यहोवा आपल्याला त्याच्या जवळ येण्यास कशी मदत करतो?
“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याको. ४:८.
१. मानवांमध्ये कोणती इच्छा असते, आणि आपली ही इच्छा कोण पूर्ण करू शकेल?
मानवांमध्ये एकमेकांशी जवळीक साधण्याची उत्कट इच्छा असते. सहसा जेव्हा दोन व्यक्ती “एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात व त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडतो, तेव्हा त्यांच्यात जवळीक आहे असे आपण म्हणतो.” आपल्यावर प्रेम करणारे, आपली कदर करणारे आणि आपल्याला समजून घेणारे कुटुंबातील सदस्य आणि मित्र असल्यामुळे आपल्याला आनंद होतो. पण, आपला सर्वात जवळचा नातेसंबंध आपल्या महान निर्माणकर्त्यासोबत असला पाहिजे.—उप. १२:१.
२. यहोवाने आपल्याला कोणते आश्वासन दिले आहे, आणि या आश्वासनावर बरेच लोक विश्वास का ठेवत नाहीत?
२ यहोवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला त्याच्या जवळ येण्यास आर्जवतो. आणि असे केल्यास तोदेखील आपल्या जवळ येईल असे आश्वासन तो आपल्याला देतो. (याको. ४:८) यामुळे आपल्याला किती प्रेरणा मिळते! पण, देव आपल्याशी जवळचा नातेसंबंध जोडू इच्छितो ही गोष्ट बऱ्याच लोकांना अशक्य वाटते. त्यांना वाटते की ते देवाच्या जवळ जाण्याच्या लायकीचे नाहीत किंवा देव मानवांपासून खूप दूर असल्यामुळे आपण कधीच त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. तर मग, यहोवाशी जवळीक साधणे खरेच शक्य आहे का?
३. यहोवाविषयी कोणती गोष्ट आपण आठवणीत ठेवली पाहिजे?
३ मुळात, जे लोक यहोवाला शोधतात अशा “कोणापासूनही [तो] दूर नाही.” यहोवाच्या जवळ जाणे आपल्यापैकी प्रत्येकाला शक्य आहे. (प्रेषितांची कृत्ये १७: २६, २७; स्तोत्र १४५:१८ वाचा.) अपरिपूर्ण मानवांनीदेखील देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडावा अशी त्याची इच्छा आहे. आणि जे लोक त्याच्याशी मैत्री करू इच्छितात अशांशी घनिष्ठ मैत्री करण्यास तो सदैव तयार असतो. (यश. ४१:८; ५५:६) स्तोत्रकर्त्याने आपल्या वैयक्तिक अनुभवावरून यहोवाविषयी असे लिहिले: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य.” (स्तो. ६५:२, ४) आता आपण यहूदाचा राजा आसा याच्याविषयीचा बायबलमधील अहवाल पाहू या. आसाने यहोवाशी जवळीक कशी साधली आणि यहोवाने त्याच्या प्रयत्नांना कसा प्रतिसाद दिला हे आपल्याला या अहवालातून पाहायला मिळेल. *
प्राचीन काळातील उदाहरणावरून शिका
४. यहूदाच्या लोकांकरता आसा राजाने कोणते उदाहरण मांडले?
४ आसा राजाने त्याच्या काळात प्रचलित असलेल्या मंदिरातील वेश्याव्यवसायाचा आणि मूर्तिपूजेचा समूळ नाश केला. असे करण्याद्वारे त्याने शुद्ध उपासनेसाठी आपला आवेश दाखवला. (१ राजे १५:९-१३) आसा राजाने लोकांना आर्जवले की त्यांनी “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन करावे.” त्याच्या राजवटीतील पहिली दहा वर्षे शांतीची होती कारण यहोवाने त्याला आशीर्वादित केले होते. या शांतीचे श्रेय त्याने कोणाला दिले? त्याने आपल्या लोकांना म्हटले: “देश आपल्या हाती आहे, कारण आपण आपला देव परमेश्वर याची कास धरली आहे; आपण त्याची कास धरली आहे व त्याने आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे.” (२ इति. १४:१-७) त्यानंतर काय घडले याकडे लक्ष द्या.
५. आसाने कोणत्या परिस्थितीत यहोवावर पूर्ण विश्वास असल्याचे दाखवले, आणि याचा काय परिणाम झाला?
