूने ‘मऱ्‍या व दुष्काळ’ यांच्याविषयी काय भाकीत केले त्याचा विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे, या घटना सगळीकडे एकाच वेळी किंवा एकाच प्रमाणात घडतील असे त्याने म्हटले नाही. तर, त्या घटना “निरनिराळ्या ठिकाणी” घडतील असे त्याने म्हटले. (लूक २१:११, पं.र.भा.) तेव्हा, सर्वत्र एकाच वेळी एकसारख्याच घटना घडण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, दुष्काळांचा उल्लेख केल्यावर, येशूने सूचित केले की त्याच्या काही अनुयायांना अधाशीपणापासून सावध राहावे लागेल. त्याने म्हटले: ‘तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणामुळे तुमची अंतःकरणे भारावून जातील.’ (लूक २१:३४) त्यामुळे, सर्व ख्रिश्‍चनांनी चिन्हाचा प्रत्येक पैलू अनुभवण्याची अपेक्षा करू नये. येशूने म्हटले: “ह्‍या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.” (लूक २१:३१) आपण राहतो त्या भागात आपण चिन्हाचे सर्व पैलू अनुभवत नसलो, तरी आधुनिक प्रसार माध्यमांद्वारे आपण ते नक्कीच पाहू शकतो.

शिवाय, लक्षात असू द्या, की यहोवाने मोठ्या संकटाचा ‘दिवस व घटका’ आधीच ठरवून ठेवली आहे. (मत्त. २४:३६) आणि पृथ्वीवर घडणाऱ्‍या घटनांमुळे ती तारीख बदलणार नाही.

येशूने जगभरातील सर्व ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: ‘तुम्ही सिद्ध असा.’ (मत्त. २४:४४) होय, आपण नेहमी सिद्ध किंवा तयार असले पाहिजे. अर्थात, आपण दररोज, दिवसभर ईश्‍वरशासित कार्ये करू शकत नाही. शिवाय, मोठे संकट येईल तेव्हा आपण काय करत असू हे आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही. काही जण शेतात काम करत असतील किंवा घरातील कामे करत असतील. (मत्त. २४:४०, ४१) तर मग, सिद्ध किंवा तयार राहण्यासाठी आपण काय करू शकतो?

एम्मानवेल व त्यांची पत्नी विक्टोरीन आणि त्यांच्या सहा मुली आफ्रिकेतील अशा एका भागात राहतात, जेथे येशूने सांगितलेल्या चिन्हातील सर्व गोष्टी ते अनुभवत नाहीत. पण, येशूने सांगितल्याप्रमाणे नेहमी तयार राहण्यासाठी त्यांनी दररोज आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्याचे ठरवले. एम्मानवेल म्हणतात: “घरातील सर्वांकरता सोईस्कर असेल अशी वेळ ठरवणे कठीण होते. शेवटी आम्ही सकाळी सहा ते साडेसहादरम्यानची वेळ निश्‍चित केली. दैनिक वचनावर चर्चा केल्यावर, त्या आठवड्यात मंडळीत ज्या प्रकाशनाचा अभ्यास केला जाणार आहे त्यातील काही परिच्छेदांची आम्ही तयारी करतो.” यामुळे त्यांना जागृत राहण्यास मदत मिळाली आहे का? नक्कीच! एम्मानवेल मंडळीच्या वडील वर्गाचे संयोजक या नात्याने सेवा करतात. विक्टोरीन वारंवार सहायक पायनियर सेवा करते व तिने अनेकांना सत्य स्वीकारण्यास मदत केली आहे. आणि त्यांच्या सर्व मुली आध्यात्मिक रीत्या चांगली प्रगती करत आहेत.

येशू आपल्याला असा सल्ला देतो: “सावध असा, जागृत राहा.” (मार्क १३:३३) कोणत्याही विकर्षणामुळे आध्यात्मिक रीत्या बेसावध होऊ नका. त्याऐवजी, ऑरीएलने केले त्याप्रमाणे आपल्या प्रकाशनांमध्ये व ख्रिस्ती सभांमध्ये दिल्या जाणाऱ्‍या उत्तम सल्ल्याकडे बारकाईने लक्ष द्या. एम्मानवेल यांच्या कुटुंबाप्रमाणे, सिद्ध व ‘जागृत राहण्यास’ दररोज आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी थोडा वेळ काढा.

[तळटीप]

^ यहोवाच्या दृष्टीने योग्य ते करण्यासाठी एक ख्रिस्ती तरुण कशा प्रकारे संघर्ष करतो त्याविषयी एक आधुनिक नाटक.

[४ पानांवरील चित्र]

दररोज आध्यात्मिक गोष्टींची चर्चा केल्यामुळे एम्मानवेलला आणि त्यांच्या कुटुंबाला ‘सिद्ध राहण्यास’ मदत मिळते