“आजपर्यंत ऐकण्यात आलेला सर्वोत्तम संदेश”
आमच्या संग्रहातून
“आजपर्यंत ऐकण्यात आलेला सर्वोत्तम संदेश”
कॅनडातील सॅस्केचिवन प्रांतात असलेल्या सॅस्केटून येथे ६०-फूट (१८ मि.) लांबीच्या ओंडक्यांकडे बोट दाखवून जॉर्ज नेश यांनी विचारले, “हे सर्व कशासाठी?” त्या तुळया असल्याचे आणि पहिल्या महायुद्धादरम्यान संदेश देण्याकरता टॉवर बांधण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बंधू नेश यांनी नंतर असे म्हटले: “या ओंडक्यांचा वापर आपण रेडिओ टॉवर उभारण्यासाठी करू शकतो असा विचार माझ्या मनात आला आणि अशा प्रकारे देवाच्या राज्याचा संदेश घोषित करण्यासाठी एक आकाशवाणी केंद्र असावे ही कल्पना उदयास आली.” याच्या केवळ एका वर्षानंतर, म्हणजे १९२४ मध्ये सीएचयूसी नावाचे आकाशवाणी केंद्र सुरू झाले. कॅनडात धार्मिक विषय प्रसारित करणाऱ्या अगदी सुरुवातीच्या आकाशवाणी केंद्रांपैकी हे एक होते.
कॅनडाचे क्षेत्रफळ जवळजवळ युरोपच्या क्षेत्रफळाइतके असल्यामुळे, येथे साक्ष देण्यासाठी आकाशवाणी अगदी योग्य माध्यम होते. सॅस्केटूनमध्ये असलेल्या आकाशवाणी केंद्रात काम केलेल्या फ्लॉरेन्स जॉन्सन हिने असे म्हटले: “आपल्या रेडिओ प्रसारणांमुळे सत्य अशा अनेक लोकांपर्यंत पोचले, ज्यांना आपण वैयक्तिक रीत्या भेटू शकलो नसतो. आणि रेडिओ त्या वेळी नवीन गोष्ट होती, त्यामुळे रेडिओवरून प्रसारित होणारा कोणताही कार्यक्रम ऐकण्यास लोक उत्सुक असायचे.” १९२६ पर्यंत कॅनडातील चार शहरांमध्ये बायबल विद्यार्थ्यांची (त्या काळी यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी म्हटले जायचे) स्वतःची आकाशवाणी केंद्रे होती. *
या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणारा एखादा कार्यक्रम तुम्ही लावला असता, तर तुम्हाला काय ऐकायला मिळाले असते? अनेकदा, स्थानिक मंडळीतील बंधुभगिनी वाद्यांच्या साथीने आणि कधीकधी छोट्याशा ऑर्केस्ट्राच्या साथीने गीते सादर करायची. अर्थातच, बांधव बायबलमधील उपदेश सांगायचे आणि बायबलवर आधारित चर्चांचे संचालनदेखील करायचे. या चर्चांमध्ये भाग घेतलेल्या एमी जोन्स हिने आठवून असे सांगितले: “क्षेत्रसेवेत असताना, मी घरमालकांना आपला परिचय करून द्यायचे तेव्हा कधीकधी घरमालक म्हणायचे, ‘हो हो, मी रेडिओवर तुमचा आवाज ऐकलाय.’ ”
नोवा स्कॉशिया प्रांतातील हॅलिफॅक्स येथील बायबल विद्यार्थ्यांनी त्या काळी एक नव्या प्रकारचा कार्यक्रम सुरू केला. यात श्रोते फोन करून बायबल विषयांवर प्रश्न विचारू शकत होते. एका बांधवाने असे लिहिले: “या प्रकारच्या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरघोस
प्रतिसाद मिळाला. इतके फोन यायचे की सर्वांचे फोन घेणे शक्यच होत नसे.”प्रेषित पौलाप्रमाणेच, बायबल विद्यार्थ्यांच्या संदेशाला लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. (प्रे. कृत्ये १७:१-५) काही श्रोत्यांनी संदेशामध्ये आवड दाखवली. उदाहरणार्थ, बायबल विद्यार्थांनी आकाशवाणीवर स्टडीज इन द स्क्रिप्चर्स या पुस्तकाचा उल्लेख केला, तेव्हा हेक्टर मार्शल यांनी पुस्तकाचे सहा खंड मागवले. त्यांनी नंतर लिहिले: “मला वाटलं होतं सण्डे स्कूलमध्ये यांचा मला उपयोग होईल.” पण, हेक्टर यांनी पहिलाच खंड वाचून पूर्ण केल्यावर चर्च सोडण्याचा निर्णय घेतला. ते एक आवेशी सुवार्तिक बनले. आणि १९९८ मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी विश्वासूपणे यहोवाची सेवा केली. नोवा स्कॉशियाच्या पूर्व भागात “देवाचे राज्य, जगाची आशा” हे भाषण प्रसारित झाल्यावर दुसऱ्या दिवशी, कर्नल जे. ए. मॅकडॉनल्ड यांनी एका स्थानिक बांधवाला असे सांगितले: “केप ब्रेटन बेटावरील लोकांनी काल जो संदेश ऐकला तो जगाच्या या भागात आजपर्यंत ऐकण्यात आलेला सर्वोत्तम संदेश होता.”
