व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा आदर करतात

खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा आदर करतात

खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचा आदर करतात

“तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहा. १७:१७.

हे मुद्दे शोधण्याचा प्रयत्न करा:

इ.स. ४९ मध्ये जेरूसलेममध्ये भरलेली सभा, नंतरच्या काळातील चर्चच्या धर्मसभांपेक्षा वेगळी कशी होती?

मध्ययुगात ज्यांनी देवाच्या वचनाचे समर्थन केले अशांची काही नावे सांगा?

सन १८०० च्या अखेरच्या काळातील विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी कोणत्या पद्धतीने बायबलचा अभ्यास केला आणि ती पद्धत परिणामकराक का ठरली?

१. यहोवाचे साक्षीदार इतर धार्मिक गटांपेक्षा वेगळे का आहेत याचे एक महत्त्वपूर्ण कारण आपल्या वैयक्‍तिक अनुभवावरून सांगा.

 तुम्ही पहिल्यांदा यहोवाच्या साक्षीदारांसोबत केलेल्या अर्थपूर्ण चर्चेचा विचार करा. त्या चर्चेबद्दल तुम्हाला काय आठवते? पुष्कळ लोक असे उत्तर देतील, की ‘साक्षीदारांनी माझ्या प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर बायबलमधून दिलं ही गोष्ट मला विशेष आवडली.’ पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश काय आहे, आपण मरतो तेव्हा आपले काय होते आणि आपल्या मृत प्रिय जनांसाठी भविष्यात कोणती आशा आहे या गोष्टी कळल्यामुळे आपण किती आनंदी झालो होतो!

२. कोणत्या काही कारणांमुळे तुम्ही बायबलची कदर करू लागला?

परंतु, आपण जसजसे अभ्यास करत गेलो, तसतशी आपल्याला याची जाणीव झाली की बायबल केवळ जीवन, मरण आणि भविष्य यांबद्दल असलेल्या आपल्या प्रश्‍नांची उत्तरेच देत नाही, तर आणखी बरेच काही शिकवते. आपल्याला याचीही जाणीव झाली की बायबल हे जगातील सगळ्यात व्यवहारोपयोगी पुस्तक आहे; त्यातील सल्ला सर्वकाळाला लागू होणारा आहे आणि जे या सल्ल्याचे काळजीपूर्वक पालन करतात ते यशस्वी व आनंदी जीवन जगतात. (स्तोत्र १:१-३ वाचा.) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी नेहमीच बायबलला ‘माणसांचे वचन म्हणून नव्हे तर देवाचे वचन म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे.’ (१ थेस्सलनी. २:१३) जे मनापासून देवाच्या वचनाचा आदर करतात व जे तसे करत नाहीत यांच्यात किती फरक आहे यावर एक संक्षिप्त ऐतिहासिक उजळणी प्रकाश टाकेल.

कठीण वादविषय सोडवण्यात येतो

३. कोणत्या वादविषयामुळे पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीची एकता धोक्यात आली, आणि हा वादविषय सोडवणे इतके कठीण का होते?

सुंता न झालेला पहिला विदेशी कर्नेल्य याला अभिषिक्‍त करण्यात आले त्यानंतरच्या १३ वर्षांदरम्यान ख्रिस्ती मंडळीच्या एकतेला धोका पोहचवणारा एक वादविषय निर्माण झाला. अधिकाधिक विदेशी लोक ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारत होते. प्रश्‍न असा होता, की बाप्तिस्मा घेण्याआधी विदेशी पुरुषांची यहुदी रूढीप्रमाणे सुंता झाली पाहिजे का? या प्रश्‍नाचे उत्तर देणे कोणाही यहुद्याला सोपे नव्हते. नियमशास्त्राचे पालन करणारे यहुदी लोक विदेशी लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे तर दूर, त्यांच्या घरांत पाऊलसुद्धा ठेवत नव्हते. यहुदी ख्रिश्‍चनांनी आपला पूर्वीचा धर्म त्यागल्यामुळे त्यांचा आधीच क्रूर छळ केला जात होता. आणि अशा परिस्थितीत जर यहुदी ख्रिश्‍चनांनी सुंता न झालेल्या विदेशी लोकांना आपल्यात सामावून घेतले असते, तर यहुदी धर्म पाळणाऱ्‍या लोकांतील व यहुदी ख्रिश्‍चनांतील दरी आणखी वाढत गेली असती व यामुळे यहुदी ख्रिश्‍चनांचा अधिकच छळ झाला असता.—गलती. २:११-१४.

