व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी “तुमच्याबरोबर आहे”

मी “तुमच्याबरोबर आहे”

मी “तुमच्याबरोबर आहे”

“खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.”—दानी. १२:४, ईझी-टू-रीड व्हर्शन.

तुमचे उत्तर काय असेल?

आधुनिक काळात “सत्यज्ञान” कशा प्रकारे प्रकाशात आले?

सत्य स्वीकारणाऱ्‍यांच्या संख्येत कशा प्रकारे वाढ झाली?

कोणकोणत्या मार्गांनी सत्यज्ञान वाढले आहे?

१, २. (क) येशू आज आपल्या प्रजाजनांबरोबर आहे आणि भविष्यातही राहील असे आपण कशावरून म्हणू शकतो? (ख) दानीएल १२:४ या वचनानुसार, शास्त्रवचनांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यामुळे कोणते परिणाम घडून येणार होते?

 तुम्ही नंदनवनात आहात अशी कल्पना करा. दररोज सकाळी तुम्ही उठता तेव्हा तुम्हाला अगदी ताजेतवाने वाटते. तुम्ही अतिशय उत्साहाने दिवसाची सुरुवात करता. तुम्हाला कोणतीही दुखणीखुपणी नाहीत. ज्या काही आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला होत्या त्या केव्हाच नाहीशा झाल्या आहेत. तुमची सर्व ज्ञानेंद्रिये अगदी उत्तम रीत्या कार्य करतात; त्यामुळे पाहणे, ऐकणे, वास घेणे, स्पर्श जाणवणे व चव घेणे या सर्व क्रिया तुमचे शरीर अगदी चोखपणे पार पाडते. कितीही श्रम केले तरी तुम्हाला थकवा जाणवत नाही, तुमच्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो; तुम्हाला अनेक मित्रमैत्रिणी आहेत आणि तुमच्या सर्व चिंता नाहीशा झाल्या आहेत. देवाच्या राज्यात हे सर्व आशीर्वाद तुम्ही अनुभवाल. देवाने नियुक्‍त केलेला राजा, ख्रिस्त येशू आपल्या प्रजाजनांना आशीर्वादित करेल आणि त्यांना यहोवाच्या मार्गांचे शिक्षण देईल.

यहोवाचे विश्‍वासू सेवक भविष्यातील त्या विश्‍वव्यापी शैक्षणिक कार्यात भाग घेतील तेव्हा यहोवा स्वतः त्यांच्यासोबत असेल. देवाने व त्याच्या पुत्राने शतकानुशतके विश्‍वासू जनांना साथ दिली आहे. स्वर्गास परतण्याआधी येशूने आपल्या विश्‍वासू शिष्यांना आश्‍वासन दिले की तो त्यांच्याबरोबर असेल. (मत्तय २८:१९, २० वाचा.) त्याच्या या आश्‍वासनावर आपला विश्‍वास आणखी दृढ करण्यासाठी, आता आपण २,५०० वर्षांपूर्वी प्राचीन बॅबिलोनमध्ये, देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या एका भविष्यवाणीतील फक्‍त एका वाक्याचे परीक्षण करू या. दानीएल संदेष्ट्याने अंतसमयाविषयी, म्हणजेच आज आपण राहत आहोत त्या काळाविषयी असे लिहिले होते: “खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.” (दानी. १२:४) ‘इकडे तिकडे शोध घेतील’ असे भाषांतर केलेल्या हिब्रू क्रियापदाचा अर्थ काळजीपूर्वक परीक्षण करणे असा होतो, हे आता स्पष्ट झाले आहे. इकडे तिकडे शोध घेतल्यामुळे अतिशय अद्‌भुत आशीर्वाद मिळणार होते! शास्त्रवचनांचे काळजीपूर्वक परीक्षण करणाऱ्‍यांना आशीर्वादाच्या रूपात देवाच्या वचनाचे सत्यज्ञान म्हणजेच अचूक ज्ञान लाभणार होते. भविष्यवाणीत असेही सांगण्यात आले होते, की त्या “सत्यज्ञानाचा” खूप लोक स्वीकार करतील. शिवाय, हे ज्ञान वाढेल. अर्थात, त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होईल आणि ते सहजगत्या उपलब्ध असेल. या भविष्यवाणीची कशा प्रकारे पूर्णता झाली याचे परीक्षण करताना आपल्याला खातरी पटेल की येशू खरोखरच आज त्याच्या शिष्यांबरोबर आहे. तसेच, यहोवा जे काही वचन देतो त्याप्रमाणे घडवून आणण्यास तो पूर्णपणे समर्थ आहे हेही त्यावरून स्पष्ट होईल.

