तुम्ही “जागृत” राहाल का?
“जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”—मत्त. २५:१३.
१, २. (क) शेवटल्या दिवसांबद्दल येशूनं काय सांगितलं? (ख) आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
जैतुनांच्या डोंगरावर बसलेल्या येशूचं चित्र डोळ्यांपुढे आणा. समोर जेरूसलेमचं मंदिर स्पष्ट दिसत आहे. पेत्र, अंद्रिया, याकोब आणि योहान हे चार प्रेषितही येशूसोबत आहेत. येशू त्यांना भविष्यात होणाऱ्या घटनांविषयी एक रोमांचक भविष्यवाणी सांगत आहे आणि ते त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत आहेत. या दुष्ट जगाच्या शेवटल्या दिवसांत तो स्वर्गात राज्य करत असताना कोणकोणत्या घटना घडतील याविषयी तो त्यांना सांगतो. तसंच, त्या रोमांचक काळात आपण नेमलेला “विश्वासू व बुद्धिमान” दास पृथ्वीवर आपल्या वतीने कार्य करेल; आणि आपल्या अनुयायांना योग्य वेळी आध्यात्मिक अन्न पुरवेल, असंही येशू त्यांना सांगतो.—मत्त. २४:४५-४७.
२ यानंतर येशूनं त्याच भविष्यवाणीत दहा कुमारींचा दाखला दिला. (मत्तय २५:१-१३ वाचा.) या लेखात आपण त्या दाखल्याविषयी पुढील तीन प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: (१) या दाखल्यातून येशूनं खासकरून कोणता महत्त्वाचा सल्ला दिला? (२) दाखल्यातून मिळणाऱ्या सल्ल्याचं अभिषिक्त जनांनी कशा प्रकारे पालन केलं आहे आणि यामुळे कोणता परिणाम घडून येतो? (३) येशूच्या या दाखल्यामुळे आज आपल्यापैकी प्रत्येकाला कोणता फायदा होऊ शकतो?
येशूनं दाखल्यातून कोणता महत्त्वाचा सल्ला दिला?
३. पूर्वी दहा कुमारींच्या दाखल्याबद्दल आपल्या प्रकाशनांत काय सांगण्यात आलं होतं, आणि यामुळे काय घडलं असण्याची शक्यता आहे?
३ याआधीच्या लेखात आपण पाहिलं, की बायबलमधील अहवालांचं स्पष्टीकरण देण्याच्या पद्धतीत विश्वासू दासानं अलीकडच्या काळात थोडा बदल केला आहे. एखाद्या अहवालाचा लाक्षणिक किंवा भविष्यसूचक अर्थ काय असू शकतो याकडे जास्त लक्ष देण्याऐवजी, आता विश्वासू दास जीवनात लागू करता येतील अशा व्यावहारिक धड्यांवर जास्त भर देतो. येशूनं दिलेल्या दहा कुमारींच्या दाखल्याचंच उदाहरण घ्या. या दाखल्यातील दिवे, तेल आणि तेलाची भांडी यांपैकी प्रत्येक गोष्ट विशिष्ट गोष्टीला किंवा व्यक्तीला चित्रित करते, असं पूर्वी आपल्या प्रकाशनांत सांगण्यात आलं होतं. पण, अशा बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे दाखल्यातून मिळणाऱ्या साध्यासोप्या, पण अगदी महत्त्वाच्या धड्याकडे दुर्लक्ष झालं असावं का? या प्रश्नाचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे.
४. (क) दाखल्यातील ‘वर’ कोण आहे हे आपल्याला कशावरून कळतं? (ख) कुमारी कोणाला सूचित करतात हे आपल्याला कशावरून कळतं?
४ या दाखल्यातून येशूनं जो महत्त्वाचा सल्ला दिला त्याकडे आता आपण लक्ष देऊ या. सर्वात आधी दहा कुमारींच्या दाखल्यात ज्या व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे त्यांचा विचार करा. दाखल्यातील ‘वर’ कोण आहे? दाखल्यातील ‘वर’ येशू आहे. आपण असं का म्हणू शकतो? कारण स्वतः येशूनं तो ‘वर’ असल्याचं सांगितलं होतं. (लूक ५:३४, ३५) दाखल्यातील कुमारी कुणाला सूचित करतात? त्या अभिषिक्त जनांनी बनलेल्या ‘लहान कळपाला’ सूचित करतात. हे कशावरून म्हणता येईल? येशूनं दिलेल्या दाखल्यात, ‘वर’ येतो तेव्हा कुमारींनी आपले दिवे पेटवून त्याच्यासाठी तयार असणं गरजेचं होतं. यासंदर्भात, येशूनं त्याच्या अभिषिक्त अनुयायांना काय सांगितलं त्याकडे लक्ष द्या. तो त्यांना म्हणाला: “तुमच्या कंबरा बांधलेल्या व दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकेल तेव्हा . . . तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही व्हा.” (लूक १२:३२, ३५, ३६) तसंच, प्रेषित पौलाने आणि प्रेषित योहानानेही ख्रिस्ताच्या अभिषिक्त अनुयायांची तुलना शुद्ध कुमारींशी केली आहे. (२ करिंथ. ११:२; प्रकटी. १४:४) यावरून स्पष्ट होतं, की मत्तय २५:१-१३ मध्ये देण्यात आलेला सल्ला आणि ताकीद खरंतर येशूच्या अभिषिक्त अनुयायांना उद्देशून आहे.
