“जो अदृश्य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?
“जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.”—इब्री ११:२७.
१, २. (क) मोशेचा जीव धोक्यात होता, हे कशावरून म्हणता येईल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) मोशे राजाच्या क्रोधाला का घाबरला नाही?
इजिप्तच्या लोकांमध्ये फारोचा खूप दरारा होता. त्यांच्यासाठी तो देवच होता. व्हेन इजिप्ट रूल्ड दी ईस्ट या पुस्तकात असे सांगितले आहे, की इजिप्तच्या लोकांच्या नजरेत फारो “पृथ्वीवरील जीवांमध्ये सर्वात बुद्धिमान आणि शक्तिशाली” होता. आपल्या प्रजेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी फारो, फणा काढलेल्या नागाची प्रतिमा असलेला एक विशिष्ट प्रकारचा मुकुट घालायचा. हे सर्वांना याची आठवण करून देण्यासाठी होते, की राजाचा विरोध करणाऱ्यांचा लगेच सर्वनाश केला जाईल. हे सर्व लक्षात घेतल्यावर जरा कल्पना करून पाहा, की जेव्हा यहोवाने मोशेला, “तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज यांस बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो,” असे सांगितले, तेव्हा त्याला कसे वाटले असेल!—निर्ग. ३:१०.
२ देवाच्या सांगण्यानुसार मोशे इजिप्तला गेला आणि त्याने फारोला देवाचा संदेश सांगितला. फारो त्याच्यावर अतिशय क्रोधित झाला. इजिप्तवर नऊ पीडा आल्यानंतर फारोने मोशेला अशी ताकीद दिली: “माझ्यापुढून चालता हो आणि संभाळ, पुनः मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखवशील, त्या दिवशी तू मरशील.” (निर्ग. १०:२८) फारोच्या समोरून निघून जाण्याआधी मोशेने अशी भविष्यवाणी केली, की फारोच्या ज्येष्ठ पुत्राचा मृत्यू होईल. (निर्ग. ११:४-८) त्यानंतर मोशेने प्रत्येक इस्राएली कुटुंबाला, मेंढ्यांतल्या किंवा बकऱ्यांतल्या एका कोकऱ्याचा वध करून त्याचे रक्त आपल्या दाराच्या चौकटीवर लावण्याची सूचना दिली. इजिप्शियन लोक, कोकऱ्याला पवित्र समजत कारण ते कोकरू ‘रा’ या त्यांच्या दैवताचे प्रतीक आहे असे मानत असत. (निर्ग. १२:५-७) हे सगळे पाहून फारोची काय प्रतिक्रिया असणार होती? मोशेला याची भीती नव्हती. त्याने “राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने” यहोवाच्या आज्ञेचे पालन केले. तो असे का करू शकला? “कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.”—इब्री लोकांस ११:२७, २८ वाचा.
३. मोशेच्या विश्वासासंबंधी आपण कोणत्या गोष्टींचे परीक्षण करणार आहोत?
३ तुमचाही विश्वास इतका दृढ आहे का, की जणू तुम्ही देवाला ‘पाहू’ शकता? (मत्त. ५:८) “जो अदृश्य आहे त्याला” पाहू शकण्याइतपत आपला विश्वास दृढ करण्यासाठी आपण मोशेच्या उदाहरणाचे परीक्षण करू या. मोशेच्या विश्वासाने मनुष्याची भीती बाळगण्यापासून त्याचे कशा प्रकारे रक्षण केले? त्याने देवाच्या अभिवचनांवर पूर्ण विश्वास असल्याचे आपल्या कार्यांतून कसे दाखवले? आणि मोशे व त्याचे लोक संकटात सापडले तेव्हा “जो अदृश्य आहे त्याला” पाहू शकत असल्यामुळे, मोशेला कशा प्रकारे बळ मिळाले?
“राजाच्या क्रोधाला” तो घाबरला नाही
४. फारोपुढे मोशेचे स्थान काय होते?