५ स्वतःला आसाच्या परिस्थितीत ठेवून पाहा. यहूदावर हल्ला करण्यासाठी जेरह नावाचा कूशी आपले १०,००,००० सैनिक आणि ३०० रथ घेऊन आला आहे. (२ इति. १४:८-१०) तुमच्यासोबत युद्ध करण्यास आलेली ही बलाढ्य सेना पाहून तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुमच्या सैन्यात फक्त ५,८०,००० सैनिक आहेत! म्हणजेच तुमच्या सैन्याच्या तुलनेत शत्रू सैन्यात जवळजवळ दुप्पट सैनिक आहेत. अशा वेळी तुम्ही असा विचार कराल का, की यहोवा त्याच्या लोकांवर हा हल्ला का होऊ देत आहे? या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणार का? आसाने या आणीबाणीच्या परिस्थितीत जे केले त्यावरून यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध किती जवळचा होता व त्याचा यहोवावर किती भरवसा होता हे दिसून आले. त्याने कळकळीने यहोवाला विनंती केली: “हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुजवर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुजवर वर्चस्व होऊ देऊ नको.” आसाने केलेल्या या विनंतीला यहोवाने कसे उत्तर दिले? यहोवाने कूशी लोकांना पराजित केले. त्यांच्या सैन्यातील एकही पुरुष या युद्धात वाचला नाही!—२ इति. १४:११-१३.
६. आपण कोणत्या बाबतीत आसाचे अनुकरण केले पाहिजे?
६ देव आपल्याला मार्गदर्शन करेल व आपले रक्षण करेल यावर पूर्ण भरवसा ठेवण्यास आसाला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली? बायबल आपल्याला सांगते की आसाने “परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते केले,” आणि त्याचे “मन . . . परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते.” (१ राजे १५:११, १४) आपणदेखील देवाची पूर्ण मनाने सेवा केली पाहिजे. यहोवासोबतचा आपला घनिष्ठ नातेसंबंध आता आणि भविष्यातही टिकवून ठेवायचा असेल, तर असे करणे खूप गरजेचे आहे. आपल्याला यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडणे व तो टिकवून ठेवणे शक्य व्हावे म्हणून यहोवाने स्वतः पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण त्याचे किती आभार मानले पाहिजे! यहोवाने कोणत्या दोन मार्गांनी हे केले आहे ते आता आपण पाहू या.
खंडणीच्या तरतुदीद्वारे
७. (क) यहोवाने केलेल्या कोणकोणत्या गोष्टींमुळे आपण त्याच्या जवळ जाण्यास प्रेरित होतो? (ख) कोणत्या सर्वात महत्त्वाच्या मार्गाने यहोवा आपल्याला त्याच्या जवळ आणतो?
७ मानवांना राहण्यासाठी एका सुंदर पृथ्वीची निर्मिती करण्याद्वारे यहोवाने आपल्यावरील त्याचे प्रेम प्रदर्शित केले. आजही तो अद्भुत रीत्या निर्माण केलेल्या जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याद्वारे आपल्यावरील त्याचे प्रेम व्यक्त करत आहे. (प्रे. कृत्ये १७:२८; प्रकटी. ४:११) यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे यहोवा आज आपल्या आध्यात्मिक गरजा भागवत आहे. (लूक १२:४२) तसेच, तो आपल्याला आश्वासन देतो की आपण जेव्हाही प्रार्थना करू तेव्हा तो स्वतः आपल्या प्रार्थना ऐकेल. (१ योहा. ५:१४) पण, ज्या सर्वात महत्त्वाच्या मार्गाने यहोवा आपल्याला त्याच्या जवळ आणतो व आपणही त्याच्याकडे आकर्षित होतो, तो मार्ग म्हणजे खंडणीची तरतूद. या तरतुदीद्वारे यहोवा आपल्यावरील त्याचे प्रेम व्यक्त करतो. (१ योहान ४:९, १०, १९ वाचा.) पाप व मृत्यू यांपासून आपली सुटका व्हावी म्हणून यहोवाने त्याचा “एकुलता एक पुत्र” आपल्याकरता या पृथ्वीवर पाठवला.—योहान ३:१६.
