सर्व मानवांच्या फायद्यासाठी एक राजकीय याजकगण
सर्व मानवांच्या फायद्यासाठी एक राजकीय याजकगण
“तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक’ असे आहा.” —१ पेत्र २:९.
तुम्ही स्पष्ट करू शकता का?
राजकीय याजकगणाचे अभिवचन पहिल्यांदा केव्हा देण्यात आले होते?
नवा करार कशा प्रकारे राजकीय याजकगण उत्पन्न करतो?
राजकीय याजकगणामुळे मानवजातीला कोणते फायदे मिळतील?
१. “प्रभुभोजन” या विधीला स्मारक विधी म्हणूनदेखील का ओळखले जाते, आणि या विधीचा उद्देश काय आहे?
इसवी सन ३३ सालच्या निसान १४ च्या रात्री, येशू ख्रिस्ताने व त्याच्या १२ प्रेषितांनी शेवटच्या वेळी यहुदी वल्हांडण सण साजरा केला. विश्वासघातकी यहूदा इस्कार्योतला बाहेर घालवल्यानंतर, येशूने एका वेगळ्या विधीची सुरुवात केली. या विधीला, नंतर “प्रभुभोजन” म्हणून ओळखले जाऊ लागले. (१ करिंथ. ११:२०) या विधीची स्थापना करताना येशूने दोनदा असे म्हटले, “माझ्या स्मरणार्थ हे करा.” या विधीला स्मारक विधी म्हणूनदेखील ओळखले जाते, ज्याचा अर्थ ख्रिस्ताच्या मृत्यूवर भर देणारे स्मारक. (१ करिंथ. ११:२४, २५) येशूच्या या आज्ञेनुसार, जगभरातील यहोवाचे साक्षीदार दरवर्षी स्मारक विधी साजरा करतात. २०१२ मध्ये, बायबल कॅलेंडरमधील निसान १४ हा दिवस गुरुवार ५ एप्रिल रोजी सूर्यास्तानंतर सुरू होईल.
२. येशूने जी प्रतीके वापरली होती त्यांविषयी त्याने काय म्हटले?
२ त्या विधीची स्थापना करताना येशूने जे केले व म्हटले त्याचे वर्णन शिष्य लूक अवघ्या दोन वचनांत करतो: “त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुति करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे; ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुम्हासाठी ओतिले जात आहे.” (लूक २२:१९, २०) येशूच्या या शब्दांचा त्याच्या प्रेषितांनी काय अर्थ लावला?
३. प्रेषितांनी प्रतीकांचा काय अर्थ घेतला?
३ येशूचे प्रेषित यहुदी होते, त्यामुळे जेरूसलेमच्या मंदिरात याजक देवाला पशूंची जी बलिदाने अर्पण करायचे त्यांविषयी त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होते. ही अर्पणे यहोवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी केली जायची, आणि त्यांपैकी अनेक अर्पणे पापांची क्षमा मिळवण्यासाठी केली जायची. (लेवी. १:४; २२:१७-२९) म्हणून, येशूने जेव्हा म्हटले की त्याचे शरीर ‘त्यांच्यासाठी दिले जाईल’ व त्याचे रक्त ‘त्यांच्यासाठी ओतले जाईल’ तेव्हा तो त्याचे परिपूर्ण जीवन बलिदान म्हणून अर्पण करणार होता हे प्रेषितांना समजले. हे बलिदान पशूंच्या बलिदानांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असणार होते.
४. “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे,” असे येशूने जे म्हटले त्याचा काय अर्थ होतो?
४ “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे,” असे येशूने जे म्हटले त्याचा काय अर्थ होतो? नव्या कराराविषयी यिर्मयाच्या पुस्तकात नमूद असलेल्या भविष्यवाणीबद्दल प्रेषितांना माहीत होते. (यिर्मया ३१:३१-३३ वाचा.) येशूच्या शब्दांतून सूचित झाले की तो आता त्या नव्या कराराची स्थापना करत होता. हा नवा करार यहोवाने मोशेच्या द्वारे इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्राच्या कराराची जागा घेणार होता. या दोन करारांचा एकमेकांशी काही संबंध होता का?
५. नियमशास्त्राच्या कराराने इस्राएल लोकांना कोणती आशा दिली?
५ होय, त्या दोन्ही करारांच्या उद्देशांचा एकमेकांशी जवळचा संबंध होता. नियमशास्त्राच्या कराराची स्थापना करताना यहोवाने इस्राएल राष्ट्राला असे सांगितले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” (निर्ग. १९:५, ६) या शब्दांचा इस्राएल लोकांकरता काय अर्थ होता?
