व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण पवित्र का असले पाहिजे?

आपण पवित्र का असले पाहिजे?

“तुम्हीही पवित्र व्हा.”—लेवी. ११:४५.

१. लेवीय पुस्तकातील माहिती आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते?

बायबलमध्ये, लेवीय या पुस्तकात पवित्र किंवा पवित्रता या शब्दांचा इतर पुस्तकांच्या तुलनेत जास्त वेळा उल्लेख आढळतो. यहोवाच्या सर्व खऱ्या उपासकांनी पवित्र असावे अशी त्याची अपेक्षा आहे. म्हणूनच, आता आपण लेवीय या पुस्तकातील काही माहिती विचारात घेणार आहोत. ही माहिती समजून घेतल्यामुळे आणि तिच्याबद्दल कदर उत्पन्न केल्यामुळे आपल्याला सर्व बाबतींत पवित्र राहण्यास निश्‍चितच मदत मिळेल.

२. लेवीय पुस्तकाची काही वैशिष्ट्ये कोणती?

लेवीय हे पुस्तक मोशेने लिहिलेले आहे आणि ते शिकवण्याकरता उपयुक्त असलेल्या ‘परमेश्वरप्रेरित शास्त्रलेखाचा’ एक भाग आहे. (२ तीम. ३:१६) मूळ इब्री भाषेत, या पुस्तकाच्या प्रत्येक अध्यायात यहोवाचे नाव जवळजवळ दहा वेळा आढळते. लेवीय पुस्तकातील माहितीचा खरा अर्थ समजून घेतल्यास आपल्याला यहोवाच्या नावाचा अनादर होईल अशी कोणतीही कृती टाळण्याचा दृढ निर्धार करण्यास मदत मिळेल. (लेवी. २२:३२) या पुस्तकात “मी परमेश्वर आहे” किंवा मूळ भाषेनुसार “मी यहोवा आहे,” असे आपण वारंवार वाचतो. हे शब्द आपल्याला देवाच्या आज्ञांचे पालन करण्याची आठवण करून देतात. या व पुढील लेखात आपण लेवीय पुस्तकातील काही खास माहितीवर लक्ष देऊ या. या मौल्यवान माहितीमुळे आपल्याला नक्कीच याची खात्री पटेल, की लेवीय हे पुस्तक यहोवाने आपल्याला दिलेली एक देणगी आहे. तसेच, ही माहिती यहोवाची पवित्र उपासना करण्यासही आपल्याला साहाय्य करेल.

पवित्र असणे गरजेचे

३, ४. अहरोनाला शुद्ध केले जाणे आणि त्याच्या पुत्रांना शुद्ध केले जाणे कशास सूचित करते? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

लेवीय ८:५, ६ वाचा. यहोवाने इस्राएल राष्ट्राचा मुख्य याजक होण्याकरता अहरोनाला निवडले. तसेच, अहरोनाचे पुत्र इस्राएल राष्ट्रात याजक म्हणून सेवा करणार होते. अहरोन हा येशू ख्रिस्ताला सूचित करतो, तर अहरोनाचे पुत्र हे येशूच्या अभिषिक्त अनुयायांना सूचित करतात. अहरोनाला पाण्याने आंघोळ घालण्यात आली असे जे आपण वाचतो, ते येशूला शुद्ध केले जाण्यास सूचित करते का? नाही, कारण येशू परिपूर्ण असल्यामुळे त्याने कोणतेही पाप केले नव्हते. तो “निष्कलंक” असल्यामुळे त्याला शुद्ध करण्याची गरज नव्हती. (इब्री ७:२६; ९:१४) पण, अहरोनाची शुद्ध स्थिती या गोष्टीला सूचित करते की येशू पवित्र आणि नीतिमान आहे. तर मग, अहरोनाच्या पुत्रांचे शुद्ध केले जाणे कशास सूचित करते?

