व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या जवळ येण्यास झटत राहा

यहोवाच्या जवळ येण्यास झटत राहा

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याको. ४:८.

१, २. (क) सैतान कशा प्रकारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतो? (ख) देवाच्या जवळ जाण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

 यहोवाने मानवांची निर्मिती केली तेव्हा त्याने त्याच्या जवळ जाण्याची गरज त्यांच्यामध्ये रुजवली. पण सैतान आपल्याला त्याच्याप्रमाणेच असा विचार करायला लावू इच्छितो की आपल्याला यहोवाची गरज नाही. एदेन बागेत ही लबाडी बोलून त्याने हव्वेला फसवले, तेव्हापासून इतरांनीही यावर विश्‍वास ठेवावा असा त्याचा प्रयत्न राहिला आहे. (उत्प. ३:४-६) आणि सबंध इतिहासादरम्यान बहुतेक मनुष्य त्याच्या या लबाडीला बळी पडले आहेत.

पण आपल्याला सैतानाच्या या पाशात पडण्याची गरज नाही. कारण “त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” (२ करिंथ. २:११) चुकीची निवड करण्यास प्रवृत्त करून सैतान आपल्याला यहोवापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे आपण करियर, मनोरंजन आणि कौटुंबिक नातेसंबंधांविषयी योग्य निर्णय घेऊ शकतो. तंत्रज्ञान, आरोग्य, पैसा आणि अभिमान या गोष्टींना जीवनात योग्य ठिकाणी ठेवल्यामुळे देवाच्या जवळ जाण्यास कशा प्रकारे आपल्याला मदत मिळेल हे या लेखात सांगितले आहे.—याको. ४:८.

तंत्रज्ञान

३. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या किंवा वाईट प्रकारे कसा केला जाऊ शकतो, उदाहरण द्या.

आज जगभरात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर अगदी सर्रासपणे होत आहे. यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास ती खूप उपयोगी ठरू शकतात. पण गैरवापर केल्यास, ती आपल्या व आपल्या स्वर्गीय पित्याच्या नात्यात दरी निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, कंप्युटरचा विचार करा. हे मासिक ज्यातून तुम्ही वाचत आहात ते कंप्युटरच्या साहाय्याने लिहिण्यात व प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधन व दळणवळण करण्यासाठी कंप्युटर एक प्रभावकारी साधन आहे, आणि कंप्युटरमुळे कधीकधी आपले मनोरंजनही होते. पण आपल्याला कंप्युटरचे व्यसनही लागू शकते. जाहिरातदार चलाखीने लोकांना असे पटवून देतात की त्यांच्याजवळ बाजारातील सर्वात नवीन वस्तू असलीच पाहिजे. एका तरुणाला विशिष्ट प्रकारचा कंप्युटर इतका हवाहवासा वाटला की तो विकत घेण्यासाठी त्याने गुपचूप जाऊन त्याची एक किडनी विकली. किती दुःखाची गोष्ट!

४. कंप्युटरचा अतिवापर करणाऱ्‍या एका ख्रिस्ती बांधवाने या समस्येवर कशा प्रकारे मात केली?

तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे किंवा अतिवापरामुळे तुम्ही यहोवासोबचा तुमचा नातेसंबंध बिघडू दिला तर हे आणखी दुःखदायक ठरू शकते. तीसच्या जवळ असलेला यॉन * म्हणतो: “आपण ‘वेळेचा सदुपयोग’ करावा असे बायबल म्हणते हे मला माहीत आहे, पण कंप्युटरचा वापर करण्याच्या बाबतीत मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही.” यॉन नेहमी रात्री उशीरापर्यंत इंटरनेटचा वापर करायचा. तो सांगतो: “मी जितका जास्त थकायचो, तितकंच चॅटिंग करण्याचं थांबवणं किंवा लहान व्हिडियो पाहण्याचं थांबवणं—जे नेहमीच चांगले नसायचे मला जास्त कठीण वाटायचं.” ही सवय मोडण्यासाठी, यॉनने कंप्युटरमध्ये अशी व्यवस्था केली की झोपायची वेळ होताच त्याचा कंप्युटर आपोआप बंद होईल.—इफिसकर ५:१५, १६ वाचा.