५. दहा कुमारींचा दाखला कोणत्या काळाला लागू होतो हे आपल्याला येशूच्या शब्दांवरून कसं समजतं?
५ येशूनं दिलेला सल्ला कोणत्या काळाला लागू होतो? दाखल्याच्या शेवटी येशूनं, “वर आला” असं जे म्हटलं, त्यामुळे आपल्याला हे समजण्यास मदत मिळते. (मत्त. २५:१०) “वर आला” हे शब्द केव्हा पूर्ण होतात? १५ जुलै २०१३ च्या टेहळणी बुरूज अंकात आपण शिकलो होतो, की मत्तय २४ आणि २५ या अध्यायांत येशूच्या ‘येण्याविषयी’ आठ वेळा उल्लेख करण्यात आला आहे. येशूनं आपल्या ‘येण्याविषयी’ उल्लेख केला, तेव्हा खरंतर तो मोठ्या संकटादरम्यानच्या त्या काळाबद्दल बोलत होता, जेव्हा तो दुष्ट जगाचा न्याय करून त्याचा नाश करण्यासाठी येईल. त्याअर्थी, येशूनं दिलेला दहा कुमारींचा दाखला शेवटल्या काळाला लागू होतो; पण त्यात येशूच्या ‘येण्याविषयी’ जे म्हटलं आहे ते मोठ्या संकटादरम्यान घडेल.
६. येशूनं या दाखल्यातून खासकरून कोणता महत्त्वाचा सल्ला दिला?
६ या दाखल्यातून येशूनं खासकरून कोणता महत्त्वाचा सल्ला दिला? हे समजून घेण्यासाठी, या अहवालाच्या आधीची आणि नंतरची माहिती लक्षात घ्या. मत्तय २४ मध्ये येशूनं विश्वासू आणि बुद्धिमान दासाविषयी सांगितलं. हा दास शेवटल्या काळात ख्रिस्ताच्या अनुयायांचं नेतृत्व करणारा, अभिषिक्त जनांचा एक लहान गट असणार होता. या अभिषिक्त जनांना येशूनं शेवटपर्यंत विश्वासू राहण्याविषयी ताकीद दिली. पुढच्या अध्यायात येशूनं दहा कुमारींच्या दाखल्याचा उपयोग करून शेवटल्या काळातील त्याच्या सर्व अभिषिक्त अनुयायांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. तो म्हणाला, “जागृत राहा.” स्वर्गीय जीवनाचं प्रतिफळ मिळवण्यासाठी त्यांनी जागृत राहणं अत्यंत महत्त्वाचं होतं. (मत्त. २५:१३) आता आपण या दाखल्याचं परीक्षण करू या आणि अभिषिक्तांनी या सल्ल्याचं कशा प्रकारे पालन केलं आहे ते पाहू या.
अभिषिक्तांनी सल्ल्याचं पालन कशा प्रकारे केलं?
७, ८. (क) शहाण्या कुमारी तयार होत्या असं का म्हणता येईल? (ख) अभिषिक्त जन तयार आहेत असं का म्हणता येईल?
७ दहा कुमारींच्या दाखल्यात, ‘वर’ आला तेव्हा मूर्ख कुमारी त्याचं स्वागत करण्यास तयार नव्हत्या, पण शहाण्या कुमारी मात्र तयार होत्या या गोष्टीवर येशूनं भर दिला. शहाण्या कुमारी चांगली तयारी करून आल्या होत्या आणि सतर्क होत्या. खरंतर, सर्वच कुमारींनी सतर्क राहणं आणि रात्रभर आपले दिवे पेटते ठेवणं गरजेचं होतं. पण, मूर्ख कुमारींनी आपल्यासोबत जास्तीचं तेल आणलं नव्हतं. दुसरीकडे पाहता, पाच शहाण्या कुमारींनी आपल्यासोबत भांड्यांत जास्तीचं तेल आणलं होतं आणि म्हणूनच त्या वराच्या स्वागतासाठी तयार होत्या. तर मग, विश्वासू अभिषिक्त जनांनी येशूच्या येण्याची कशा प्रकारे तयारी केली आहे?