४ तसे पाहिल्यास, फारोपुढे मोशे काहीच नव्हता. मोशेचे जीवन आणि त्याचे भविष्य जणू फारोच्या हातात होते. मोशेने स्वतःदेखील याआधी यहोवाला असे विचारले होते: “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांस मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?” (निर्ग. ३:११) सुमारे ४० वर्षांपूर्वी मोशे इजिप्तमधून फरार झाला होता. त्यामुळे त्याच्या मनात कदाचित असा विचार आला असेल, की ‘इजिप्तला परत जाऊन राजाचा रोष ओढवणं हे खरोखरच शहाणपणाचं ठरेल का?’
५, ६. फारोचे नव्हे, तर यहोवाचे भय बाळगण्यास मोशेला कशामुळे साहाय्य मिळाले?
५ मोशे इजिप्तला परतण्याआधी देवाने त्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. हीच गोष्ट मोशेने नंतर ईयोबाच्या पुस्तकात लिहून ठेवली: “प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय.” (ईयो. २८:२८) देवाचे हे भय उत्पन्न करण्यास आणि सुज्ञपणे कार्य करण्यास मोशेला साहाय्य करण्यासाठी यहोवाने मानव आणि सर्वसमर्थ देव यांतील फरक त्याला दाखवला. यहोवाने त्याला विचारले: “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?”—निर्ग. ४:११.
६ यहोवा मोशेला काय सांगू इच्छित होता? हेच, की त्याने घाबरण्याचे काहीही कारण नव्हते. त्याला खुद्द यहोवाने पाठवले होते आणि त्यामुळे फारोला देवाचा संदेश सांगण्यासाठी लागणारे धैर्य व मदत यहोवा त्याला पुरवणार होता. शिवाय, यहोवापुढे फारो काहीच नव्हता. तसेच, इजिप्तच्या साम्राज्यात राहत असताना देवाच्या सेवकांचा जीव धोक्यात येण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. याआधीच्या फारोंच्या राज्यांत यहोवाने अब्राहाम, योसेफ आणि स्वतः मोशेचेही रक्षण केले होते. या घटनांवर मोशेने कदाचित मनन केले असावे. (उत्प. १२:१७-१९; ४१:१४, ३९-४१; निर्ग. १:२२–२:१०) आणि त्यामुळे “जो अदृश्य आहे” त्या यहोवा देवावर विश्वास ठेवून मोशे धैर्याने फारोच्या दरबारात गेला आणि यहोवाने आज्ञा दिलेला एकूण एक शब्द त्याने फारोला सांगितला.
७. यहोवावर असलेल्या विश्वासाने कशा प्रकारे एका बहिणीला साहाय्य केले?
७ यहोवावरील विश्वासामुळेच एल्ला नावाच्या आपल्या एका बहिणीलाही मनुष्याच्या भीतीला बळी न पडण्यास साहाय्य मिळाले. १९४९ साली एल्ला हिला एस्टोनिया येथे केजीबी अधिकाऱ्यांनी अटक केली. तिचे सर्व कपडे उतरवण्यात आले आणि तरुण पोलीस अधिकारी निर्लज्जपणे तिच्याकडे पाहत होते. ती म्हणते, “मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण, यहोवाला प्रार्थना केल्यानंतर मला एक प्रकारची शांती जाणवू लागली.” त्यानंतर एल्ला हिला तीन दिवसांकरता एकांत कारावासात ठेवण्यात आले. ती सांगते: “अधिकारी ओरडूनओरडून सांगत होते, ‘एस्टोनियामध्ये कुणाला यहोवाचं नावदेखील आठवणीत राहणार नाही असं आम्ही करू! तुला एका शिबिरात पाठवलं जात आहे आणि इतर सर्वांना साइबीरियाला जावं लागेल!’ मग ते टोमणा मारत म्हणाले, ‘कुठंय तुमचा यहोवा?’” एल्ला त्या मनुष्यांना घाबरली, की तिने यहोवावर भरवसा ठेवला? तिची उलटतपासणी घेण्यात आली तेव्हा तिने निर्भयपणे त्या अधिकाऱ्यांना सांगितले: “मी या बाबतीत बराच विचार केला आहे आणि तुरुंगातून मुक्त होऊन यहोवा देवाची मर्जी गमावण्यापेक्षा मी तुरुंगातच राहून त्याच्यासोबतचं माझं नातं टिकवून ठेवणं पसंत करीन.” एल्ला हिच्यासाठी तिच्यासमोर उभ्या असलेल्या त्या माणसांइतकाच यहोवा खरा होता. तिच्या विश्वासामुळे अशा कठीण परिस्थितीतही ती टिकून राहिली.