अहरोनाच्या पुत्रांना पाण्याने आंघोळ घालण्यात आली ही गोष्ट स्वर्गीय याजकगणातील अभिषिक्त सदस्यांना शुद्ध केले जाण्यास सूचित करते. हे अभिषिक्त जनांच्या बाप्तिस्म्याशी संबंधित आहे का? नाही, कारण बाप्तिस्म्यामुळे पापे धुतली जात नाहीत; तर, एका व्यक्तीने यहोवा देवाची सेवा करण्यासाठी कोणत्याही अटीविना स्वतःला समर्पित केले आहे, याचे ते प्रतीक आहे. तर मग, अभिषिक्त जनांना कशा प्रकारे शुद्ध केले जाते? त्यांना देवाच्या “वचनाद्वारे” शुद्ध केले जाते. जेव्हा ते ख्रिस्ताच्या शिकवणींचे मनापासून पालन करतात तेव्हा ते देवाच्या वचनाद्वारे शुद्ध व पवित्र ठरतात. (इफिस. ५:२५-२७) पण दुसऱ्या मेंढरांतील सदस्यांबद्दल काय?—योहा. १०:१६.

५. दुसऱ्या मेंढरांतील सदस्यांनाही देवाच्या वचनाद्वारे शुद्ध केले जाते असे का म्हटले जाऊ शकते?

अहरोनाचे पुत्र येशूच्या दुसऱ्या मेंढरांनी बनलेल्या मोठ्या लोकसमुदायाला सूचित करत नाहीत. (प्रकटी. ७:९) मग, दुसऱ्या मेंढरांतील बाप्तिस्मा घेतलेल्या सदस्यांनाही देवाच्या वचनाद्वारे शुद्ध केले जाते असे म्हटले जाऊ शकते का? हो, असे म्हटले जाऊ शकते. पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले जेव्हा येशूच्या बलिदानाच्या महत्त्वाविषयी आणि त्याच्या वाहिलेल्या रक्ताद्वारे मिळणाऱ्या मुक्ततेविषयी बायबलमध्ये वाचतात, तेव्हा ते यावर विश्वास ठेवतात. यामुळे, ते “अहोरात्र” यहोवाची पवित्र “सेवा” करतात. (प्रकटी. ७:१३-१५) या अर्थाने त्यांनाही देवाच्या वचनाद्वारे शुद्ध केले जाते. अभिषिक्त आणि दुसरी मेंढरे या दोन्ही गटांतील सदस्यांना देवाच्या वचनाद्वारे सतत शुद्ध केले जात असल्यामुळेच त्यांना कायम चांगले आचरण टिकवून ठेवण्यास मदत मिळते. (१ पेत्र २:१२) ते आपला मेंढपाळ, येशू याचे ऐकतात आणि विश्वासूपणे त्याने दाखवलेल्या मार्गावर चालत राहतात. या दोन्ही गटांतील सदस्यांचे शुद्ध आचरण आणि त्यांच्यामधील एकता पाहून यहोवाला किती आनंद होत असेल!

६. आपण स्वतःचे परीक्षण कसे करू शकतो?

इस्राएलमधील याजकांनी शुद्ध असावे अशी यहोवाची आज्ञा होती. आज यहोवाचे लोक यावरून बरेच काही शिकू शकतात. आपण ज्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करतो त्यांच्यापैकी बरेच जण आपले राज्य सभागृह किती स्वच्छ असते याविषयी आपली प्रशंसा करतात. तसेच, यहोवाचे लोक सर्व बाबतींत स्वच्छता राखतात आणि त्यांचा पेहराव शालीन असतो ही गोष्टदेखील त्यांच्या लक्षात येते. हे खरे असले, तरी इस्राएलमधील याजकांच्या शुद्धतेवरून आपल्याला हे समजण्यास मदत मिळते, की जो कोणी यहोवाच्या उच्च स्तरांचे पालन करू इच्छितो त्याचे “मन शुद्ध” असणे गरजेचे आहे. (स्तोत्र २४:३, ४ वाचा; यश. २:२, ३) देवाची पवित्र सेवा करण्याकरता, आपले शरीर स्वच्छ असण्यासोबतच विचार आणि भावनादेखील शुद्ध असल्या पाहिजेत. यासाठी आपण वारंवार स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. असे परीक्षण केल्यानंतर, यहोवाच्या नजरेत शुद्ध होण्याकरता कदाचित काहींना स्वतःमध्ये मोठे बदल करावे लागतील. (२ करिंथ. १३:५) उदाहरणार्थ, बाप्तिस्मा घेतलेल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित अश्‍लील चित्रे किंवा व्हिडिओ पाहण्याची सवय लागली असेल. अशा व्यक्तीने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, की ‘मी खरोखरच शुद्ध आहे का?’ तसेच, या व्यक्तीने ही अशुद्ध सवय सोडून देण्यासाठी वडिलांकडून मदतदेखील मागितली पाहिजे.—याको. ५:१४.

