विविध ईश्वरशासित प्रशाला यहोवाच्या प्रेमाचा पुरावा
विविध ईश्वरशासित प्रशाला यहोवाच्या प्रेमाचा पुरावा
यहोवा देव आपला थोर शिक्षक आहे. (ईयो. ३६:२२) प्रेम त्याला इतरांना शिकवण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी प्रवृत्त करते. उदाहरणार्थ, येशूवर त्याचे गहिरे प्रेम असल्यामुळे तो “स्वतः जे काही करितो” ते सर्व येशूला दाखवतो. (योहा. ५:२०) आपल्यासाठी, म्हणजे त्याच्या साक्षीदारांसाठी असलेल्या प्रेमामुळे यहोवाने आपल्याला “सुशिक्षितांची जिव्हा” दिली आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे गौरव आणि इतरांना मदत करता येईल.—यश. ५०:४.
यहोवाच्या प्रेमाचे अनुकरण करण्याद्वारे, नियमन मंडळाची शिक्षण समिती दहा ईश्वरशासित प्रशालांचा उपयोग करते. ज्यांना या प्रशालांमध्ये उपस्थित राहण्याची इच्छा आहे, त्याचबरोबर ज्यांची परिस्थिती अनुमती देते अशांना या प्रशालांद्वारे प्रशिक्षित केले जाते. या प्रशाला यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहेत असे तुम्हाला वाटते का?
सध्या चालवल्या जात असलेल्या ईश्वरशासित प्रशालांची संक्षिप्त माहिती घेऊ या आणि या प्रशालांना उपस्थित राहिलेल्या काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ या. ही माहिती वाचल्यानंतर स्वतःला विचारा, ‘देवाकडील या शिक्षणाचा मला कशा प्रकारे फायदा करून घेता येईल?’
ईश्वरशासित प्रशिक्षणाचा पुरेपूर फायदा घ्या
यहोवा “प्रीतीचा” देव असल्यामुळे तो आपल्याला जे प्रशिक्षण देतो त्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ मिळतो, तसेच आव्हानांना सामोरे जाण्यास आणि सेवाकार्यात खरा आनंद अनुभवण्यास मदत मिळते. (२ करिंथ. १३:११) पहिल्या शतकातील शिष्यांप्रमाणे आपण इतरांना मदत करण्यास, म्हणजेच आपल्याला आज्ञा दिलेल्या गोष्टी त्यांना “पाळावयास” शिकवण्यास सुसज्ज आहोत.—मत्त. २८:२०.
आपल्याला जरी या सर्व प्रशालांना उपस्थित राहणे शक्य नसले, तरी आपण यांपैकी एका किंवा यापेक्षा अधिक प्रशालांपासून फायदा मिळवू शकतो. आणि त्यांतून मिळणाऱ्या बायबलवर आधारित मार्गदर्शनाचा अवलंब करू शकतो. त्याचबरोबर आपण उत्तम प्रशिक्षण मिळालेल्या बंधुभगिनींसोबत क्षेत्रात सहभागी होऊन, आपले सेवाकार्य अधिक परिणामकारक बनवू शकतो.
स्वतःला विचारा, ‘या प्रशालांपैकी कोणत्या प्रशालेला उपस्थित राहण्यासाठी माझी परिस्थिती अनुमती देते?’
या अनमोल प्रशालांना पाठिंबा देणे आणि त्यांतून शिकणे हा एक बहुमान आहे असे यहोवाचे उपासक मानतात. तुम्हाला जे प्रशिक्षण मिळेल त्यामुळे तुम्ही देवाच्या जवळ याल आणि देवाच्या सेवेतील तुमच्या जबाबदाऱ्या—खासकरून, सुवार्ता सांगण्याची महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करण्यात तुम्हाला मदत मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो.
[१३-१७ पानांवरील चौकट/चित्रे]
विविध ईश्वरशासित प्रशाला
ईश्वरशासित सेवा प्रशाला
उद्दिष्ट: प्रचारकांना प्रभावीपणे सुवार्ता सांगण्यासाठी आणि शिकवण्यासाठी प्रशिक्षित करणे.