८, ९. यहोवाच्या उद्देशात येशूची कोणती भूमिका आहे?
८ खंडणीचा फायदा ख्रिस्ताच्या आधी मरण पावलेल्या लोकांनादेखील व्हावा अशी तरतूद यहोवाने केली आहे. भविष्यात मानवांसाठी एक तारणकर्ता येईल अशी भविष्यवाणी यहोवाने ज्या क्षणी केली, त्या क्षणीच त्याच्या दृष्टीने खंडणीची किंमत दिल्यासारखी होती. कारण आपला कोणताही उद्देश फोल ठरत नाही हे यहोवाला माहीत आहे. (उत्प. ३:१५) अनेक शतकांनंतर प्रेषित पौलाने, “ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या” मुक्तीसाठी आपली कृतज्ञता व्यक्त केली. पौलाने म्हटले की “पूर्वी झालेल्या पापांची” देवाने “सहनशीलतेने उपेक्षा” म्हणजेच क्षमा केली. (रोम. ३:२१-२६) खरोखर, मानवांना यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडता यावा यामागे येशूची किती महत्त्वाची भूमिका आहे!
९ नम्र लोकांना यहोवाबद्दल जाणून घेणे व त्याच्याशी जवळचा नातेसंबंध जोडणे केवळ येशूद्वारे शक्य आहे. शास्त्रवचनांमध्ये ही गोष्ट ठळकपणे कशी दिसून येते? पौलाने लिहिले: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:६-८) येशूचे खंडणी बलिदान, आपण त्याच्या लायक आहोत म्हणून नाही तर आपल्यावर देवाचे प्रेम आहे म्हणून देण्यात आले. येशूने म्हटले की, “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.” दुसऱ्या एका प्रसंगी येशूने म्हटले: “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहा. ६:४४; १४:६) येशूच्या खंडणीच्या आधारावर यहोवा आपल्याला त्याच्या जवळ येण्यास व सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी त्याच्या प्रेमात टिकून राहण्यास मदत करतो. असे करण्यासाठी यहोवा आपल्या पवित्र आत्म्याचा उपयोग करतो. (यहूदा २०, २१ वाचा.) यहोवा त्याच्या जवळ येण्यास आणखी कोणत्या मार्गाने आपल्याला मदत करतो त्यावर आता आपण चर्चा करू या.
त्याच्या लिखित वचनाद्वारे
१०. यहोवाच्या जवळ जाण्यास बायबल आपल्याला कसे मदत करते?
१० या लेखात आतापर्यंत आपण बायबलमधील १४ पुस्तकांतून अनेक वचने उद्धृत केली आहेत किंवा त्यांचा उल्लेख केला आहे. बायबल नसते तर आपण निर्माणकर्त्याच्या जवळ जाऊ शकतो हे आपल्याला कधी कळले असते का? तसेच, खंडणीबद्दल आणि यहोवा आपल्याला येशूद्वारे त्याच्या जवळ येण्यास मदत करतो याबद्दल आपल्याला शिकायला मिळाले असते का? यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे बायबल लेखकांना प्रेरित केले. त्याच्या वचनाद्वारे आपल्याला त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या अद्भुत उद्देशांबद्दल शिकायला मिळते. उदाहरणार्थ, निर्गम ३४:६, ७ या वचनांत यहोवाने स्वतःबद्दल मोशेला असे सांगितले की तो, “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा” देव आहे. अशा देवाच्या जवळ जाण्यास कोणाला आवडणार नाही? यहोवाला हे माहीत आहे की बायबलमधून आपण त्याच्याबद्दल जितके जास्त शिकू तितकेच आपण त्याच्या जवळ जाऊ व तो आपल्याला तितकाच खरा वाटू लागेल.
११. आपण देवाच्या गुणांबद्दल व त्याच्या मार्गांबद्दल शिकण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
११ यहोवा के करीब आओ या पुस्तकातील प्रस्तावनेत आपण देवासोबत जवळचा नातेसंबंध कसा जोडू शकतो याविषयी असे म्हटले आहे: “आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला जवळून ओळखतो, त्याच्या गुणांची कदर करतो व त्यामुळे ती आपल्याला आवडते तेव्हा ती व्यक्ती आपली जवळची मित्र बनते. म्हणूनच, बायबलमध्ये देवाच्या गुणांविषयी व त्याच्या मार्गांविषयी जे सांगितले आहे त्याचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे.” मानवांना समजेल अशा भाषेत यहोवाने बायबल लिहून घेतले यासाठी आपण त्याचे किती आभारी असले पाहिजे!
