घटस्फोटित बंधुभगिनींना मदत—कशी कराल?
तुम्ही कदाचित घटस्फोट झालेल्या एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना ओळखत असाल. आजकाल घटस्फोट घेणे सर्वसामान्य बनले आहे. उदाहरणार्थ, पोलंडमध्ये केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले, की ज्यांच्या लग्नाला तीन ते सहा वर्षे झाली आहेत अशा ३० वर्षीय पती-पत्नींच्या घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे; अर्थात केवळ ३० वर्षीयच घटस्फोट घेतात असे नाही.
खरेतर, स्पेनमधील कुटुंब योजना संस्थेच्या रिपोर्टनुसार, युरोपमधील आकडेवारीवरून दिसून येते, की तेथे ज्यांचे विवाह होतात त्यांतल्या निम्म्या लोकांचा घटस्फोट होतो. इतर विकसित राष्ट्रांमध्ये चित्र काही वेगळे नाही.
त्रस्त करणाऱ्या भावनांचा उद्रेक
घटस्फोट ही आजकाल एक सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण, घटस्फोट घेण्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात? पूर्व युरोपातील एक अनुभवी महिला विवाह सल्लागार म्हणते: “घटस्फोटाचा निर्णय एका रात्रीत घेतला जात नाही. आधी, भावनिक नातं तुटतं. ते सोबत राहून सोबत नसल्यासारखे असतात. ही भावनिक रीत्या अगदी क्लेशदायक गोष्ट असते. त्या वेळी, राग, पश्चात्ताप, निराशा, नाउमेद, लज्जा यांसारख्या भावनांचा उद्रेक होतो. कधीकधी आत्महत्येचादेखील विचार मनात येतो. कोर्टाकडून जेव्हा घटस्फोट निश्चित होतो तेव्हा दुसरा टप्पा सुरू होतो. मनात एकटेपणाच्या व रिक्ततेच्या भावना दाटून येतात. घटस्फोटित व्यक्ती विचार करू लागते: ‘आता मी लोकांना कसं तोंड देऊ? माझ्या जगण्याला काय अर्थ आहे?’”
इवाचा घटस्फोट झाल्यानंतर तिला कसे वाटले होते त्याबद्दल ती म्हणते: “घटस्फोटानंतर जेव्हा माझे शेजारी व माझ्यासोबत काम करणारे मला उल्लेखताना, ‘घटस्फोटित’ हा शब्द वापरायचे तेव्हा मला खूप लाज वाटायची. खूप रागही यायचा. आता माझ्या दोन मुलांसाठी मीच आई व वडील बनले होते.” * अॅडम, ज्यांचे मंडळीत चांगले नाव होते व ज्यांनी १२ वर्षांपासून वडील म्हणून सेवा केली होती, ते म्हणतात: “मला स्वतःबद्दल आदरच उरला नाही. मला स्वतःचाच राग येतो. पुष्कळदा मला एकटं राहावसं वाटतं.”
तोल सांभाळण्याचा प्रयत्न
भविष्याबद्दलच्या चिंता मन खात असल्यामुळे, घटस्फोट घेतलेल्या पुष्कळांना त्यांचा तोल सांभाळण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. इतरांना आपल्यात काही स्वारस्य नाही, असा निष्कर्ष ते काढतील. या विषयावर लेख लिहिणाऱ्या एका स्तंभ लेखिकेने म्हटले, की घटस्फोट घेतलेल्यांना “त्यांच्या सवयी बदलाव्या लागतील आणि इथून पुढं समस्यांना एकट्यानं सामोरं जावं लागेल.”
स्टॅनिस्वॉफ आठवून सांगतात: “आमचा घटस्फोट झाल्यानंतर माझी पत्नी मला आमच्या दोन लहान मुलींना भेटू द्यायची नाही. यामुळं मला वाटू लागलं, की आता कुणाला माझी पर्वा नाही आणि यहोवानंही मला सोडून दिलं आहे. माझी जगण्याची इच्छाच मरून गेली होती. पण हळूहळू मला जाणवलं, की मी किती चुकीचा विचार करत होतो.” भविष्याबद्दल अनिश्चिततेच्या भावनांमुळे वँडा नावाच्या एका घटस्फोटित बहिणीला काय वाटत होते ते ती सांगते: “घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांतच मला वाटू लागलं, की आता कुणाचंही, म्हणजे अगदी मंडळीतल्या आपल्या बहीण भावांचंसुद्धा माझ्याकडं व मुलांकडं लक्ष राहणार नाही. सर्व आपापल्या कामात व्यस्त होतील. पण तसं झालं नाही. उलट, मंडळीतले बहीण भाऊ आमच्याभोवती अक्षरशः पिंगा घालत होते. मुलांना यहोवाचे उपासक बनण्यास मी करत असलेल्या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबा होता.”
