तुम्ही यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहात का?
तुम्ही यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहात का?
“आपण सर्व जण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो.”—२ करिंथ. ३:१८.
तुमचे उत्तर काय असेल?
आपण पापपूर्ण असूनही कशा प्रकारे यहोवाचे गौरव करू शकतो?
प्रार्थनांमुळे व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्यासाठी कशा प्रकारे साहाय्य मिळते?
यहोवाचे गौरव सतत करत राहण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?
१, २. आपण यहोवाच्या गुणांचे अनुकरण करू शकतो अशी अपेक्षा करणे योग्य का आहे?
प्रत्येक जण या ना त्या मार्गाने आपल्या आईवडिलांसारखा असतो. म्हणूनच जेव्हा एका मुलाला म्हटले जाते की ‘तू अगदी तुझ्या वडिलांवर गेलास’ किंवा एका मुलीला म्हटले जाते की ‘तू अगदी तुझ्या आईवर गेलीस’ तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत नाही. मुले सहसा आपल्या पालकांचे अनुकरण करतात. पण, आपल्याबद्दल काय? आपण आपल्या स्वर्गीय पित्याचे, यहोवाचे अनुकरण करू शकतो का? जरी आपण त्याला पाहिले नसले, तरी त्याच्या वचनाचा अभ्यास केल्याने, सृष्टीचे निरीक्षण केल्याने व शास्त्रवचनांवर, खासकरून देवाच्या पुत्राच्या शब्दांवर व त्याच्या कृत्यांवर मनन केल्याने आपण यहोवाचे मौल्यवान गुण ओळखू शकतो. (योहा. १:१८; रोम. १:२०) होय, आपण यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करू शकतो.
२ आदाम व हव्वा यांना बनवण्याआधी, देवाला याची खातरी होती की मानव त्याची इच्छा पूर्ण करतील, त्याचे गुण प्रदर्शित करतील व त्याचे गौरव करतील. (उत्पत्ति १:२६, २७ वाचा.) यहोवाने आपल्याला निर्माण केले असल्यामुळे, आपण त्याचे उपासक या नात्याने त्याचे गुण प्रदर्शित केले पाहिजे. आपण असे केले, तर देवाचे गौरव प्रतिबिंबित करण्याचा सुहक्क आपल्याला लाभेल, मग आपली संस्कृती, शिक्षण किंवा आपली पार्श्वभूमी कोणतीही असो. का? कारण “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रे. कृत्ये १०:३५.
३. यहोवाची सेवा करत असताना ख्रिस्ती कोणती भावना अनुभवतात?
३ अभिषिक्त ख्रिस्ती यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करतात. म्हणूनच, आत्म्याने अभिषिक्त झालेल्या प्रेषित पौलाने लिहिले: “आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो . . . तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो.” (२ करिंथ. ३:१८) मोशे संदेष्टा सीनाय पर्वतावरून दहा आज्ञा असलेल्या पाट्या घेऊन आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत होते, कारण त्याने यहोवाशी संभाषण केले होते. (निर्ग. ३४:२९, ३०) ख्रिश्चनांना असा अनुभव आला नसला आणि त्यांच्या चेहऱ्यातून अक्षरशः तेजाचे किरण निघत नसले, तरी ते इतरांना यहोवाबद्दल, त्याच्या गुणांबद्दल आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या उद्देशाबद्दल सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो. प्राचीन काळातील चमकवलेल्या धातूच्या आरशाप्रमाणे अभिषिक्त जन आणि त्यांचे पृथ्वीवरील सहकारी त्यांच्या जीवनातून व सेवाकार्यातून यहोवाचे गौरव प्रतिबिंबित करतात. (२ करिंथ. ४:१) तुम्ही तुमच्या आचरणाद्वारे व नियमितपणे राज्य प्रचार कार्यात भाग घेण्याद्वारे यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहात का?
यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याची आपली इच्छा आहे
४, ५. (क) पौलाप्रमाणे आपल्याला कोणता संघर्ष करावा लागतो? (ख) पापाचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे?
४ यहोवाचे सेवक या नात्याने आपण जे काही करतो त्याद्वारे आपल्या निर्माणकर्त्याचे गौरव व सन्मान व्हावा असे नक्कीच आपल्याला वाटते. पण बऱ्याच वेळा, आपल्याला जे करण्याची इच्छा असते ते आपल्या हातून घडत नाही. पौलाला व्यक्तिगत रीत्या या समस्येचा सामना करावा लागला. (रोमकर ७:२१-२५ वाचा.) आपल्याला असा संघर्ष का करावा लागतो याविषयी त्याने असा खुलासा केला: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोम. ३:२३) हो, आदामाकडून वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे मानवजात पापाच्या कठोर राज्याच्या अधीन झाली.—रोम. ५:१२; ६:१२.