आईवडिलांनो, तंत्रज्ञानाचा सुज्ञपणे वापर करण्यास आपल्या मुलांना शिकवा

५, ६. (क) मुलांप्रती आईवडिलांची कोणती जबाबदारी आहे? (ख) आपल्या मुलांना चांगली संगत प्राप्त व्हावी म्हणून पालक काय करू शकतात?

आईवडिलांनो, तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याची गरज नाही, पण कंप्युटरचा वापर ते कसा करत आहेत याकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिलेच पाहिजे. अनैतिकतेशी किंवा भूतविद्येशी संबंध असलेल्या वेब साईट्‌सवर जाण्यास, हिंसक गेम्स खेळण्यास, किंवा इंटरनेटवर वाईट लोकांशी संगती करण्यास त्यांना परवानगी देऊ नका. जर तुम्ही त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी किंवा त्यांनी तुमच्या कामात व्यत्यय आणू नये म्हणून असे करू दिले तर ते असा निष्कर्ष काढतील, ‘जर आईबाबांना काही पडलेली नाही तर इंटरनेटवर जे मी करतो ते योग्यच असेल.’ एक पालक या नात्याने, जी गोष्ट तुमच्या मुलांना ज्यात किशोरवयीन मुलांचाही समावेश होतो यहोवापासून दूर नेईल, अशा गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पशुपक्षीदेखील धोक्यांपासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करतात. जर कोणी अस्वलाच्या पिल्लांना हानी पोहचवण्याचा प्रयत्न केला तर अस्वल काय करेल याचा विचार करा!—होशेय ८: १३ पडताळून पाहा.

आपल्या मुलांना इतर अनुकरणीय तरुण व वृद्ध ख्रिश्‍चनांसोबत हितकारक संगती करण्यास मदत करा. आणि लक्षात ठेवा की तुमच्या मुलांना तुमच्या सहवासाची, वेळेची गरज आहे! तर मग, एकत्र मिळून हसण्यासाठी, खेळण्यासाठी, काम करण्यासाठी आणि “देवाजवळ” येण्यासाठी वेळ काढा. *

आरोग्य

७. आपल्या प्रत्येकाला सुदृढ का राहावेसे वाटते?

“तुमची तब्येत कशी आहे?” या वाक्यामुळे एक कटू सत्य प्रकट होते. आपल्या पहिल्या पालकांनी सैतानाच्या बहकाव्यात येऊन स्वतःला यहोवापासून दूर केले, त्यामुळे आपण सर्वच जण आजारी पडतो. आपण आजारी पडतो तेव्हा सैतानाचा हेतू पूर्ण होतो; कारण, त्यामुळे यहोवाची सेवा करणे आपल्याला कठीण जाते. आणि जर आपला मृत्यू झाला, तर आपण यहोवाची सेवा करूच शकत नाही. (स्तो. ११५:१७) त्यामुळे साहजिकच निरोगी राहण्यासाठी आपण जमेल ते सर्व केले पाहिजे. * आणि सोबतच आपण आपल्या बंधुभगिनींच्या आरोग्याचा व हिताचाही विचार केला पाहिजे.

८, ९. (क) आरोग्यविषयक बाबींत अतिरेक करण्याचे आपण कसे टाळू शकतो? (ख) आनंदी असण्याचे कोणते फायदे आहेत?

पण, अतिरेक करण्याचे टाळणे खूप महत्त्वाचे आहे. काही जण देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार जितक्या आवेशाने करत नाहीत तितक्या आवेशाने ते विशिष्ट प्रकारचा आहार, उपचार किंवा उत्पादने घेण्याचे लोकांना प्रोत्साहन देतात. त्यांना असे प्रामाणिकपणे वाटू शकते की ते दुसऱ्‍यांना मदत करत आहेत. तरीसुद्धा, सभांच्या आधी किंवा नंतर राज्य सभागृहात, संमेलनांत किंवा अधिवेशनांत आरोग्य किंवा सौंदर्य उत्पादनांना व उपचारांना प्रसिद्धी देणे चुकीचे आहे. का?