४. सुंतेसंबंधीचा वादविषय सोडवण्यास कोणाची मदत घेण्यात आली आणि या संदर्भात, पाहणाऱ्‍या लोकांच्या मनात कोणते प्रश्‍न निर्माण झाले असतील?

इ.स. ४९ मध्ये जेरूसलेममधील प्रेषित व वडीलवर्गाचे सदस्य, जे स्वतः सुंता झालेले यहुदी होते ते “ह्‍या प्रकरणाचा विचार करावयास” जमले. (प्रे. कृत्ये १५:६) या सभेत, धर्मशास्त्राशी संबंधित क्षुल्लक बाबींवर रटाळ वादविवाद करण्यात आला नाही, तर बायबलच्या शिकवणीवर अर्थपूर्ण चर्चा करण्यात आली. सदर विषयावर दोन्ही बाजूंनी ठाम मते मांडण्यात आली. वैयक्‍तिक मतांच्या किंवा पूर्वग्रहाच्या आधारावर निर्णय घेतला जाणार होता का? इस्राएलातील धार्मिक वातावरण सुधारेपर्यंत हे जबाबदार वडीलजन या विषयावरील निर्णय लांबणीवर टाकणार होते का? की एक अंतिम निर्णय घेता यावा म्हणून ते सर्व जण आपल्या विश्‍वासाशी तडजोड करून कोणत्या तरी एका गोष्टीला आपली सहमती दर्शवणार होते?

५. कोणत्या महत्त्वपूर्ण मार्गांनी, इ.स. ४९ साली जेरूसलेममध्ये झालेली सभा, नंतरच्या शतकांत झालेल्या चर्चच्या धर्मसभांपेक्षा वेगळी होती?

आज चर्चच्या धर्मसभांमध्ये तडजोड करणे व इतरांची मने आपल्या बाजूने वळवणे सर्वसामान्य गोष्ट आहे. पण, जेरूसलेममध्ये झालेल्या त्या सभेत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही किंवा मते मिळवण्यासाठी कोणाचीही मने वळवण्यात आली नाहीत. उलट, एकमताने निर्णय घेण्यात आला. हे कसे शक्य झाले? या सभेत असलेला प्रत्येक सदस्य स्वतःच्या दृष्टिकोनावर ठाम असला, तरी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना देवाच्या वचनाबद्दल आदर होता, आणि याच पवित्र लिखाणांत सदर वादविषयावरील उपाय दडला होता.—स्तोत्र ११९:९७-१०१ वाचा.

६, ७. सुंतेविषयी निर्माण झालेला वादविषय मिटवण्यासाठी शास्त्रवचनांचा कशा प्रकारे उपयोग करण्यात आला?

बायबलमधील आमोस ९:११, १२ मध्ये असलेल्या उताऱ्‍याने प्रेषितांना व वडीलवर्गाला हे प्रकरण मिटवण्यास मदत केली. हा उतारा प्रेषितांची कृत्ये १५:१६, १७ मध्ये उद्धृत आहे. तेथे म्हटले आहे: “ह्‍यानंतर मी परत येईन, व दावीदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन; ह्‍यासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा.”

पण, कोणी कदाचित असे म्हणेल, ‘विदेशी पुरुषांना सुंता करायची गरज नाही असं या वचनात कुठं म्हटलं आहे?’ होय, कबूल आहे, पण तरीसुद्धा यहुदी ख्रिश्‍चनांना मुद्दा समजला असावा. तो कसा? यहुदी ख्रिश्‍चन, सुंता झालेल्या विदेशी पुरुषांना परराष्ट्रीय नव्हे, तर आपले बांधव मानायचे. (निर्ग. १२:४८, ४९) उदाहरणार्थ, बॅगस्टरच्या सेप्टुआजिंट आवृत्तीनुसार, एस्तेर ८:१७ मध्ये असे लिहिले आहे: “अनेक विदेशी पुरुषांची सुंता करण्यात आली आणि ते यहुदी बनले.” त्यामुळे, इस्राएलाच्या घराण्यातील ‘शेष राहिलेली माणसे’ (यहुदी व सुंता झालेले यहुदी मतानुसारी) व ‘राष्ट्रांतील’ लोक (सुंता न झालेले विदेशी) हे सर्व देवाच्या नावासाठी एक लोक होतील असे जे शास्त्रवचनांत म्हटले होते त्यावरून मुद्दा स्पष्ट झाला. तो म्हणजे, ख्रिस्ती बनू इच्छिणाऱ्‍या विदेशी पुरुषांना सुंता करायची गरज नव्हती.