आज्ञाधारक राहण्याद्वारे पवित्रता

७. येशूने कोणत्या बाबतींत उत्तम उदाहरण मांडले?

इस्राएलमध्ये याजकांना नेमण्यात आले त्या प्रसंगी, मुख्य याजक अहरोन आणि त्याचे पुत्र यांच्या उजव्या कानाला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला मेंढ्याचे रक्त लावण्यात आले. (लेवीय ८:२२-२४ वाचा.) याचा काय अर्थ होता? याजक यहोवाचे ऐकतील आणि आपल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतील असे यावरून सूचित झाले. या बाबतीत, मुख्य याजक येशू याने अभिषिक्त जनांसाठी व दुसऱ्या मेंढरांसाठी सर्वात उत्तम उदाहरण मांडले. येशूने यहोवाचे मार्गदर्शन नेहमी कान देऊन ऐकले. त्याने यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्या हातांचा वापर केला आणि त्याचे पाय पवित्र आचरणाच्या मार्गावरून कधीही भरकटले नाहीत.—योहा. ४:३१-३४.

८. यहोवाच्या सर्वच उपासकांनी काय केले पाहिजे?

अभिषिक्त ख्रिस्ती आणि दुसरी मेंढरे यांनी आपल्या मुख्य याजकाच्या म्हणजेच येशूच्या विश्वासू उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. यहोवाच्या सर्वच उपासकांनी देवाच्या वचनातील आज्ञांकडे कान देऊन त्यांनुसार वागले पाहिजे. अशा रीतीने ते देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करण्याचे टाळू शकतात. (इफिस. ४:३०) तसेच, त्यांनी यहोवाच्या मार्गांनी चालत राहण्याकरता “आपल्या पायांसाठी सरळ वाटा” तयार केल्या पाहिजेत.—इब्री १२:१३.

९. तीन बांधवांनी कोणते मनोगत व्यक्त केले, आणि त्यांच्या शब्दांमुळे तुम्हाला पवित्रता टिकवून ठेवण्यास मदत कशी मिळू शकते?

दुसऱ्या मेंढरांपैकी असलेल्या आणि अनेक वर्षे नियमन मंडळातील सदस्यांच्या निकट सहवासात राहून काम केलेल्या तीन बांधवांचे मनोगत विचारात घ्या. त्यांपैकी एकाने म्हटले: “या बांधवांसोबत काम करायला मिळालं हा खरोखरच माझ्यासाठी एक बहुमान आहे. पण, त्यांच्यासोबत अगदी जवळून काम केल्यामुळे मला वेळोवेळी याची जाणीव झाली आहे, की हे बांधव आत्म्यानं अभिषिक्त असले तरी ते अपरिपूर्ण आहेत. तरीसुद्धा, या सर्व वर्षांत मी संघटनेत पुढाकार घेणाऱ्या या बांधवांच्या अधीन राहण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.” दुसऱ्या बांधवाने म्हटले: “दुसरे करिंथकर १०:५ यात ख्रिस्ताला अधीन राहण्याविषयी सांगितलं आहे. यांसारख्या वचनांनी मला संघटनेचं नेतृत्व करणाऱ्या बांधवांच्या आज्ञेत राहून त्यांना सहकार्य करण्यास मदत केली आहे. कारण मनापासून आज्ञाधारक राहण्याचा हाच अर्थ होतो.” तिसऱ्या बांधवाने म्हटले: “जर आपल्याला यहोवाला आवडणाऱ्या गोष्टींची आवड धरायची असेल आणि त्याला न आवडणाऱ्या गोष्टींचा द्वेष करायचा असेल; तसंच, सतत त्याचं मार्गदर्शन घेऊन त्याच्या इच्छेनुसार वागायचं असेल तर यहोवाच्या संघटनेच्या आणि त्यानं नेमलेल्या बांधवांच्या अधीन राहणं अत्यंत गरजेचं आहे.” या बांधवाने बंधू नेथन नॉर, जे नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले, त्यांच्याविषयी असे ऐकले होते, की १९२५ साली टेहळणी बुरूजमध्ये प्रकाशित झालेल्या “एका राष्ट्राचा जन्म” या लेखातील काही मुद्द्यांविषयी अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या; पण, बंधू नॉर यांनी त्या लेखातील माहिती लगेच स्वीकारली. आज्ञाधारकतेच्या या उत्तम उदाहरणाची त्या बांधवाच्या मनावर खोलवर छाप पडली. वरती दिलेल्या या तिन्ही बांधवांच्या शब्दांवर विचार केल्यास आपल्यालाही आज्ञाधारक राहण्यास आणि त्याद्वारे पवित्रता टिकवून ठेवण्यास मदत मिळेल.

