व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अलीशाने अग्निमय रथ पाहिले—तुम्हीही पाहू शकता का?

अलीशाने अग्निमय रथ पाहिले—तुम्हीही पाहू शकता का?

अरामाचा राजा, देवाचा संदेष्टा अलीशा याच्या मागावर असतो. तो दोथान या तटबंदी असलेल्या शहरात आहे हे कळताच अरामाचा राजा त्या रात्री घोडे, रथ आणि सैन्य पाठवतो. त्याचे सैन्य रातोरात त्या शहराला वेढा घालते.—२ राजे ६:१३, १४.

अलीशाचा सेवक सकाळी उठून बाहेर येतो आणि सैन्याला पाहून घाबरतो. तो ओरडून म्हणतो: “स्वामी, हाय! हाय! आता आपण काय करावे?” अलीशा त्याला म्हणतो: “भिऊ नको; त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.” नंतर, अलीशा प्रार्थना करतो: “हे परमेश्‍वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे.” अहवाल पुढे सांगतो: “परमेश्‍वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले.” (२ राजे ६:१५-१७) अलीशाच्या जीवनात घडलेल्या या आणि इतर घटनांवरून आपल्याला काय शिकायला मिळते?

अरामाच्या सैन्याने वेढा घातला तेव्हा अलीशा घाबरला नाही कारण यहोवावर त्याचा पूर्ण भरवसा होता आणि यहोवा त्याचे रक्षण कसे करत आहे हेही त्याने पाहिले. आज आपण चमत्कारिक कृत्यांची अपेक्षा करत नाही, पण एक समूह या नात्याने यहोवा त्याच्या लोकांचे संरक्षण करत आहे याची आपल्याला खातरी आहे; एका अर्थाने आपल्या सभोवतीही अग्निमय रथ आणि घोडे आहेत. आपण जर त्यांना आपल्या विश्‍वासाच्या डोळ्यांनी पाहिले आणि नेहमी यहोवावर विसंबून राहिलो तर आपण “निर्भय” राहू शकू आणि यहोवाचे आशीर्वाद अनुभवू शकू. (स्तो. ४:८) अलीशाच्या जीवनात घडलेल्या इतर घटनांवर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हे आता आपण पाहू या.

अलीशा एलीयाची सेवा करण्यास सुरुवात करतो

एका प्रसंगी, अलीशा शेतात काम करत असताना एलीया संदेष्टा तेथे येतो आणि स्वतःचा झगा काढून अलीशावर टाकतो. असे करण्याद्वारे एलीया अलीशाला त्याचा सेवक बनण्याचे आमंत्रण देतो. तेव्हा, अलीशा एक मोठी मेजवानी ठेवतो, आई-वडिलांचा आनंदाने निरोप घेतो आणि एलीयाची सेवा करण्यासाठी घराबाहेर पडतो. (१ राजे १९:१६, १९-२१) अलीशा यहोवाच्या सेवेत होता होईल तितके करण्यासाठी स्वतःला झोकून देतो म्हणूनच यहोवा त्याचा उपयोग करतो आणि पुढे तो एलीयाच्या जागी संदेष्टा या नात्याने सेवा करू लागतो.

अलीशाने जवळजवळ एलीयाची सहा वर्षे सेवा केली. त्यादरम्यान, अलीशा एलीयाच्या “हातावर पाणी” घालत असे. (२ राजे ३:११) पूर्वीच्या काळी, घरातील सेवक जी कामे करायचा त्यांपैकी एक काम म्हणजे, जेवण झाल्यावर हात धुताना धन्याच्या हातावर पाणी घालणे. अलीशा जे काम करायचा ते क्षुल्लक होते असे वाटेल, पण एलीयाचा सेवक या नात्याने हे काम करणे हा एक बहुमानच आहे असे त्याने मानले.

आज बरेच ख्रिस्ती वेगवेगळ्या प्रकारचे पूर्णवेळचे सेवाकार्य करतात. यहोवावर विश्‍वास असल्यामुळे आणि त्याच्या सेवेत होता होईल तितके करण्याची इच्छा असल्यामुळे ते असे करण्यास प्रवृत्त होतात. काही जण बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी, बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यासाठी आणि अशा प्रकारचे इतर पूर्णवेळचे सेवाकार्य करण्यासाठी घराबाहेर पडतात. बऱ्‍याच लोकांना अशा प्रकारची कामे क्षुल्लक वाटतील. पण ख्रिस्ती या नात्याने आपण या कामांना क्षुल्लक किंवा खालच्या दर्जाचे समजू नये कारण यहोवाच्या नजरेत ही कामे खूप मौल्यवान आहेत.—इब्री ६:१०.