५ पाप म्हणजे काय? जे काही यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाच्या, मार्गांच्या, स्तरांच्या आणि त्याच्या इच्छेच्या विरुद्ध आहे त्याला पाप म्हणता येईल. पापामुळे एका व्यक्तीचा यहोवासोबतचा नातेसंबंध बिघडतो. जसा एक तिरंदाज बाण मारतो पण काही कारणामुळे तो निशाणावर लागत नाही, त्याचप्रमाणे पापामुळे आपण देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्यापासून चुकतो. आपण एकतर जाणूनबुजून किंवा चुकून पाप करतो. (गण. १५:२७-३१) पाप हे मानवांमध्ये खोलवर रुजले आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये व त्यांच्या निर्माणकर्त्यामध्ये एक दरी निर्माण होते. (स्तो. ५१:५; यश. ५९:२; कलस्सै. १:२१) अशा रीतीने, बहुतेक मानव त्यांच्या जीवनशैलीमुळे यहोवापासून दुरावले आहेत आणि देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याच्या मौल्यवान संधीला मुकले आहेत. तर मग यात काही शंकाच नाही, की पापामुळे मानवजातीला सर्वात जास्त हानी झाली आहे.
६. आपल्यात अद्यापही उपजत पापी प्रवृत्ती असली, तरी आपण यहोवाचे गौरव कसे करू शकतो?
६ आपण पापी असतानासुद्धा यहोवा “आशेचा देव” आहे हे त्याने दाखवले आहे. (रोम. १५:१३) पाप नाहीसे करण्यासाठी त्याने तरतूद केली आहे—येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान. या बलिदानावर विश्वास ठेवल्याने आपण पापाच्या दास्यात राहत नाही, तर यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करणे आपल्याला शक्य होते. (रोम. ५:१९; ६:६; योहा. ३:१६) देवासोबत स्वीकारयोग्य नातेसंबंध टिकवून ठेवल्यामुळे आपल्याला सध्या यहोवाचे आशीर्वाद, तसेच भविष्यात परिपूर्णतेचा व सार्वकालिक जीवनाचा फायदाही मिळण्याची खातरी लाभते. आपल्यात अद्यापही उपजत पापी प्रवृत्ती असली, तरी आपण देवाचे वैभव प्रतिबिंबित करू शकतो अशा दृष्टिकोनातून यहोवा आपल्याला पाहतो, हा किती मोठा आशीर्वाद आहे!
देवाचे वैभव प्रतिबिंबित करा
७. देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्यासाठी आपण स्वतःबद्दल काय ओळखले पाहिजे?
७ देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याची पात्रता टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे आपल्या पापी प्रवृत्तीची जाणीव ठेवली पाहिजे. (२ इति. ६:३६) आपण स्वतःमध्ये असलेली पापी प्रवृत्ती ओळखली पाहिजे आणि तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला खऱ्या अर्थाने देवाचे गौरव करण्याइतपत प्रगती करता येईल. उदाहरणार्थ, पोर्नोग्राफी (अश्लील साहित्य) पाहणे हे देवाचा अनादर करणारे पाप आहे. आपल्याला ही अशुद्ध सवय जडली असेल तर आपल्याला आध्यात्मिक मदतीची गरज आहे ही वस्तुस्थिती कबूल करून आवश्यक पावले उचलली पाहिजेत. (याको. ५:१४, १५) आपल्या जीवनातून पूर्णपणे देवाचे गौरव करण्याची ही पहिली पायरी ठरेल. यहोवाचे उपासक या नात्याने आपण यहोवाच्या धार्मिक स्तरांनुसार जगत आहोत की नाही याचे सतत आत्मपरीक्षण केले पाहिजे. (नीति. २८:१८; १ करिंथ. १०:१२) आपल्यात कोणत्याही स्वरूपाची पापी प्रवृत्ती असली, तरी ती नियंत्रणात ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे.
८. आपण जरी परिपूर्ण नसलो, तरी आपण काय केले पाहिजे?