“सत्यज्ञान” प्रकाशात येते

३. प्रेषितांच्या मृत्यूनंतर सत्यज्ञानाचे काय झाले?

ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर, खरा ख्रिस्ती धर्म अनुसरणाऱ्‍यांपैकी काहींनी धर्मत्याग केला आणि हा धर्मत्याग वणव्यासारखा पसरला. याबद्दल पूर्वीच भाकीत करण्यात आले होते. (प्रे. कृत्ये २०:२८-३०; २ थेस्सलनी. २:१-३) यानंतर कित्येक शतके “सत्यज्ञान” जणू लोप पावले. बायबलविषयी कसलेही ज्ञान नसलेल्या लोकांमध्येच नव्हे, तर स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍यांमध्येही या “सत्यज्ञानाचा” दुष्काळ होता. ख्रिस्ती धर्मजगतातील पुढारी बायबलवर विश्‍वास असल्याचा दावा तर करायचे, पण त्यांनी लोकांना खोटे सिद्धान्त शिकवण्याद्वारे देवाचा अनादर करणारे ‘भुतांचे शिक्षण’ दिले. (१ तीम. ४:१) सर्वसामान्य लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या अंधारातच ठेवण्यात आले. धर्मत्यागी शिकवणींची काही उदाहरणे म्हणजे देव तीन मिळून एक आहे, आत्मा अमर आहे आणि काही आत्म्यांना नरकात सर्वकाळ यातना भोगाव्या लागतात.

४. ख्रिश्‍चनांच्या एका गटाने १८७० च्या दशकात “सत्यज्ञानाचा” शोध घेण्यास कशा प्रकारे सुरुवात केली?

पण १८७० च्या दशकात, म्हणजे अंतसमयाला सुरुवात होण्याच्या सुमारे चाळीस वर्षांआधी, अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया येथे प्रामाणिक मनाच्या ख्रिश्‍चनांचा एक लहानसा गट, बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी आणि “सत्यज्ञानाचा” शोध घेण्यासाठी एकत्र येऊ लागला. (२ तीम. ३:१) या गटातील सदस्य स्वतःला बायबल विद्यार्थी म्हणायचे. ते नम्र मनाचे लोक होते ज्यांना देवाच्या इच्छेनुसार वागण्याची प्रामाणिक इच्छा होती. येशूने सांगितल्यानुसार सत्याचे ज्ञान ज्यांच्यापासून गुप्त ठेवले जाणार होते अशा “ज्ञानी व विचारवंत” लोकांपैकी ते नव्हते. (मत्त. ११:२५) या बायबल विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक बायबलचे वाचन, तसेच त्यावर चर्चा व मनन केले. शिवाय, त्यांनी बायबलमधील वेगवेगळे उतारे एकमेकांशी पडताळून पाहिले आणि पूर्वी ज्यांनी या प्रकारे शोध केला होता त्यांच्या लिखाणांचेही परीक्षण केले. हळूहळू या बायबल विद्यार्थ्यांना शतकानुशतके अंधारात असलेली सत्ये उमगण्यास सुरुवात झाली.

५. दी ओल्ड थियोलॉजी नावाच्या पत्रिकांची मालिका प्रकाशित करण्याचा काय उद्देश होता?

नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्यामुळे बायबल विद्यार्थी रोमांचित तर झाले, पण या ज्ञानामुळे ते गर्विष्ठ बनले नाहीत; तसेच, आपण काहीतरी नवीन घोषित करत आहोत असा दावाही त्यांनी केला नाही. (१ करिंथ. ८:१) उलट, दी ओल्ड थियोलॉजी (जुने सिद्धान्त) या नावाने त्यांनी पत्रिकांची एक मालिका प्रकाशित केली. बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या सत्यांचा वाचकांना परिचय करून देणे हा त्यांचा उद्देश होता. त्या मालिकेतील पहिल्या पत्रिकेत असे म्हणण्यात आले: “बायबल अभ्यासात साहाय्य करण्यासाठी अतिरिक्‍त वाचन साहित्य. मनुष्यांच्या सर्व खोट्या परंपरा मोडीत काढून, आपल्या प्रभूने व त्याच्या प्रेषितांनी शिकवलेल्या जुन्या सिद्धान्तांना पुन्हा एकदा उजाळा देणे हा यातील माहितीचा उद्देश आहे.”—दी ओल्ड थियोलॉजी, क्र. १, एप्रिल १८८९, पृ. ३२.

