तुम्ही भरवशालायक कारभारी आहा!
तुम्ही भरवशालायक कारभारी आहा!
“तुम्ही स्वतःचे मालक नाही.” —१ करिंथ. ६:१९.
तुमचे उत्तर काय असेल?
प्राचीन काळात कारभाऱ्यांची भूमिका काय होती?
देवाच्या सर्व कारभाऱ्यांना कोणत्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत?
आपल्याला मिळालेल्या कारभारीपणाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?
१. स्वातंत्र्याबद्दल जगातील लोकांचा काय दृष्टिकोन आहे?
जवळजवळ २,५०० वर्षांपूर्वी एका ग्रीक नाटककाराने असे लिहिले: “कोणीही स्वेच्छेने दास बनत नाही.” या विधानाशी आज अनेक लोक लगेच सहमत होतील. दासत्व या शब्दावरून अशा लोकांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते, ज्यांच्यावर जुलूम केला जातो, जे बंधनांत आहेत, आणि ज्यांच्या कामामुळे व त्यागामुळे त्यांना नव्हे, तर त्यांच्या मालकांना व त्यांच्यावर अधिकार चालवणाऱ्यांना फायदा होतो.
२, ३. (क) स्वेच्छेने ख्रिस्ताचे सेवक, किंवा दास बनणाऱ्यांना कोणते स्थान लाभते? (ख) कारभारीपणाबाबत आपण कोणत्या प्रश्नांचे परीक्षण करणार आहोत?
२ पण, येशूने सांगितले की त्याचे शिष्य नम्र सेवक किंवा दास असतील. तरीसुद्धा, खऱ्या ख्रिश्चनांच्या बाबतीत हे दासत्व कमीपणा दाखवणारे किंवा जुलमी नाही. उलट, या दासांना सन्मानाचे, भरवशाचे व आदराचे स्थान आहे. उदाहरणार्थ, येशूचा मृत्यू होण्याच्या थोड्याच काळाआधी त्याने एका दासाबद्दल काय म्हटले होते त्याकडे लक्ष द्या. ख्रिस्ताने भाकीत केले होते की तो एका “विश्वासू व बुद्धिमान दासाला” काम सोपवून देईल.—मत्त. २४:४५-४७.
३ उल्लेखनीय म्हणजे, लूकच्या अहवालात या दासाला “कारभारी” म्हटले आहे. (लूक १२:४२-४४ वाचा.) आज जिवंत असलेले बहुतेक विश्वासू ख्रिस्ती त्या कारभारी वर्गाचे सदस्य नाहीत. पण, बायबलमध्ये सांगितले आहे की देवाची सेवा करणाऱ्या सर्वांनाच एक कारभारीपण मिळाले आहे. त्यात कोणकोणत्या जबाबदाऱ्या गोवलेल्या आहेत? त्यांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे? उत्तरासाठी, प्राचीन काळात कारभारी कोणकोणती कामे करायचे त्याचे आपण परीक्षण करू या.
कारभाऱ्यांची भूमिका
४, ५. प्राचीन काळात कारभाऱ्यांवर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असायच्या? उदाहरणे द्या.
४ प्राचीन काळात, कारभारी हा सहसा एक भरवशालायक दास असायचा ज्याच्यावर त्याच्या मालकाच्या घरगुती किंवा व्यापाराशी संबंधित कारभाराची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली जायची. सर्वसाधारणतः, कारभाऱ्यांना बराच अधिकार दिला जायचा आणि त्यांच्यावर घरातील साधनसंपत्ती आणि इतर दासांवर देखरेख करण्याची जबाबदारी असायची. अब्राहामाचा सेवक अलियेजर याच्या बाबतीत पाहिल्यास, त्याच्यावर अब्राहामाच्या बऱ्याच मालमत्तेवर देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपला पुत्र इसहाक याच्यासाठी पत्नी शोधण्याकरता अब्राहामाने ज्या सेवकाला मेसोपोटेमियाला पाठवले तो कदाचित अलियेजरच असावा. किती महत्त्वाची व दूरगामी परिणाम करणारी जबाबदारी!—उत्प. १३:२; १५:२; २४:२-४.