अलीशा त्याच्या नेमणुकीशी जडून राहतो

एलीयाला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याआधी देव त्याला गिलगालहून बेथेल येथे जाण्यास सांगतो. अलीशा जेव्हा एलीयासोबत जाण्याची इच्छा दर्शवतो तेव्हा एलीया त्याला तिथेच थांबण्यास सांगतो. पण अलीशा त्याला म्हणतो: “मी आपल्याला कधी सोडावयाचा नाही.” दोघे चालत असताना एलीया आणखी दोन वेळा अलीशाला माघारी जाण्यास सांगतो, पण अलीशा त्याचे काहीएक ऐकायला तयार नसतो. (२ राजे २:१-६) ज्याप्रमाणे रूथ नामीशी जडून राहिली होती त्याच प्रकारे अलीशा, एलीयाशी जडून राहतो. (रूथ १:८, १६, १७) का? कारण, एलीयाची सेवा करण्याचा त्याला जो बहुमान मिळाला होता त्याची तो मनापासून कदर करायचा.

अलीशाने खरोखरच आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण मांडले. आपण यहोवाची सेवा करत आहोत ही गोष्ट जर नेहमी लक्षात ठेवली, तर यहोवाच्या संघटनेद्वारे आपल्याला कोणतीही नेमणूक देण्यात आल्यास ती खूप मौल्यवान आहे असे आपण समजू. खरेच, यहोवाची सेवा करण्यापेक्षा मोठा बहुमान असूच शकत नाही!—स्तो. ६५:४; ८४:१०.

“मी तुजसाठी काय करू ते मला सांग”

दोघे चालत असता एलीया अलीशाला म्हणतो: “मला तुजपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुजसाठी काय करू ते मला सांग.” ज्या प्रकारे शलमोनाने बऱ्‍याच वर्षांआधी केले होते त्याच प्रकारे अलीशादेखील देवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी देवाकडे मागणे मागतो. तो एलीयाच्या “आत्म्याचा दुप्पट वाटा” मागतो. (१ राजे ३:५, ९; २ राजे २:९) इस्राएलमध्ये, घरातल्या ज्येष्ठ पुत्राला मालमत्तेतून दुप्पट वाटा दिला जायचा. (अनु. २१:१५-१७) त्याअर्थी, अलीशा एलीयाचा वारस बनण्याची किंवा एलीयाच्या जागी संदेष्टा म्हणून नेमले जाण्याची विनंती करत होता. तसेच, खऱ्‍या उपासनेप्रती एलीयाची जी मनोवृत्ती होती, जो आवेश होता त्याच प्रकारची मनोवृत्ती आणि आवेश दाखवण्याची अलीशाची इच्छा असल्यामुळे तो एलीयाचा आत्मा मिळण्याची विनंती करतो.—१ राजे १९:१३, १४.

एलीयाने त्याच्या सेवकाच्या विनंतीला कसा प्रतिसाद दिला? एलीया म्हणतो: “तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुजपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.” (२ राजे २:१०) एलीयाने जे म्हटले त्यावरून दोन गोष्टी सूचित झाल्या. एक म्हणजे, अलीशाने जे मागितले आहे ते द्यायचे की नाही हे फक्‍त यहोवाच ठरवू शकत होता. दुसरी म्हणजे, अलीशाला जर वारसाहक्क हवा असेल तर काहीही झाले तरी एलीयासोबत राहण्याचा त्याने जो निश्‍चय केला होता त्या निश्‍चयाला त्याला जडून राहावे लागेल.

अलीशाने काय पाहिले?

अलीशाने एलीयाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मागितला त्याप्रती देवाचा काय दृष्टिकोन होता? अहवाल पुढे सांगतो: “ते बोलत चालले असता, पाहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारु दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांस अलग केले; एलीया वावटळीतून स्वर्गास गेला.” * अशा रीतीने, देवाने अलीशाची विनंती मान्य केली. म्हणजेच, एलीया आपल्यापासून विलग होत आहे हे अलीशाने पाहिले, त्याला एलीयाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मिळाला आणि त्याचबरोबर एलीयाच्या जागी संदेष्टा म्हणून त्याला नेमण्यात आले.—२ राजे २:११-१४.