८. सुंतेविषयी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी धैर्याची गरज का होती?

देवाच्या वचनाने व त्याच्या आत्म्याने पहिल्या शतकातील प्रामाणिक ख्रिश्‍चनांना ‘एकमताने’ निर्णय घेण्यास मदत केली. (प्रे. कृत्ये १५:२५) या निर्णयामुळे यहुदी ख्रिश्‍चनांचा अधिकच छळ होण्याची शक्यता असली, तरी बायबलच्या आधारावर घेतलेल्या या निर्णयाला विश्‍वासू जनांनी पूर्ण पाठिंबा दिला.—प्रे. कृत्ये १६:४, ५.

एक ढळढळीत फरक

९. कोणत्या एका महत्त्वाच्या कारणामुळे खरी उपासना दुषित झाली, आणि त्यामुळे कोणती शिकवण पुढे आली?

प्रेषित पौलाने आधीच भाकीत केले होते की प्रेषितांच्या मृत्यूनंतर, ख्रिस्ती विश्‍वास खोट्या शिकवणींमुळे दुषित होईल. (२ थेस्सलनीकाकर २:३,  वाचा.) “सुशिक्षण” ऐकून न घेणाऱ्‍या लोकांमध्ये असेही काही जण होते जे जबाबदार पदांवर होते. (२ तीम. ४:३) पौलाने त्याच्या दिवसांतील वडिलांना असा इशारा दिला: “तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रे. कृत्ये २०:३०) कोणत्या एका महत्त्वाच्या कारणामुळे खरी उपासना दुषित झाली याचे वर्णन द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका करते: “ग्रीक तत्त्वज्ञानाचे थोडेफार प्रशिक्षण मिळालेल्या ख्रिश्‍चनांना आपले बौद्धिक समाधान करण्यासाठी व सुशिक्षित मूर्तिपूजक लोकांचे धर्मांतर करण्यासाठी त्या तत्त्वज्ञानानुसार आपला विश्‍वास व्यक्‍त करण्याची गरज भासू लागली.” अशाच प्रकारे बायबलच्या एका महत्त्वपूर्ण शिकवणीला मूर्तिपूजक स्वरूप देण्यात आले. ती शिकवण येशू ख्रिस्ताच्या ओळखीसंबंधी होती. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असे बायबल शिकवते; पण ग्रीक तत्त्वज्ञानावर प्रेम करणाऱ्‍या लोकांनी असे शिकवले की तोच देव आहे.

१०. ख्रिस्ताच्या ओळखीसंबंधी निर्माण झालेला वादविषय कसा मिटू शकला असता?

१० येशू ख्रिस्ताच्या ओळखीसंबंधी चर्चच्या बऱ्‍याच धर्मसभांमध्ये चर्चा करण्यात आली. त्या सभांमध्ये उपस्थित राहिलेल्या प्रतिनिधींनी शास्त्रवचनांना उचित महत्त्व दिले असते, तर हा विषय सहज मिटू शकला असता. पण, बहुतेकांनी तसे केले नाही. उलट, बहुतेक प्रतिनिधींनी सभेला येण्याआधीच आपआपली मते बनवली होती आणि सभा संपल्यानंतर तर ते आपआपल्या मतांवर अधिकच अडून राहिले. या सभांमध्ये जे धर्मनियम व जाहीरनामे बनवण्यात आले त्यांत शास्त्रवचनांचा उल्लेखही आढळत नाही.

११. तथाकथित चर्च फादर्सच्या अधिकाराला कोणते महत्त्व देण्यात आले, आणि का?

११ या धर्मसभांमध्ये शास्त्रवचनांचे पूर्णपणे परीक्षण का करण्यात आले नाही? याचे उत्तर चार्ल्स फ्रीमन या विद्वानाने दिले. त्यांनी म्हटले की आपण देवापेक्षा कनिष्ठ आहोत असे जे येशूने अनेकदा सुचवले होते ते खोडून काढणे, येशूला देव मानणाऱ्‍यांना मुश्‍कील वाटले. परिणामस्वरूप, शुभवर्तमानांची जागा चर्चच्या परंपरांनी आणि नंतर आलेल्या धर्मगुरूंच्या मतांनी घेतली. आजपर्यंत, अनेक पाळक तथाकथित चर्च फादर्सच्या देवप्रेरित नसलेल्या शिकवणींना देवाच्या वचनापेक्षा जास्त महत्त्व देतात! तुम्ही जर कधी, पाळक बनण्याचे शिक्षण घेतलेल्या एखाद्या व्यक्‍तीसोबत त्रैक्याच्या शिकवणीवर चर्चा केली असेल, तर ही गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल.