१२. बायबलचे लिखाण करण्यासाठी यहोवाने मानवांचा उपयोग का केला?
१२ बायबलचे लिखाण करण्यासाठी यहोवा देवदूतांचा उपयोग करू शकला असता. कारण मानवांबद्दल व त्यांच्या कार्यांबद्दल देवदूतांना खूप आस्था आहे. (१ पेत्र १:१२) मानवांकरता देवाचा संदेश देवदूतदेखील लिहू शकले असते यात काही शंका नाही. पण, ते मानवी दृष्टिकोनातून गोष्टींना पाहू शकले असते का? आपल्या गरजा, आपल्या उणिवा आणि आपल्या इच्छा-आकांक्षा देवदूत पूर्णपणे समजू शकले असते का? नाही, याबाबतीत त्यांच्या मर्यादा आहेत हे यहोवाला माहीत होते. बायबल लिहिण्यासाठी यहोवाने मानवांचा उपयोग केल्यामुळे त्यातील माहिती आपल्या भावनांना स्पर्श करते. बायबल लेखकांच्या व त्यात उल्लेख केलेल्या इतर लोकांच्या भावना आणि त्यांचे विचार आपण सहजपणे समजू शकतो. त्या लोकांच्या मनात आलेली निराशा, शंका, भीती आणि त्यांच्या कमतरता आपण समजू शकतो. तसेच, त्यांना झालेला आनंद व मिळालेले यश या गोष्टी आपल्यालादेखील आनंदित करतात. संदेष्टा एलीयाप्रमाणे सर्व बायबल लेखक आपल्यासारख्याच भावना असणारे लोक होते.—याको. ५:१७.
१३. योनाची प्रार्थना वाचल्यावर तुमच्या मनात कोणत्या भावना येतात?
१३ उदाहरणार्थ, देवाने सोपवलेल्या कामगिरीपासून जेव्हा संदेष्टा योनाने पळ काढला तेव्हा त्याच्या मनात कोणत्या भावना आल्या असतील हे एक देवदूत पूर्णपणे व्यक्त करू शकला असता का? हा अहवाल व एका माशाच्या पोटातून योनाने यहोवाला कळकळून केलेली विनवणी लिहिण्यासाठी यहोवाने योनाचाच उपयोग केल्यामुळे आपण त्या भावना समजू शकतो. योनाने म्हटले: “मृत्यूच्या छायेत असताना मी यहोवाचे स्मरण केले.”—योना १:३, १०; २:१-९, NW.
१४. यशयाने स्वतःबद्दल जे म्हटले ते आपण का समजू शकतो?
१४ यशयाने जेव्हा एका दृष्टान्तात देवाचे वैभव पाहिले तेव्हा स्वतःच्या पापी स्थितीची जाणीव होऊन त्याने काय लिहिले यावर विचार करा. त्याने म्हटले: “हाय हाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.” (यश. ६:५) एक देवदूत अशा भावना कधी व्यक्त करू शकला असता का? कधीच नाही, पण यशयाने या भावना व्यक्त केल्या. आपणही यशयाप्रमाणे अपरिपूर्ण असल्यामुळे त्याच्या भावना समजू शकतो.
१५, १६. (क) इतर मानवांनी व्यक्त केलेल्या भावना आपण का समजू शकतो? उदाहरणे द्या. (ख) यहोवाच्या जवळ जाण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
१५ “मी पात्र नाही” असे जे याकोबाने स्वतःबद्दल म्हटले, किंवा “मी पापी” आहे असे जे पेत्राला वाटले, ते देवदूत स्वतःबद्दल कधी म्हणू शकले असते का? (उत्प. ३२:१०; लूक ५:८) येशूच्या शिष्यांसारखे त्यांना कधी “भय” वाटले असते का? किंवा पौल व इतर शिष्यांना विरोध होत असताना सुवार्ता सांगण्यासाठी जसे धैर्य एकवटावे लागले तसे कधी देवदूतांना एकवटावे लागले असते का? (योहा. ६:१९; १ थेस्सलनी. २:२) मुळीच नाही, कारण देवदूत प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आणि मानवांपेक्षा खूप शक्तिशाली आहेत. पण जेव्हा आपल्यासारखे अपरिपूर्ण लोक अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतात तेव्हा आपण त्या लगेच समजू शकतो. म्हणूनच, बायबलचे वाचन करताना आपण खऱ्या अर्थाने आनंद करणाऱ्यांसोबत आनंद आणि शोक करणाऱ्यांसोबत शोक करू शकतो.—रोम. १२:१५.