कालावधी: सतत चालणारी प्रशाला.
ठिकाण: स्थानीय राज्य सभागृह.
पात्रता: जे नियमितपणे सभांना उपस्थित राहतात, बायबल शिकवणी मान्य करतात आणि ख्रिस्ती तत्त्वांचा आपल्या जीवनात अवलंब करतात असे सर्व जण.
प्रवेश: ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांचा या प्रशालेत समावेश करतो.
शॅरन, जी एमायोट्रोफिक लॅट्रल स्क्लेरोसिस (ALS) या आजाराने अधू झाली आहे ती म्हणते: “ईश्वरशासित सेवा प्रशालेमुळं मी संशोधन करण्यास आणि तर्कसंगत रीतीनं माहिती सादर करण्यास शिकले. त्याचबरोबर मी माझ्याच नव्हे, तर इतरांच्याही आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यास शिकले.”
आर्नी, जे बऱ्याच वर्षांपासून प्रवासी पर्यवेक्षक आहेत ते म्हणतात: “मी लहानपणापासूनच अडखळत बोलायचो आणि समोरच्या व्यक्तीकडे पाहून बोलणं मला कठीण जायचं. या प्रशालेमुळं मला आत्मविश्वास मिळाला की मीही काही करू शकतो. यहोवाच्या मदतीनं या प्रशिक्षणाद्वारे, श्वासोच्छ्वासावर नियंत्रण कसं करायचं आणि लक्ष एकाग्र कसं करायचं हे मला शिकायला मिळालं आहे. सेवाकार्यात आणि मंडळीत मी यहोवाचं गौरव करू शकतो यासाठी खूप आभारी आहे.”
बेथेल नवोदितांसाठी प्रशाला
उद्दिष्ट: बेथेल नवोदितांना त्यांच्या बेथेल सेवेत यशस्वी होण्यास साहाय्य करणे.
कालावधी: दर आठवड्यात ४५ मिनिटे याप्रमाणे सोळा आठवडे.
ठिकाण: बेथेल.
पात्रता: बेथेल कुटुंबाचे स्थायी सदस्य किंवा तात्पुरते स्वयंसेवक या नात्याने एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी स्वीकारण्यात आलेले.
प्रवेश: बेथेल कुटुंबातील नव्या सदस्यांचा आपोआप समावेश केला जातो.
डमीट्रीयस, जे या प्रशालेत १९८० च्या दशकात उपस्थित राहिले होते ते म्हणतात: “या प्रशालेमुळं मला अभ्यास करण्याची सवय लागली आणि बेथेलमध्ये दीर्घकाळ सेवा करण्यासाठी या प्रशालेनं मला तयार केलं. प्रशालेतील मार्गदर्शक, अभ्यासक्रम, आणि मिळालेले व्यावहारिक सल्ले यांवरून मला याची खातरी पटली की यहोवाला माझी काळजी आहे आणि बेथेल सेवेत यशस्वी होण्यास मला मदत करण्याची त्याची इच्छा आहे.”
केटलिन म्हणते: “मला सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर म्हणजेच आध्यात्मिक व्यक्ती बनण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळाली. नवोदितांसाठी असणाऱ्या या प्रशालेमुळं यहोवाबद्दल, त्याच्या घराबद्दल, आणि त्याच्या संघटनेबद्दल माझी कदर वाढली आहे.”
राज्य सेवा प्रशाला
उद्दिष्ट: प्रवासी पर्यवेक्षकांना, वडिलांना आणि कधीकधी सेवा सेवकांना मंडळीत देखरेख करण्यासाठी व संघटनेतील इतर जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे. (प्रे. कृत्ये २०:२८) या प्रशालेत, सध्याच्या परिस्थितींविषयी, होणाऱ्या बदलांविषयी, आणि मंडळीच्या गरजांविषयी मार्गदर्शन केले जाते. ही प्रशाला नियमन मंडळाने ठरवल्याप्रमाणे दर दोन-चार वर्षांनी आयोजित केली जाते.