८ आजपर्यंत येशू हा एकच असा मनुष्य होऊन गेला जो देवाला खूश करण्याच्या आणि त्याचे वैभव प्रतिबिंबित करण्याच्या बाबतीत कधीच चुकला नाही. येशूप्रमाणे आपण परिपूर्ण नाही. तरीसुद्धा, आपण त्याच्या उदाहरणाचे पालन करू शकतो आणि तसे करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. (१ पेत्र २:२१) यहोवाचे गौरव करण्यासाठी आपण करत असलेली मेहनत व प्रगती तो पाहतो आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना आशीर्वादित करतो.
९. ज्या ख्रिश्चनांना आपले जीवन देवाच्या अपेक्षांनुसार जगण्याची इच्छा आहे अशांना बायबल कशा प्रकारे मदत करते?
९ यहोवाचे लिखित वचन आपल्याला सुधार करण्याचा मार्ग दाखवते. म्हणूनच शास्त्रवचनांचा सखोल अभ्यास करणे व त्यांवर मनन करणे गरजेचे आहे. (स्तो. १:१-३) दररोज बायबलचे वाचन केल्याने आपल्याला सुधारणा करण्यास मदत मिळेल. (याकोब १:२२-२५ वाचा.) बायबलचे ज्ञान आपल्या विश्वासाचा पाया आहे आणि गंभीर पाप टाळण्याचा व यहोवाला आनंदी करण्याचा आपला निश्चय बळकट करण्याचे माध्यम आहे.—स्तो. ११९:११, ४७, ४८.
१०. यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रार्थना आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते?
१० देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्यासाठी “प्रार्थनेत तत्पर” राहणेदेखील गरजेचे आहे. (रोम. १२:१२) यहोवाची सेवा स्वीकारयोग्य पद्धतीने करता यावी म्हणून आपण त्याला प्रार्थना करू शकतो, नव्हे केलीच पाहिजे. आपण त्याला पवित्र आत्मा, आणखी मजबूत विश्वास, प्रलोभनांचा प्रतिकार करण्याची शक्ती व “सत्याचे वचन नीट” सांगण्याचे कौशल्य द्यावे अशी विनंती करू शकतो. (२ तीम. २:१५; मत्त. ६:१३; लूक ११:१३; १७:५) एक लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या पित्यावर अवलंबून असते, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या स्वर्गीय पित्यावर, यहोवावर अवलंबून राहिले पाहिजे. आपल्याला त्याची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी मदत मागितल्यास तो नक्कीच आपली मदत करेल अशी खातरी आपण बाळगू शकतो. आपल्या प्रार्थना त्याला त्रासदायक वाटतील असा आपण कधीच विचार करू नये. उलट, आपण प्रार्थनेत त्याचे गौरव करू या, धन्यवाद मानू या, खासकरून परीक्षेत असताना त्याचे मार्गदर्शन घेऊ या आणि त्याच्या पवित्र नावाचे गौरव होईल अशा मार्गांनी त्याची सेवा करण्यासाठी त्याची मदत मागू या.—स्तो. ८६:१२; याको. १:५-७.
११. देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्यास मंडळीच्या सभा आपल्याला कशा प्रकारे मदत करतात?
११ देवाने त्याच्या मौल्यवान मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी “विश्वासू व बुद्धिमान” दासावर सोपवली आहे. (मत्त. २४:४५-४७; स्तो. १००:३) सहविश्वासू बांधव यहोवाचे वैभव कशा प्रकारे प्रतिबिंबित करतात हे जाणून घेण्यास दास वर्ग उत्सुक आहे. ज्याप्रमाणे आपण आणखी चांगले दिसण्यासाठी आपले कपडे शिंप्याला कमी जास्त करायला देतो, त्याचप्रमाणे सभांमुळे ख्रिस्ती सेवक या नात्याने आपल्या स्वरूपात सुधारणा होते. (इब्री १०:२४, २५) म्हणूनच, आपण नेहमी सभांना वेळेवर गेले पाहिजे. कारण जर आपण नेहमीच उशिरा गेलो, तर यहोवाचे सेवक या नात्याने आपल्या स्वरूपात आध्यात्मिक रीत्या सुधारणा करण्यासाठी आवश्यक असलेली काही माहिती आपण गमावू शकतो.
देवाचे अनुकरण करू या
१२. आपण देवाचे अनुकरण कसे करू शकतो?