१२. रोमी सम्राटाने कोणता नकारात्मक प्रभाव पाडला?

१२ या धर्मसभांमध्ये होणाऱ्‍या चर्चांसंबंधी विचारात घेण्याजोगी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांत रोमी सम्राटांनी केलेला हस्तक्षेप. या संदर्भात, प्राध्यापक रिचर्ड इ. रूबनस्टाईन यांनी नायसियाच्या धर्मसभेबद्दल असे लिहिले: “कॉन्स्टंटीनने [बिशपांच्या] कल्पनेपलीकडे त्यांच्यावर मेहेरबानी केली होती व त्यांना संपन्‍न केले होते. एका वर्षाच्या आत या नवीन सम्राटाने त्यांची सर्व चर्चेस त्यांना परत केली किंवा उद्‌ध्वस्त केलेल्या जवळजवळ सर्व चर्चेसची पुनर्बांधणी केली, त्यांची कामे त्यांना परत केली व त्यांना पुन्हा सन्मानित केले . . . पूर्वी मूर्तिपूजक धर्मगुरूंना दिले जाणारे विशेषाधिकार त्याने आता ख्रिस्ती पाळकांना दिले.” परिणामस्वरूप, “नायसियाच्या धर्मसभेतील घटनांना वळण देण्यात त्याने निर्णायक भूमिका बजावली, इतकेच नव्हे तर सभेची सर्व सूत्रेही कदाचित त्याने आपल्या हातात घेतली.” याला दुजोरा देत चार्ल्स फ्रीमन यांनी म्हटले: “या गोष्टीमुळे, सम्राट आता केवळ चर्चला बळकट करण्यासच नव्हे, तर बायबलच्या शिकवणींवर प्रभाव पाडण्यासही हस्तक्षेप करू शकतो हा शिरस्ता पडला.”—याकोब ४:४ वाचा.

१३. तुमच्या मते, बायबलच्या स्पष्ट शिकवणींकडे दुर्लक्ष करण्यास कोणत्या गोष्टींनी नंतरच्या काळातील चर्चच्या धर्मगुरूंना प्रभावित केले?

१३ चर्चच्या मुख्य धर्माधिकाऱ्‍यांना येशूची अचूक ओळख ठरवणे कठीण वाटत होते; पण दुसरीकडे पाहता सामान्य लोकांपैकी अनेकांना ते मुळीच कठीण वाटले नाही. सम्राटाकडून मिळणाऱ्‍या पैशाने आपले खिसे भरण्यात किंवा चर्चमध्ये अधिकारपद मिळवण्यात त्यांना आस्था नव्हती. त्यामुळे शास्त्रवचने विचारात घेऊन ते सर्व बाबींकडे वास्तविक दृष्टिकोनातून पाहू शकले. त्या काळातील एक ख्रिस्ती धर्मशास्त्रवेत्ता, नायसाचा ग्रेगरी याने या सामान्य लोकांची निंदा करत असे म्हटले: “कपड्यांचे व्यापारी, पैशांची अदलाबदल करणारे, किराणा माल विकणारे हे सर्व धर्मशास्त्रवेत्ते आहेत. तुम्ही तुमच्या पैशांची किंमत विचारली, तर पुत्र कोणत्या अर्थाने पित्यापेक्षा वेगळा आहे हे एखादा तत्त्वज्ञानी तुम्हाला समजावतो. तुम्ही ब्रेडची किंमत विचारली, तर पिता पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे असे उत्तर तुम्हाला मिळते. अंघोळीचे पाणी गरम झाले की नाही असे विचारले, तर पुत्राला अस्तित्वात नसलेल्या गोष्टीतून उत्पन्‍न करण्यात आले होते अशी घोषणा तुम्हाला ऐकायला मिळते.” होय, चर्चमध्ये निरनिराळी पदे भूषवणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांच्या अगदी विपरीत सामान्य लोक देवाच्या वचनाचा उपयोग करून आपली मते मांडायचे. ग्रेगरीने व त्याच्या सहकाऱ्‍यांनी या सामान्य लोकांचे ऐकले असते तर किती बरे झाले असते!