आपण सभांमध्ये आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्यासाठी व देवाच्या पवित्र आत्म्याचा एक पैलू असलेला आनंद वाढवण्यासाठी एकत्र येतो. (गलती. ५:२२) अशा प्रसंगी आरोग्यविषयक सल्ला देणे किंवा उत्पादन विकणे योग्य नाही, मग कोणी त्याबद्दल आपल्याला विचारले असो वा नसो. यामुळे आपण आध्यात्मिक गोष्टींपासून विचलित होऊ शकतो आणि इतरांचा आनंद यामुळे हिरावला जाऊ शकतो. (रोम. १४:१७) आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे प्रत्येकाने स्वतः ठरवले पाहिजे. शिवाय, सर्व आजार दूर करू शकेल असा उपाय कोणाजवळही नाही. सर्वात उत्तम डॉक्टरसुद्धा वृद्ध होतात, आजारी पडतात आणि मरण पावतात. आपल्या आरोग्याविषयी प्रमाणाच्या बाहेर चिंता केल्याने आपले आयुष्य वाढेल असेही काही नाही. (लूक १२:२५) दुसरीकडे पाहता, “आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय.”—नीति. १७:२२.

१०. (क) यहोवाच्या दृष्टिकोनातून कोणते गुण एका व्यक्‍तीला सुंदर बनवतात? (ख) आपण खऱ्‍या अर्थाने सुदृढ आरोग्याचा आनंद कसा घेऊ शकतो?

१० त्याचप्रमाणे, आपल्या स्वरूपाची काळजी घेणे चुकीचे नाही. पण, वाढत्या वयाची सर्वच चिन्हे खोडून टाकण्याचा आपण अवाजवी प्रमाणात प्रयत्न करू नये. ही चिन्हे सहसा प्रौढत्वाची, सन्मानाची व आंतरिक सौंदर्याची लक्षणे असतात. उदाहरणार्थ, बायबल म्हणते: “पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो.” (नीति. १६:३१) यहोवा आपल्याला याच दृष्टिकोनातून पाहतो आणि आपणही स्वतःला त्याच्या दृष्टिकोनातूनच पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (१ पेत्र ३:३, ४ वाचा.) तर मग, केवळ शारीरिक रीत्या सुंदर दिसण्यासाठी अनावश्‍यक आणि हानिकारक ठरणाऱ्‍या शस्त्रक्रिया करणे किंवा औषधोपचार घेणे सुज्ञपणाचे ठरेल का? आपले वय कितीही असो किंवा आपले आरोग्य कसेही असो, परमेश्‍वराविषयीचा आनंद हाच खऱ्‍या सौंदर्याचा स्रोत आहे. (नहे. ८:१०) केवळ नवीन जगातच आपले आरोग्य पूर्णपणे सुदृढ होईल आणि आपण पुन्हा तरुण होऊ. (ईयो. ३३:२५; यश. ३३:२४) तोपर्यंत, व्यावहारिक बुद्धी व विश्‍वास दाखवल्यामुळे आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा उत्तम रीत्या उपयोग करून यहोवाच्या जवळ जाण्यास मदत मिळेल.—१ तीम. ४:८.

पैसा

११. पैसा एक पाश कसा ठरू शकतो?

११ पैसा असणे चुकीचे नाही किंवा प्रामाणिकपणे उद्योग करणेही चुकीचे नाही. (उप. ७:१२; लूक १९:१२, १३) पण “द्रव्याचा लोभ” बाळगल्यास आपण हमखास यहोवापासून दूर जाऊ. (१ तीम. ६:९, १०) “संसाराची चिंता” म्हणजे जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली अवाजवी काळजी आपली आध्यात्मिकता खुंटवू शकते. तसेच, “धनाची भुलवणारी शक्‍ती” आपल्याला या चुकीच्या गोष्टीवर विश्‍वास ठेवण्यास प्रवृत्त करू शकते की पैसा आपल्याला सार्वकालिक आनंद व सुरक्षितता देऊ शकतो. (मत्त. १३:२२, NW) येशूने हे स्पष्टपणे सांगितले की “कोणीही” यशस्वीपणे एकाच वेळी देवाची व धनाची सेवा करू शकत नाही.—मत्त. ६:२४.