१२ आपल्याला यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करायचे असेल, तर आपण “[देवाचे] अनुकरण करणारे” झाले पाहिजे. (इफिस. ५:१) यहोवाचे अनुकरण करण्याचा एक मार्ग म्हणजे सगळ्या गोष्टींबाबत त्याचा दृष्टिकोन बाळगणे. इतर कोणत्याही मार्गाने जीवन जगणे हे देवाचा अनादर करण्यासारखे आहे आणि त्यामुळे आपल्याला हानी पोहचू शकते. आपल्या सभोवतालचे जग दुष्टाच्या अर्थात दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली असल्यामुळे, यहोवाला ज्या गोष्टींचा वीट आहे त्यांची घृणा करण्याचा आणि ज्या गोष्टी त्याला आवडतात त्यांवर मनापासून प्रेम करण्याचा आपण जिवापाड प्रयत्न केला पाहिजे. (स्तो. ९७:१०; १ योहा. ५:१९) आपल्याला पूर्ण खातरी असली पाहिजे, की सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी करण्याद्वारेच आपण त्याची योग्य प्रकारे सेवा करू शकतो.—१ करिंथकर १०:३१ वाचा.
१३. आपण पापाचा वीट का मानला पाहिजे, आणि यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळेल?
१३ यहोवाला पापाचा वीट आहे आणि आपल्यालाही असला पाहिजे. पापाला बळी न पडता आपण त्याच्या कितपत जवळ जाऊ शकतो हे पाहण्याऐवजी, आपण पापापासून होता होईल तितके दूर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, धर्मत्यागाला बळी पडण्यापासून आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे. हे एक असे पाप आहे जे आपल्याला देवाचे गौरव करण्यास अयोग्य ठरवू शकते. (अनु. १३:६-९) म्हणूनच, धर्मत्यागी व्यक्तींशी किंवा अशा कोणाशीही जो स्वतःला बांधव म्हणवतो पण खरे पाहता देवाचा अनादर करत आहे, त्याच्याशी आपण कोणताही संबंध ठेवू नये, मग तो कुटुंबाचा सदस्य असला तरी. (१ करिंथ. ५:११) धर्मत्यागी लोकांच्या किंवा यहोवाच्या संघटनेची टीका करणाऱ्यांच्या मतांचे खंडन करण्याचा प्रयत्न केल्याने आपल्याला काहीही फायदा होत नाही. खरेतर धर्मत्यागी लोकांची माहिती, मग ती लिखित स्वरूपातील असो अथवा इंटरनेटवरील, ती आध्यात्मिक रीत्या धोकादायक आहे आणि अशी माहिती वाचणेसुद्धा चुकीचे आहे.—यशया ५:२०; मत्तय ७:६ वाचा.
१४. देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करताना आपल्यात कोणता गुण प्रामुख्याने दिसून आला पाहिजे, आणि का?
१४ आपल्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रेम प्रदर्शित करणे. आपण त्याच्यासारखेच प्रेमळ असले पाहिजे. (१ योहा. ४:१६-१९) खरेतर, ख्रिस्ती बांधवांमध्ये असलेल्या प्रेमामुळे आपण येशूचे शिष्य आणि यहोवाचे सेवक म्हणून ओळखले जातो. (योहा. १३:३४, ३५) पण कधीकधी आपली उपजत पापी प्रवृत्ती प्रेम प्रदर्शित करण्याच्या आड येऊ शकते. तरीसुद्धा, आपण ती बाजूला सारून नेहमी प्रेमळपणे वागले पाहिजे. प्रेम व देवाला आवडणारे इतर गुण उत्पन्न केल्याने आपल्याला दुष्ट व पापपूर्ण कृत्ये टाळता येतील.—२ पेत्र १:५-७.
१५. प्रेमामुळे इतरांवरील आपल्या नातेसंबंधावर कसा प्रभाव पडतो?
१५ प्रेम आपल्याला इतर लोकांसाठी चांगल्या गोष्टी करण्यास प्रेरित करते. (रोम. १३:८-१०) उदाहरणार्थ, आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम वैवाहिक जीवनात विश्वासू राहण्यास आपल्याला प्रेरित करेल. मंडळीतील वडिलांप्रती असलेले प्रेम, शिवाय त्यांच्या कामाप्रती असलेला आदर आपल्याला त्यांची आज्ञा मानण्यास व त्यांच्या अधीन राहण्यास मदत करेल. जी मुले आपल्या पालकांवर प्रेम करतात, ती त्यांची आज्ञा मानतात, त्यांचा आदर करतात व त्यांच्याविषयी नकारात्मक बोलत नाहीत. जर आपण इतरांवर प्रेम केले तर आपण त्यांना कमी लेखणार नाही किंवा त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीने बोलणार नाही. (याको. ३:९) आणि जे वडील देवाच्या मेंढरांवर प्रेम करतात ते त्यांच्याशी कोमलतेने वागतील.—प्रे. कृत्ये २०:२८, २९.
