देवाच्या राज्यावर तुमचा पक्का विश्वास आहे का?
“विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा [आहे].” —इब्री ११:१.
१, २. मशीही राज्याद्वारे देवाचा उद्देश पूर्ण होईल यावरील आपला विश्वास कशामुळे दृढ होतो, आणि का? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण देवाच्या राज्याचा आवेशाने प्रचार करतो. हे राज्यच मानवांच्या सर्व समस्या सोडवू शकते या महत्त्वाच्या सत्याबद्दल आपण लोकांना बायबलमधून स्पष्ट करून सांगतो. तसेच या राज्याच्या आशेमुळे आपल्याला खूप सांत्वन मिळते. पण हे एक खरोखरचे राज्य आहे याची आपल्याला पूर्ण खात्री आहे का? आणि या राज्याद्वारे यहोवाचा उद्देश नक्कीच पूर्ण होईल यावर आपला पक्का विश्वास आहे का? असा मजबूत विश्वास बाळगण्यासाठी आपल्याजवळ कोणता आधार आहे?—इब्री ११:१.
२ मशीही राज्याची स्थापना स्वतः यहोवा देवाने केली आहे. या राज्याद्वारे मानवांसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण होईल. विश्वावर राज्य करण्याचा अधिकार फक्त यहोवालाच आहे; या महत्त्वाच्या आणि कधीही न बदलू शकणाऱ्या सत्यावरच मशीही राज्य आधारित आहे. पण, या राज्याचा राजा कोण असेल? त्याच्यासोबत कोण राज्य करतील? ते कोणावर राज्य करतील? या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट करण्यासाठी आणि राज्याशी संबंधित असलेल्या या गोष्टींना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी अनेक करार करण्यात आले. करार हा दोन पक्षांमध्ये केलेला एक कायदेशीर ठराव असतो. राज्याशी संबंधित असलेल्या करारांपैकी प्रत्येक करार हा एकतर यहोवाने किंवा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याने केलेला आहे. या करारांचे परीक्षण केल्यामुळे, यहोवाचा उद्देश निश्चितच पूर्ण होईल याची आपल्याला खात्री पटेल. तसेच देवाने स्थापन केलेले मशीही राज्य हे एक अविनाशी राज्य आहे यावरही आपला विश्वास दृढ होईल.—इफिसकर २:१२ वाचा.
३. या आणि पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ बायबलमध्ये मशीही राज्याशी संबंधित असलेल्या सहा प्रमुख करारांविषयी सांगण्यात आले आहे. हे करार पुढीलप्रमाणे आहेत: (१) अब्राहामाशी केलेला करार, (२) नियमशास्त्राचा करार, (३) दाविदाशी केलेला करार, (४) मलकीसदेकासारखा याजक होण्याविषयी केलेला करार, (५) नवा करार, आणि (६) राज्याचा करार. यांपैकी प्रत्येक करार मशीही राज्याशी कशा प्रकारे संबंधित आहे आणि पृथ्वीसाठी व मानवांसाठी असलेला देवाचा उद्देश पूर्ण करण्यास प्रत्येक करार कशा प्रकारे हातभार लावतो याचे आता आपण परीक्षण करू या.—“ देव त्याचा उद्देश कशा प्रकारे पूर्ण करेल?” हे शीर्षक असलेला तक्ता पाहा.
देवाचा उद्देश कसा पूर्ण होईल हे प्रकट करणारे अभिवचन
४. यहोवाने मानवांसंबंधी कोणत्या तीन गोष्टी जाहीर केल्या होत्या?
४ मानवांना राहण्यासाठी ही सुंदर पृथ्वी तयार केल्यानंतर यहोवाने तीन महत्त्वाच्या गोष्टी जाहीर केल्या: पहिली गोष्ट म्हणजे, तो मानवांना त्याच्या प्रतिरूपात निर्माण करेल. दुसरी गोष्ट ही, की मानवांनी सबंध पृथ्वीला एदेन बागेसारखेच नंदनवन बनवायचे होते आणि त्यांच्या मुलांनी ही पृथ्वी व्यापून टाकायची होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मानवांनी बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खायचे नव्हते. (उत्प. १:२६, २८; २:१६, १७) देवाने मानवांना निर्माण केले तेव्हा यांपैकी पहिली गोष्ट पूर्ण झाली. देवाचा पृथ्वीकरता असलेला उद्देश पूर्ण होण्याकरता फक्त बाकीच्या दोन गोष्टी पूर्ण होणे गरजेचे होते. तर मग, अशा कोणत्या घटना घडल्या ज्यांमुळे करारांची गरज निर्माण झाली?