१२. आज सगळीकडे कोणत्या प्रकारचे आर्थिक पाश दिसतात, आणि आपण ते कसे टाळू शकतो?

१२ पैशाबद्दल चुकीचा दृष्टिकोन असल्यामुळे एक व्यक्‍ती चुकीची कामे करू शकते. (नीति. २८:२०) एका झटक्यात पैसे कमवण्याच्या मोहामुळे काही जण लॉटरीची तिकिटे विकत घेतात किंवा अशा स्कीममध्ये पैसे गुंतवतात ज्यामध्ये झटपट पैसा कमवण्याचे आश्‍वासन दिले जाते. इतकेच काय, तर ते मंडळीतल्या इतरांनाही अशा व्यवसायांत पैसे गुंतवण्यास सांगतात. इतर काही बांधव, भरपूर नफा मिळेल या अपेक्षेने गुंतवणूक करून स्वतःची फसवणूक करतात. पैशाच्या लोभाला बळी पडू नका. आपल्या बुद्धीचा वापर करा. कमी वेळात जास्त पैसा मिळवून देण्याची आश्‍वासने सहसा विश्‍वासार्ह नसतात.

१३. पैशाबद्दलचा यहोवाचा दृष्टिकोन जगाच्या दृष्टिकोनापेक्षा कशा प्रकारे वेगळा आहे?

१३ जेव्हा आपण पहिल्याने यहोवाचे “राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास” झटतो तेव्हा उदरनिर्वाह करण्याच्या आपल्या संतुलित प्रयत्नांवर तो आशीर्वाद देतो. (मत्त. ६:३३; इफिस. ४:२८) यहोवाची अशी इच्छा नाही की ओव्हरटाईम केल्यामुळे आपण सभा चालू असताना झोपावे किंवा राज्य सभागृहात बसून पैशाविषयी चिंता करावी. पण, जगातील बरेच लोक असे मानतात की पैसा कमवण्यासाठी स्वतःला झोकून दिल्यामुळेच त्यांचे भविष्य सुरक्षित होईल आणि नंतरच्या आयुष्यात ते आरामाचे जीवन जगू शकतील. असे लोक आपल्या मुलांनाही भौतिक ध्येय गाठण्याचे प्रोत्साहन देतात. येशूने सांगितले की अशी विचारसरणी गैरवाजवी आहे. (लूक १२:१५-२१ वाचा.) ही गोष्ट आपल्याला गेहजीची आठवण करून देते ज्याला असे वाटले की तो लोभी मनोवृत्ती बाळगूनही यहोवासोबत एक चांगला नातेसंबंध टिकवून ठेवू शकतो.—२ राजे ५:२०-२७.

१४, १५. संरक्षणासाठी आपण आर्थिक व्यवस्थेवर भरवसा का ठेवू नये? उदाहरण द्या.

१४ असे सांगितले जाते की काही गरूड पाण्यात बुडाले, कारण त्यांनी पकडलेला मासा खूप जड असूनही तो पंजातून सोडण्यास ते तयार नव्हते. एखाद्या ख्रिश्‍चनासोबतही असे होऊ शकते का? ॲलेक्स नावाचे एक वडील म्हणतात: “मी सहसा खूप काटकसर करणारा आहे. शँपूच्या बाटलीतून जरा जास्त शँपू निघाल्यास मी तो पुन्हा बाटलीत टाकतो.” असे असूनही, ॲलेक्स शेअर बाजाराच्या व्यवसायात अडकले. त्यांनी विचार केला की ते लवकरच नोकरीचा राजीनामा देतील व पायनियर सेवा करण्यास सुरू करतील. ते वेगवेगळ्या स्कीम्सचा आणि बाजाराविषयीच्या अहवालांचा अभ्यास करण्यात अधिकाधिक गुंग झाले. स्वतःच्या साठवलेल्या पैशातून व दलालांकडून कर्ज घेतलेल्या पैशातून, त्यांनी असे शेअर विकत घेतले ज्यांची किंमत लगेच वाढेल असे विश्‍लेषकांनी भाकीत केले होते. पण या शेअर्सच्या किमती वाढण्याऐवजी जबरदस्त घसरल्या. ॲलेक्स सांगतात: “कसंही करून मला माझे पैसे परत मिळवायचे होते. मला असं वाटत होतं की जर मी काही काळ थांबलो, तर शेअर्सच्या किमती पुन्हा वर जातील.”

