कोणतीही गोष्ट तुम्हाला यहोवापासून दूर न नेवो!
“ज्याची तुम्ही सेवा करणार त्याला आज आपणासाठी निवडून घ्या.”—यहो. २४:१५, पं.र.भा.
१-३. (क) जीवनात योग्य निवड करण्याच्या बाबतीत यहोशवाचे उदाहरण अनुकरणीय का आहे? (ख) निर्णय घेताना आपण कोणती गोष्ट मनात बाळगली पाहिजे?
‘निवड’ हा एक वजनदार शब्द आहे. निवड करणाऱ्या व्यक्तीसमोर पर्याय असतात आणि तिचे जीवन कोणती दिशा घेईल यावर बऱ्याच प्रमाणात तिचे स्वतःचे नियंत्रण असते. उदाहरणार्थ: कल्पना करा, की एक माणूस रस्त्याने चालत आहे आणि अचानक रस्त्याला दोन फाटे फुटतात. तो यांपैकी कोणता मार्ग निवडणार? या मनुष्याच्या मनात जर एक निश्चित ध्येय असेल तर कदाचित यांपैकी एक मार्ग त्याला त्याच्या ध्येयाच्या आणखी जवळ नेईल; तर दुसरा मार्ग कदाचित त्याला या ध्येयापासून आणखी दूर नेईल.
२ बायबलमध्ये अशा अनेक लोकांची उदाहरणे आहेत जे अशाच परिस्थितीत होते. उदाहरणार्थ, काइनासमोर दोन पर्याय होते—रागाच्या भरात कृती करावी किंवा रागावर नियंत्रण करावे. (उत्प. ४:६, ७) यहोशवाला खऱ्या देवाची सेवा करावी की खोट्या दैवतांची उपासना करावी, यांपैकी एक पर्याय निवडायचा होता. (यहो. २४:१५) यहोशवाचे ध्येय देवाशी जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवणे हे होते; आणि म्हणून त्याने असा मार्ग निवडला ज्यामुळे त्याला ते ध्येय गाठण्यास मदत मिळाली. पण काइनाच्या डोळ्यांपुढे असे ध्येय नव्हते; आणि त्यामुळे त्याने असा मार्ग निवडला जो त्याला यहोवापासून आणखीनच दूर घेऊन गेला.
३ कधीकधी आपल्यासमोरही दोन पर्याय असतात आणि आपल्याला त्यांपैकी एक निवडायचा असतो. अशा वेळी, तुमचे ध्येय मनात बाळगा; आणि ते ध्येय म्हणजे, तुम्ही जे काही करता त्याद्वारे यहोवाचे गौरव करणे आणि तुम्हाला त्याच्यापासून दूर नेईल अशी कोणतीही गोष्ट टाळणे. (इब्री लोकांस ३:१२ वाचा.) या व पुढील लेखात आपण जीवनातील अशा सात क्षेत्रांचा विचार करू, ज्यांत आपण विचारपूर्वक निवड केली पाहिजे आणि कोणतीही गोष्ट आपल्याला यहोवापासून दूर नेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
नोकरी-व्यवसाय आणि करियर
४. उदरनिर्वाह करणे महत्त्वाचे का आहे?
४ ख्रिश्चनांवर स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे उदरभरण करण्याची जबाबदारी आहे. बायबलमध्ये सूचित केले आहे, की जर कोणाला आपल्या घरच्यांच्या गरजा पूर्ण करण्याची इच्छा नसेल, तर तो विश्वास न ठेवणाऱ्यापेक्षा वाईट आहे. (२ थेस्सलनी. ३:१०; १ तीम. ५:८) तेव्हा नोकरी-व्यवसाय हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग निश्चितच आहे; पण, काळजी न घेतल्यास, तुमची नोकरी व करियर तुम्हाला यहोवापासून दूर नेऊ शकते. ते कसे?
५. नवी नोकरी स्वीकारण्याअगोदर आपण कोणत्या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे?