५, ६. (क) सैतानाने कशा प्रकारे देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला? (ख) एदेन बागेत सैतानाने यहोवाच्या विरोधात बंड केले तेव्हा यहोवाने काय केले?
५ देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत अडथळा आणण्याच्या दुष्ट हेतूने दियाबल सैतानाने मानवांना देवाविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त केले. त्याने पहिली स्त्री हव्वा हिला फसवले आणि तिला देवाची आज्ञा मोडायला लावली. (उत्प. ३:१-५; प्रकटी. १२:९) अशा रीतीने सैतानाने सबंध विश्वावर राज्य करण्याच्या देवाच्या अधिकाराला आव्हान दिले. तसेच, काही काळानंतर सैतानाने असा दावा केला की देवाचे एकनिष्ठ सेवक केवळ स्वार्थापोटी त्याची सेवा करतात.—ईयो. १:९-११; २:४, ५.
६ एदेन बागेत सैतानाने यहोवाच्या विरोधात बंड केले तेव्हा यहोवाने काय केले? जर देवाने सैतानाचा आणि त्याला सामील झालेल्यांचा नाश केला असता तर त्यांचे बंड तेथेच थांबले असते. पण आदाम आणि हव्वा यांच्या संततीने पृथ्वीला व्यापून टाकावे हा जो उद्देश यहोवाने प्रकट केला होता, तो पूर्ण होऊ शकला नसता. म्हणूनच, आपल्या उद्देशाचे सर्व पैलू पूर्ण व्हावेत या हेतूने, बंडखोरांचा लगेच नाश करण्याऐवजी यहोवाने एक अतिशय अर्थपूर्ण भविष्यवाणी केली. ही भविष्यवाणी म्हणजेच एदेन बागेत देण्यात आलेले अभिवचन.—उत्पत्ती ३:१५ वाचा.
७. एदेन बागेत देण्यात आलेल्या अभिवचनातून सर्प आणि त्याची संतती यांच्याबद्दल काय प्रकट झाले?
७ एदेन बागेतील अभिवचनाद्वारे देवाने सर्पाला म्हणजेच सैतानाला आणि त्याच्या संततीला मृत्युदंड सुनावला. सैतानाच्या संततीत अशा सर्वांचा समावेश होतो, जे देवाच्या अधिकाराविषयी निर्माण झालेल्या वादविषयात सैतानाची बाजू घेतात. दुसरीकडे पाहता, देवाने स्त्रीच्या संततीला या बंडखोरांचा नाश करण्याचा अधिकार दिला. अशा रीतीने, एदेन बागेत देण्यात आलेल्या अभिवचनातून हे प्रकट करण्यात आले की सैतानाचा नाश केला जाईल आणि त्याच्या बंडामुळे झालेले सर्व दुष्परिणाम काढून टाकले जातील. तसेच, हे कसे केले जाईल हेदेखील त्या अभिवचनातून सांगण्यात आले.
८. स्त्री व तिची संतती यांच्याबद्दल आपण काय म्हणू शकतो?
८ स्त्रीच्या संततीविषयी काय? ही संतती कोण असणार होती? ती नक्कीच आत्मिक असणार होती. पण, आपण असे का म्हणू शकतो? कारण दियाबल सैतान एक आत्मिक व्यक्ती आहे आणि ही संतती सैतानाचा नाश करेल असे सांगण्यात आले होते. (इब्री २:१४) तसेच, जर संतती आत्मिक असेल तर या संततीला जन्म देणारी स्त्रीदेखील आत्मिक असली पाहिजे. काळाच्या ओघात, सर्पाची संतती वाढत गेली. पण, स्त्री आणि तिची संतती कोण आहे, हे एदेन बागेतील अभिवचन देण्यात आल्यानंतर जवळजवळ ४,००० वर्षांपर्यंत एक गुपित होते. त्या काळादरम्यान यहोवाने अनेक करार केले. स्त्रीची संतती कोण आहे आणि सैतानाच्या बंडामुळे झालेले नुकसान यहोवा कशा प्रकारे भरून काढेल हे या करारांद्वारे प्रकट करण्यात आले.
स्त्रीच्या संततीची ओळख करून देणारा करार
९. यहोवाने अब्राहामाशी कोणता करार केला, आणि तो केव्हा अंमलात आला?