राजकीय याजकगणाचे अभिवचन
६. यहोवाने कोणते अभिवचन पूर्ण करण्यासाठी नियमशास्त्राच्या कराराची स्थापना केली?
६ “करार” या शब्दाचा काय अर्थ होतो हे इस्राएल लोकांना माहीत होते. कारण, यापूर्वी यहोवाने अशा प्रकारचे करार त्यांच्या पूर्वजांशी म्हणजे नोहा व अब्राहाम यांच्याशी केले होते. (उत्प. ६:१८; ९:८-१७; १५:१८; १७:१-९) यहोवाने अब्राहामाशी जो करार केला होता त्यात त्याने असे अभिवचन दिले: “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्प. २२:१८) हे अभिवचन पूर्ण करण्यासाठी यहोवाने नियमशास्त्राच्या कराराची स्थापना केली. या कराराच्या आधारावर इस्राएल लोक इतर “सर्व लोकांपेक्षा” यहोवाचा “खास निधि” होऊ शकत होते. कोणत्या उद्देशासाठी? यहोवाकरता “याजकराज्य” बनण्यासाठी.
७. “याजकराज्य” असे जे म्हटले आहे त्याचा काय अर्थ होतो?
७ इस्राएल लोक राजांशी व याजकांशी परिचित होते, पण गतकाळात मलकीसदेक हा एकमेव पुरुष होता ज्याने यहोवाच्या अनुमतीने राजा व याजक या नात्याने सेवा केली होती. (उत्प. १४:१८) यहोवाने आता इस्राएल राष्ट्राला एक “याजकराज्य” उत्पन्न करण्याची संधी देऊ केली. याचा अर्थ, देवप्रेरित लिखाणांनी नंतर सूचित केल्याप्रमाणे, इस्राएल राष्ट्राला राजकीय याजकगण उत्पन्न करण्याची, म्हणजे असे राजे उत्पन्न करण्याची संधी मिळाली जे याजक म्हणूनदेखील सेवा करणार होते.—१ पेत्र २:९.
८. देवाकडून नियुक्त झालेले याजक कोणती कार्ये करतात?
८ राजा अर्थातच राज्य करतो. पण याजक काय करतो? इब्री लोकांस ५:१ याचे स्पष्टीकरण असे देते: “प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरिता नेमिलेला असतो: ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी.” तर मग, यहोवाने नियुक्त केलेला याजक, ठरवून दिलेल्या अर्पणांद्वारे देवासमोर पापी लोकांचे प्रतिनिधित्व करतो, आणि त्यांच्या वतीने देवाला विनंती करतो. त्यासोबतच, याजक लोकांसमोर यहोवाचे प्रतिनिधित्वदेखील करतो, आणि त्यांना देवाचे नियम शिकवतो. (लेवी. १०:८-११; मला. २:७) या मार्गांनी, देवाकडून नियुक्त झालेला याजक देवासोबत लोकांचा समेट घडवून आणण्यासाठी कार्य करतो.
९. (क) इस्राएल राष्ट्र कोणत्या अटीवर “याजकराज्य” उत्पन्न करू शकत होते? (ख) यहोवाने इस्राएलमध्ये याजकगणाची स्थापना का केली? (ग) कोणत्या गोष्टीमुळे इस्राएल राष्ट्र नियमशास्त्राच्या कराराधीन “याजकराज्य” उत्पन्न करू शकले नाही?
