यहोवाच्या सूचनांचे आनंदाने पालन करा
“तुझे निर्बंध [सूचना] माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत.”—स्तो. ११९:१११.
१. (क) मार्गदर्शन किंवा सूचना दिल्या जातात तेव्हा लोक कसा प्रतिसाद देतात, आणि का? (ख) गर्वामुळे एक व्यक्ती सल्ल्याकडे कोणत्या दृष्टिकोनाने पाहू शकते?
मार्गदर्शनाला लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. अधिकारपदावर असलेल्या एखाद्या व्यक्तीचे मार्गदर्शन किंवा सूचना सहसा आनंदाने स्वीकारल्या जातात, तर आपल्याच वयाच्या किंवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीच्या सूचनांना सहसा नकार दिला जातो. सूचना किंवा सल्ला दिला जातो तेव्हा काही लोकांना दुःख वाटते, ते निरुत्साहित होतात किंवा त्यांना लाजिरवाणे वाटते. पण, इतर काही जणांना मात्र सूचना स्वीकारून चांगले ते करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हा फरक का? यामागील एक कारण आहे गर्व. एखाद्या व्यक्तीला सल्ला दिला जातो तेव्हा हा सल्ला मला लागू होत नाही असा विचार करून ती व्यक्ती तो नाकारते आणि मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा फायदा घेत नाही.—नीति. १६:१८.
२. खरे ख्रिस्ती देवाच्या वचनातून मिळणाऱ्या सल्ल्याची कदर का करतात?
२ दुसरीकडे पाहता, खरे ख्रिस्ती त्यांच्या भल्याकरता दिलेल्या सल्ल्याची कदर करतात, खासकरून हा सल्ला देवाच्या वचनातून दिला जातो तेव्हा. यहोवाच्या सूचनांतून आपल्याला बरीच मोलाची माहिती मिळते. त्यामुळे आपल्याला पैशांचा लोभ, लैंगिक अनैतिकता आणि मादक पदार्थांचा दुरुपयोग किंवा अतिमद्यपान यांसारख्या गोष्टी कशा टाळता येतील हे शिकायला मिळते. (नीति. २०:१; २ करिंथ. ७:१; १ थेस्सलनी. ४:३-५; १ तीम. ६:६-११) शिवाय, देवाच्या सूचनांचे पालन केल्यामुळे आपले मन आनंदित होते.—यश. ६५:१४.
३. स्तोत्रकर्त्याच्या कोणत्या मनोवृत्तीचे अनुकरण करणे चांगले आहे?
३ आपला स्वर्गीय पिता यहोवा याच्यासोबतचा मौल्यवान नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या जीवनात त्याच्या सुज्ञ सूचनांचा निरंतर अवलंब केला पाहिजे. या बाबतीत आपली मनोवृत्ती स्तोत्रकर्त्याप्रमाणे असली पाहिजे, ज्याने लिहिले: “तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो.” (स्तो. ११९:१११) यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यास स्तोत्रकर्त्याप्रमाणेच आपल्यालाही आनंद वाटतो का, की कधीकधी आपण त्या आज्ञांना ओझ्यासारखे मानतो? एखाद्या सल्ल्याचे पालन करणे जरी आपल्याला कठीण वाटले, तरी आपण निराश होऊ नये. देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे नेहमीच आपल्या भल्यासाठी असते याबद्दल आपला भरवसा आपण दृढ करू शकतो. हे कसे करता येईल याचे तीन मार्ग आपण पाहू या.
प्रार्थनेद्वारे भरवसा दृढ करा
४. दाविदाच्या जीवनात कोणती गोष्ट अढळ होती?
४ दावीद राजाच्या जीवनात बऱ्याच चांगल्या-वाईट घटना घडल्या. पण, एक गोष्ट मात्र अढळ राहिली; आणि ती म्हणजे सृष्टिकर्त्यावरील त्याचा भरवसा. त्याने म्हटले: “हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. हे देवा, तुझ्यावर माझी श्रद्धा आहे.” (स्तो. २५:१, २) आपल्या स्वर्गातील पित्यावर अशा प्रकारचा भरवसा विकसित करण्यास दाविदाला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली?
५, ६. बायबल आपल्याला दाविदाच्या यहोवासोबत असलेल्या नातेसंबंधाविषयी काय सांगते?