कालावधी: अलीकडील वर्षांत ही प्रशाला प्रवासी पर्यवेक्षकांसाठी दोन ते अडीच दिवसांकरता, वडिलांसाठी दीड दिवसाकरता, तर सेवा सेवकांसाठी एक दिवसाकरता चालवली गेली आहे.
ठिकाण: सहसा राज्य सभागृह किंवा संमेलन गृह.
पात्रता: प्रवासी पर्यवेक्षक, वडील किंवा सेवा सेवक असले पाहिजेत.
प्रवेश: वडिलांना आणि सेवा सेवकांना विभागीय पर्यवेक्षकाद्वारे, तर प्रवासी पर्यवेक्षकांना शाखा कार्यालयाद्वारे आमंत्रित केले जाते.
“या प्रशालेत कमी वेळात भरपूर माहिती देण्यात येत असली, तरी वडिलांना यहोवाची सेवा आनंदानं आणि खंबीरपणे करत राहण्यास मदत मिळते. या प्रशिक्षणामुळं नवीन वडिलांना आणि बऱ्याच वर्षांपासून ही जबाबदारी सांभाळत असलेल्यांना कळपाची चांगल्या प्रकारे देखभाल करणं आणि एकमेकांशी ‘एकमतानं’ जोडलेले राहून काम करणं शक्य होतं.”—क्विन (खाली).
“या प्रशिक्षणात, आध्यात्मिक गोष्टींची चांगली समज, हानिकारक गोष्टींविषयी इशारा, आणि कळपाची देखभाल करण्याविषयी व्यावहारिक सूचना या तिन्ही गोष्टींकडे पुरेसं लक्ष देण्यात आलं.”—मायकल.
पायनियर सेवा प्रशाला
उद्दिष्ट: पायनियरांना त्यांची “सेवा पूर्ण” करण्यास मदत करणे.—२ तीम. ४:५.
कालावधी: दोन आठवडे.
ठिकाण: शाखा कार्यालय ठरवते; सहसा राज्य सभागृहात ही प्रशाला चालवली जाते.
पात्रता: निदान एका वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून सामान्य पायनियर असायला हवेत. *
प्रवेश: पात्रता पूर्ण करणाऱ्या पायनियरांचा आपोआप समावेश केला जातो आणि याबाबतीत त्यांचे विभागीय पर्यवेक्षक माहिती देतात.
लिली (उजवीकडे) म्हणते, “माझ्या जीवनात येणाऱ्या आणि सेवाकार्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी मला या प्रशालेची मदत झाली आहे. माझ्या अभ्यासात, शिकवण्यात आणि बायबलचा उपयोग करण्यात कमालीची सुधारणा झाली आहे. इतरांना मदत करण्यास, वडिलांना पाठिंबा देण्यास, मंडळीच्या वाढीस हातभार लावण्यास आता मी पूर्वीपेक्षा जास्त सक्षम आहे.”
ब्रेन्डा, जी या प्रशालेला दोन वेळा उपस्थित राहिली आहे ती म्हणते: “या प्रशिक्षणामुळं उपासनेत पूर्ण अंतःकरणानं सामील होण्याचं, माझा विवेक बळकट करण्याचं, आणि इतरांना मदत करण्याचं मला प्रोत्साहन मिळालं आहे. खरंच, यहोवा खूप उदार मनाचा आहे.”
[तळटीप]
^ परि. 40 ही प्रशाला आयोजित करण्यासाठी पुरेसे नवीन पायनियर नसतील, तर जे पायनियर मागील पाच वर्षांत या प्रशालेला उपस्थित राहिलेले नाहीत अशांना पुन्हा उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.
मंडळीतील वडिलांकरता प्रशाला
उद्दिष्ट: वडिलांना मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी आणि यहोवाच्या उपासनेत त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे याची गहन समज मिळवण्यासाठी मदत करणे.
कालावधी: पाच दिवस.
ठिकाण: शाखा कार्यालय ठरवते; सहसा राज्य सभागृह किंवा संमेलन गृह.