१६ प्राचीन काळातील विश्वासू सेवकांसोबत यहोवाने कसा व्यवहार केला याबद्दल बायबलमध्ये जे सांगितले आहे त्यावर आपण मनन केले पाहिजे. असे केल्यास, या अपरिपूर्ण मानवांशी नातेसंबंध जोडण्यासाठी धीर व प्रेम दाखवणाऱ्या आपल्या देवाबद्दल बऱ्याच अद्भुत गोष्टी आपण शिकू. यामुळे आपल्याला यहोवाची जवळून ओळख होईल आणि त्याच्यावरील आपले प्रेम आणखी वाढेल. आणि याचा परिणाम असा होईल की आपण यहोवाच्या आणखी जवळ जाऊ.—स्तोत्र २५:१४ वाचा.
देवासोबत कधीही न तुटणारा नातेसंबंध जोडा
१७. (क) अजऱ्याने आसाला कोणता चांगला सल्ला दिला? (ख) अजऱ्याने दिलेल्या सल्ल्याकडे आसाने दुर्लक्ष कसे केले आणि याचा काय परिणाम झाला?
१७ आसा राजाने कूशी सैन्यावर मोठा विजय मिळवल्यानंतर देवाचा संदेष्टा अजऱ्या याने आसाला व त्याच्या लोकांना हा सुज्ञ सल्ला दिला: “तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडेल.” (२ इति. १५:१, २) दुःखाची गोष्ट म्हणजे पुढे जाऊन आसाने हा सल्ला पाळला नाही. उत्तरेकडील इस्राएल राज्य यहूदावर हल्ला करण्यास आले तेव्हा आसा मदतीसाठी अरामी लोकांकडे वळला. पुन्हा एकदा यहोवाला मदतीची याचना करण्याऐवजी त्याने खोट्या दैवतांची उपासना करणाऱ्या लोकांची मदत घेतली. त्यामुळे आसाला असे सांगण्यात आले की, “तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.” यानंतर आसाच्या राजवटीत नेहमी युद्ध होत राहिले. (२ इति. १६:१-९) यावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?
१८, १९. (क) आपण यहोवापासून दूर गेलो आहोत असे जाणवल्यास आपण काय केले पाहिजे? (ख) आपण यहोवाच्या आणखी जवळ कसे जाऊ शकतो?
१८ आपण कधीच यहोवापासून दूर जाऊ नये. पण, जर आपल्याला जाणवले की आपण यहोवापासून दूर गेलो आहोत तर आपण लगेच होशेय १२:६ या वचनानुसार केले पाहिजे. त्यात म्हटले आहे: “आपल्या परमेश्वराकडे परत या. त्याच्याशी निष्ठा ठेवा. योग्य तेच करा. तुमच्या परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा.” (ईझी-टू-रीड व्हर्शन) तर मग, आपण सर्व जण खंडणीच्या तरतुदीवर मनन करण्याद्वारे आणि बायबलचा सखोल अभ्यास करण्याद्वारे यहोवासोबतचा नातेसंबंध दिवसेंदिवस आणखी घनिष्ठ करू या.—अनुवाद १३:४ वाचा.
१९ स्तोत्रकर्त्याने म्हटले: “देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे.” (स्तो. ७३:२८) आपण सर्व जण यहोवाविषयी सतत नवनवीन गोष्टी शिकण्याद्वारे त्याच्यावरील आपले प्रेम वाढवत राहू या. आपण यहोवाच्या जवळ गेलो तर तोदेखील आपल्या जवळ येईल व आपला अनंतकाळासाठी त्याच्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध राहील.
^ परि. 3 टेहळणी बुरूज, १५ ऑगस्ट २०१२ या अंकातील आसा राजावर आधारित, “तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल” हा लेख पाहा.