५ तुम्ही नोकरीच्या शोधात आहात अशी कल्पना करा. तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी नोकऱ्या मोठ्या मुश्कीलीने मिळत असतील, तर नोकरीची जी पहिली संधी तुमच्यासमोर येईल ती लगेच स्वीकारण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो, मग ती कोणतीही नोकरी असो. पण त्या नोकरीत तुम्हाला बायबल तत्त्वांच्या विरोधात असलेले काम करावे लागणार असेल, तर काय? नोकरीच्या वेळा आणि कामानिमित्ताने करावा लागणारा प्रवास यांमुळे जर तुमच्या ख्रिस्ती कार्यांवर किंवा कुटुंबासोबत तुम्ही घालवत असलेल्या वेळेवर गदा येणार असेल, तर काय? हे सर्व असूनही तुम्ही ती नोकरी स्वीकारावी का? सोयीची नसली, तरी बेरोजगार असण्यापेक्षा ही नोकरी बरी, असा विचार तुम्ही करावा का? आठवणीत असू द्या, अनुचित मार्ग निवडल्यास तुम्ही यहोवापासून दूर जाल. (इब्री २:१) नवी नोकरी शोधण्याच्या बाबतीत असो, किंवा सध्याच्या नोकरीबद्दल पुनर्विचार करण्याच्या बाबतीत असो, तुम्ही सुज्ञ निर्णय कसे घेऊ शकता?
६, ७. (क) नोकरी निवडताना एका व्यक्तीसमोर कोणती ध्येये असू शकतात? (ख) कोणते ध्येय तुम्हाला यहोवाच्या आणखी जवळ आणेल आणि का?
६ याआधी सांगितल्याप्रमाणे, तुमचे ध्येय लक्षात ठेवा. स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘या नोकरीच्या किंवा करियरच्या साहाय्याने मला कोणते ध्येय साध्य करायचे आहे?’ जर यहोवाची सेवा करता यावी म्हणून स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा भागवण्याचे एक साधन, या दृष्टीने तुम्ही नोकरी-व्यवसायाकडे पाहत असाल, तर यहोवा तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल. (मत्त. ६:३३) तुमची नोकरी तुमच्या हातून गेली, किंवा अचानक तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले, तरी यहोवा तुम्हाला मदत करण्यास समर्थ आहे. (यश. ५९:१) आपल्या सेवकांना कठीण परिस्थितीतून कसे सोडवावे “हे प्रभूला कळते.”—२ पेत्र २:९.
७ पण जर, श्रीमंत होणे एवढेच तुमचे ध्येय असेल तर काय? कदाचित तुम्ही यात यशस्वी व्हालही. पण हे “यश” मिळवणे तुम्हाला महागात पडेल. (१ तीमथ्य ६:९, १० वाचा.) पैसा आणि करियर यांना जीवनात जास्त महत्त्व दिल्यास या गोष्टी तुम्हाला यहोवापासून दूर नेल्याशिवाय राहणार नाहीत.
८, ९. आईवडिलांनी नोकरी-व्यवसायाबाबत आपल्या दृष्टिकोनाबद्दल कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? स्पष्ट करा.
८ तुम्हाला मुले असल्यास, तुमच्या उदाहरणाचा तुमच्या मुलांवर कसा परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. तुम्ही जीवनात कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देत असल्याचे त्यांना दिसते—तुमच्या करियरला की यहोवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाला? जर पैसा, पत, प्रतिष्ठा याच गोष्टींना तुम्ही जीवनात महत्त्व देत असल्याचे त्यांना दिसले, तर तेदेखील विनाशाकडे नेणाऱ्या या मार्गावर तुमचे अनुकरण करण्याची शक्यता आहे का? एक पालक या नात्याने तुमच्याबद्दल त्यांचा आदर काही प्रमाणात का होईना, पण कमी होईल का? एका ख्रिस्ती तरुणीने म्हटले: “मागच्या कितीतरी वर्षांपासून माझ्या वडिलांचा सगळा वेळ त्यांच्या नोकरीतच जातो. सुरुवातीला असं वाटायचं की आमच्या कुटुंबाला सगळ्यात चांगल्या वस्तू मिळाव्यात, आम्हाला कशाचीही उणीव भासू नये म्हणून ते इतकं कष्ट करत आहेत. पण अलीकडच्या वर्षांत परिस्थिती काहीशी बदललीय. ते सतत न् सतत काम करत असतात, आणि मग ते गरजेच्या नव्हे तर चैनीच्या वस्तू घरात आणतात. यामुळं आता चारचौघांत आम्हाला खूप पैसेवालं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. आध्यात्मिक कार्यांत इतरांना प्रोत्साहन देणारं कुटुंब म्हणून आम्हाला कुणीही ओळखत नाही. खरं सांगायचं, तर पैशापेक्षा आम्हाला त्यांचा आध्यात्मिक आधार हवा आहे.”