८, ९. (क) मनुष्यांच्या भीतीवर मात करण्याचा सर्वात चांगला उपाय कोणता आहे? (ख) तुम्हाला मनुष्यांची भीती वाटल्यास तुम्ही कोणावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे?
८ यहोवावर असलेला विश्वास तुम्हालाही तुमच्या भीतीवर मात करण्यास साहाय्य करेल. जर उच्च पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांनी देवाची उपासना करण्यापासून तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित असे वाटू शकेल की तुमचे जीवन आणि भविष्य त्या मानवांच्याच हातात आहे. तुम्ही कदाचित असाही विचार कराल, की अधिकाऱ्यांनी मना केले असताना यहोवाची उपासना चालू ठेवणे आणि त्यांचा रोष ओढवणे खरेच शहाणपणाचे आहे का? पण, आठवणीत असू द्या: मानवांच्या भीतीवर मात करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. (नीतिसूत्रे २९:२५ वाचा.) यहोवा असे विचारतो: “तुम्ही लोकांना का भ्यावे? ती जन्म मृत्यू पावणारी माणसेच आहेत. ते फक्त मनुष्यप्राणी आहेत. ते गवताप्रमाणे मरतात.”—यश. ५१:१२, १३, ईझी-टू-रीड व्हर्शन.
९ तुमच्या सर्वसमर्थ पित्यावर लक्ष केंद्रित करा. यहोवाच्या सेवकांना अन्यायी अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातो तेव्हा तो ते पाहतो. त्याला त्याच्या या सेवकांबद्दल सहानुभूती वाटते आणि तो त्यांना साहाय्यदेखील करतो. (निर्ग. ३:७-१०) उच्च पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या विश्वासाचे समर्थन करण्याची तुमच्यावर वेळ आली, तरीसुद्धा “कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच घटकेस तुम्हास सुचवले जाईल.” (मत्त. १०:१८-२०) मानवी शासक आणि सरकारी अधिकारी हे यहोवासमोर काहीच नाहीत. जर तुम्ही आताच तुमचा विश्वास दृढ केला, तर तुम्ही यहोवाकडे एक खरी व्यक्ती म्हणून पाहू लागाल आणि तो तुम्हाला मदत करण्यास उत्सुक आहे याचीही तुम्हाला खातरी पटेल.
त्याने देवाच्या अभिवचनांवर विश्वास असल्याचे दाखवले
१०. (क) इ.स.पू. १५१३ सालच्या निसान महिन्यात यहोवाने इस्राएली लोकांना कोणत्या सूचना दिल्या? (ख) मोशेने देवाच्या सूचनांचे पालन का केले?
१० इ.स.पू. १५१३ सालच्या निसान महिन्यात यहोवाने मोशे व अहरोन यांना, इस्राएली लोकांना काही असाधारण सूचना देण्यास सांगितले. इस्राएली लोकांना मेंढ्यांतला किंवा बकऱ्यांतला एक निर्दोष नर निवडून त्याचा वध करण्यास आणि त्याचे रक्त दाराच्या चौकटीवर लावण्यास सांगावे, असे यहोवाने त्यांना सांगितले. (निर्ग. १२:३-७) मोशेने देवाच्या आज्ञेचे पालन केले का? प्रेषित पौलाने नंतर त्याच्या संदर्भात असे लिहिले: “त्याने वल्हांडण सण व रक्तसिंचन हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये.” (इब्री ११:२८) मोशेला यहोवावर पूर्ण भरवसा होता आणि त्याच्या सूचनांचे पालन करण्याद्वारे मोशेने दाखवले की इजिप्तच्या ज्येष्ठ पुत्रांचा संहार करण्याचे जे वचन यहोवाने दिले होते त्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.