६, ७. (क) आपल्याला १८७० च्या दशकापासून आजपर्यंत कोणती सत्ये समजून घेण्यास साहाय्य मिळाले आहे? (ख) तुम्हाला विशेषतः कोणती सत्ये शिकायला मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटते?

शंभर वर्षांपूर्वी झालेली ती एक लहानशी सुरुवात होती. तेव्हापासून आजपर्यंत कितीतरी अद्‌भुत सत्ये प्रकाशात आली आहेत! * ही सत्ये म्हणजे आपल्या जीवनाशी कसलाही संबंध नसलेली, धर्मशास्त्राचे विद्वान ज्यांवर वादविवाद करतात तशा प्रकारची पुस्तकी तत्त्वे नाहीत. तर, ही अतिशय रोमांचक सत्ये आहेत जी आपल्याला खोट्या शिकवणींपासून मुक्‍त करतात, आपल्या जीवनाला अर्थ देतात आणि आपल्याला आनंद व आशा देतात. ती आपल्याला यहोवाला जाणून घ्यायला, म्हणजेच त्याचे प्रेमळ व्यक्‍तिमत्त्व आणि उद्देश समजून घ्यायला मदत करतात. तसेच, ही सत्ये येशूच्या भूमिकेवर प्रकाश टाकतात; तो पृथ्वीवर का आला, त्याचा मृत्यू का झाला आणि आज तो काय करत आहे हे स्पष्ट करतात. देव दुष्टाई का खपवून घेतो, आपला मृत्यू का होतो, आपण कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे आणि आपण जीवनात आनंदी कसे होऊ शकतो, या सर्व गोष्टी समजून घ्यायला ही अनमोल सत्ये आपल्याला साहाय्य करतात.

शतकानुशतके “गुप्त” असलेल्या, पण या अंतसमयात पूर्ण होत असलेल्या अनेक भविष्यवाण्यांचा अर्थ समजून घेणे आता आपल्याला शक्य झाले आहे. (दानी. १२:९) यांत सबंध बायबलमधील, विशेषतः शुभवर्तमानांतील व प्रकटीकरणाच्या पुस्तकातील भविष्यवाण्यांचा समावेश होतो. ज्या घटना आपल्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे शक्य नव्हते त्या घटनांविषयीही समजून घेण्यास यहोवाने आपल्याला साहाय्य केले आहे. उदाहरणार्थ, येशूचे राजासनावर बसणे, स्वर्गात झालेली लढाई आणि सैतानाला पृथ्वीवर फेकले जाणे. (प्रकटी. १२:७-१२) यासोबतच, ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष पाहू शकतो त्यांचाही अर्थ समजून घेण्यास देवाने आपल्याला साहाय्य केले आहे. उदाहरणार्थ युद्धे, भूकंप, रोगराई, अन्‍नटंचाई, तसेच या “कठीण” काळात दुष्ट लोकांमुळे वाढत चाललेल्या समस्या.—२ तीम. ३:१-५; लूक २१:१०, ११.

८. आपल्याला पाहायला व ऐकायला मिळालेल्या गोष्टींचे श्रेय आपण कोणाला देतो?

येशूने आपल्या शिष्यांना जे सांगितले होते त्याचा अर्थ समजणे आज आपल्याकरता सोपे आहे: “तुम्ही जे पाहत आहा ते पाहणारे डोळे धन्य होत; मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे पाहत आहा ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि जे तुम्ही ऐकत आहा ते ऐकावयाची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.” (लूक १०:२३, २४) आपल्याला ज्या गोष्टी पाहायला व ऐकायला मिळाल्या आहेत त्यांचे श्रेय आपण यहोवा देवाला देतो. तसेच, येशूच्या अनुयायांना “सर्व सत्यात” नेण्याकरता “कैवारी” अर्थात देवाचा पवित्र आत्मा पाठवण्यात आला आहे याबद्दलही आपण किती कृतज्ञ आहोत! (योहान १६:७, १३ वाचा.) तर मग, आपल्याला मिळालेले सत्यज्ञान किती मौल्यवान आहे हे नेहमी आठवणीत ठेवून आपण निःस्वार्थपणे ते इतरांनाही देण्याचा प्रयत्न करू या!

“खूप लोक” सत्यज्ञानाचा स्वीकार करतात

९. या नियतकालिकाच्या एप्रिल १८८१ अंकात कोणते आवाहन करण्यात आले?