दुसरीकडे पाहता, चर्चचे पाळक संतापले. हॅलिफॅक्समधील काही कॅथलिकांनी बायबल विद्यार्थ्यांचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या आकाशवाणी केंद्रांना उडवून टाकण्याची धमकी दिली. धार्मिक पुढाऱ्यांच्या आग्रहावरून, १९२८ मध्ये सरकारने बायबल विद्यार्थ्यांच्या मालकीचे असलेल्या आकाशवाणी केंद्रांच्या परवान्यांचे नविनीकरण करणार नसल्याची अचानक घोषणा केली. प्रतिक्रिया म्हणून बंधुभगिनींनी अशा अन्यायी कृत्याच्या विरोधात हू ओन्स दी एयर? (आकाश कोणाच्या मालकीचे आहे?) या शीर्षकाचा छापील संदेश वितरित केला. तरीसुद्धा, सरकारी अधिकाऱ्यांनी बायबल विद्यार्थ्यांच्या प्रसारण परवान्यांचे नविनीकरण करण्याचे नाकारले.
यामुळे कॅनडातील यहोवाच्या सेवकांच्या लहान गटाचा आवेश कमी झाला का? इजाबेल वेनराइट हिने असे म्हटले: “सुरुवातीला शत्रूंना नक्कीच वाटलं असावं की त्यांना मोठं यश आलं आहे. पण, मला माहीत आहे की आकाशवाणीद्वारे साक्ष देणं आम्ही पुढंही चालू ठेवावं अशी यहोवाची इच्छा असती, तर त्यानं असं घडूच दिलं नसतं. मग याचा कदाचित असा अर्थ होता की आम्ही राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या आणि जास्त प्रभावकारी मार्गाचा अवलंब करावा.” साक्ष देण्याकरता सर्वस्वी आकाशवाणीवर अवलंबून राहण्याऐवजी, कॅनडातील बायबल विद्यार्थी लोकांच्या घरी जाऊन साक्ष देण्यावर लक्ष केंद्रित करू लागले. पण, आकाशवाणी प्रसारणाच्या त्या काळात “आजपर्यंत ऐकण्यात आलेला सर्वोत्तम संदेश” घोषित करण्यात या माध्यमाने नक्कीच एक जबरदस्त भूमिका बजावली.—कॅनडातील आमच्या संग्रहातून.
[तळटीप]
^ परि. 4 आकाशवाणीवरून साक्ष देण्यासाठी कॅनडातील बांधवांनी दुसऱ्या व्यावसायिक आकाशवाणी केंद्रांचाही उपयोग केला.
[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]
“इतके फोन यायचे की सर्वांचे फोन घेणे शक्यच होत नसे”
[३२ पानांवरील चित्रे]
(१) ॲल्बर्टातील एडमंटन येथील केंद्र (२) ऑन्टेरियोतील टराँटो येथील प्रक्षेपण केंद्रात एक बांधव पॉवर ट्यूब्स हाताळताना (३) सॅस्केचिवनमधील सॅस्केटून येथील सीएचयूसी स्टुडिओ