११. मोशेने इतरांना धोक्याची सूचना का दिली?
११ मोशेचे स्वतःचे पुत्र त्या वेळी मिद्यानात होते. त्यामुळे ‘नाश करणाऱ्याद्वारे’ त्यांचा संहार होण्याची शक्यता नव्हती. * (निर्ग. १८:१-६) तरीसुद्धा, इतर इस्राएली कुटुंबांतील ज्येष्ठ पुत्रांचा जीव धोक्यात असल्यामुळे मोशेने विश्वासूपणे त्यांना यहोवाच्या सूचना कळवल्या. शेवटी हा जीवनमरणाचा प्रश्न होता आणि मोशेला आपल्या सहमानवांवर प्रेम होते. त्यामुळे जराही विलंब न लावता त्याने “इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, . . . वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा.”—निर्ग. १२:२१.
१२. यहोवाने आपल्याला कोणता महत्त्वाचा संदेश घोषित करण्यास सांगितले आहे?
१२ आज देवदूतांच्या मार्गदर्शनाने, यहोवाचे लोक एक अतिशय महत्त्वाचा संदेश घोषित करत आहेत: “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा.” (प्रकटी. १४:७) हा संदेश घोषित करण्याची हीच वेळ आहे. आपण आपल्या क्षेत्रातील लोकांना मोठ्या बाबेलमधून बाहेर निघण्याचा इशारा दिला पाहिजे, जेणेकरून “तिच्या पीडांतील कोणतीही पीडा” त्यांच्यावर येऊ नये. (प्रकटी. १८:४) देवापासून दुरावलेल्या लोकांना त्याच्यासोबत “समेट” करण्याची विनवणी करण्यात दुसरी मेंढरेदेखील अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत मिळून कार्य करत आहेत.—योहा. १०:१६; २ करिंथ. ५:२०.
१३. देवाच्या राज्याची चांगली बातमी सर्वांना सांगण्याची इच्छा तुमच्या मनात कशामुळे वाढत जाईल?
१३ “न्यायनिवाडा करावयाची घटका” खरोखरच आली आहे याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका नाही. तसेच, प्रचाराचे आणि शिष्य बनवण्याचे कार्य तातडीचे आहे असे जे यहोवाने आपल्याला सांगितले आहे ते विनाकारण सांगितलेले नाही, यावरही आपला विश्वास आहे. प्रेषित योहानाने दृष्टान्तात “चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनांवर उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरत होते.” (प्रकटी. ७:१) तुमच्या विश्वासामुळे, तुम्ही त्या देवदूतांना पाहू शकता का जे या जगावर मोठ्या संकटाचे नाशकारक वारे सोडण्याच्या तयारीत आहेत? विश्वासाच्या डोळ्यांनी जर तुम्ही या देवदूतांना पाहू शकत असाल तरच देवाच्या राज्याची आनंदाची बातमी तुम्ही इतरांना पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकाल.
१४. कोणत्या कारणामुळे आपण, “पातक्याने [त्याचा] कुमार्ग सोडून जगावे” असे त्याला सांगण्यास प्रवृत्त होतो?