“गहू” आणि “निदण” एकत्र वाढतात

१४. पहिल्या शतकापासून पुढे पृथ्वीवर नेहमीच काही खरे अभिषिक्‍त ख्रिस्ती असले असतील असा निष्कर्ष आपण का काढू शकतो?

१४ येशूने एका दाखल्यात हे सूचित केले की पहिल्या शतकापासून पुढे पृथ्वीवर नेहमीच काही खरे अभिषिक्‍त ख्रिस्ती असतील. त्याने त्यांची तुलना ‘निदणामध्ये’ वाढणाऱ्‍या ‘गव्हाशी’ केली. (मत्त. १३:३०) अर्थात, कोणत्या व्यक्‍ती किंवा गट अभिषिक्‍त गहू वर्गामध्ये असतील हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही; पण, ज्यांनी धैर्याने देवाच्या वचनाचे समर्थन केले व चर्चच्या खोट्या शिकवणी उघड केल्या असे काही लोक नेहमीच हयात होते हे आपण निश्‍चितपणे सांगू शकतो. अशांची काही उदाहरणे आता आपण पाहू या.

१५, १६. ज्यांनी देवाच्या वचनाचा आदर केला अशांची काही नावे सांगा.

१५ फ्रान्समधील लियोन्सच्या ॲगोबार्ड नावाच्या आर्चबिशपने (इ.स. ७७९-८४०) मूर्तिपूजा, संतांना समर्पित केलेली चर्चेस, आणि चर्चचे अशास्त्रीय धार्मिक विधी व प्रथा यांच्याविरुद्ध आवाज उठवला. त्याच्याच काळातील क्लॉडियस नावाच्या बिशपनेसुद्धा चर्चच्या परंपरा नाकारल्या, तसेच संतांना केल्या जाणाऱ्‍या प्रार्थना व पवित्र वस्तूंची उपासना यांच्यावर आक्षेप घेतला. ११ व्या शतकात, फ्रान्समधील टूअर्सच्या बेरन्गॅरीयस नावाच्या आर्चडीकनने ट्रानसबस्टॅन्शीएशन (भाकर आणि द्राक्षरस यांचे चमत्कारिक रीत्या ख्रिस्ताचे शरीर आणि रक्‍त यांत होणारे रूपांतर) या कॅथलिक शिकवणीला नाकारल्यामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्याचे असेही मत होते, की बायबल हे चर्चच्या परंपरेपेक्षा श्रेष्ठ आहे.

१६ बाराव्या शतकात, बायबल सत्यावर प्रेम करणारे आणखी दोघे जण होते; ब्रवीचा पिटर आणि लाउसानचा हेन्री. लहान मुलांचा बाप्तिस्मा, ट्रानसबस्टॅन्शीएशन, मृतांसाठी केल्या जाणाऱ्‍या प्रार्थना, आणि क्रुसाची उपासना या कॅथलिक शिकवणींना बायबलमध्ये काहीच आधार नसल्यामुळे पिटरने आपले पाळकपद सोडून दिले. यासाठी सन ११४० मध्ये पिटरला आपले जीवन गमवावे लागले. हेन्री जो एक मठवासी होता त्याने चर्चमधील भ्रष्ट कार्यांविरुद्ध व चर्चच्या अशास्त्रीय धार्मिक विधींविरुद्ध आवाज उठवला. त्याबद्दल त्याला सन ११४८ मध्ये अटक करण्यात आली आणि त्याला आपले उरलेले जीवन तुरुंगात घालवावे लागले.

१७. वॅल्डो व त्याच्या अनुयायांनी कोणती महत्त्वाची पावले उचलली?