१६. प्रेम आपल्याला सेवाकार्यात कशा प्रकारे मदत करेल?
१६ प्रेमाचा गुण आपल्या सेवा कार्यातूनही ठळकपणे दिसून आला पाहिजे. काही घरमालकांनी थंड किंवा नकारात्मक प्रतिसाद दिला, तरी यहोवावर आपले गहिरे प्रेम असल्यामुळे आपण आपला आवेश कमी होऊ देणार नाही. याउलट, आपण सुवार्तेचा प्रचार करत राहू. प्रेमामुळे आपल्याला चांगली तयारी करण्याची व सेवाकार्यात परिणामकारक बनण्याची प्रेरणा मिळेल. देवावर व आपल्या शेजाऱ्यांवर आपले खरोखर प्रेम असल्यास, आपण राज्य प्रचाराचे कार्य केवळ करावे लागते म्हणून करणार नाही. त्याऐवजी, या कार्याला मोठा सुहक्क मानून आपण ते आनंदाने करत राहू.—मत्त. १०:७.
यहोवाचे गौरव करत राहा
१७. आपण देवाच्या गौरवाला उणे पडतो ही गोष्ट मान्य केल्याने आपल्याला कसा फायदा होतो?
१७ जगातील सर्वसामान्य लोकांना पापाच्या गांभीर्याची जाणीव नाही, पण आपल्याला आहे. त्यामुळे, आपल्याला पापी प्रवृत्तीविरुद्ध लढण्याची गरज आहे हे आपण ओळखतो. आपण पापी आहोत हे मान्य केल्यास, आपल्याला आपल्या विवेकाला प्रशिक्षित करता येईल; जेणेकरून पाप करण्याची इच्छा आपल्या मनात उत्पन्न होते तेव्हा योग्य पाऊल उचलण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. (रोम. ७:२२, २३) आपण दुर्बळ आहोत हे खरे आहे, पण देव आपल्याला कोणत्याही परिस्थितीत योग्य ते करण्यास शक्ती देऊ शकतो.—२ करिंथ. १२:१०.
१८, १९. (क) दुरात्म्यांविरुद्धच्या आपल्या लढाईत आपण कशामुळे यशस्वी होऊ शकतो? (ख) आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
१८ यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करण्यासाठी आपल्याला दुरात्म्यांविरुद्धदेखील लढावे लागेल. देवाकडून मिळालेल्या शस्त्रसामग्रीमुळे या लढाईत आपण यशस्वी होऊ शकतो. (इफिस. ६:११-१३) जे गौरव केवळ यहोवाला मिळाले पाहिजे ते बळकावण्याचा सैतान सतत प्रयत्न करत असतो. तसेच, यहोवासोबतचा आपला नातेसंबंध नष्ट करण्याचादेखील सैतान हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. पण आपण व इतर लाखो अपरिपूर्ण स्त्री-पुरुष व मुले देवाला एकनिष्ठ राहून त्याचे गौरव करतो, तेव्हा सैतानासाठी हा किती मोठा पराभव ठरतो! तर मग, स्वर्गातील आत्मिक प्राण्यांप्रमाणेच आपणही सतत यहोवाची स्तुती करत राहू या: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटी. ४:११.
१९ काहीही झाले तरी यहोवाचे गौरव करत राहण्याचा आपला निर्धार असला पाहिजे. यहोवाचे अनेक एकनिष्ठ सेवक त्याचे अनुकरण करण्याचा व त्याचे वैभव प्रतिबिंबित करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करत आहेत हे पाहून त्याला खूप आनंद होतो. (नीति. २७:११) आपली मनोवृत्ती दाविदाप्रमाणे असली पाहिजे, ज्याने म्हटले: “हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णीन.” (स्तो. ८६:१२) आपण त्या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा आपण पूर्णपणे यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करू व सदासर्वकाळ त्याची स्तुती करत राहू! हा आनंद आज्ञाधारक मानवांना अनुभवायला मिळेल. आज तुम्ही यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याद्वारे अनंतकाळापर्यंत असे करत राहण्याची आशा बाळगता का?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२७ पानांवरील चित्रे]
तुम्ही या मार्गांनी यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करत आहात का?