१४ खऱ्या ख्रिश्चनांचा आजदेखील यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध आहे आणि त्यांना सार्वकालिक जीवनाची आशासुद्धा आहे. तरीपण, “पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून . . . त्यास बजावून” सांगण्याची आपली जबाबदारी आहे हे आपण ओळखतो. (यहेज्केल ३:१७-१९ वाचा.) अर्थात, आपल्यावर कोणाच्या रक्ताचा दोष येऊ नये एवढ्याच कारणासाठी आपण प्रचार करत नाही. तर यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम असल्यामुळे आपण असे करतो. इतरांवर प्रेम व दया करण्याचा काय अर्थ होतो हे स्पष्ट करण्यासाठी येशूने चांगल्या शोमरोन्याचा दृष्टान्त सांगितला होता. आपण स्वतःला विचारू शकतो, ‘मी शोमरोन्यासारखा आहे का? मला लोकांचा “कळवळा” येतो का, आणि त्यामुळे त्यांना साक्ष देण्याची मला प्रेरणा मिळते का?’ या दृष्टान्तातील याजक आणि लेवी यांच्यासारखे आपण निश्चितच होऊ इच्छित नाही, जे काही ना काही निमित्त सांगून “दुसऱ्या बाजूने” निघून गेले. (लूक १०:२५-३७) उलट, देवाच्या अभिवचनांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आणि क्षेत्रातील लोकांवर प्रेम असल्यामुळे, आपण फार उशीर होण्याआधी प्रचाराच्या कार्यात होताहोईल तितका सहभाग घेण्यास प्रवृत्त होऊ.
“ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले”
१५. इस्राएलांना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाल्यासारखे का वाटले?
१५ इजिप्तमधून बाहेर पडल्यावर इस्राएली लोक संकटात सापडले, तेव्हा “जो अदृश्य आहे” त्याच्यावरील विश्वासामुळे मोशेला खूप साहाय्य मिळाले. बायबल सांगते: “इस्राएल लोकांनी टेहळून पाहिले तो मिसरी लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करू लागले.” (निर्ग. १४:१०-१२) ही परिस्थिती अगदीच अनपेक्षित होती का? मुळीच नाही. यहोवाने आधीच भाकीत केले होते: “मी फारोचे मन कठीण करेन आणि तो त्यांचा पाठलाग करेल; या प्रकारे फारो व त्याची सर्व सेना यांच्यावर मी गौरवशाली होईन, आणि मी परमेश्वर आहे हे मिसरी लोक ओळखतील.” (निर्ग. १४:४) इतके असूनही, इस्राएली लोकांनी फक्त त्यांच्या डोळ्यांनी जे दिसत होते तितकेच पाहिले. त्यांच्यासमोर तांबडा समुद्र होता जो ओलांडणे अशक्य होते. मागून, फारोचे वेगवान रथ त्यांचा पाठलाग करत होते. आणि त्यांचे नेतृत्व करणारा कोण, तर एक ८० वर्षांचा मेंढपाळ! अशा परिस्थितीत, इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाल्यासारखे इस्राएलांना वाटले.
१६. तांबड्या समुद्राजवळ असताना मोशेला विश्वासामुळे कशा प्रकारे साहाय्य मिळाले?
१६ तरीसुद्धा, मोशे डळमळला नाही. का नाही? कारण त्याच्या दृढ विश्वासामुळे, तो तांबड्या समुद्रापेक्षा आणि फारोच्या सैन्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली असे काहीतरी पाहू शकत होता. तो यहोवाकडून मिळणारे “तारण” पाहू शकत होता. त्याला पक्की खातरी होती की यहोवा इस्राएलांच्या वतीने लढेल. (निर्गम १४:१३, १४ वाचा.) मोशेच्या विश्वासामुळे इस्राएली लोकांनाही यहोवावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळाली. बायबलमध्ये आपण असे वाचतो, “जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले.” (इब्री ११:२९) त्यानंतर इस्राएली लोकांनी “परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेवला.”—निर्ग. १४:३१.
१७. भविष्यातील कोणत्या घटनेमुळे आपल्या विश्वासाची परीक्षा होईल?