५ बरेच लोक फक्त समस्या येतात तेव्हाच देवाला प्रार्थना करतात. जरा विचार करा: तुमच्या एखाद्या मित्राने किंवा नातेवाइकाने फक्त पैशांची किंवा मदतीची गरज असते तेव्हाच जर तुमच्याशी संपर्क साधला तर तुम्हाला कसे वाटेल? कालांतराने, या व्यक्तीचे खरोखर तुमच्यावर प्रेम आहे की नाही अशी शंका तुमच्या मनात येईल. पण, दावीद अशा मित्रासारखा किंवा नातेवाइकासारखा नव्हता. त्याच्या प्रार्थनांवरून दिसून येते की त्याने त्याच्या संबंध जीवनात, चांगल्या आणि वाईट काळात, नेहमीच यहोवावर प्रेम केले आणि त्याच्यावर भरवसा ठेवला.—स्तो. ४०:८.
६ दाविदाने यहोवाची स्तुती कशी केली व त्याचे आभार कसे मानले त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटले: “हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे.” (स्तो. ८:१) आपल्या स्वर्गीय पित्यासोबत दाविदाचा किती घनिष्ट नातेसंबंध होता हे तुमच्या लक्षात आले का? यहोवा किती थोर आणि वैभवशाली आहे हे पाहून दाविदावर इतका जबरदस्त प्रभाव पडला होता की तो “दिवसभर” यहोवाची स्तुती करण्यास प्रेरित झाला.—स्तो. ३५:२८.
७. नियमितपणे यहोवाला प्रार्थना केल्यामुळे आपल्याला कशा प्रकारे साहाय्य मिळेल?
७ यहोवावरील आपला भरवसा वाढवण्यासाठी आपण दाविदाप्रमाणेच नियमितपणे यहोवासोबत बोलणे गरजेचे आहे. बायबल म्हणते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याको. ४:८) यहोवाला प्रार्थना केल्यामुळे आपण त्याच्या जवळ जातो. तसेच, देवाचा पवित्र आत्मा मिळवण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.—१ योहान ३:२२ वाचा.
८. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तेच ते शब्द बोलण्याचे आपण का टाळले पाहिजे?
८ तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा तुम्ही तेच ते शब्द किंवा तीच ती वाक्ये बोलता का? जर असे होत असेल तर प्रार्थना करण्याआधी, तुम्हाला काय बोलायचे आहे त्यावर काही मिनिटे विचार करा. एखाद्या मित्राशी किंवा नातेवाइकाशी बोलताना प्रत्येक वेळी आपण तेच ते शब्द वापरले तर त्याला ते आवडेल का? काही काळानंतर तो कदाचित आपले ऐकणारही नाही. अर्थात, यहोवाचा एकनिष्ठ सेवक त्याला प्रामाणिकपणे प्रार्थना करतो तेव्हा तो कधीही त्याच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करणार नाही. असे असले, तरीसुद्धा आपल्या प्रार्थना रटाळ बनणार नाहीत याची खबरदारी आपण बाळगली पाहिजे.
९, १०. (क) आपण कशाविषयी प्रार्थना करू शकतो? (ख) कोणती गोष्ट आपल्याला मनापासून प्रार्थना करण्यास मदत करेल?
९ साहजिकच जर आपल्याला देवासोबत घनिष्ट नातेसंबंध जोडायचा असेल, तर केवळ वरवरच्या गोष्टींविषयी प्रार्थना करून चालणार नाही. आपण यहोवाजवळ जितके जास्त आपले मन मोकळे करू तितकेच जास्त आपण त्याच्या जवळ जाऊ व तितकाच जास्त त्याच्यावर असलेला आपला भरवसा वाढेल. पण मग आपण कशाविषयी प्रार्थना केली पाहिजे? बायबल याचे उत्तर देते: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” (फिलिप्पै. ४:६) तेव्हा, ज्या गोष्टींचा आपल्या जीवनावर किंवा देवासोबतच्या आपल्या मैत्रीवर प्रभाव पडतो अशा सर्व गोष्टींविषयी आपण प्रार्थना करू शकतो.
१० बायबलमध्ये अनेक विश्वासू पुरुषांच्या व स्त्रियांच्या प्रार्थना नमूद करण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्रार्थनांतून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. (१ शमु. १:१०, ११; प्रे. कृत्ये ४:२४-३१) स्तोत्रांत, यहोवाला मनःपूर्वक केलेल्या प्रार्थनांचा व त्याच्या स्तुतीसाठी गायलेल्या गीतांचा समावेश होतो. या प्रार्थनांमध्ये व गीतांमध्ये दुःखापासून ते उल्हासापर्यंतच्या सर्व मानवी भावनांचा समावेश होतो. देवाच्या एकनिष्ठ सेवकांनी केलेल्या या प्रार्थनांचे परीक्षण केल्यामुळे, यहोवाला अर्थपूर्ण प्रार्थना करण्यास आपल्याला मदत मिळेल.