एलीयाच्या अंगावरून जो झगा पडतो तो अलीशा उचलतो आणि घालतो. या झग्यावरून अलीशा देवाचा संदेष्टा आहे हे लोक ओळखणार होते. पुढे यार्देन नदीचे दोन भाग करण्याद्वारे अलीशा जो चमत्कार करतो यावरूनही पुरावा मिळतो की त्याला देवाचा संदेष्टा म्हणून नेमण्यात आले आहे.

एलीया वावटळीतून स्वर्गात जात आहे हे अलीशा पाहतो तेव्हा त्याच्या मनावर अतिशय खोलवर प्रभाव पडला असेल यात शंका नाही. खरेतर, अग्निमय घोडे आणि रथ पाहून कोणालाही आश्‍चर्यच वाटेल! अलीशाने जे पाहिले त्यावरून, यहोवाने त्याची मागणी पूर्ण केली होती हे दिसते. यहोवा जेव्हा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो तेव्हा आपल्याला अग्निमय घोडे आणि रथ पाहायला मिळत नाहीत. पण, यहोवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या अफाट शक्‍तीचा उपयोग करतो हे आपण ओळखू शकतो. तसेच, यहोवा त्याच्या संघटनेच्या पृथ्वीवरील भागावर कसा आशीर्वाद देत आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा जणू त्याचे स्वर्गीय रथ वाटचाल करत असल्याचे आपल्याला दिसते.—यहे. १०:९-१३.

अलीशाला बऱ्‍याचदा यहोवाच्या अद्‌भुत शक्‍तीचा अनुभव आला. खरे पाहता, यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने अलीशा, एलीयाने केलेल्या चमत्कारांच्या दुप्पट, म्हणजे १६ चमत्कार करू शकला. * अलीशाने आणखी एकदा अग्निमय रथ आणि घोडे पाहिले. ही घटना दोथान या ठिकाणी अरामी सैन्याने वेढा घातला होता त्या वेळी घडली, जिचे वर्णन या लेखाच्या सुरुवातीला करण्यात आले आहे.

अलीशा यहोवावर विश्‍वास ठेवतो

दोथान नगराच्या भोवती शत्रूंनी वेढा घातला होता तरी अलीशा शांत होता. का? कारण, यहोवावर त्याचा दृढ विश्‍वास होता. आपणही असाच दृढ विश्‍वास उत्पन्‍न केला पाहिजे. तेव्हा, आपण यहोवाजवळ त्याच्या पवित्र आत्म्याची मागणी करू या जेणेकरून आपण विश्‍वास दाखवू शकू आणि आत्म्याच्या फळाचे इतर पैलू विकसित करू शकू.—लूक ११:१३; गलती. ५:२२, २३.

दोथान या ठिकाणी जे घडले त्यावरून अलीशाचा यहोवावरील आणि त्याच्या अदृश्‍य देवदूतांवरील विश्‍वास आणखी वाढला. यहोवाने आपले रक्षण करण्यासाठी देवदूत पाठवले असल्याचे त्याने पाहिले. यहोवाने चमत्कारिक रीत्या शत्रूंना आंधळे करून अलीशाचे आणि त्याच्या सेवकाचे रक्षण केले. (२ राजे ६:१७-२३) अशा खडतर प्रसंगी, आणि इतर परिस्थितीतही अलीशाने यहोवावर पूर्ण भरवसा व विश्‍वास दाखवला.

अलीशाप्रमाणे आपणही यहोवावर पूर्ण भरवसा दाखवू या. (नीति. ३:५, ६) असे केल्यास, यहोवा आपल्यावर दया करेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. (स्तो. ६७:१) आपल्या सभोवती काही खरोखरचे अग्निमय रथ आणि घोडे नाहीत. पण, यहोवा येणाऱ्‍या मोठ्या संकटादरम्यान जगभरातील आपल्या बंधुसमाजाचे रक्षण करेल. (मत्त. २४:२१; प्रकटी. ७:९, १४) तोपर्यंत, आपण हे नेहमी लक्षात ठेवू या की यहोवा देव आपला “आश्रय आहे.”—स्तो. ६२:८.

^ ज्या स्वर्गात देव आणि त्याचे आत्मिक पुत्र राहतात त्या ठिकाणी एलीया गेला नाही. टेहळणी बुरूज, १५ सप्टेंबर १९९७, पृष्ठ १५ पाहा.

^ टेहळणी बुरूज, १ ऑगस्ट २००५ या अंकातील पृष्ठ १० पाहा.