९ एदेन बागेतील अभिवचन दिल्यावर जवळजवळ दोन हजार वर्षांनंतर यहोवाने अब्राहामाला ऊर देशातील त्याचे घर सोडून कनान देशात जाण्यास सांगितले. (प्रे. कृत्ये ७:२, ३) उत्पत्ती १२:१-३ (पं.र.भा.) यात सांगितल्याप्रमाणे यहोवा अब्राहामाला म्हणाला: “तू आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवेन त्यात जा. आणि मी तुला मोठे राष्ट्र करेन, आणि मी तुला आशीर्वाद देईन, व तुझे नाव मोठे करेन; आणि तू आशीर्वाद होशील; आणि जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जो तुला शाप देतो त्याला मी शाप देईन; आणि तुझ्याकडून पृथ्वीतली सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.” यहोवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचा हा पहिलाच लेखी स्वरूपातील उल्लेख आहे. हा करार यहोवाने अब्राहामाशी पहिल्यांदा नेमका केव्हा केला हे आपल्याला माहीत नाही. पण हा करार इ.स.पू. १९४३ या वर्षी अंमलात आला. त्या वर्षी, अब्राहामाने हारानातून निघून फरात नदी पार केली. त्या वेळी तो ७५ वर्षांचा होता.
१०. (क) देवाच्या वचनांवर पक्का विश्वास असल्याचे अब्राहामाने कसे दाखवले? (ख) स्त्रीच्या संततीबद्दल यहोवाने कोणकोणत्या गोष्टी प्रकट केल्या?
१० अब्राहामाला दिलेले वचन यहोवाने अनेक प्रसंगी पुन्हा बोलून दाखवले. प्रत्येक वेळी त्याने आणखी काही गोष्टी अब्राहामाला प्रकट केल्या. (उत्प. १३:१५-१७; १७:१-८, १६) देवाच्या अभिवचनांवर अब्राहामाचा पक्का विश्वास होता. म्हणूनच, देवाने आज्ञा दिली तेव्हा अब्राहाम आपल्या एकुलत्या एका पुत्राचे बलिदान द्यायलाही तयार झाला. हे पाहून यहोवाला आनंद झाला आणि त्याने अब्राहामाला हमी दिली की त्याला देण्यात आलेले वचन निश्चित पूर्ण होईल. (उत्पत्ती २२:१५-१८; इब्री लोकांस ११:१७, १८ वाचा.) अब्राहामाशी केलेला करार अंमलात आल्यानंतर, यहोवाने हळूहळू स्त्रीच्या संततीविषयी महत्त्वाची माहिती देण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ, यहोवाने हे प्रकट केले, की ही संतती अब्राहामाच्या कुटुंबातून येईल; या संततीत अनेक जणांचा समावेश असेल; ते राजे म्हणून कार्य करतील; ते देवाच्या शत्रूंचा नाश करतील; आणि सर्व मानवांना त्यांच्याद्वारे आशीर्वाद मिळतील.
११, १२. अब्राहामाशी केलेल्या कराराची मोठी पूर्णतादेखील आहे हे बायबल कशा प्रकारे दाखवते, आणि यामुळे मानवजातीला कोणता फायदा होईल?
११ अब्राहामाच्या वंशजांनी प्रतिज्ञात देशाचा ताबा घेतला, तेव्हा अब्राहामाच्या करारातील अभिवचने पूर्ण झाली. पण, या अभिवचनांची आध्यात्मिक अर्थाने मोठी पूर्णता भविष्यात होईल असे बायबलमध्ये सांगण्यात आले. (गलती. ४:२२-२५) प्रेषित पौलाने स्पष्ट केले की अब्राहामाच्या संततीतील पहिला किंवा प्रमुख सदस्य येशू ख्रिस्त आहे. तर, दुसरे किंवा सोबतीचे सदस्य १,४४,००० अभिषिक्त जन आहेत. (गलती. ३:१६, २९; प्रकटी. ५:९, १०; १४:१, ४) एदेन बागेत देण्यात आलेल्या अभिवचनातील स्त्री ही देवाच्या संघटनेचा स्वर्गीय भाग आहे. बायबलमध्ये या स्त्रीला “वर असलेली यरुशलेम” असे म्हणण्यात आले आहे आणि तिच्यात देवाच्या एकनिष्ठ आत्मिक सेवकांचा समावेश होतो. (गलती. ४:२६, ३१) अब्राहामाशी केलेल्या करारात सांगण्यात आल्यानुसार, या स्त्रीच्या संततीमुळे मानवजातीला सार्वकालिक आशीर्वाद मिळतील.