५ अब्राहामाचा पणतू योसेफ हा पोटीफरच्या घरावर देखरेख करायचा. (उत्प. ३९:१, २) काही काळाने, खुद्द योसेफानेदेखील आपल्या घरावर देखरेख करण्यासाठी एका कारभाऱ्यास नियुक्त केले. त्या कारभाऱ्याने योसेफाच्या दहा भावांच्या पाहुणचाराची व्यवस्था केली. आणि त्याने चांदीचा प्याला चोरीला जाण्याची घटना घडवून आणण्यासाठी योसेफाच्या आदेशानुसार पावले उचलली. यावरून स्पष्टपणे दिसते की त्या काळी कारभाऱ्यांना मोठ्या भरवशाचे स्थान प्राप्त होते.—उत्प. ४३:१९-२५; ४४:१-१२.
६. मंडळीतील वडिलांना कोणकोणत्या प्रकारचे कारभारीपण मिळाले आहे?
६ अनेक शतकांनंतर, प्रेषित पौलाने लिहिले की ख्रिस्ती पर्यवेक्षकांनी देवाचे “कारभारी” असले पाहिजे. (तीत १:७) पर्यवेक्षकांना “देवाच्या कळपाचे पालन” करण्यासाठी नियुक्त करण्यात आले असल्यामुळे ते मंडळ्यांचे मार्गदर्शन करतात आणि मंडळ्यांत पुढाकार घेतात. (१ पेत्र ५:१, २) अर्थातच, प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते. उदाहरणार्थ, आज बहुतेक पर्यवेक्षक एकाच मंडळीत सेवा करतात. तर प्रवासी पर्यवेक्षक अनेक मंडळ्यांची सेवा करतात. आणि शाखा समिती सदस्य देशातील सर्वच मंडळ्यांची देखरेख करतात. असे असले, तरी सर्वांनी विश्वासूपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते; त्या सर्वांनाच देवाला “हिशेब द्यावयाचा” आहे.—इब्री १३:१७.
७. एका अर्थाने सर्वच ख्रिस्ती कारभारी आहेत हे आपण कसे म्हणू शकतो?
७ पण, जे पर्यवेक्षक नाहीत अशा अनेक विश्वासू ख्रिश्चनांविषयी काय? प्रेषित पेत्राने सर्व ख्रिश्चनांना उद्देशून एक पत्र लिहिले: “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.” (१ पेत्र १:१; ४:१०) देवाने मोठ्या कृपेने आपल्या सर्वांना दाने, सुसंधी, क्षमता किंवा कौशल्ये दिली आहेत, ज्यांचा वापर आपण आपल्या सहविश्वासू बंधुभगिनींच्या फायद्यासाठी करू शकतो. त्याअर्थी, देवाची सेवा करणारे सर्वच जण कारभारी आहेत; आणि या कारभारीपणासोबत सन्मान, भरवसा व जबाबदारी येते.
आपण देवाच्या मालकीचे आहोत
८. आपण आठवणीत ठेवावे असे एक महत्त्वाचे तत्त्व कोणते आहे?
८ आता आपण अशा तीन तत्त्वांवर आपले लक्ष केंद्रित करू जी कारभारी या नात्याने आपण विचारात घेतली पाहिजेत. पहिले: आपण सर्व जण देवाच्या मालकीचे आहोत आणि आपल्याला त्याला हिशेब द्यायचा आहे. पौलाने लिहिले: “तुम्ही स्वतःचे मालक नाही; कारण तुम्ही मोलाने,” म्हणजे ख्रिस्ताने सांडलेल्या रक्ताने “विकत घेतलेले आहा.” (१ करिंथ. ६:१९, २०) आपण यहोवाच्या मालकीचे आहोत त्यामुळे त्याच्या आज्ञांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. (रोम. १४:८; १ योहा. ५:३) तसेच, आपण ख्रिस्ताचेदेखील दास बनतो. प्राचीन काळातील कारभाऱ्यांप्रमाणे आपल्याला बरेच स्वातंत्र्य मिळाले आहे. पण, आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत. आपण आपल्या जबाबदाऱ्या, देण्यात आलेल्या सूचनांनुसार हाताळल्या पाहिजेत. आपल्याला कोणत्याही प्रकारचे विशेषाधिकार असले, तरी आपण अजूनही देवाचे व ख्रिस्ताचे सेवक आहोत.
९. मालक व दास यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट करण्यासाठी येशूने कोणता दृष्टान्त दिला?