९ आईवडिलांनो, तुमच्या करियरला खूप जास्त महत्त्व देऊन यहोवापासून दूर जाऊ नका. आपल्याजवळ जी सर्वात मौल्यवान संपत्ती असू शकते, ती भौतिक संपत्ती नव्हे तर आध्यात्मिक संपत्ती आहे. तुम्ही ही गोष्ट मनापासून मानता हे आपल्या उदाहरणावरून आपल्या मुलांना दाखवून द्या.—मत्त. ५:३.
१०. करियरची निवड करताना एक तरुण व्यक्ती कोणत्या गोष्टी लक्षात घेऊ शकते?
१० जर तुम्ही एक तरुण व्यक्ती असाल आणि कोणते करियर निवडावे या विचारात असाल, तर तुम्ही योग्य मार्ग कसा निवडू शकता? याआधी चर्चा केल्याप्रमाणे, तुम्हाला जीवनात काय मिळवायचे आहे हे तुमच्या मनात स्पष्ट असले पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याच्या व नोकरी करण्याच्या विचारात आहात, त्यामुळे तुम्हाला राज्याच्या कार्यांत जास्त सहभाग घेणे शक्य होईल का? की, तुम्ही यहोवापासून दूर जाल? (२ तीम. ४:१०) ज्यांच्या जीवनातील आनंद त्यांच्या बँक खात्यातील रकमेवर किंवा त्यांच्याजवळ असलेल्या स्टॉक्स किंवा शेअर्सवर अवलंबून आहे अशा लोकांच्या जीवनशैलीचे तुम्हाला अनुकरण करायचे आहे का? की तुम्ही दाविदासारखा आत्मविश्वास व्यक्त करू इच्छिता, ज्याने असे लिहिले: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तो. ३७:२५) आठवणीत असू द्या, एक मार्ग तुम्हाला यहोवापासून दूर नेईल, तर दुसरा मार्ग तुम्हाला सर्वात उत्तम प्रकारच्या जीवनाकडे नेईल. (नीतिसूत्रे १०:२२; मलाखी ३:१० वाचा.) तुम्ही कोणता मार्ग निवडाल? *
मनोरंजन व करमणूक
११. मनोरंजन व करमणूक यांसंबंधी बायबल कोणती गोष्ट मान्य करते, पण आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?
११ बायबल मौजमजा करण्याच्या विरोधात नाही. तसेच, मनोरंजन व करमणूक यांमुळे वेळ वाया जातो असा दृष्टिकोनही बायबलमध्ये मांडलेला नाही. पौलाने तीमथ्याला लिहिले, “शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे.” (१ तीम. ४:८) बायबल असेही म्हणते की “हसण्याचा समय” असतो आणि “नृत्य करण्याचा समय” असतो, आणि ते योग्य प्रमाणात विश्रांती घेण्याचाही सल्ला देते. (उप. ३:४; ४:६) पण तुम्ही काळजी न घेतल्यास, मनोरंजन व करमणूक या गोष्टी तुम्हाला यहोवापासून दूर नेऊ शकतात. त्या कशा? यातील धोका हा खासकरून दोन गोष्टींशी संबंधित आहे—तुम्ही कोणत्या प्रकारचे मनोरंजन निवडता आणि त्यासाठी तुम्ही किती वेळ खर्च करता?