९ अशा प्रकारे नियमशास्त्राच्या कराराने इस्राएल लोकांना इतर ‘सर्व लोकांच्या’ फायद्यासाठी एक राजकीय याजकगण उत्पन्न करण्याची संधी देऊ केली. पण, ही अद्भुत सुसंधी एका अटीवर त्यांना मिळणार होती. यहोवाने त्यांना म्हटले होते: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर.” इस्राएल लोक खरोखर यहोवाची ‘वाणी ऐकू’ शकले का, म्हणजे ते तंतोतंत त्याच्या आज्ञा पाळू शकले का? नाही. ते केवळ काही प्रमाणात त्याच्या आज्ञा पाळू शकले. (रोम. ३:१९, २०) त्यामुळे, यहोवाने इस्राएलमध्ये राजपदापासून वेगळ्या अशा याजकगणाची स्थापना केली. हा याजकगण इस्राएल लोकांच्या पापांकरता पशुबलिदाने अर्पण करायचा. (लेवी. ४:१–६:७) त्या पापांमध्ये याजकांच्याही पापांचा समावेश होता. (इब्री ५:१-३; ८:३) पापांसाठी दिलेली ही पशुबलिदाने यहोवाने स्वीकारली. पण, यामुळे बलिदाने अर्पण करणाऱ्यांच्या पापांची पूर्णपणे क्षमा होऊ शकली नाही. नियमशास्त्राच्या कराराधीन असलेला याजकगण प्रामाणिक इस्राएल लोकांचादेखील देवासोबत पूर्णपणे समेट घडवून आणू शकत नव्हता. त्याबद्दल प्रेषित पौलाने असे म्हटले: “बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.” (इब्री १०:१-४) नियमशास्त्राचे उल्लंघन केल्यामुळे, इस्राएल लोक खरेतर शापित बनले. (गलती. ३:१०) अशा परिस्थितीत राजकीय याजकगण या नात्याने जगाची सेवा करणे त्यांना शक्य नव्हते.
१०. नियमशास्त्राच्या कराराचा काय उद्देश होता?
१० तर मग, इस्राएल राष्ट्र एक “याजकराज्य” उत्पन्न करेल असे जे अभिवचन यहोवाने दिले होते ते पोकळ अभिवचन होते का? मुळीच नाही. इस्राएल लोकांनी प्रामाणिकपणे यहोवाच्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ही संधी मिळणार होती, पण नियमशास्त्राधीन नाही. का नाही? (गलतीकर ३:१९-२५ वाचा.) हे समजून घेण्याकरता, नियमशास्त्राच्या कराराचा उद्देश काय होता हे जाणून घेणे आवश्यक आहे. नियमशास्त्राने विश्वासू इस्राएल लोकांचे खोट्या उपासनेपासून रक्षण केले. नियमशास्त्राने इस्राएलांना याची जाणीव करून दिली की ते पापी आहेत व त्यांच्या पापांसाठी महायाजक अर्पण करत असलेल्या बलिदानापेक्षा श्रेष्ठ बलिदानाची गरज आहे. नियमशास्त्र एका बालरक्षकाप्रमाणे त्यांना ख्रिस्ताकडे, किंवा मशीहाकडे (या पदांचा अर्थ “अभिषिक्त जन” असा होतो) नेणार होते. पण, मशीहा आल्यानंतर तो यिर्मयाने पूर्वभाकीत केलेल्या नव्या कराराची स्थापना करणार होता. ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यांना नव्या कराराचे भागीदार होण्याचे आमंत्रण देण्यात आले आणि पुढे ते खरोखर एक “याजकराज्य” बनणार होते. ते कसे हे आपण पाहू या.
नवा करार एक राजकीय याजकगण उत्पन्न करतो
११. येशू कशा प्रकारे राजकीय याजकगणाचा पाया बनला?
११ इसवी सन २९ मध्ये नासरेथचा येशू, मशीहा बनला. सुमारे ३० वर्षांचा असताना त्याने पाण्याद्वारे बाप्तिस्मा घेतला आणि त्याच्याकरता यहोवाची जी खास इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःला सादर केले. यहोवाने येशूबद्दल “माझा पुत्र, मला परमप्रिय आहे” असे म्हणून त्याच्याबद्दल आपली पसंती दर्शवली आणि त्याचा तेलाने नव्हे, तर पवित्र आत्म्याने अभिषेक केला. (मत्त. ३:१३-१७; प्रे. कृत्ये १०:३८) अशा प्रकारे त्याचा अभिषेक झाल्यानंतर, तो सबंध मानवी कुटुंबातील विश्वासू जनांचा महायाजक व भावी राजा बनला. (इब्री १:८, ९; ५:५, ६) आणि तो एका खऱ्या राजकीय याजकगणाचा पाया बनणार होता.
१२. येशूच्या बलिदानामुळे काय शक्य झाले?