देवाच्या सूचनांवर मनन करा
११. देवाकडून मिळणाऱ्या सल्ल्यांवर आपण मनन का केले पाहिजे?
११ दाविदाने म्हटले: “परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करतो.” (स्तो. १९:७) खरेच, आपल्याजवळ फारसा अनुभव नसला तरी देवाच्या आज्ञांचे पालन केल्यामुळे आपण सुज्ञ बनू शकतो. बायबलमधील सल्ल्यांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आपण त्यांवर मनन केले पाहिजे. उदाहरणार्थ, बायबल तत्त्वांवर मनन केल्यास, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला चुकीची गोष्ट करण्याचा मोह होतो तेव्हा एकनिष्ठ राहण्यास मदत मिळते. रक्ताविषयी व जगातील राजकारणापासून दूर राहण्याविषयी असलेल्या देवाच्या नियमांचे पालन करण्यासही यामुळे मदत मिळते. शिवाय मनन केल्यामुळे, पेहराव निवडताना बायबल तत्त्वे लागू करण्यास मदत मिळते. देवाने दिलेल्या सल्ल्यांवर मनन केल्यामुळे, अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करण्यास आपण आपल्या मनाची तयारी करतो. यांपैकी एखादी समस्या आपल्यासमोर आलीच तर काय करावे हे आपण आधीच ठरवू शकतो. अशा प्रकारे, आधीपासून विचार केल्यामुळे व पूर्वतयारी केल्यामुळे आपण गंभीर चुका टाळू शकतो.—नीति. १५:२८.
१२. कोणत्या प्रश्नांवर मनन केल्यामुळे आपल्याला देवाच्या सूचना आठवणीत ठेवण्यास मदत मिळेल?
१२ देवाचे अभिवचन पूर्ण होण्याची वाट पाहत असताना आपण आपल्या जीवनशैलीतून दाखवतो का की आपण आजही आध्यात्मिक रीत्या जागृत आहोत? उदाहरणार्थ, मोठ्या बाबेलचा लवकरच नाश होईल असा भरवसा आपण खरोखरच बाळगतो का? भविष्यात आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादांबद्दल जसे की नंदनवनात सार्वकालिक जीवन जगण्याच्या आशीर्वादाबद्दल आपण जेव्हा शिकलो तेव्हा तो आपल्याला जितका खरा वाटला तितकाच आताही खरा वाटतो का? आपण प्रचार कार्यात आपला आवेश टिकवून ठेवला आहे का, की वैयक्तिक गोष्टींना आपण जीवनात जास्त महत्त्व देत आहोत? पुनरुत्थानाच्या आशेविषयी, यहोवाचे नाव पवित्र केले जाण्याविषयी आणि त्याचे सार्वभौमत्व सिद्ध केले जाण्याविषयी काय? हे विषय आपल्याला आजही तितकेच महत्त्वाचे वाटतात का जितके आधी वाटायचे? अशा प्रश्नांवर मनन केल्यामुळे आपल्यालाही स्तोत्रकर्त्याप्रमाणे देवाचे “निर्बंध . . . सर्वकाळचे वतन” आहेत असे म्हणता येईल.—स्तो. ११९:१११.
१३. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना काही गोष्टी समजण्यास कठीण का वाटत होत्या? उदाहरण द्या.
१३ बायबलमध्ये लिहिलेल्या काही गोष्टी आज आपल्याला पूर्णपणे समजणार नाहीत. कारण त्या गोष्टी उघड करण्याचा, यहोवाचा समय अद्यापही आलेला नाही. येशूने वारंवार आपल्या प्रेषितांना सांगितले की त्याला दुःख सोसावे लागेल व जिवे मारण्यात येईल. (मत्तय १२:४०; १६:२१ वाचा.) पण येशूला नक्की काय म्हणायचे आहे हे प्रेषितांना पूर्णपणे समजले नाही. येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतर तो त्याच्या शिष्यांसमोर प्रगट झाला व “त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले,” तेव्हा कोठे त्याच्या शिष्यांना त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. (लूक २४:४४-४६; प्रे. कृत्ये १:३) तसेच, इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेव्हा ख्रिस्ताच्या शिष्यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक करण्यात आला तेव्हाच त्यांना समजले की देवाचे राज्य स्वर्गातून राज्य करेल.—प्रे. कृत्ये १:६-८.
१४. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बऱ्याच बांधवांना शेवटल्या काळाविषयी गैरसमज होता तरी त्यांनी कोणते चांगले उदाहरण मांडले?