१५ कितीतरी महिने ॲलेक्स शेअर्सशिवाय दुसऱ्‍या कशाचाही विचार करू शकत नव्हते. आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण वाटू लागले आणि त्यांची झोपही उडाली. पण शेअर्सच्या किमती केव्हाही पुन्हा चढल्या नाहीत. ॲलेक्स यांनी आपला सर्व पैसा गमावला आणि त्यांना आपले घर विकावे लागले. ते म्हणतात: “माझ्यामुळं माझ्या कुटुंबाला खूप दुःख सोसावं लागलं.” पण यातून ते एक महत्त्वाचा धडा शिकले. ते पुढे म्हणतात: “आता मला कळलं आहे की जी व्यक्‍ती सैतानाच्या जगावर भरवसा ठेवते तिची घोर निराशाच होईल.” (नीति. ११:२८) आपल्या साठवलेल्या, गुंतवलेल्या पैशांवर किंवा या जगात पैसे कमवण्याच्या क्षमतेवर भरवसा ठेवणे म्हणजे या युगाच्या दैवतावर अर्थात सैतानावर भरवसा ठेवण्यासारखेच आहे. (२ करिंथ. ४:४; १ तीम. ६:१७) आता ॲलेक्स यांनी “सुवार्तेकरिता” आपले जीवन साधे केले आहे. ते आपल्याला सांगू इच्छितात की असे केल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला खूप आनंद झाला आहे आणि यहोवाच्या जवळ जाण्यास त्या सर्वांना मदत मिळाली आहे.—मार्क १०:२९, ३० वाचा.

अभिमान

१६. योग्य प्रकारचा अभिमान हा नकारात्मक गर्वाच्या तुलनेत कशा प्रकारे वेगळा आहे?

१६ योग्य गोष्टींचा अभिमान बाळगणे चांगली गोष्ट आहे. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार असल्याचा आपल्याला नेहमी अभिमान वाटला पाहिजे. (यिर्म. ९:२४) सकारात्मक आत्मसन्मान आपल्याला योग्य निर्णय घेण्यास आणि आपल्या उच्च नैतिक स्तरांना चिकटून राहण्यास मदत करेल. पण आपल्या मतांना किंवा आपल्या अधिकाराला खूप जास्त महत्त्व दिल्यास आपण यहोवापासून दूर जाऊ शकतो.—स्तो. १३८:६; रोम. १२:३.

मंडळीमध्ये जबाबदारीचे पद मिळवण्याची आस लावण्यापेक्षा प्रचार कार्य करण्यात आनंदाने सहभाग घ्या!

१७, १८. (क) बायबलमधील नम्र व गर्विष्ठ लोकांची उदाहरणे द्या. (ख) गर्वामुळे यहोवापासून दूर जाण्याचे एका बांधवाने कसे टाळले?

१७ बायबलमध्ये गर्विष्ठ लोकांची आणि नम्र लोकांचीही उदाहरणे आहेत. दावीद राजाने नम्रपणे, मार्गदर्शन मिळवण्यासाठी यहोवाजवळ मदत मागितली आणि यहोवाने त्याला आशीर्वादित केले. (स्तो. १३१:१-३) पण नबुखद्‌नेस्सर व बेलशस्सर यांसारख्या गर्विष्ठ राजांना यहोवाने नमवले. (दानी. ४:३०-३७; ५:२२-३०) आजही अशी परिस्थिती उद्‌भवू शकते ज्यात आपली नम्रता पारखली जाऊ शकते. उदाहरणार्थ, ३२ वर्षांचा सेवा सेवक रायन एका नवीन मंडळीसोबत सहवास करू लागला. रायन म्हणतो: “मला लवकरच एक वडील म्हणून नेमण्यात येईल अशी मी अपेक्षा करत होतो, पण एक वर्ष लोटले तरी असे काही झाले नाही.” वडिलांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असा विचार करून तो रागावला का किंवा त्याच्या मनात कटू भावना निर्माण झाल्या का? त्याने सभांना उपस्थित राहण्याचे थांबवले का व अशा प्रकारे गर्वामुळे स्वतःला यहोवापासून व त्याच्या लोकांपासून दूर केले का? तुम्ही त्याच्या परिस्थितीत असता तर काय केले असते?