१२ महायाजक या नात्याने येशू कोणते बलिदान देणार होता जेणेकरून विश्वासू जनांना वारशाने मिळालेल्या पापाची क्षमा होणार होती? येशूने त्याच्या मृत्यूच्या स्मारक विधीची स्थापना करताना सूचित केले होते की तो त्याचे स्वतःचे परिपूर्ण जीवन बलिदान करणार होता. (इब्री लोकांस ९:११, १२ वाचा.) इ.स. २९ मध्ये येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून ते त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याने महायाजक या नात्याने परीक्षांचा सामना केला व त्यांतून तो शिकत गेला. (इब्री ४:१५; ५:७-१०) त्याच्या पुनरुत्थानानंतर, तो स्वर्गात गेला आणि त्याने त्याच्या बलिदानाचे मूल्य यहोवाला सादर केले. (इब्री ९:२४) तेव्हापासून पुढे, त्याच्या बलिदानावर विश्वास प्रदर्शित करणाऱ्यांकरता तो यहोवाला विनंती करू शकत होता आणि यहोवाची सेवा करण्यासाठी त्यांना मदत करू शकत होता जेणेकरून त्यांना सार्वकालिक जीवन मिळणे शक्य होणार होते. (इब्री ७:२५) त्याच्या बलिदानामुळे नव्या कराराला कायदेशीर मान्यतादेखील मिळाली.—इब्री ८:६; ९:१५.
१३. नव्या कराराचे भागीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्यांना कोणती आशा होती?
१३ नव्या कराराचे भागीदार होण्यासाठी ज्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांनादेखील आत्म्याने अभिषिक्त केले जाणार होते. (२ करिंथ. १:२१) यामध्ये विश्वासू यहुद्यांचा व नंतर यहुदीतर लोकांचा समावेश करण्यात आला. (इफिस. ३:५, ६) नव्या करारात भागीदार असलेल्यांना कोणती आशा होती? त्यांचे पाप खऱ्या अर्थाने क्षमा केले जाणार होते. याविषयी यहोवाने असे अभिवचन दिले होते: “मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.” (यिर्म. ३१:३४) अशा प्रकारे, त्यांच्या पापांची कायदेशीर रीत्या क्षमा झाल्यानंतर, ते एक “याजकराज्य” बनण्याच्या स्थितीत असणार होते. अभिषिक्त ख्रिश्चनांना उद्देशून बोलताना पेत्राने असे लिहिले: “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक’ असे आहा; ह्यासाठी की, ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.’” (१ पेत्र २:९) यहोवाने इस्राएल लोकांना नियमशास्त्र देताना जे म्हटले होते ते शब्द पेत्राने येथे उद्धृत केले आणि ते नव्या कराराचे भागीदार असलेल्या ख्रिश्चनांना लागू केले.—निर्ग. १९:५, ६.
राजकीय याजकगणामुळे सर्व मानवांना फायदे मिळतात
१४. राजकीय याजकगण कोठे सेवा करतो?
१४ नव्या कराराचे भागीदार कोठे सेवा करतात? एक समूह या नात्याने ते याजकगण म्हणून या पृथ्वीवर सेवा करतात. ते लोकांपुढे यहोवाचे ‘गुण प्रसिद्ध करण्याद्वारे’ आणि त्यांना आध्यात्मिक अन्न पुरवण्याद्वारे त्याचे प्रतिनिधित्व करतात. (मत्त. २४:४५; १ पेत्र २:४, ५) त्यांचा मृत्यू व पुनरुत्थान झाल्यानंतर, ते स्वर्गात ख्रिस्तासोबत राजे व याजक म्हणून आपली सेवा पूर्णपणे पार पाडतात. (लूक २२:२९; १ पेत्र १:३-५; प्रकटी. १:६) याला प्रेषित योहानानेही दुजोरा दिला. त्याने एका दृष्टान्तात, यहोवाच्या राजासनाजवळ अनेक आत्मिक प्राण्यांना पाहिले. ते ‘कोकऱ्याला’ उद्देशून एक “नवे गीत गाऊन” म्हणतात: “तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या देवासाठी [लोक] विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांस राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटी. ५:८-१०) या शासकांबद्दल नंतरच्या एका दृष्टान्तात योहान असे म्हणतो: “ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करितील.” (प्रकटी. २०:६) ख्रिस्तासोबत मिळून त्यांचे राजकीय याजकगण बनते ज्याचा सर्व मानवांना फायदा होतो.
१५, १६. राजकीय याजकगणामुळे मानवजातीला कोणते आशीर्वाद मिळतील?