८ आपल्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अगदी शेवटपर्यंत विश्वासूपणे पार पाडण्याचा अभिषिक्त जनांचा संकल्प आहे. देवाची सेवा करण्यासाठी सैतानाच्या या जगातील सुखसोयींचा त्याग करावा लागेल, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आणि त्यांनी या सुखसोयींकडे अगदी आनंदानं पाठ फिरवली आहे. फक्त अंत जवळ आल्यामुळे नव्हे, तर यहोवावर आणि त्याच्या पुत्रावर मनापासून प्रेम असल्यामुळे ते त्याची एकनिष्ठपणे सेवा करू इच्छितात. आपल्या विश्वासांसंबंधी ते कोणतीही तडजोड करत नाहीत. तसंच, जगातल्या धनलोभी, अनैतिक आणि स्वार्थी मनोवृत्तीचा ते स्वतःवर परिणाम होऊ देत नाहीत. दाखल्यातील शहाण्या कुमारींनी ज्याप्रमाणे आपले दिवे पेटते ठेवले, त्याचप्रमाणे अभिषिक्त जनसुद्धा आज आध्यात्मिक रीत्या ज्योतींसारखे चमकत आहेत; ‘वर’ येण्यास उशीर लागत आहे असं वाटलं तरीसुद्धा ते त्याच्या येण्याची धीरानं वाट पाहत आहेत.—फिलिप्पै. २:१५.
९. (क) येशूनं झोपी जाण्याविषयी कोणता इशारा दिला? (ख) “पाहा, वर आला आहे!” या हाकेला अभिषिक्त जनांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिला? (तळटीपदेखील पाहा.)
९ ‘वर’ आला तेव्हा शहाण्या कुमारी तयार होत्या याचं आणखी एक कारण म्हणजे त्या सतर्क होत्या. पण, दाखल्यात असं सांगण्यात आलं आहे, की ‘वर’ येण्यास उशीर लागत आहे असं वाटल्यानं सर्वच कुमारींना “डुलक्या आल्या व झोप लागली.” तर मग, आज अभिषिक्त जनसुद्धा ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत असताना लक्ष विचलित होऊन झोपी जाऊ शकतात का? हो, असं घडू शकतं. येशूला या गोष्टीची कल्पना होती, की एखादी व्यक्ती त्याच्या येण्याची प्रामाणिकपणे व उत्सुकतेनं वाट पाहत असली, तरीसुद्धा ती आध्यात्मिक रीत्या कमजोर आणि विचलित होऊ शकते. हे ओळखून विश्वासू अभिषिक्त जनांनी जागृत राहण्याचा आणखीनच प्रयत्न केला आहे. असं का म्हणता येईल? दाखल्यात, “पाहा, वर आला आहे!” अशी हाक आली तेव्हा खरंतर सर्वच कुमारी उठून आपले दिवे नीट करू लागल्या. पण, फक्त शहाण्या कुमारी सतर्क असल्यामुळे त्या ‘वर’ येईपर्यंत त्याची वाट पाहू शकल्या. (मत्त. २५:५, ६; २६:४१) त्याच प्रकारे, शेवटल्या काळात विश्वासू अभिषिक्त जनांनी, “पाहा, वर आला आहे!” या हाकेला प्रतिसाद दिला आहे. येशू लवकरच येणार आहे हे दाखवणाऱ्या सबळ पुराव्यांकडे त्यांनी लक्ष दिलं आहे आणि ते सतर्क राहून त्याच्या येण्याची वाट पाहत आहेत. * आता आपण येशूच्या या दाखल्याच्या शेवटच्या भागावर विचार करू या. हा भाग एका विशिष्ट कालावधीकडे आपलं लक्ष वेधतो.
शहाण्यांना प्रतिफळ, तर मूर्खांना शिक्षा
१०. शहाण्या व मूर्ख कुमारींमध्ये होणाऱ्या संभाषणाबद्दल कोणता प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो?
१० दाखल्याच्या शेवटल्या भागात, मूर्ख कुमारी आपल्या दिव्यांसाठी शहाण्या कुमारींकडे तेल मागतात. शहाण्या कुमारी त्यांना मदत करण्यास नकार देतात. (मत्तय २५:८, ९ वाचा.) पण, आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो, की अभिषिक्त ख्रिश्चनांनी कधी मदतीची गरज असलेल्यांना साहाय्य करण्यास नकार दिला आहे का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा दाखला कोणत्या काळाला लागू होतो हे लक्षात घ्या. मोठ्या संकटाचा शेवट जवळ येतो त्या वेळी ‘वर’ अर्थात येशू येतो. त्यामुळे, मूर्ख व शहाण्या कुमारींमधलं हे संभाषण मोठं संकट संपण्याच्या अगदी थोड्या काळाआधी घडतं. असं आपण का म्हणू शकतो? कारण, तोपर्यंत अभिषिक्तांवर शेवटला शिक्का मारण्यात आलेला असेल.