रक्ताविषयी देवाच्या नियमाचे पालन करण्याद्वारे पवित्रता

१०. रक्तासंबंधी देवाच्या नियमाचे पालन करणे महत्त्वाचे का आहे?

१० लेवीय १७:१० वाचा. “कोणत्याही प्रकारचे” रक्त सेवन करू नका अशी आज्ञा यहोवाने इस्राएली लोकांना दिली होती. ख्रिश्चनांनाही प्राण्यांच्या किंवा मानवांच्या रक्ताचे कोणत्याही प्रकारे सेवन न करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (प्रे. कृत्ये १५:२८, २९) यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे त्याने आपल्यावरून त्याची कृपादृष्टी काढून घ्यावी किंवा त्याच्या लोकांमधून आपल्याला काढून टाकावे असे आपल्यापैकी कोणालाही वाटत नाही. उलट, यहोवावर प्रेम असल्यामुळे त्याच्या आज्ञांनुसार वागण्याची आपली इच्छा आहे. कधीकधी, आणीबाणीच्या परिस्थितीत यहोवाबद्दल ज्ञान नसलेले आणि त्याच्या आज्ञांविषयी आदर नसलेले लोक आपल्याला त्याच्या आज्ञांच्या विरोधात जाण्याची गळ घालू शकतात. पण अशा परिस्थितीतही, यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा आपला दृढ निश्चय आहे. रक्ताविषयी देवाच्या आज्ञेचे पालन केल्यामुळे कदाचित काही लोक आपली टीका किंवा टिंगल करतील. पण, आपण देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे निवडतो. (यहू. १७, १८) रक्तासंबंधी कोणता दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपल्याला रक्त सेवन न करण्याविषयी आणि रक्त संक्रमण न स्वीकारण्याविषयी ठाम राहण्यास साहाय्य मिळेल?—अनु. १२:२३.

११. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी जे केले जायचे ते निरर्थक विधी का नव्हते?

११ इस्राएल राष्ट्रात, दरवर्षी येणाऱ्या प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मुख्य याजक प्राण्यांच्या रक्ताचा एका खास प्रकारे वापर करायचा. त्यावरून आपल्याला रक्ताविषयी देवाचा दृष्टिकोन समजून घेण्यास मदत मिळते. रक्त हे फक्त एका खास उद्देशासाठी उपयोगात आणले जावे असा देवाचा नियम होता. आणि तो उद्देश म्हणजे, यहोवाकडून क्षमा मिळवण्यास इच्छुक असलेल्यांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करणे. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मुख्य याजक बैलाचे आणि बकऱ्याचे रक्त कराराच्या कोशाच्या दयासनावर आणि दयासनासमोर शिंपडत असे. (लेवी. १६:१४, १५, १९) यहोवाने इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करावी या उद्देशाने असे केले जायचे. शिवाय, एखाद्याने खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे असाही नियम यहोवाने दिला होता. कारण यहोवाच्या दृष्टिकोनातून प्राण्यांचे “रक्त हेच त्यांचे जीवन” आहे. (लेवी. १७:११-१४) हे सर्व विधी निरर्थक होते का? नाही. या विधींतून यहोवाचा रक्ताविषयी असलेला दृष्टिकोन दिसून आला. यापूर्वीही यहोवाने रक्तासंबंधी नोहाला व त्याच्या वंशजांना एक आज्ञा दिली होती. नोहाला देण्यात आलेली ती आज्ञा, प्रायश्‍चित्ताच्या दिवशी रक्ताच्या वापरासंबंधी तसेच जमिनीवर रक्त ओतण्यासंबंधी दिलेल्या आज्ञांसारखीच होती. (उत्प. ९:३-६) यहोवा देवाने पूर्वीपासूनच रक्ताचे सेवन करण्यास मनाई केली होती. ही गोष्ट ख्रिश्चनांकरता महत्त्वाची का आहे?