१७ चर्चची टीका केल्यामुळे ब्रवीचा पिटर याला जिवंत जाळण्यात आले त्याच काळात एका व्यक्‍तीचा जन्म झाला. ही व्यक्‍ती पुढे बायबल सत्याचा प्रसार करण्यात जबरदस्त प्रभाव पाडणार होती. त्या व्यक्‍तीचे आडनाव वॅल्डेस किंवा वॅल्डो होते. * वॅल्डो हा ब्रवीचा पिटर व लाउसानचा हेन्री यांच्यासारखा पाळक किंवा मठवासी नव्हता. तो एक साधासुधा गृहस्थ होता. पण, त्याला देवाच्या वचनाची इतकी कदर होती की त्याने आपली सर्व मालमत्ता विकली आणि फ्रान्सच्या दक्षिणपूर्व भागात सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्‍या भाषेत बायबलच्या काही भागांचे भाषांतर करण्याची व्यवस्था केली. काही जण, आपल्या स्वतःच्या भाषेत बायबलचा संदेश ऐकून इतके भारावून गेले की त्यांनीसुद्धा आपले सर्वकाही त्यागले व इतरांना बायबलचे सत्य सांगण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. या गोष्टीमुळे, चर्च खूप अस्वस्थ झाले. सन ११८४ मध्ये, या आवेशी स्त्री-पुरुषांना ज्यांना कालांतराने वॅल्डेनसेस म्हणून ओळखण्यात आले त्यांना पोपने बहिष्कृत केले, आणि बिशपने त्यांना हद्दपार केले. पण यामुळे खरेतर, बायबलचा संदेश इतर भागांत पसरला. कालांतराने युरोपच्या अनेक भागांत वॅल्डो, ब्रवीचा पिटर व लाउसानचा हेन्री यांचे अनुयायी, तसेच चर्चच्या पारंपरिक मताचा विरोध करणाऱ्‍या इतरांचे अनुयायी दिसू लागले. बायबल सत्याचे समर्थन करणारे इतर काही जण नंतरच्या शतकांत उदयास आले. त्यांच्यापैकी काही जॉन विक्लिफ (सुमारे १३३०-१३८४), विल्यम टिंडेल (सुमारे १४९४-१५३६), हेन्री ग्रू (१७८१-१८६२), आणि जॉर्ज स्टॉर्झ (१७९६-१८७९) हे आहेत.

“देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही”

१८. एकोणिसाव्या शतकातील प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने बायबलचा अभ्यास केला आणि ती पद्धत परिणामकराक का ठरली हे स्पष्ट करा?

१८ विरोधकांनी बायबल सत्याचा प्रसार रोखण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. “देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही,” असे २ तीमथ्य २:९ म्हणते. सन १८७० मध्ये प्रामाणिक बायबल विद्यार्थ्यांचा एक गट सत्याचा शोध करू लागला. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत कशी होती? त्यांच्यापैकी एक जण प्रश्‍न विचारायचा, मग त्यावर सर्व जण चर्चा करायचे. त्या मुद्द्‌याशी संबंधित सर्व शास्त्रवचने ते पडताळून पाहायचे, आणि तो मुद्दा शास्त्रवचनांशी सुसंगत आहे याचे समाधान झाल्यावर शेवटी ते आपला निष्कर्ष नोंदवून ठेवायचे. सन १८०० च्या अखेरच्या काळातील या विश्‍वासू पुरुषांनी अर्थात आपल्या “आध्यात्मिक पूर्वजांनी” पहिल्या शतकातील प्रेषित व वडीलवर्ग यांच्याप्रमाणे, आपले विश्‍वास पूर्णपणे देवाच्या वचनाशी सुसंगत आहेत याची खातरी करण्याचा दृढनिश्‍चय केला हे जाणून तुम्हाला प्रोत्साहन मिळत नाही का?

१९. सन २०१२ चे वार्षिक वचन काय आहे, आणि ते उचित का आहे?

१९ आजही बायबल आपल्या विश्‍वासाचा आधार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाने, येशूने जे पूर्ण विश्‍वासाने म्हटले होते तेच २०१२ या वर्षाचे वार्षिक वचन म्हणून निवडले आहे: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहा. १७:१७) देवाची कृपापसंती मिळवण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या सर्वांनी सत्यात चालणे आवश्‍यक आहे. तेव्हा, आपण सर्व जण सदैव देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनानुसार चालण्याचा प्रयत्न करू या.

[तळटीप]

^ परि. 17 वॅल्डेस याला काही वेळा पियेर वॅल्डेस किंवा पिटर वॅल्डो म्हणून ओळखले जायचे, पण त्याचे पहिले नाव काय होते हे निश्‍चितपणे सांगता येत नाही.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

सन २०१२ चे आपले वार्षिक वचन: “तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहा. १७:१७

[७ पानांवरील चित्र]

वॅल्डो

[७ पानांवरील चित्र]

विक्लिफ

[७ पानांवरील चित्र]

टिंडेल

[७ पानांवरील चित्र]

ग्रू

[७ पानांवरील चित्र]

स्टॉर्झ