अठराशे एक्याऐंशी सालच्या एप्रिल महिन्यात, जेव्हा टेहळणी बुरूजच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाला अद्याप दोन वर्षेही झाली नव्हती, तेव्हा या नियतकालिकात १,००० सुवार्तिकांची गरज आहे असे आवाहन करण्यात आले. त्या लेखात असे म्हणण्यात आले: “जे आपला अर्धा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ प्रभूचे कार्य करण्याकरता समर्पित करू शकतात त्यांना आम्ही असे सुचवू इच्छितो . . . , की तुम्ही तुमच्या सोयीनुसार एकतर मोठ्या किंवा लहान शहरांमध्ये कॉलपोर्टर किंवा इव्हॅन्जेलिस्ट (सुवार्तिक) म्हणून जावे आणि या प्रत्येक ठिकाणी प्रामाणिक मनाच्या ख्रिश्‍चनांना शोधून काढण्याचा प्रयत्न करावा; तुम्हाला असे अनेक ख्रिश्‍चन सापडतील ज्यांना देवाबद्दल आवेश तर आहे, पण तो अचूक ज्ञानानुसार नाही. अशांना शोधून त्यांना आपल्या स्वर्गीय पित्याच्या अगाध कृपेबद्दल आणि त्याच्या वचनातील मौल्यवान सत्यांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करावा.”

१०. पूर्ण-वेळ सुवार्तिकांसाठी करण्यात आलेल्या आवाहनाला लोकांनी कसा प्रतिसाद दिला?

१० सुवार्तेचा प्रचार करणे ही खऱ्‍या ख्रिश्‍चनांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे, याची बायबल विद्यार्थ्यांना जाणीव असल्याचे या आवाहनावरून दिसून आले. पण १,००० पूर्ण-वेळ सुवार्तिकांचे आवाहन काहीसे महत्त्वाकांक्षी होते असे म्हणावे लागेल. कारण, त्या वेळी बायबल विद्यार्थ्यांच्या सभांना फक्‍त दीडशे-दोनशे जण येत होते. पण, बऱ्‍याच लोकांना एखादी पत्रिका किंवा नियतकालिक वाचल्यावर त्यातील माहिती सत्य असल्याची खातरी पटली आणि त्यांनी सदर आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूजचा एक अंक व बायबल विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेली एक पुस्तिका वाचल्यावर १८८२ मध्ये लंडन, इंग्लंड येथील एका वाचकाने असे लिहिले: “देवाला जे अद्‌भुत कार्य घडवून आणण्याची इच्छा आहे ते साध्य करण्यासाठी मी कशा प्रकारे आणि कशाबद्दल प्रचार करावा याविषयी कृपया माझे मार्गदर्शन करावे.”

११, १२. (क) आपल्यासारखाच कॉलपोर्टर्सचाही कोणता उद्देश होता? (ख) कॉलपोर्टर्सनी कशा प्रकारे “वर्गांची” किंवा मंडळ्यांची स्थापना केली?

११ अठराशे पंचाऐंशीपर्यंत जवळजवळ ३०० बायबल विद्यार्थी कॉलपोर्टर सेवेत सहभागी झाले होते. प्रचार कार्य करण्यामागे आज आपला जो उद्देश आहे—येशू ख्रिस्ताचे शिष्य बनवण्याचा, तोच त्यांचाही होता. अर्थात, त्यांच्या कार्यपद्धती आपल्यापेक्षा वेगळ्या होत्या. आज आपण सहसा एका वेळी एकाच व्यक्‍तीसोबत बायबलचा अभ्यास करतो आणि त्या व्यक्‍तीच्या क्षमतेनुसार व गरजेनुसार तिला शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपण या बायबल विद्यार्थ्याला आधीपासूनच स्थापित असलेल्या मंडळीच्या सभांना येण्याचे आमंत्रण देतो. पण जुन्या काळात कॉलपोर्टर, लोकांना पुस्तके द्यायचे आणि मग आस्थेवाईक लोकांना एक गट या नात्याने बायबलचा अभ्यास करण्याकरता एकत्र करायचे. लोकांसोबत व्यक्‍तिशः अभ्यास करण्याऐवजी ते विद्यार्थ्यांचे “वर्ग” किंवा मंडळ्या स्थापन करायचे.