१८ रायन आठवून सांगतो: “अपेक्षा लांबणीवर टाकली जाते तेव्हा काय करावं याविषयी मी आपल्या प्रकाशनांमध्ये असलेली सर्व माहिती वाचून काढली.” (नीति. १३:१२) “मला याची जाणीव झाली की मला सहनशीलता आणि नम्रता हे गुण वाढवण्याची आणि यहोवा देत असलेले प्रशिक्षण स्वीकारण्याची गरज आहे.” रायनने स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मंडळीत आणि क्षेत्र सेवेत दुसऱ्‍यांना साहाय्य करण्यावर ते केंद्रित केले. लवकरच तो अनेक प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करू लागला. तो म्हणतो: “मला जेव्हा दीड वर्षांनी वडील म्हणून नेमण्यात आलं, तेव्हा मी आश्‍चर्यचकित झालो. कारण मी प्रचार कार्यात इतका गुंग झालो होतो की याविषयी चिंता करण्याचं मी सोडून दिलं होतं.”—स्तोत्र ३७:३, ४ वाचा.

यहोवाच्या जवळ राहा!

१९, २०. (क) दररोजच्या जीवनात आपण ज्या गोष्टी करतो त्या आपल्याला यहोवापासून दूर नेणार नाहीत याची खातरी आपण कशी करू शकतो? (ख) बायबलमधील कोणाच्या उदाहरणाचे तुम्ही अनुकरण करू शकता जे यहोवाच्या जवळ राहिले?

१९ या व मागच्या लेखांत चर्चा केलेल्या सर्वच गोष्टींचे आपल्या जीवनात स्थान आहे. यहोवाचे सेवक असण्याचा आपण अभिमान बाळगतो. आनंदी कुटुंब आणि चांगले आरोग्य यहोवाच्या सर्वात अमूल्य भेटींपैकी आहेत. नोकरी केल्यामुळे व पैशामुळे आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो याची जाणीव आपल्याला आहे. करमणुकीमुळे आपल्याला आनंद होतो आणि तंत्रज्ञान फार उपयोगी आहे. पण चुकीच्या वेळी, प्रमाणाच्या बाहेर किंवा उपासनेत कोणत्याही प्रकारे व्यत्यय येईल अशा रीतीने या गोष्टींच्या मागे लागल्यास त्या आपल्याला यहोवापासून दूर नेऊ शकतात.

जगातील कोणत्याही गोष्टीला तुम्हाला यहोवापासून दूर नेऊ देऊ नका!

२० तुम्ही यहोवापासून दूर व्हावे अशी सैतानाची इच्छा आहे. तरीही तुम्ही हे संकट तुमच्यावर व तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांवर येण्याचे टाळू शकता! (नीति. २२:३) यहोवाच्या जवळ या आणि त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवा. या बाबतीत आपले मार्गदर्शन करण्यासाठी बायबलमध्ये बरीच उदाहरणे आहेत. हनोख व नोहा “देवाबरोबर” चालले. (उत्प. ५:२२; ६:९) मोशेने, “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा . . . धीर धरला.” (इब्री ११:२७) येशूला देवाचा सदैव पाठिंबा होता कारण त्याने नेहमी आपल्या स्वर्गीय पित्याचे मन आनंदित केले. (योहा. ८:२९) या व अशा उदाहरणांचे अनुकरण करा. “सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा.” (१ थेस्सलनी. ५:१६-१८) आणि जगातील कोणत्याही गोष्टीला तुम्हाला यहोवापासून दूर नेऊ देऊ नका!

^ काही नावे बदलण्यात आली आहेत.

^ “कशी घडवाल जबाबदार मुलं?” हे माहितीपत्रक पाहा.

^ सजग होइए! जुलै-सप्टेंबर २०११ चा “अच्छी सेहत पाने के पाँच सुझाव” हा अंक पाहा.