पात्रता: वडील असले पाहिजेत.
प्रवेश: वडिलांना शाखा कार्यालयातर्फे आमंत्रित केले जाते.
अमेरिकेत झालेल्या ९२ व्या वर्गास उपस्थित राहिलेल्या काहींच्या प्रतिक्रिया:
“या प्रशालेचा मला खरंच खूप फायदा झाला आहे; यामुळं स्वतःचं परीक्षण करण्यास आणि यहोवाच्या मेंढरांची चांगल्या प्रकारे देखभाल कशी करावी हे समजून घेण्यास मला मदत मिळाली.”
“शास्त्रवचनांतील मुख्य मुद्द्यांवर जोर देण्याद्वारे इतरांना आणखी प्रोत्साहन देण्यास मी आता तयार झालो आहे.”
“मला या प्रशिक्षणात जे शिकायला मिळालं त्याचा उपयोग मी माझ्या उरलेल्या सबंध आयुष्यात करणार आहे.”
प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशाला
उद्दिष्ट: “उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम” घेणारे या नात्याने विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांना अधिक प्रभावीपणे मंडळ्यांची सेवा करण्यास मदत करणे.—१ तीम. ५:१७; १ पेत्र ५:२, ३.
कालावधी: दोन महिने.
ठिकाण: शाखा कार्यालयाद्वारे ठरवले जाते.
पात्रता: बांधव विभागीय किंवा प्रांतीय पर्यवेक्षक असला पाहिजे.
प्रवेश: प्रवासी पर्यवेक्षकांना आणि त्यांच्या पत्नींना शाखा कार्यालयातर्फे आमंत्रित केले जाते.
“संघटनेवर असणाऱ्या येशूच्या मस्तकपदाबद्दल आमची कदर वाढली आहे. आम्ही सेवा करत असलेल्या बांधवांना प्रोत्साहन देण्याची आणि प्रत्येक मंडळीत एकता बळकट करण्याची गरज आहे हे पाहण्यास आम्हाला मदत मिळाली आहे. या प्रशालेमुळं आमच्या मनावर हे बिंबवलं गेलं आहे की प्रवासी पर्यवेक्षक सल्ला देत असला किंवा वेळप्रसंगी एखादी चूकही दुरुस्त करत असला, तरी यहोवाचं बांधवांवर खूप प्रेम आहे याची त्यांना जाणीव करून देणं, हाच त्याचा मुख्य हेतू आहे.”—जोएल, पहिला वर्ग, १९९९.
अविवाहित बांधवांकरता बायबल प्रशाला
उद्दिष्ट: अविवाहित वडील आणि सेवा सेवक यांना यहोवाच्या संघटनेत अधिक जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे. पदवीधर झालेल्यांपैकी बहुतेकांना त्यांच्याच देशात जेथे गरज आहे तेथे पाठवले जाईल. तर काहींना, त्यांनी तयारी दाखवल्यास दुसऱ्या देशात नियुक्त केले जाऊ शकते. काही पदवीधर तात्पुरते खास पायनियर म्हणून नवीन क्षेत्रांत कार्याची सुरुवात करू शकतात आणि दुर्गम भागांत सेवाकार्य वाढवू शकतात.
कालावधी: दोन महिने.
ठिकाण: शाखा कार्यालय ठरवते; सहसा राज्य सभागृह किंवा संमेलन गृह.
पात्रता: अविवाहित बांधव २३ ते ६२ या वयोगटातील असावेत. त्यांचे स्वास्थ्य चांगले असावे आणि ख्रिस्ती बांधवांची सेवा करण्याची आणि जेथे जास्त गरज आहे तेथे प्रचार कार्याला हातभार लावण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे. (मार्क १०:२९, ३०) त्यांनी कमीतकमी दोन वर्षे सामान्य पायनियर म्हणून सेवा केलेली असावी आणि वडील किंवा सेवा सेवक म्हणून कमीतकमी दोन वर्षे सलग सेवा केलेली असावी.