१२ उदाहरणार्थ, १९०७ मध्ये कॉलपोर्टर्सच्या एका गटाने एका शहरात एक खास मोहीम राबवली. ज्यांच्याजवळ मिलेनियल डॉन (स्टडीज इन द स्क्रिप्चर्स या नावानेही ओळखले जायचे) या प्रकाशनाच्या प्रती आधीपासूनच होत्या अशा लोकांना शोधण्याची ही मोहीम होती. त्याविषयी टेहळणी बुरूजमध्ये हे वृत्त प्रकाशित झाले: “या लोकांना [आस्थेवाईक लोकांना] त्यांच्यापैकी एकाच्या घरी लहानशा सभेसाठी एकत्र करण्यात आले. कॉलपोर्टरने रविवारचा सबंध दिवस त्यांना ‘युगांसंबंधी देवाची योजना’ (डिव्हाइन प्लॅन ऑफ दी एजेस) याविषयी माहिती दिली आणि पुढच्या रविवारपासून त्यांनी नियमित सभा घेण्यास सुरुवात करावी असे प्रोत्साहन त्यांना दिले.” मग १९११ मध्ये, बांधवांनी या पद्धतीत बदल केला. अठ्ठावन्‍न खास प्रवासी सेवकांनी सबंध अमेरिकेत व कॅनडात जाहीर भाषणे दिली. या बांधवांनी भाषणांना उपस्थित राहिलेल्या आस्थेवाईक लोकांकडून त्यांचे नाव व घरचा पत्ता घेतला आणि त्यांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी केली, जेणेकरून ते नवे “वर्ग” स्थापन करून घरांमध्ये सभा घेऊ शकतील. १९१४ पर्यंत सबंध जगात बायबल विद्यार्थ्यांच्या १,२०० मंडळ्या बनल्या होत्या.

१३. आज होत असलेल्या सत्यज्ञानाच्या प्रसाराबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात उल्लेखनीय वाटते?

१३ आज सबंध जगात १,०९,४०० मंडळ्या आहेत आणि ८,९५,८०० बंधुभगिनी पायनियर या नात्याने सेवा करत आहेत. जवळजवळ ऐंशी लाख लोकांनी “सत्यज्ञान” स्वीकारले आहे आणि ते आपल्या जीवनात त्याचा अवलंब करत आहेत. (यशया ६०:२२ वाचा.) * हे अतिशय उल्लेखनीय आहे, कारण येशूने भाकीत केले होते की त्याच्या नावामुळे त्याच्या शिष्यांचा सर्वांकडून “द्वेष” केला जाईल. त्याच्या अनुयायांचा छळ केला जाईल, त्यांना तुरुंगात टाकले जाईल, इतकेच काय तर त्यांना जिवे मारले जाईल असेही त्याने सांगितले होते. (लूक २१:१२-१७) पण सैतान, त्याचे दुरात्मे आणि मानवी विरोधक यांनी यहोवाच्या लोकांच्या मार्गात अनेक अडसर आणले असले, तरीसुद्धा शिष्य बनवण्याच्या कार्यात त्यांना अभूतपूर्व प्रमाणात यश आले आहे. आज ते अक्षरशः “सर्व जगात,” म्हणजे उष्णकटीबंधातील जंगलांपासून बर्फाळ टुंड्रा प्रदेशापर्यंत, डोंगराळ भागांत, वाळवंटांत, शहरांत आणि सर्वात दुर्गम खेड्यापाड्यांतही प्रचार कार्य करत आहेत. (मत्त. २४:१४) देवाच्या पाठिंब्याशिवाय हे कधीही शक्य झाले नसते.

“सत्यज्ञान” वाढते

१४. छापील साहित्याच्या माध्यमातून “सत्यज्ञानाचा” कशा प्रकारे सर्वदूर प्रसार झाला आहे?

१४ सत्यज्ञानाच्या वाढीत सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍या अनेकांचे योगदान आहे. पण, छापील साहित्यानेही सत्यज्ञानाच्या वाढीला हातभार लावला आहे. १८७९ सालच्या जुलै महिन्यात बायबल विद्यार्थ्यांनी या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित केला होता. त्याचे शीर्षक झायन्स वॉच टावर ॲन्ड हेरल्ड ऑफ ख्राइस्ट्‌स प्रेझेन्स असे होते. एका व्यावसायिक कंपनीकडून त्या अंकाच्या ६,००० प्रती फक्‍त इंग्रजी भाषेत छापण्यात आल्या. सत्तावीस वर्षांच्या चार्ल्झ टेझ रस्सल यांना नियतकालिकाचे संपादक म्हणून निवडण्यात आले आणि इतर पाच अनुभवी बायबल विद्यार्थी नियतकालिकासाठी नियमितपणे लेख लिहू लागले. आज टेहळणी बुरूज १९५ भाषांतून प्रकाशित केले जाते. ते पृथ्वीवरील सर्वात जास्त वितरण केले जाणारे नियतकालिक असून, त्याच्या प्रत्येक अंकाच्या ४,२१,८२,००० प्रती वितरित केल्या जातात. त्याच्या पाठोपाठ अवेक! नियतकालिकाचा क्रमांक लागतो, ज्याच्या ४,१०,४२,००० प्रती ८४ भाषांतून वितरित केल्या जातात. शिवाय, दरवर्षी जवळजवळ एक कोटी पुस्तके व बायबल छापली जातात.