१४ अशाच प्रकारे, २० व्या शतकाच्या सुरुवातीला खऱ्या ख्रिश्चनांमध्ये शेवटल्या काळाबद्दल बऱ्याच चुकीच्या धारणा होत्या. (२ तीम. ३:१) उदाहरणार्थ, १९१४ साली काहींना वाटले की या वर्षी त्यांचे स्वर्गात जाणे निश्चित आहे, पण असे झाले नाही. त्यांनी शास्त्रवचनांचे पुन्हा परीक्षण केले, तेव्हा त्यांना याची जाणीव झाली की मोठ्या प्रमाणात प्रचार करण्याचे कार्य बाकी आहे. (मार्क १३:१०) म्हणून १९२२ मध्ये जे. एफ. रदरफर्ड, जे त्या काळी प्रचार कार्याचे नेतृत्व करायचे, त्यांनी अमेरिकेच्या ओहायो राज्यातील सीडर पॉईंट येथे भरलेल्या अधिवेशनासाठी जमा झालेल्यांना असे म्हटले: “पाहा, राजा राज्य करत आहे! तुम्ही लोकांसमोर त्याचे प्रतिनिधी आहात. म्हणून राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा.” तेव्हापासून, “राज्याची सुवार्ता” इतरांना जाऊन सांगणे हे आधुनिक काळातील यहोवाच्या सेवकांचे ओळखचिन्ह बनले आहे.—मत्त. ४:२३; २४:१४.
१५. देवाने त्याच्या लोकांकरता जे काही केले आहे त्यावर मनन केल्यास आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
१५ यहोवाने त्याच्या लोकांना दिलेली अभिवचने गतकाळात व सध्याच्या काळातही किती अद्भुत रीत्या पूर्ण केली आहेत यावर मनन करणे आपल्याकरता चांगले आहे. यांवर मनन केल्यामुळे, भविष्यातही यहोवा त्याची इच्छा व त्याचा उद्देश पूर्ण करण्यास समर्थ आहे यावरील आपला भरवसा अधिक वाढतो. शिवाय देवाकडून मिळणाऱ्या सूचनांमुळे, लवकरच पूर्ण होणार असलेल्या त्याच्या भविष्यवाण्या आठवणीत ठेवण्यास आपल्याला मदत मिळेल. अशा प्रकारे, देवाने दिलेल्या अभिवचनांवर आपला भरवसा नक्कीच वाढेल अशी खात्री आपण बाळगू शकतो.
उपासना करण्याद्वारे भरवसा दृढ करा
१६. सेवाकार्यात क्रियाशील असल्यामुळे कोणते आशीर्वाद लाभतील?
१६ यहोवा आपला देव अतिशय क्रियाशील देव आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे?” तो पुढे म्हणतो: “तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे.” (स्तो. ८९:८, १३) तो क्रियाशील देव असल्यामुळे, आपण जेव्हा राज्याशी संबंधित कार्य करण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि आपल्या मेहनतीवर तो आशीर्वाद देतो. त्याचे सेवक, पुरुष असो किंवा स्त्री असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, ते “आळशी बसून अन्न खात” नाहीत हे तो लक्षात घेतो. (नीति. ३१:२७) आपल्या निर्माणकर्त्याप्रमाणे आपणही देवाच्या सेवेत स्वतःला व्यस्त ठेवले पाहिजे. देवाची सेवा पूर्ण मनाने केल्यामुळे आपल्याला आनंद अनुभवायला मिळेल व यहोवादेखील खूश होईल.—स्तोत्र ६२:१२ वाचा.
१७, १८. जेव्हा आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करतो तेव्हा आपला भरवसा कसा दृढ होतो? उदाहरण द्या.
१७ यहोवाच्या सेवेत केलेल्या कार्यांमुळे त्याच्यावरील आपला भरवसा कसा वाढू शकतो? उदाहरणार्थ, अभिवचन दिलेल्या देशात प्रवेश करणाऱ्या इस्राएल राष्ट्राचा विचार करा. यहोवाने याजकांना कराराचा कोश घेऊन यार्देन नदीत उतरण्यास सांगितले. पण ते नदीच्या जवळ आले तेव्हा कापणीच्या काळात पडणाऱ्या पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहत असल्याचे त्यांनी पाहिले. आता इस्राएली लोक काय करणार होते? नदीच्या काठावर तंबू ठोकून नदीचे पाणी कमी होईपर्यंत ते काही आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ तिथे थांबणार होते का? नाही, त्यांनी यहोवावर पूर्ण भरवसा दाखवला व त्याचे मार्गदर्शन पाळले. याचा परिणाम? अहवाल म्हणतो: “याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले. आणि लगेच पाणी वाहायचे थांबले. . . . [याजक] नदीच्या मध्यावर आले व थांबले. सर्व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून यार्देन पलीकडे निघून जाईपर्यंत ते तिथेच थांबले.” (यहो. ३:१२-१७, ईझी-टू-रीड व्हर्शन) इतक्या जोरात वाहणारे पाणी थांबल्याचे पाहून इस्राएली लोक किती आनंदी झाले असतील याचा जरा विचार करा. खरेच, यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे यहोवावरील त्यांचा भरवसा नक्कीच दृढ झाला असेल.