१२. तुम्ही जे मनोरंजन व करमणूक निवडता त्यासंबंधी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
१२ सर्वप्रथम, कोणत्या प्रकारचे मनोरंजन निवडावे याविषयी पाहू या. निकोप मनोरंजन आणि चांगल्या दर्जाचे करमणुकीचे प्रकार मिळवणे आजही शक्य आहे याची खातरी बाळगा. पण, मनोरंजनाच्या रूपात आज जे उपलब्ध आहे त्यात जास्तकरून अशाच गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते ज्यांचा देवाला वीट आहे, जसे की हिंसा, भूतविद्या आणि अनैतिक लैंगिक संबंध. म्हणूनच, मनोरंजन व करमणुकीचे प्रकार निवडताना चोखंदळ असणे गरजेचे आहे. त्या मनोरंजनाचा तुमच्यावर कोणता परिणाम होतो? त्यामुळे तुमच्या मनात हिंसा, द्वेषपूर्ण स्पर्धा किंवा राष्ट्रवादासारख्या भावना निर्माण होतात का? (नीति. ३:३१) त्यासाठी तुम्हाला बराच खर्च करावा लागतो का? त्यामुळे इतरांना अडखळण होऊ शकते का? (रोम. १४:२१) तुम्ही निवडलेल्या मनोरंजनामुळे व करमणुकीमुळे तुम्ही कशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येता? (नीति. १३:२०) त्या मनोरंजनामुळे तुमच्या मनात अनुचित कृत्ये करण्याची इच्छा जागृत होते का?—याको. १:१४, १५.
१३, १४. करमणुकीसाठी किती वेळ खर्च करावा हे ठरवताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
१३ मनोरंजन व करमणूक यांसाठी तुम्ही किती वेळ खर्च करता हेदेखील लक्षात घ्या. स्वतःला हा प्रश्न विचारा, ‘माझ्याजवळ आध्यात्मिक कार्यांसाठी वेळच उरणार नाही, इतका वेळ मी करमणुकीसाठी खर्च करतो का?’ तुम्ही मनोरंजन व करमणूक यांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ खर्च करायचे निवडल्यास, तुमचा फावला वेळ खऱ्या अर्थाने तजेलादायक ठरणार नाही. खरेतर, जे करमणुकीला जीवनात योग्य स्थानी ठेवतात त्यांना त्यातून आणखी जास्त आनंद मिळतो. का? कारण जीवनात ज्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्याचे समाधान त्यांच्याजवळ असते आणि त्यामुळे करमणूक करताना त्यांच्या मनाला बोचणी लागत नाही.—फिलिप्पैकर १:१०, ११ वाचा.
१४ करमणुकीत बराच वेळ खर्च करावासा तुम्हाला वाटत असला, तरी हा मार्ग निवडल्यास तो तुम्हाला यहोवापासून दूर नेऊ शकतो. किम नावाच्या एका २० वर्षीय बहिणीला याचा प्रत्यय आला. ती म्हणते, “मी सगळ्या पार्ट्यांना जायचे. दर आठवड्यात शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी काहीतरी खास बेत असायचाच. पण आता मला जाणीव होतेय की अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, पायनियर असल्यामुळं क्षेत्र सेवेसाठी मी सकाळी सहाला उठते. त्यामुळं साहजिकच मी पहाटे एक किंवा दोन वाजेपर्यंत मित्रमैत्रिणींसोबत मौजमजा करू शकत नाही. सगळ्याच पार्ट्या किंवा सामाजिक कार्यक्रम वाईट नसतात हे मला माहीत आहे, पण ते अतिशय वेळखाऊ असू शकतात. इतर गोष्टींप्रमाणेच त्यांनाही जीवनात योग्य स्थानी ठेवणं गरजेचं आहे.”
१५. आईवडील आपल्या मुलांना तजेलादायक मनोरंजनाचा आनंद घेण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात?