९ येशू आपल्याला एक मालक व दास यांच्यातील नातेसंबंध कसा असतो हे समजून घेण्यास मदत करतो. एकदा येशूने आपल्या शिष्यांना एका दासाविषयी सांगितले जो दिवसभर काम करून घरी आला होता. त्या दासाला मालक असे म्हणतो का, की: “आताच येऊन जेवावयाला बैस?” नाही. तो म्हणतो: “माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी.” येशूने हा दृष्टान्त कसा लागू केला? त्याने म्हटले: “त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.”—लूक १७:७-१०.
१०. यहोवाची सेवा करण्याच्या आपल्या प्रयत्नांची तो कदर करतो हे कशावरून दिसते?
१० अर्थातच, यहोवाची सेवा करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांची तो कदर करतो. बायबल आपल्याला असे आश्वासन देते: “तुमचे कार्य . . . आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) यहोवा आपल्याकडून कधीही अवाजवी अपेक्षा करत नाही. शिवाय, तो आपल्याकडून जी अपेक्षा करतो ती आपल्याच हितासाठी असते आणि कधीही ओझ्याप्रमाणे नसते. तरीसुद्धा, येशूने दिलेल्या दृष्टान्ताच्या सामंजस्यात, एक दास स्वतःच्या आवडीनिवडींना पहिल्या स्थानी ठेवण्याद्वारे स्वतःला आनंदित करत नाही. मुद्दा हा आहे, की आपण जेव्हा देवाला आपले जीवन समर्पित करतो तेव्हा आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टींना जीवनात पहिले स्थान देण्याची निवड करतो. याच्याशी तुम्ही सहमत नाहीत का?
यहोवा आपल्या सर्वांकडून काय अपेक्षा करतो?
११, १२. कारभारी या नात्याने आपण कोणता गुण दाखवला पाहिजे आणि कोणता टाळला पाहिजे?
११ दुसरे तत्त्व म्हणजे: कारभारी या नात्याने आपण सर्व जण एकसमान स्तरांचे पालन करतो. हे खरे आहे, की ख्रिस्ती मंडळीत काही जबाबदाऱ्या मोजक्याच लोकांना मिळतात. तरीसुद्धा, बहुतेक जबाबदाऱ्या सर्वांसाठी असतात. उदाहरणार्थ, ख्रिस्ताचे शिष्य आणि यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. येशूने म्हटले की प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचे ओळखचिन्ह आहे. (योहा. १३:३५) पण, आपले प्रेम केवळ आपल्या बंधुसमाजापुरतेच मर्यादित नाही. जे आपले सहविश्वासू बंधुभगिनी नाहीत त्यांनादेखील प्रेम दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो. असे आपण सर्वच जण करू शकतो आणि आपण नक्कीच केले पाहिजे.
१२ आपल्याकडून चांगल्या आचरणाचीदेखील अपेक्षा केली जाते. देवाच्या वचनात ज्या प्रकारच्या आचरणाची आणि जीवनशैलीची निंदा करण्यात आली आहे ती आपण टाळू इच्छितो. पौलाने लिहिले: “जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथ. ६:९, १०) हे मान्य आहे, की देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगण्यासाठी मेहनत करावी लागते. तरीसुद्धा, अशी मेहनत सार्थक होते. त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात, जसे की आपल्याला असे जीवन जगण्याची प्रेरणा मिळते ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते, इतरांसोबतचे नातेसंबंध उत्तम बनतात, आणि आपल्याला देवाची स्वीकृती मिळते.—यशया ४८:१७, १८ वाचा.
१३, १४. सर्व ख्रिश्चनांना कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, आणि आपण तिच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?
१३ हेही लक्षात घ्या की कारभाऱ्याने काम करायचे होते. आपल्यालादेखील आज काम करायचे आहे. आपल्याला एक मौल्यवान देणगी म्हणजे सत्याचे ज्ञान देण्यात आले आहे. आपण ते ज्ञान इतरांना द्यावे अशी अपेक्षा देव आपल्याकडून करतो. (मत्त. २८:१७-२०) पौलाने लिहिले: “आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या [ “पवित्र,” NW] रहस्यांचे कारभारी आहो असे प्रत्येकाने आम्हाला मानावे.” (१ करिंथ. ४:१) पौलाला जाणीव होती की हे कारभारीपण पार पाडण्यात दोन गोष्टी समाविष्ट होत्या—देवाच्या “पवित्र” रहस्यांची मनापासून कदर करणे आणि आपला धनी येशू ख्रिस्त याने सांगितल्याप्रमाणे त्या रहस्यांबद्दल विश्वासूपणे इतरांना सांगणे.—१ करिंथ. ९:१६.