वर उल्लेखण्यात आलेल्या व्यक्तींच्या विधानांवरून तुम्हाला कळले असेल, की ज्यांचा घटस्फोट होतो ते नंतर नकारात्मक भावनांनी घेरले जातात. ते स्वतःच्याच नजरेतून उतरतील; आपण काही कामाचे नाही व कोणालाही आपली पर्वा नाही, असे त्यांना वाटू लागेल. आणि, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबद्दलही ते टीकात्मक होतील. यामुळे, मंडळीतील बंधुभगिनींना आपली कसलीही काळजी नाही, त्यांना आपली परिस्थिती समजत नाही, असा ते विचार करू लागतील. पण स्टॅनिस्वॉफ व वँडा यांच्या अनुभवावरून दिसते, की घटस्फोट झालेल्यांना नंतर ही जाणीव होऊ शकते, की मंडळीतील बंधुभगिनींना त्यांच्याबद्दल खरोखर काळजी वाटत असते. उलट बंधुभगिनी त्यांना विशेष काळजी दाखवतात. घटस्फोटितांना सुरुवातीला याची जाणीव नसली तरीसुद्धा बहीण भाऊ त्यांना एकटे सोडत नाहीत.
एकाकीपणाच्या व नाकारल्याच्या भावना येणे
आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, घटस्फोटितांना आपण कितीही मदत करण्याचा प्रयत्न केला तरी, एकाकीपणाच्या भावना त्यांच्या मनात वरचेवर येतीलच. खासकरून घटस्फोटित बहिणींना वाटेल, की मी कोणाला आवडत नाही. अॅलेत्स्या नावाची बहीण म्हणते: “माझा घटस्फोट होऊन आठ वर्षं झाली आहेत. अजूनही कधीकधी माझ्या मनात कमीपणाच्या भावना डोकावतात. अशा वेळी मी लोकांमध्ये मिसळत नाही. मला रडू येतं, स्वतःची कीव येते.”
घटस्फोट झालेल्यांच्या मनात अशा भावना येणे साहजिक असले तरी, स्वतःला इतरांपासून दूर नेणे योग्य नाही, असा सल्ला बायबलमध्ये देण्यात आला आहे. या सल्ल्याच्या विरोधात कार्य करणे म्हणजे, व्यावहारिक बुद्धी नाकारणे. (नीति. १८:१) पण, एकाकीपणाला तोंड देणाऱ्या व्यक्तीने सांत्वन व सल्ला मिळवण्यासाठी वारंवार एखाद्या विरुद्धलिंगी व्यक्तीची मदत घेण्याचे टाळले पाहिजे. यामुळे तिचे संरक्षण होईल आणि मनात अयोग्य प्रणय भावना जागृत होणार नाहीत हे तिने समजून घेतले पाहिजे.
घटस्फोट झालेल्या आपल्या बंधुभगिनींच्या मनात भविष्याबद्दलच्या चिंता, नकारात्मक, एकाकीपणाच्या किंवा झिडकारल्याच्या भावना येऊ शकतात. त्यांच्या मनात अशा भावना येणे साहजिक आहे तसेच त्यांच्यावर मात करणे इतके सोपे नाही ही गोष्ट बाकीच्यांनी समजून घेतली पाहिजे. अशा प्रकारे या भावा-बहिणींना एकनिष्ठ प्रेम दाखवून आपण यहोवाचे अनुकरण केले पाहिजे. (स्तो. ५५:२२; १ पेत्र ५:६, ७) आपण देत असलेल्या मदतीबद्दल ते नक्कीच कृतज्ञता दाखवतील. मंडळीत त्यांना खऱ्या मित्रांकडून भावनिक आधार मिळू शकतो.—नीति. १७:१७; १८:२४.
^ परि. 6 काही नावे बदलण्यात आली आहेत.