१५. आपल्या साहित्याच्या छपाईचा खर्च कसा चालवला जातो?

१५ प्रचंड मोठ्या प्रमाणात केले जात असलेले हे कार्य ऐच्छिक अनुदानांच्या साहाय्याने चालवले जाते. (मत्तय १०:८ वाचा.) मुद्रणयंत्रे, कागद, शाई व छपाईसाठी लागणाऱ्‍या इतर साहित्यासाठी किती खर्च लागतो याची माहिती असलेल्या मुद्रण व्यवसायातील लोकांना ही गोष्ट अशक्यप्राय वाटते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जगभरातील कार्यासाठी खरेदी करणाऱ्‍या विभागाचे एक बांधव सांगतात: “इतक्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी व एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी संस्था, ऐच्छिक अनुदानांच्या साहाय्याने चालवली जाते हे ऐकून आपल्या प्रिंटिंग प्रेस पाहायला येणारे लोक अचंबित होतात. तसेच, बेथेलमध्ये काम करणारे बहुतेक जण तरुण वयाचे व आनंदी आहेत याचेही त्यांना अतिशय आश्‍चर्य वाटते.”

परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल

१६. “सत्यज्ञान” प्रकट करण्याचा उद्देश काय आहे?

१६ एका अतिशय चांगल्या उद्देशासाठी “सत्यज्ञानाचा” इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. देवाची अशी इच्छा आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीम. २:३, ४) लोकांना यहोवाची योग्य प्रकारे उपासना करता यावी आणि त्यांना त्याचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी सत्याचे ज्ञान घेतले पाहिजे. यहोवाची हीच इच्छा आहे. “सत्यज्ञान” प्रकट करण्याद्वारे यहोवाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या विश्‍वासू शेषजनांना एकत्रित केले आहे. तसेच, तो “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे” यांच्यामधून, पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांचा एक “मोठा लोकसमुदाय” एकत्रित करत आहे.—प्रकटी. ७:९.

१७. खऱ्‍या उपासनेत होत असलेली वाढ काय दाखवते?

१७ मागील १३० वर्षांत खऱ्‍या उपासनेत झालेली वाढ अगदी स्पष्टपणे दाखवून देते की यहोवा व त्याचा नियुक्‍त राजा, येशू ख्रिस्त पृथ्वीवरील खऱ्‍या उपासकांबरोबर आहेत. ते त्यांचे मार्गदर्शन व संरक्षण करत आहेत, त्यांना संघटित करत आहेत व प्रशिक्षित करत आहेत. देवाच्या लोकांमध्ये होत असलेली वाढ याचीही खातरी देते की भविष्याकरता यहोवाने केलेल्या सर्व प्रतिज्ञा अवश्‍य पूर्ण होतील. “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यश. ११:९) तो काळ येईल तेव्हा मानव किती अद्‌भुत आशीर्वाद उपभोगतील!

[तळटीपा]

^ परि. 6 जेहोवाज विट्‌नेसेस—फेथ इन ॲक्शन, पार्ट १: आउट ऑफ डार्कनेस आणि जेहोवाज विट्‌नेसेस—फेथ इन ॲक्शन, पार्ट २: लेट्‌ द लाइट शाइन या डीव्हीडी पाहिल्यास तुम्हाला हा विषय आणखी चांगल्या प्रकारे समजेल.

^ परि. 13 यशायाह की भविष्यवाणी—सारे जगत के लिए उजियाला भाग II, पृष्ठ ३२० पाहा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[६ पानांवरील चित्र]

सुरुवातीचे बायबल विद्यार्थी देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास उत्सुक असलेले नम्र लोक होते

[७ पानांवरील चित्र]

“सत्यज्ञानाचा” प्रसार करण्यासाठी तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांची यहोवा कदर करतो