“मी आत्ता अधू आहे, पण नेहमीसाठीच अशी राहणार नाही!”
“मी आत्ता अधू आहे, पण नेहमीसाठीच अशी राहणार नाही!”
सारा वॉन डर मॉण्ड यांच्याद्वारे कथित
लोक मला नेहमी म्हणतात, “सारा तू किती गोड हसतेस. तू नेहमीच कशी आनंदी असते?” मी त्यांना सांगते, की मला एक खास आशा आहे. ती आशा ही आहे, की “मी आत्ता अधू आहे, पण नेहमीसाठीच अशी राहणार नाही!”
पॅरिस, फ्रान्स येथे १९७४ साली माझा जन्म झाला. माझा जन्म होताना माझ्या आईला खूप त्रास झाला होता. नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं, की मला सेरेब्रल पॅलसी आहे. मला माझ्या हाता-पायांची हालचाल फार कमी करता येत होती. शिवाय माझं बोलणंही अस्पष्ट होतं, लोकांना पटकन कळायचं नाही. यानंतर मला फेपरे येत असत आणि अशक्तपणामुळे सहज रोगांची लागण होण्याचा धोका होता.
मी दोन वर्षांची असताना, आमचं कुटुंब ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं राहायला गेलं. दोन वर्षांनंतर पप्पा, मला आणि आईला सोडून गेले. त्या वेळेला पहिल्यांदा मला देवाच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटलं. आई यहोवाची साक्षीदार होती. ती नेहमी मला ख्रिस्ती सभांना घेऊन जायची. तिथंच मी शिकले, की देवाचं माझ्यावर प्रेम आहे आणि त्याला माझी काळजी आहे. पप्पा आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्ही एकट्याच पडलो. पण ख्रिस्ती सभांमध्ये मी शिकत असलेल्या गोष्टींमुळे तसंच आईची प्रेमळ काळजी व धीर यांमुळे मला सुरक्षित वाटलं.
आईनं मला यहोवाला प्रार्थना कशी करायची तेही शिकवलं. खरंतर बोलण्यापेक्षा मला प्रार्थना करणंच जास्त सोपं वाटतं. प्रार्थनेत मला शब्द उच्चारावे लागत नाहीत. माझ्या मनात तयार झालेले शब्द मी स्पष्टपणे “ऐकू” शकते. मला स्पष्ट बोलता येत नाही. पण प्रार्थनेत मी जेव्हा मनातल्या मनात किंवा अडखळत बोलत असले, तरी मला काय म्हणायचं आहे ते यहोवाला कळतं, ही जाणीव मला खूप दिलासादायक वाटते.—स्तो. ६५:२.
समस्या माझ्या सोबती
मी पाच वर्षांची झाले तेव्हा मला चालणंही अशक्य झालं. चालण्याकरता मला कॅलिपर स्प्लींट्सचा आधार घ्यावा लागला. चालताना माझे पाय स्थिर नसायचे. आणि ११ वर्षांची होईपर्यंत तर माझं चालणंही बंद झालं. नंतर नंतर तर मला स्वतःहून बिछान्यातून खाली उतरताही येत नव्हतं. त्यासाठी मला विजेवर चालणाऱ्या एका यंत्राच्या आधारे माझ्या व्हिलचेअरवर बसावं लागायचं. हे यंत्र मी एका बटणानं वर-खाली करू शकते.
माझ्या या अवस्थेमुळे पुष्कळदा मी निराश झाले आहे. पण नंतर मला, आम्ही कुटुंब मिळून जे ब्रीदवाक्य ठरवलं आहे, ते आठवतं: “जे करता येत नाही त्याची चिंता करायची नाही. जे करता येतं ते करत राहायचं.” हे ब्रीदवाक्य मी माझ्या मनात कोरून घेतलं आहे. त्यामुळेच मी, घोडदौड, नौकाविहार करणं, होडीतून जलविहार करणं, सुट्टी तंबूत घालवणं, एवढंच नव्हे तर सार्वजनिक वाहतूक नसलेल्या रस्त्यावर कार चालवणं यांसारख्या गोष्टी करू शकते. मी एक कलाकारदेखील आहे त्यामुळे मला चित्रकाम, शिवणकाम, रझई बनवायला, एमब्रॉयडरी व मातीची शिल्पं करायलासुद्धा आवडतं.
मी अनेक बाबतीत दुर्बळ असल्यामुळे, काही लोकांना वाटलं, की देवाची उपासना करण्याचा निर्णय मला घेता येणार नाही. मी १८ वर्षांची होते तेव्हा माझी एक शाळा शिक्षिका, मी घर सोडावं म्हणून माझ्या मागंच लागली. तू घरातून निघालीस की आपोआप तुझ्या आईच्या धर्मापासूनही दूर होशील, असं तिला म्हणायचं होतं. ती तर माझ्या राहण्याची व्यवस्थासुद्धा करायला तयार होती. पण मी तिला सांगितलं, की मी माझा विश्वास कधीही सोडणार नाही आणि मी जेव्हा एकटीच्या बळावर राहण्यास सक्षम होईन तेव्हाच घर सोडेन.
या घटनेनंतर काही काळातच मी यहोवाची साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. दोन वर्षांनंतर मी एका लहानशा अपार्टमेंटमध्ये राहायला गेले. इथं मी आनंदी आहे कारण इथं मला हवी असलेली मदत मिळते आणि स्वातंत्र्यही मिळतं.
अनपेक्षित मागणी
माझ्या जीवनात असेही अनेक प्रसंग आले ज्यात, यहोवाबरोबरच्या माझ्या नातेसंबंधाची परीक्षा झाली. एकदा, माझ्यासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं मला लग्नाची मागणी घातली. तोही माझ्यासारखाच अधू होता. माझ्यासारख्या मुलीबरोबर कोणी लग्न करण्यास तयार होईल, या विचारानंच मी भारावून गेले. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही जीवनात एक जोडीदार हवा होता. पण आम्ही दोघंही अधू असल्यामुळं, आमचा विवाह आनंदी होईलच याची शाश्वती नव्हती. शिवाय, तो यहोवाचा साक्षीदार नव्हता. त्याचे धार्मिक विश्वास, त्याची कार्यं, त्याची ध्येयं माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. मग आमचं कसं काय चाललं असतं? मी तर, फक्त यहोवाचा साक्षीदार असलेल्या व्यक्तीबरोबरच लग्न करण्यासंबंधी असलेल्या देवाच्या स्पष्ट आज्ञेचं पालन करण्याचं ठरवलं होतं. (१ करिंथ. ७:३९) त्यामुळे मग मी या तरुणाला, सर्व गोष्टी समजावून सांगितल्या व लग्नाच्या मागणीला नकार दिला.
मी केलेली निवड अगदी योग्य होती, याचा मला आजही आनंद वाटतो. आणि देवानं वचन दिलेल्या नवीन जगातही मी आनंदी असेन याची मला पूर्ण खात्री आहे. (स्तो. १४५:१६; २ पेत्र ३:१३) तोपर्यंत, मला यहोवाशी एकनिष्ठ राहायचं आहे व आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायचं आहे.
मी त्या दिवसाची अगदी आतुरतेनं वाटत पाहत आहे जेव्हा मी वाऱ्याच्या वेगानं धावू शकेन. तेव्हा मी आनंदानं म्हणेन, “मी अधू होते, पण आत्ता निरोगी बनले आहे—तेही कायमची!”