१२. पौलाने इब्री ख्रिश्चनांना लिहिलेल्या पत्रात कोणत्या गोष्टींचा खुलासा केला?

१२ रक्तामध्ये शुद्ध करण्याची जी ताकद आहे तिच्याविषयी इब्री ख्रिश्चनांना लिहिताना प्रेषित पौलाने असे म्हटले: “नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.” (इब्री ९:२२) यासोबतच, पौलाने हेही स्पष्ट केले की प्राण्यांची बलिदाने जरी महत्त्वाची असली, तरी त्यांचा उद्देश इस्राएली लोकांना त्यांच्या पापी प्रवृत्तीची आठवण करून देणे हा होता. तसेच, पापांची पूर्णपणे क्षमा होण्याकरता आणखी कशाचीतरी गरज आहे याचीही जाणीव या बलिदानांनी इस्राएली लोकांना करून दिली. म्हणूनच बायबलमध्ये असे म्हटले आहे: “ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही.” (इब्री १०:१-४) मग, पापांची क्षमा मिळणे कशामुळे शक्य होणार होते?

१३. येशूने यहोवासमोर त्याच्या रक्ताचे मोल सादर केले याबद्दल तुम्हाला कृतज्ञ का वाटते?

१३ इफिसकर १:७ वाचा. येशू ख्रिस्ताने स्वेच्छेने मृत्यूला सामोरे जाऊन, एक बलिदान म्हणून स्वतःला आपल्याकरता दिले. ख्रिस्तावर आणि त्याच्या पित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी या गोष्टीचा अतिशय गहन अर्थ आहे. (गलती. २:२०) पण, प्रत्यक्ष येशूच्या बलिदानामुळे नव्हे, तर त्याच्या मृत्यूच्या व पुनरुत्थानाच्या नंतर त्याने जे केले त्यामुळे खरेतर आपल्याला पापांची क्षमा मिळणे शक्य झाले आहे. मोशेच्या नियमशास्त्रानुसार प्रायश्‍चित्ताच्या दिवशी जे केले जायचे त्याची पूर्णता येशूने केली. प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मुख्य याजक यज्ञपशूंच्या रक्तातील काही रक्त घेऊन निवासमंडपाच्या परमपवित्र स्थानात, जणू यहोवाच्या समोर जायचा. नंतर शलमोनाचे मंदिर बांधण्यात आल्यावर मुख्य याजक मंदिरातील परमपवित्र स्थानात रक्त घेऊन जायचा. (लेवी. १६:११-१५) त्याच प्रकारे, येशू आपल्या मानवी रक्ताचे मोल घेऊन स्वर्गात गेला आणि तेथे त्याने ते यहोवासमोर सादर केले. (इब्री ९:६, ७, ११-१४, २४-२८) येशूच्या रक्तावर विश्वास ठेवून त्यानुसार कार्य केल्यामुळे आपल्याला पापांची क्षमा आणि एक शुद्ध विवेक मिळू शकतो याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत!

१४, १५. रक्ताविषयी यहोवाच्या आज्ञेमागचा उद्देश समजून घेणे आणि तिचे पालन करणे महत्त्वाचे का आहे?

१४ कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन न करण्याची आज्ञा यहोवाने का दिली आहे हे आता तुमच्या लक्षात आले का? (लेवी. १७:१०) देवाच्या नजरेत रक्त पवित्र का आहे हे तुम्हाला समजले का? त्याचे कारण म्हणजे यहोवाच्या नजरेत रक्त हेच जीवन आहे. (उत्प. ९:४) रक्ताविषयी देवाच्या या दृष्टिकोनाचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे रक्त सेवन न करण्याची आज्ञा आपण पाळली पाहिजे हे तुम्हाला पटते का? जर आपण येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवला आणि रक्ताविषयीचा आपल्या निर्माणकर्त्याचा दृष्टिकोन स्वीकारला, तरच आपण यहोवा देवासोबत एक चांगला नातेसंबंध जोडू शकतो.—कलस्सै. १:१९, २०.