१२ अब्राहामाशी केलेल्या करारामुळे मशीही राज्य निश्चितच स्थापन केले जाईल याची खात्री मिळाली. तसेच, या राज्याचा राजा आणि त्याचे सहराजे कोण असतील हेदेखील यातून स्पष्ट झाले. (इब्री ६:१३-१८) अब्राहामाशी केलेला करार केव्हापर्यंत अस्तित्वात राहील? उत्पत्ती १७:७ मध्ये या कराराला “निरंतरचा करार” असे म्हणण्यात आले आहे. मशीही राज्य देवाच्या शत्रूंचा नाश करून पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना आशीर्वादित करेल, तोपर्यंत अब्राहामाचा करार अंमलात राहील. (१ करिंथ. १५:२३-२६) पण, या करारामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांचा लाभ मानवजात सदासर्वकाळ घेत राहील. अब्राहामाशी केलेल्या करारावरून हीच गोष्ट सिद्ध होते, की नीतिमान लोकांनी पृथ्वी व्यापून टाकावी हा यहोवाचा उद्देश तो निश्चितच पूर्ण करेल.—उत्प. १:२८.
राज्य सर्वकाळ राहील याची खात्री देणारा करार
१३, १४. दाविदाशी केलेला करार आपल्याला मशीहाच्या राज्याविषयी कोणती खात्री देतो?
१३ एदेन बागेत देण्यात आलेले अभिवचन आणि अब्राहामाशी केलेला करार या दोन्ही गोष्टींवरून आपल्याला हेच शिकायला मिळते की यहोवाचे शासन हे नेहमीच त्याच्या नीतिमान स्तरांवर आधारित असते. त्यामुळे, त्याने स्थापित केलेले मशीही राज्यदेखील त्याच्या नीतिमान स्तरांवर आधारित आहे. (स्तो. ८९:१४) मशीही राज्य पुढे जाऊन कधी भ्रष्ट होईल का? या राज्याऐवजी दुसरे राज्य सरकार स्थापित करण्याची गरज निर्माण होईल का? नाही, असे कधीही घडणार नाही. या गोष्टीची खात्री आपल्याला आणखी एका करारावरून मिळते.
१४ प्राचीन इस्राएलचा राजा दावीद याला यहोवाने एक अभिवचन दिले. ते अभिवचन दाविदाशी केलेला करार या नावाने ओळखले जाते. (२ शमुवेल ७:१२, १६ वाचा.) दावीद जेरूसलेममध्ये राज्य करत असताना यहोवाने त्याच्यासोबत हा करार केला. यहोवाने दाविदाला सांगितले की मशीहा त्याच्याच वंशातून येईल. (लूक १:३०-३३) अशा रीतीने, यहोवाने मशीहाच्या वंशावळीसंबंधी आणखी स्पष्ट माहिती दिली. यहोवाने दाविदाला सांगितले की त्याच्या वंशातील एकाला मशीही राज्याचा राजा असण्याचा “हक्क” असेल. (यहे. २१: २५-२७) दाविदाचे राज्य सर्वकाळचे असेल कारण त्याचा वंशज असणारा येशू याचे राज्य “सर्वकाळ राहील, व त्याचे राजासन . . . सूर्याप्रमाणे कायम राहील.” (स्तो. ८९:३४-३७) मशीहाचे राज्य कधीही भ्रष्ट होणार नाही आणि त्याच्या राज्यामुळे होणारे फायदे सदासर्वकाळ टिकून राहतील याची पूर्ण खात्री आपण बाळगू शकतो.
एका याजकाची तरतूद करणारा करार
१५-१७. स्त्रीची संतती आणखी कोणती भूमिका पार पाडेल, आणि का?