१५ या राजकीय याजकगणामुळे अर्थात १,४४,००० जणांमुळे पृथ्वीवर असलेल्यांना कोणते फायदे मिळतील? प्रकटीकरणाच्या २१ व्या अध्यायात त्यांचे वर्णन स्वर्गीय नगरी अर्थात नवी यरुशलेम असे करण्यात आले आहे. त्या नगरीला “कोकऱ्याची स्त्री” असे म्हटले आहे. (प्रकटी. २१:९) २ ते ४ वचनांत असे म्हटले आहे: “तेव्हा मी पवित्र नगरी, नवी यरुशलेम, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविलेली होती; आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” किती अद्भुत आशीर्वाद! अश्रू, शोक, रडणे व दुःख नसेल, कारण या सर्वांचे मूळ कारण अर्थात मृत्यूच नाहीसा केला जाईल. याचा अर्थ, विश्वासू मानवांना परिपूर्ण केले जाईल आणि त्यांचा देवासोबत पूर्णपणे समेट केला जाईल.
१६ या राजकीय याजकगणामुळे आणखी कोणते आशीर्वाद मिळतील याविषयी प्रकटीकरण २२:१, २ मध्ये असे म्हटले आहे: “त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली, [नव्या यरुशलेमेच्या] मार्गांवरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूस बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास आपली फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.” या लाक्षणिक तरतुदींमुळे, ‘राष्ट्रे,’ किंवा मानवजातीतील कुटुंबसमूह आदामापासून वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेपासून पूर्णपणे बरे होतील. मग खऱ्या अर्थाने, ‘पहिल्या गोष्टी होऊन गेलेल्या असतील.’
राजकीय याजकगण आपले कार्य पूर्ण करतो
१७. राजकीय याजकगण सरतेशेवटी काय साध्य करेल?
१७ मानवजातीला लाभदायक सेवा पुरवण्याच्या १,००० वर्षांच्या शेवटी राजकीय याजकगणाने पृथ्वीवरील आपल्या प्रजेला परिपूर्ण बनण्यास मदत केलेली असेल. नंतर, महायाजक व राजा या नात्याने ख्रिस्त परिपूर्ण मानवी कुटुंबाला यहोवाच्या हातात सोपवून देईल. (१ करिंथकर १५:२२-२६ वाचा.) अशा प्रकारे, राजकीय याजकगणाने आपले कार्य पूर्ण केलेले असेल.
१८. राजकीय याजकगणाने आपले कार्य पूर्ण केल्यानंतर, ख्रिस्ताच्या या सहकाऱ्यांचा यहोवा कशा प्रकारे उपयोग करेल?
१८ त्यानंतर, खास विशेषाधिकार प्राप्त झालेल्या ख्रिस्ताच्या या सहकाऱ्यांचा यहोवा कशा प्रकारे उपयोग करेल? प्रकटीकरण २२:५ मध्ये सांगितल्याप्रमाणे, “ते युगानुयुग राज्य करितील.” ते कोणावर राज्य करतील? त्याविषयी बायबलमध्ये सांगितलेले नाही. पण, यहोवाच्या नजरेत त्यांना सदैव खूप मोल असेल. त्यांना अमर व अविनाशी जीवन मिळेल आणि अपरिपूर्ण मानवजातीला परिपूर्णतेकडे नेल्याचा अनुभव त्यांच्याजवळ असेल. त्यामुळे, ते राजे या नात्याने सेवा करत राहतील आणि यहोवा आपले उद्देश पूर्ण करण्यासाठी सदासर्वकाळ त्यांचा उपयोग करत राहील.
१९. स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्यांना कोणत्या गोष्टीची आठवण करून दिली जाईल?
१९ गुरुवार, ५ एप्रिल २०१२ रोजी आपण येशूच्या मृत्यूचा स्मारक विधी साजरा करण्यासाठी एकत्र येऊ तेव्हा बायबलमधील या शिकवणी आपल्या मनात असतील. आज पृथ्वीवर असलेल्या अभिषिक्त जनांचा छोटा शेषवर्ग स्मारक विधीच्या वेळी बेखमीर भाकर आणि तांबडा द्राक्षारस या प्रतीकांचे सेवन करेल. त्यावरून हे अभिषिक्त जन नव्या कराराचे भागीदार आहेत हे सूचित होईल. ख्रिस्ताच्या बलिदानाची ही प्रतीके त्यांना देवाचा सार्वकालिक उद्देश पूर्ण करण्यात मिळालेल्या अद्भुत विशेषाधिकारांची आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देतील. तेव्हा, मानवजातीच्या फायद्यासाठी यहोवाने राजकीय याजकगणाची जी तरतूद केली त्याबद्दल मनस्वी कदर दाखवण्यासाठी आपण सर्व जण स्मारक विधीला उपस्थित राहू या.
[अभ्यासाचे प्रश्न]
[२९ पानांवरील चित्र]
राजकीय याजकगणामुळे मानवजातीला अनंत फायदे मिळतील