१५ आईवडिलांवर स्वतःसोबतच आपल्या मुलांच्याही भौतिक, आध्यात्मिक व भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. यांत करमणुकीचाही समावेश होतो. जर तुम्ही पालक असाल, तर सर्वच प्रकारचे मनोरंजन वाईट असते अशी टोकाची भूमिका घेऊन आपल्या मुलांच्या आनंदावर विरजण घालू नका. त्याच वेळी, घातक ठरू शकतील अशा प्रभावांपासून सावध राहा. (१ करिंथ. ५:६) आधीपासूनच पुरेसा विचार केल्यास तुम्ही मनोरंजनाचे व करमणुकीचे असे प्रकार नक्कीच निवडू शकता जे तुमच्या कुटुंबाकरता खऱ्या अर्थाने तजेलादायक ठरतील. * अशा रीतीने तुम्ही व तुमची मुले असा मार्ग निवडू शकाल जो तुम्हाला यहोवाच्या आणखी जवळ आणेल.
कौटुंबिक नातेसंबंध
१६, १७. अनेक पालकांना कोणत्या दुःखद समस्येला तोंड द्यावे लागले आहे आणि यहोवाला त्यांची व्यथा कळते असे आपण कशावरून म्हणू शकतो?
१६ पालक आणि मूल यांच्यातील नात्याची वीण इतकी घट्ट असते, की यहोवाने त्याच्या लोकांबद्दल त्याला असलेल्या प्रेमाविषयी बोलताना याच नात्याचे उदाहरण दिले. (यश. ४९:१५) त्यामुळे, कुटुंबातील एक प्रिय सदस्य यहोवाला सोडून जातो तेव्हा दुःख होणे साहजिक आहे. एक बहीण, जिच्या मुलीला बहिष्कृत करण्यात आले ती म्हणते, “मी अगदीच खचून गेले. सारखा मनात विचार यायचा, ‘हिनं यहोवाला का सोडलं असावं?’ माझंच काहीतरी चुकलं असेल असं वाटून मी स्वतःला दोष देऊ लागले.”
१७ यहोवाला तुमची व्यथा कळते. कारण, त्याच्या मानवी कुटुंबातील पहिल्या सदस्याने आणि नंतर जलप्रलयाआधीच्या बहुतेक लोकांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह केला तेव्हा त्याच्याही “चित्ताला खेद झाला.” (उत्प. ६:५, ६) ज्यांना अशा प्रकारचा अनुभव आलेला नाही त्यांना यामुळे होणारे दुःख समजून घेणे कदाचित तितके सोपे जाणार नाही. तरीसुद्धा, बहिष्कृत झालेल्या कुटुंबातील सदस्याच्या वाईट वागणुकीमुळे तुम्ही यहोवापासून दूर जाणे सुज्ञपणाचे ठरणार नाही. तर मग, कुटुंबातील एक सदस्य यहोवाला सोडून गेल्यामुळे होणाऱ्या अतोनात दुःखाला तुम्ही कशा प्रकारे तोंड देऊ शकता?
१८. मुले यहोवाला सोडून गेल्यास आईवडिलांनी स्वतःला दोषी का ठरवू नये?
१८ जे घडले त्याबद्दल स्वतःला दोषी ठरवू नका. यहोवाने सर्व मानवांना निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि समर्पण केलेल्या व बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीचा “स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलती. ६:५) शेवटी, पाप करणाऱ्या व्यक्तीने जी निवड केली तिच्याबद्दल यहोवा तुम्हाला नव्हे, तर त्या व्यक्तीलाच जबाबदार धरतो. (यहे. १८:२०) तसेच, इतरांनाही दोष देऊ नका. पाप करणाऱ्या व्यक्तीला ताडन करण्यासाठी यहोवाने केलेल्या व्यवस्थेचा आदर करा. मंडळीचे संरक्षण करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या मेंढपाळांचा नव्हे, तर दियाबलाचा प्रतिकार करा.—१ पेत्र ५:८, ९.