१७ लवकरच, अशी परिस्थिती येईल जेव्हा देवाचे लोक संकटात सापडले आहेत, त्यांचे अस्तित्वच धोक्यात आहे असे वाटेल. मोठ्या संकटाचा शेवट जवळ येईल तेव्हा, या जगातील राजकीय शक्ती, आपल्यापेक्षा मोठ्या वाटणाऱ्या धार्मिक संघटनांचा पूर्णपणे नाश करतील. (प्रकटी. १७:१६) यहोवाचे लोक त्या वेळी किती असहाय भासतील, याचे यहोवाने यहेज्केलाच्या भविष्यवाणीत वर्णन केले होते. यहोवाच्या लोकांची परिस्थिती “तटबंदी” नसलेल्या गावांसारखी आणि “कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत” अशा शहरांत राहणाऱ्यांसारखी असेल असे त्या भविष्यवाणीत म्हटले आहे. (यहे. ३८:१०-१२, १४-१६) वरवर पाहिल्यास, आपला बचाव होणे आता शक्य नाही असे त्या वेळी भासेल. अशा परिस्थितीत तुमची प्रतिक्रिया काय असेल?
१८. मोठ्या संकटादरम्यान आपल्याला भयभीत होण्याचे कारण का नसेल हे स्पष्ट करा.
१८ आपण भयभीत होण्याचे किंवा आपला विश्वास डळमळण्याचे कारण नाही. का बरे? कारण देवाच्या लोकांवर अशा प्रकारचा हल्ला होईल हे यहोवाने आधीच भाकीत केले आहे. आणि त्याचा काय परिणाम होईल हेदेखील त्याने सांगितले आहे. यहोवा म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील, . . . मी ईर्ष्येने, क्रोधाग्नीने तप्त होऊन” बोलेन. (यहे. ३८:१८-२३) त्या वेळी, आपल्या लोकांना हानी पोचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सर्वांचा यहोवा समूळ नाश करेल. यहोवाच्या “महान व भयंकर” दिवशी त्याचाच विजय होईल यावर पूर्ण विश्वास असल्यास, तुम्हाला यहोवाकडून मिळणाऱ्या तारणाविषयी खातरी बाळगण्यास आणि शेवटपर्यंत आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यास साहाय्य मिळेल.—योए. २:३१, ३२.
१९. (क) यहोवा देव व मोशे यांच्यातील नातेसंबंध किती घनिष्ठ होता? (ख) तुम्ही आपल्या सर्व मार्गांत यहोवाचा आदर केल्यास तुम्हाला कोणता आशीर्वाद मिळेल?
१९ “जो अदृश्य आहे त्याला” पाहू शकण्याइतका विश्वास उत्पन्न करण्याद्वारे व धीर धरण्याद्वारे, मोठ्या संकटादरम्यान घडणार असलेल्या थरारक घटनांसाठी आतापासूनच स्वतःला तयार करा. नियमित अभ्यास आणि प्रार्थना यांद्वारे यहोवासोबतची आपली मैत्री दिवसेंदिवस घट्ट करा. मोशेची यहोवासोबत अशीच घनिष्ठ मैत्री होती आणि यहोवाने अनेक पराक्रम करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. म्हणूनच, बायबलमध्ये मोशेविषयी असे म्हटले आहे, की तो यहोवाच्या “प्रत्यक्ष परिचयाचा” होता. (अनु. ३४:१०) खरोखरच, मोशे एक असाधारण संदेष्टा होता. पण, तुम्हीदेखील दृढ विश्वास बाळगण्याद्वारे यहोवाला प्रत्यक्ष पाहत असल्यासारखा घनिष्ठ नातेसंबंध त्याच्यासोबत जोडू शकता. “सर्व मार्गांत” त्याचा आदर करा, असे उत्तेजन देवाच्या वचनात देण्यात आले आहे. असे केल्यास तो तुमचे “सर्व मार्ग सरळ करेल.”—नीति. ३:६, सुबोधभाषांतर.
^ परि. 11 यहोवाने इजिप्तच्या लोकांवर पीडा आणण्यासाठी देवदूतांना पाठवले होते.—स्तो. ७८:४९-५१.