१८ हे खरे आहे की यहोवा आज त्याच्या लोकांकरता असे चमत्कार करत नाही, पण जेव्हा आपण त्याच्यावर भरवसा दाखवतो व त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद देतो. देवाची क्रियाशील शक्ती आपल्यावर सोपवलेले काम करण्यास अर्थात जगभरात राज्याची सुवार्ता सांगण्यास मदत करते. आणि येशू ख्रिस्त जो यहोवाचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार आहे त्याने त्याच्या शिष्यांना असे वचन दिले की या महत्त्वाच्या कार्यात तो त्यांच्यासोबत आहे. त्याने म्हटले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा . . . युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:१९, २०) लाजाळू स्वभाव असल्यामुळे किंवा भीती वाटत असल्यामुळे बऱ्याच यहोवाच्या साक्षीदारांना इतरांशी संभाषण करणे कठीण जाते. पण देवाचा पवित्र आत्मा त्यांना सेवाकार्यात अनोळखी लोकांशी संभाषण करण्याचे धैर्य देतो.—स्तोत्र ११९:४६; २ करिंथकर ४:७ वाचा.
१९. आपल्याला देवाची जास्त सेवा करता येत नसली तरी आपण कशाची खात्री बाळगू शकतो?
१९ आजारपणामुळे व उतारवयामुळे काही बंधू-भगिनींना जास्त सेवा करता येत नाही. पण आपला देव यहोवा “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” आहे. त्याला त्याच्या प्रत्येक खऱ्या उपासकाची परिस्थिती माहीत आहे. (२ करिंथ. १:३) देवाच्या राज्यासाठी आपण जे काही करतो त्याची त्याला कदर आहे. म्हणून आपण आपल्या परिस्थितीनुसार होईल तितके केले पाहिजे. पण, त्याच वेळी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले तारण हे प्रामुख्याने ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर असलेल्या आपल्या विश्वासावर आधारित आहे.—इब्री १०:३९.
२०, २१. आपला यहोवावर भरवसा आहे हे आपण कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?
२० आपल्या उपासनेत आपला वेळ, शक्ती व भौतिक गोष्टी होताहोईल तितक्या खर्च करणे गोवलेले आहे. खरेच “सुवार्तिकाचे काम” आपल्याला पूर्ण अंतःकरणाने करण्याची इच्छा आहे. (२ तीम. ४:५) खरे पाहता, असे करण्यात आपल्याला आनंद होतो कारण यामुळे इतरांना “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत” पोहचणे शक्य होते. (१ तीम. २:४) तर मग स्पष्टच आहे की यहोवा देवाचा आदर व स्तुती केल्यामुळे आपले आध्यात्मिक जीवन समृद्ध बनते. (नीति. १०:२२) आणि आपल्या निर्माणकर्त्यासोबत भरवशाचा अतूट बंध जोडण्यासही आपल्याला मदत मिळते.—रोम. ८:३५-३९.
२१ या लेखात चर्चा केल्याप्रमाणे, यहोवाच्या सुज्ञ मार्गदर्शनावर भरवसा ठेवणे हे आपोआप शक्य होत नाही तर तो भरवसा स्वतःमध्ये उत्पन्न करण्यासाठी आपण काही पावले उचलली पाहिजेत. तर मग, प्रार्थना करण्याद्वारे यहोवावर विसंबून राहा. गतकाळात यहोवाने त्याची इच्छा कशा प्रकारे पूर्ण केली व भविष्यातही तो कशी पूर्ण करणार आहे त्यावर मनन करा. यहोवाची सेवा करत राहण्याद्वारे त्याच्यावरील आपला भरवसा दृढ करा. खरेच, यहोवाचे मार्गदर्शन सर्वकाळ टिकेल. तुम्ही त्याचे पालन केल्यास तुम्हीदेखील सर्वकाळ जिवंत राहाल.