१४ सत्याबद्दल इतरांना सांगणे ही एक प्रेमळ गोष्ट आहे. अर्थातच, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची परिस्थिती वेगवेगळी असते. सेवाकार्यात सर्वच जण एकसमान कार्य साध्य करू शकत नाहीत. आणि यहोवाला याची जाणीव आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक रीत्या आपल्याला जमेल ते सर्व करणे. अशा रीतीने आपण देवाबद्दल व आपल्या शेजाऱ्यांबद्दल निःस्वार्थ प्रेम दाखवतो.
विश्वासू राहण्याचे महत्त्व
१५-१७. (क) कारभाऱ्याने विश्वासू असणे अत्यंत आवश्यक का आहे? (ख) अविश्वासूपणाच्या दुष्परिणामांबद्दल येशूने कसे स्पष्ट केले?
१५ वर उल्लेख केलेल्या दोन तत्त्वांशी निगडित असलेले तिसरे तत्त्व म्हणजे: आपण विश्वासू, भरवशालायक असले पाहिजे. एका कारभाऱ्यात कदाचित अनेक उत्तम गुण आणि कौशल्ये असतील, पण तो बेजबाबदारपणे वागल्यास किंवा मालकाला एकनिष्ठ न राहिल्यास त्या गोष्टींना काहीच महत्त्व राहणार नाही. कारभारीपण परिणामकारक व यशस्वी रीत्या निभावण्यासाठी विश्वासूपणा अत्यंत आवश्यक आहे. पौलाने लिहिले होते: “कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.”—१ करिंथ. ४:२.
१६ आपण विश्वासू राहिल्यास आपल्याला आशीर्वाद मिळतील यात तिळमात्र शंका नाही. पण, आपण विश्वासू न राहिल्यास, आपले नुकसान होईल. येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टान्तात हे तत्त्व आपल्याला दिसते. दृष्टान्तातील ज्या दासांनी मालकाच्या रुपयांवर विश्वासूपणे “व्यापार” केला होता त्यांची प्रशंसा करण्यात आली आणि त्यांना अनेक आशीर्वाद देण्यात आले. पण, मालकाने सोपवलेल्या रुपयांप्रती ज्या दासाने बेजबाबदारपणा दाखवला होता त्याला मालकाने “दुष्ट,” “आळशी,” आणि “निरुपयोगी” ठरवले. त्याला जे रुपये देण्यात आले होते ते त्याच्याकडून परत घेण्यात आले आणि त्याला बाहेर टाकण्यात आले.—मत्तय २५:१४-१८, २३, २६, २८-३० वाचा.
१७ येशूने आणखी एका प्रसंगी, अविश्वासूपणाच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. त्याने म्हटले: “एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता; त्याच्यावर, हा तुमचे द्रव्य उडवितो, असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे; कारण ह्यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही.” (लूक १६:१, २) या कारभाऱ्याने आपल्या मालकाची मालमत्ता उधळली होती त्यामुळे मालकाने त्याला काढून टाकले. आपल्याकरता किती महत्त्वाचा धडा! आपल्याकडून जी अपेक्षा केली जाते त्याबद्दल आपण कधीही अविश्वासूपणे वागू इच्छिणार नाही.
इतरांशी तुलना करणे सुज्ञपणाचे?
१८. आपण स्वतःची तुलना इतरांशी का करू नये?
१८ आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःला असे विचारू शकतो, ‘मला मिळालेल्या कारभारीपणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन काय आहे?’ आपण जेव्हा स्वतःची तुलना इतरांशी करतो तेव्हा समस्या उद्भवू शकतात. बायबल असा सल्ला देते: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” (गलती. ६:४) आपण काय करतो त्याची तुलना इतर जण काय करतात त्याच्याशी करण्याऐवजी, वैयक्तिक रीत्या आपण काय करण्यास समर्थ आहोत यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे गर्वाने फुगण्यापासूनच नव्हे, तर निरुत्साहित होण्यापासूनही आपले संरक्षण होईल. स्वतःचे परीक्षण करताना आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की परिस्थिती बदलू शकते. अनारोग्यामुळे, वयामुळे किंवा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे कदाचित आपल्याला पूर्वीइतके कार्य करायला जमणार नाही. याउलट, कदाचित आपल्याला सध्याच्या तुलनेत जास्त कार्य करणे शक्य असेल. असे असल्यास, आणखी जास्त करण्याचा प्रयत्न का करू नये?