१९, २०. (क) बहिष्कृत झालेल्या मुलांचे आईवडील या दुःखद परिस्थितीला कसे तोंड देऊ शकतात? (ख) असे आईवडील कोणती आशा बाळगू शकतात?
१९ दुसरीकडे पाहता, जर तुम्ही यहोवाविरुद्ध मनात नाराजी बाळगली तर तुम्ही स्वतःला त्याच्यापासून दूर कराल. खरेतर, बहिष्कृत झालेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीला हे दिसून आले पाहिजे की तुम्ही इतर सर्व गोष्टींपेक्षा, अगदी रक्ताच्या नात्यांपेक्षाही यहोवाला जास्त महत्त्व देण्याच्या बाबतीत खंबीर आहात. तेव्हा या परिस्थितीला तोंड देता यावे म्हणून तुमचे स्वतःचे आध्यात्मिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी झटा. तुमच्या विश्वासू बंधुभगिनींपासून दूर राहू नका. (नीति. १८:१) प्रार्थनेत यहोवाजवळ आपले मन मोकळे करा. (स्तो. ६२:७, ८) कुटुंबातील बहिष्कृत सदस्यासोबत ई-मेल किंवा इतर मार्गांनी संपर्क करण्याची निमित्ते शोधू नका. (१ करिंथ. ५:११) आध्यात्मिक कार्यांत स्वतःला झोकून द्या. (१ करिंथ. १५:५८) वरती जिचे शब्द उद्धृत करण्यात आले आहेत ती बहीण म्हणते, “मला माहीत आहे, की मी यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिलं पाहिजे आणि आध्यात्मिक रीत्या स्वतःला दृढ केलं पाहिजे. असं केलं तरच, माझी मुलगी यहोवाकडे परत आल्यावर तिला मदत करणं मला शक्य होईल.”
२० बायबल म्हणते, प्रीती “सर्वांची आशा धरते.” (१ करिंथ. १३:४, ७) तुमची प्रिय व्यक्ती यहोवाकडे परत येईल अशी आशा मनात बाळगणे मुळीच चुकीचे नाही. दरवर्षी, बहिष्कृत झालेल्या कितीतरी व्यक्ती यहोवाच्या संघटनेत परत येतात. त्यांनी पश्चात्ताप केल्यावर यहोवा त्यांच्याबद्दल मनात राग बाळगत नाही. उलट, तो त्यांना क्षमा करतो.—स्तो. ८६:५.
सुज्ञपणे निवड करा
२१, २२. आपल्या निवडस्वातंत्र्याचा वापर करण्यासंबंधी तुमचा काय निश्चय आहे?
२१ यहोवाने मानवांना निर्माण करताना त्यांना निवडस्वातंत्र्य दिले. (अनुवाद ३०:१९, २० वाचा.) पण, त्या स्वातंत्र्यासोबतच एक गंभीर जबाबदारीही आपल्यावर येते. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने स्वतःला विचारले पाहिजे: ‘मी कोणता मार्ग निवडला आहे? नोकरी-व्यवसाय व करियर, मनोरंजन व करमणूक किंवा कौटुंबिक नातेसंबंध यांपैकी एखाद्या गोष्टीने मला यहोवापासून दूर नेले आहे का?’
२२ यहोवाचे त्याच्या लोकांवर असलेले प्रेम कधीही कमी होत नाही. आपण यहोवापासून दूर तेव्हाच जातो, जेव्हा आपण स्वतः एखादा चुकीचा मार्ग निवडतो. (रोम. ८:३८, ३९) पण असे घडू द्यावे किंवा नाही हे आपल्या हातात आहे! तेव्हा, कोणतीही गोष्ट मला यहोवापासून दूर नेणार नाही याची मी काळजी घेईन, असा मनाशी निश्चय करा! हा निश्चय तुम्ही आणखी कोणत्या चार क्षेत्रांत प्रदर्शित करू शकता याविषयी पुढील लेखात चर्चा करू या.