१५ अब्राहामाशी व दाविदाशी करण्यात आलेल्या करारांतून अशी खात्री मिळाली की स्त्रीची संतती राजा या नात्याने राज्य करेल. पण, सबंध मानवजातीला खऱ्या अर्थाने फायदा होण्याकरता स्त्रीच्या संततीने फक्त राजा या नात्याने कार्य करणे पुरेसे नव्हते. तर या संततीने याजक असणेही गरजेचे होते. पापाच्या दुष्परिणामांतून मानवांना मुक्त करण्यासाठी; तसेच, त्यांना यहोवाच्या विश्वव्यापी कुटुंबाचे सदस्य बनण्यास मदत करण्यासाठी ज्या बलिदानाची गरज होती, ते फक्त एक याजकच अर्पण करू शकत होता. म्हणूनच, स्त्रीची संतती याजकाची भूमिकादेखील पार पाडेल याची खात्री करण्यासाठी यहोवाने आणखी एक करार केला. हा करार म्हणजे मलकीसदेकासारखा याजक होण्याविषयी केलेला करार.
१६ यहोवाने दावीद राजाद्वारे असे प्रकट केले की तो येशूसोबत एक वैयक्तिक करार करेल. या करारात दोन गोष्टींचा समावेश असेल. पहिली गोष्ट म्हणजे येशू त्याच्या सर्व शत्रूंवर विजय मिळवेपर्यंत देवाच्या “उजवीकडे” बसेल. दुसरी गोष्ट म्हणजे, येशू मलकीसदेकासारखा युगानुयुगाचा याजक असेल. (स्तोत्र ११०:१, २, ४ वाचा.) पण येशू मलकीसदेकासारखा याजक असेल याचा काय अर्थ होतो? अब्राहामाच्या संततीने प्रतिज्ञात देशावर विजय मिळवण्याआधी, मलकीसदेक हा शालेम शहराचा राजा आणि “परात्पर देवाचा याजक” होता. (इब्री ७:१-३) यहोवाने स्वतः त्याला राजा व याजक म्हणून नियुक्त केले होते. आणि एकाच वेळी या दोन्ही भूमिका पार पाडणारा मलकीसदेक हा एकटाच होता. तसेच, मलकीसदेकाच्या पूर्वी किंवा त्याच्या नंतरही इतर कोणाला अशी पदवी मिळाल्याचा उल्लेख नसल्यामुळे, तो “युगानुयुग याजक” आहे असे म्हटले जाऊ शकते.
१७ या वैयक्तिक कराराद्वारे यहोवाने स्वतः येशूला याजक म्हणून नियुक्त केले. येशूदेखील मलकीसदेकासारखा “युगानुयुग याजक” राहील. (इब्री ५:४-६) मशीही राज्याचा उपयोग करून यहोवा मानवांसाठी व पृथ्वीसाठी असलेला आपला उद्देश निश्चितच पूर्ण करेल. मलकीसदेकासारखा याजक होण्याविषयी केलेल्या कराराद्वारे यहोवा स्वतः आपल्याला या गोष्टीची खात्री देतो.
मशीही राज्य कायदेशीर करारांवर आधारित आहे
१८, १९. (क) आतापर्यंत आपण ज्यांवर चर्चा केली ते करार मशीही राज्याविषयी कोणती माहिती प्रकट करतात? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
१८ आतापर्यंत आपण चर्चा केलेल्या करारांपैकी प्रत्येक कराराचा मशीही राज्याशी काय संबंध आहे हे आपण पाहिले. तसेच, या कायदेशीर ठरावांद्वारे यहोवाने मशीही राज्यासंबंधी वेगवेगळ्या गोष्टींची कशा प्रकारे खात्री दिली हेही आपल्याला समजले. एदेन बागेतील अभिवचनाद्वारे अशी खात्री देण्यात आली की यहोवा स्त्रीच्या संततीद्वारे पृथ्वी व मानव यांसंबधी असलेला त्याचा उद्देश पूर्ण करेल. तर अब्राहामाशी केलेल्या करारातून, या संततीत कोणाचा समावेश असेल आणि त्यांची भूमिका काय असेल हे स्पष्ट झाले.
१९ दाविदाशी केलेल्या करारातून मशीहाच्या वंशावळीबद्दल आणखी माहिती मिळाली. तसेच, या कराराने येशूला पृथ्वीवर सर्वकाळ राज्य करण्याचा अधिकार दिला. मलकीसदेकासारखा याजक होण्याविषयी केलेल्या कराराद्वारे अशी खात्री देण्यात आली की स्त्रीची संतती याजकाची भूमिकादेखील पार पाडेल. पण मानवांना परिपूर्ण होण्यास मदत करण्यात येशूसोबत इतर जणदेखील असतील. त्यांना राजे व याजक म्हणून नियुक्त केले जाईल. हे लोक कोण आहेत? याचे उत्तर पुढील लेखात आपल्याला मिळेल.