१९. आपल्याला एखादा विशेषाधिकार मिळाला नाही, तर आपण खिन्न का होऊ नये?
१९ तसेच, आपण अशा व्यक्तींशी स्वतःची तुलना करू नये ज्यांच्याजवळ विशिष्ट जबाबदाऱ्या आहेत ज्या आपण मिळवू इच्छितो. उदाहरणार्थ, एक बांधव कदाचित मंडळीत वडील म्हणून सेवा करण्याची किंवा संमेलनांमधील आणि अधिवेशनांमधील भाग हाताळण्याची इच्छा बाळगत असेल. असे विशेषाधिकार मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करणे चांगलेच आहे. पण, आपण जेव्हा अपेक्षा केली तेव्हा ते विशेषाधिकार आपल्याला मिळाले नाहीत, तर आपण खिन्न होऊ नये. काही विशेषाधिकार आपण अपेक्षा केली होती त्यापेक्षा कितीतरी नंतर मिळू शकतात; यामागची कारणे कदाचित आपल्याला लगेच समजणार नाहीत. इस्राएली लोकांना इजिप्तमधून सोडवण्यास आपण तयार आहोत असे मोशेला वाटत होते. पण, तसे करण्यापूर्वी त्याला ४० वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे ताठ मानेच्या, बंडखोर लोकांचे नेतृत्व करण्यासाठी लागणारे गुण विकसित करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळाला.—प्रे. कृत्ये ७:२२-२५, ३०-३४.
२०. योनाथानाच्या उदाहरणावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?
२० कधीकधी असे होऊ शकते की एखादा विशेषाधिकार आपल्याला दिलाच जात नाही. योनाथानासोबत असेच घडले. तो शौलाचा मुलगा होता आणि त्यामुळे इस्राएलचा राजा बनण्यास तो पात्र होता. पण, राजा होण्यासाठी देवाने दाविदाची निवड केली, जो योनाथानापेक्षा वयाने कितीतरी लहान होता. तर मग, योनाथानाने याबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली? योनाथानाने ही गोष्ट स्वीकारली आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दाविदाचे समर्थन केले. त्याने दाविदाला असे म्हटले: “तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार.” (१ शमु. २३:१७) येथे काय सांगायचे आहे ते तुम्हाला समजले का? योनाथानाने परिस्थिती मान्य केली. आणि त्याने त्याच्या वडिलाप्रमाणे दाविदाबद्दल मनात ईर्ष्या बाळगली नाही. तेव्हा इतरांना मिळालेल्या जबाबदाऱ्यांबद्दल मनात ईर्ष्या बाळगण्याऐवजी, आपल्याजवळ असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यावर आपण आपले लक्ष केंद्रित करू या. आपण याची खातरी बाळगू शकतो, की नवीन जगात यहोवा आपल्या सर्व सेवकांच्या उचित इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करेल.
२१. आपल्याला मिळालेल्या कारभारीपणाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे?
२१ आपण हे लक्षात ठेवू या की विश्वासू कारभारी या नात्याने आपली अवस्था अत्याचार सहन करणाऱ्या दयनीय व लाचार दासांसारखी नाही. उलट, आपल्याला मोठ्या सन्मानाचे पद लाभले आहे. कारण या जगाच्या शेवटल्या दिवसांत आपल्यावर सुवार्ता घोषित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे, ज्याची कधीच पुनरावृत्ती होणार नाही. हे कार्य करत असताना, आपण आपल्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे हाताळणार याचे बरेच स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. तर मग, आपण कारभारी या नात्याने विश्वासूपणे काम करू या. आणि या विश्वाच्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीची सेवा करण्याचा जो विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे त्यात आनंद मानू या.
[अभ्यासाचे प्रश्न]
[१२ पानांवरील चित्रे]
आपल्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या आपण विश्वासूपणे हाताळू या