१५ आपल्यापैकी कोणासमोरही अचानक रक्तासंबंधीचा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. किंवा, आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासमोर किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीसमोर असा आणीबाणीचा प्रसंग येऊ शकतो, ज्यात रक्त संक्रमण स्वीकारावे किंवा नाही हा निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशा वेळी रक्ताच्या अंशांचा, तसेच वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर करण्यासंबंधीही निर्णय घ्यावे लागू शकतात. म्हणूनच, असा पेचप्रसंग निर्माण होण्याआधीच या विषयावर संशोधन करून योग्य तयारी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच आपण प्रार्थनादेखील केली पाहिजे. असे केल्यामुळे आपल्याला योग्य निर्णयावर ठाम राहण्यास आणि कोणत्याही प्रकारे तडजोड न करण्यास मदत मिळेल. देवाच्या वचनात ज्या गोष्टीला मनाई करण्यात आली आहे अशी कोणतीही गोष्ट करून आपण यहोवाचे मन नक्कीच खेदित करू इच्छित नाही! अनेक डॉक्टर, तसेच रक्त संक्रमणांचे समर्थक, लोकांना इतरांचा जीव वाचवण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन करतात. पण रक्ताचा वापर कसा केला जावा हे सांगण्याचा अधिकार फक्त निर्माणकर्त्या यहोवालाच आहे असे त्याचे उपासक मानतात. आणि यहोवाच्या नजरेत “कोणत्याही प्रकारचे रक्त” पवित्र आहे. म्हणून, आपण रक्ताविषयी असलेल्या त्याच्या आज्ञेचे पालन करण्याचा दृढनिश्चय केला पाहिजे. तसेच, आपले आचरण शुद्ध ठेवण्याद्वारे, येशूच्या रक्तात जीवन वाचवण्याची ताकद आहे हे आपण ओळखत असल्याचे यहोवाला दाखवतो. तसेच, येशूच्या रक्ताद्वारेच पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन मिळणे शक्य आहे याबद्दल मनापासून कदर असल्याचेही आपण दाखवतो.—योहा. ३:१६.

रक्ताविषयी यहोवाच्या नियमाचे पालन करण्याचा तुम्ही दृढनिश्चय केला आहे का? (परिच्छेद १४, १५ पाहा)

आपण पवित्र असावे अशी अपेक्षा यहोवा का करतो?

१६. यहोवाच्या लोकांनी पवित्र का असले पाहिजे?

१६ इस्राएली लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवताना देवाने त्यांना असे सांगितले: “तुमचा देव होण्यासाठी ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर काढून वर आणले तो मी यहोवा आहे; म्हणून तुम्ही पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.” (लेवी. ११:४५, पं.र.भा.) यहोवा स्वतः पवित्र असल्यामुळे इस्राएली लोकांनीही पवित्र असावे अशी त्याने अपेक्षा केली. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपणदेखील पवित्र असले पाहिजे. लेवीय हे पुस्तक अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला या गोष्टीचे महत्त्व पटवून देते.

१७. बायबलमधील लेवीय या पुस्तकाबद्दल आता तुमचे काय मत आहे?

१७ या लेखात लेवीय पुस्तकातील काही भागांचे परीक्षण केल्यामुळे आपल्याला नक्कीच खूप काही शिकायला मिळाले आहे. या अभ्यासामुळे बायबलमधील या देवप्रेरित पुस्तकाबद्दलची तुमची कदर आणखीनच वाढली असेल यात शंका नाही. तसेच, लेवीय पुस्तकातील या मौल्यवान माहितीवर मनन केल्यामुळे, आपण पवित्र का असले पाहिजे हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास तुम्हाला मदत मिळाली असेल. पण या देवप्रेरित पुस्तकात आध्यात्मिक ज्ञानाची आणखी कोणती मौल्यवान रत्ने दडलेली आहेत? यहोवाची पवित्र सेवा करण्याबद्दल या पुस्तकातून आपण आणखी कोणकोणत्या गोष्टी शिकू शकतो? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील लेखात मिळतील.