प्रवेश: इच्छुक असणाऱ्यांसाठी विभागीय संमेलनात सभा घेतली जाईल आणि अधिक माहिती पुरवली जाईल.
अमेरिकेत झालेल्या २३ व्या वर्गास उपस्थित झालेला रिक म्हणतो, “या प्रशालेच्या अभ्यासात मी स्वतःला झोकून दिल्यामुळं यहोवाच्या पवित्र आत्म्यानं माझ्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणला. जेव्हा यहोवा तुम्हाला एखादी जबाबदारी देतो तेव्हा ती पूर्ण करण्यास तो तुम्हाला पाठबळही देतो. मी स्वतःच्या नव्हे, तर यहोवाच्या इच्छेवर लक्ष केंद्रित केलं, तर तो मला नक्की बळ देईल हे मी शिकलो.”
जर्मनीत सेवा करणारा आन्द्रेआस म्हणतो, “यहोवाची संघटना आज किती अद्भुत रीत्या काम करत आहे हे समजण्यास मला मदत मिळाली. या प्रशिक्षणामुळं मला भविष्यातील जबाबदाऱ्यांची तयारी करण्यास मदत मिळाली. त्याचबरोबर, बायबलमधील अनेक उदाहरणांवरून मी एक मूलभूत सत्य शिकलो: यहोवाची आणि माझ्या बांधवांची सेवा करण्यातच खरा आनंद आहे.”
ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला
उद्दिष्ट: यहोवा आणि त्याच्या संघटनेसाठी अधिकाधिक कार्य करण्यासाठी विवाहित जोडप्यांना खास प्रशिक्षण देणे. पदवीधर झालेल्यांपैकी बहुतेकांना त्यांच्याच देशात जेथे गरज आहे तेथे पाठवले जाईल. तर काहींना, त्यांनी तयारी दाखवल्यास दुसऱ्या देशात नियुक्त केले जाऊ शकते. काही पदवीधर तात्पुरते खास पायनियर म्हणून नवीन क्षेत्रांत कार्याची सुरुवात करू शकतात आणि दुर्गम भागांत सेवाकार्य वाढवू शकतात.
कालावधी: दोन महिने.
ठिकाण: ही प्रशाला अमेरिकेत चालवली जाते आणि सप्टेंबर २०१२ पासून ती निवडक शाखा कार्यालयांच्या क्षेत्रांतसुद्धा चालवली जाईल, सहसा संमेलन गृहात किंवा राज्य सभागृहात.
पात्रता: २५ ते ५० या वयोगटातील व चांगले स्वास्थ्य असणारी विवाहित जोडपी. जेथे गरज आहे तेथे सेवा करण्यास जाण्यासाठी त्यांची परिस्थिती अनुकूल असावी आणि “हा मी आहे, मला पाठीव” अशी मनोवृत्ती असावी. (यश. ६:८) त्यांच्या विवाहाला कमीतकमी दोन वर्षे पूर्ण झालेली असावीत आणि पूर्ण-वेळेच्या सेवेत निदान दोन वर्षे सलग पूर्ण केलेली असावीत. पतीने वडील किंवा सेवा सेवक म्हणून कमीतकमी दोन वर्षे सलग सेवा केलेली असावी.
प्रवेश: इच्छुक असणाऱ्यांसाठी प्रांतीय अधिवेशनात सभा घेतली जाईल आणि माहिती पुरवली जाईल. जर तुमच्या देशातील अधिवेशनांत ही सभा झाली नाही, आणि जर तुम्हाला या प्रशालेसाठी अर्ज करायचा असेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही शाखा कार्यालयाला लिहू शकता.
“या आठ आठवड्यांत आमचं जीवन पार बदलून गेलं. ज्या जोडप्यांना यहोवाची आणखी जास्त सेवा करायचीय त्यांच्यासाठी ही खरंच एक सुवर्णसंधी आहे. आम्ही जीवनात समतोल राखायचं ठरवलं आहे, जेणेकरून आम्हाला आमच्या वेळेचा सदुपयोग करता येईल.”—एरिक आणि कॉरीना (खाली), पहिला वर्ग, २०११.
वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला
उद्दिष्ट: विद्यार्थ्यांना, जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागांत मिशनरी सेवा करण्यासाठी, प्रवासी पर्यवेक्षक किंवा बेथेल सदस्य म्हणून कार्य करण्यासाठी प्रशिक्षित करणे. या प्रशालेचे ध्येय आहे, क्षेत्रात प्रचार कार्याला व शाखेत संघटनात्मक व्यवस्थेला हातभार लावणे.
कालावधी: पाच महिने.
ठिकाण: वॉचटावर शैक्षणिक केंद्र, पॅटरसन, न्यू यॉर्क, अमेरिका.
पात्रता: विवाहित जोडपी जी आधीपासूनच एखाद्या खास पूर्ण-वेळेच्या सेवेत आहेत, जसे की याआधी या प्रशालेला उपस्थित न राहिलेले मिशनरी, खास पायनियर, प्रवासी पर्यवेक्षक, किंवा बेथेल कुटुंबातील सदस्य. यांपैकी कोणत्याही सेवेत त्यांनी एकत्र मिळून निदान तीन वर्षे सलग पूर्ण केलेली असावीत. त्यांना अस्खलितपणे इंग्रजी बोलता, वाचता, आणि लिहिता आली पाहिजे.
प्रवेश: शाखा समितीद्वारे जोडप्यांना अर्ज करण्यास सांगितले जाऊ शकते.
अमेरिकेचे लॉडे आणि मॉनीक आता आफ्रिकेत सेवा करत आहेत. लॉडे म्हणतो, “गिलियड प्रशालेनं आम्हाला जगात कुठंही जाण्यास आणि आमच्या प्रिय बांधवांबरोबर सेवा करण्यास तयार केलं आहे.”
मॉनीक म्हणते: “देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टींचा मी अवलंब करत असल्यामुळं मला माझ्या सेवेत खूप आनंद मिळत आहे. हा आनंद यहोवाच्या प्रेमाचा आणखी पुरावा आहे असं मी समजते.”
शाखा समिती सदस्यांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशाला
उद्दिष्ट: शाखा समित्यांतील सदस्यांना बेथेल गृहांची देखरेख करण्यासाठी, मंडळ्यांना प्रभावित करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी, आणि विभागांची व प्रांतांची देखरेख करण्यासाठी प्रशिक्षित करणे. त्याचबरोबर साहित्याचे भाषांतर, छपाई, आणि साहित्य मंडळ्यांना पाठवणे याविषयीदेखील ते शिकतात.
कालावधी: दोन महिने.
ठिकाण: वॉचटावर शैक्षणिक केंद्र, पॅटरसन, न्यू यॉर्क, अमेरिका.
पात्रता: शाखा समितीचे सदस्य किंवा राष्ट्र समितीचे (कंट्री कमिटी) सदस्य असलेले किंवा ज्यांना या समित्यांमध्ये सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात येत आहे असे बांधव.
प्रवेश: बांधवांना आणि त्यांच्या पत्नींना नियमन मंडळातर्फे आमंत्रित केले जाते.
२५ व्या वर्गातील, लोएल आणि कारा नायजीरियात सेवा करत आहेत. लोएल म्हणतो: “मी कितीही व्यस्त असलो किंवा मला कोणतंही काम देण्यात आलं असलं, तरी यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी, मी जे काही करतो ते त्याच्या इच्छेनुसार असणं महत्त्वाचं आहे याची मला आठवण करून देण्यात आली. यहोवा ज्या प्रकारे त्याच्या सेवकांना प्रेमानं वागवतो त्याच प्रकारे आपणही इतरांशी प्रेमानं वागावं यावर या प्रशालेत जोर देण्यात आला.”
कारा म्हणते: “या प्रशालेतून एक मुद्दा जो मी शिकले, तो म्हणजे मला जर एखादा विषय सहजासहजी समजावून सांगता येत नसेल, तर इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करण्याआधी मला स्वतः त्याविषयी अभ्यास करण्याची गरज आहे.”