११. (क) मोठ्या संकटाची सुरवात होण्याच्या अगदी थोड्या काळाआधी काय घडेल? (ख) शहाण्या कुमारी मूर्ख कुमारींना तेल विकत घेण्यास सांगतात याचा खरंतर काय अर्थ होतो?
११ तर मग, मोठं संकट सुरू होण्याआधी, पृथ्वीवर असलेल्या सर्व विश्वासू अभिषिक्त जनांवर शेवटला शिक्का मारण्यात आलेला असेल. (प्रकटी. ७:१-४) त्या वेळेपासून त्यांची स्वर्गीय आशा अगदी निश्चित असेल. पण, मोठ्या संकटाची सुरवात होण्याआधीच्या काही वर्षांचा विचार करा. अभिषिक्त जनांपैकी जे जागृत राहिले नाहीत आणि अविश्वासू ठरले त्यांचं काय होईल? त्यांच्यावर शेवटला शिक्का मारला जाणार नाही. आणि तोपर्यंत, त्यांच्याऐवजी इतर विश्वासू ख्रिश्चनांना अभिषिक्त करण्यात आलेलं असेल. मोठ्या बाबेलच्या नाशानं मोठ्या संकटाची सुरवात होईल तेव्हा मूर्ख कुमारींसारख्या असणाऱ्या अभिषिक्तांना धक्का बसेल. कदाचित त्याच वेळी त्यांना याची जाणीव होईल की येशूच्या येण्याची वेळ आली आहे, आणि आपण त्यासाठी तयार नाही. पण, त्या वेळी त्यांनी मदत मागितल्यास काय होईल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दाखल्यात सापडतं. शहाण्या कुमारी मूर्ख कुमारींना आपल्याजवळचं तेल देण्यास नकार देतात. उलट, त्यांनी तेल विकणाऱ्यांकडे जाऊन ते विकत घ्यावं असं त्या त्यांना सांगतात. हे सर्व “मध्यरात्री” घडत असल्यामुळे साहजिकच त्यांना तेल विकण्यासाठी कोणीही नसतं. दुसऱ्या शब्दांत, वेळ निघून गेलेली असते!
१२. (क) अविश्वासू ठरलेल्या अभिषिक्त जनांनी मोठ्या संकटादरम्यान मदत मागितल्यास काय होईल? (ख) मूर्ख कुमारींसारख्या असणाऱ्या अभिषिक्तांना कोणत्या परिणामाला तोंड द्यावं लागेल?
१२ मोठ्या संकटादरम्यान विश्वासू अभिषिक्त जन, अविश्वासू ठरलेल्यांना मदत करू शकणार नाहीत. कारण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मग, त्या अविश्वासू जनांचं काय होईल? मूर्ख कुमारी तेल विकत घ्यायला निघून गेल्यावर काय घडलं याकडे लक्ष द्या: “वर आला; तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.” (मत्त. २४:३१; २५:१०; योहा. १४:१-३; १ थेस्सलनी. ४:१७) अविश्वासू ठरलेल्यांना येशू आपल्यासोबत घेणार नाही. कदाचित त्या वेळी मूर्ख कुमारींप्रमाणे तेही म्हणतील: “प्रभुजी, आम्हासाठी दार उघडा.” पण, येशू त्यांना काय उत्तर देईल? शेरडांप्रमाणे असलेल्या अनेकांना तो जे उत्तर देईल, तेच उत्तर तो त्यांनाही देईल: “मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही.” खरोखर, ही किती दुःखाची गोष्ट असेल!—मत्त. ७:२१-२३; २५:११, १२.
१३. (क) अभिषिक्तांपैकी अनेक जण अविश्वासू ठरतील असा निष्कर्ष काढण्याची गरज का नाही? (ख) या दाखल्यावरून येशूला अभिषिक्त जनांबद्दल भरवसा आहे असं का म्हणता येईल? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१३ दाखल्यात पाच कुमारी शहाण्या तर पाच मूर्ख होत्या, यावरून अभिषिक्तांपैकी अनेक जण अविश्वासू मत्तय २४ या अध्यायात वाचल्याप्रमाणे, येशूनं विश्वासू व बुद्धिमान दासाला ताकीद दिली होती, की त्यानं दुष्ट दासासारखं होऊ नये. पण, ही गोष्ट घडेलच असं येशू तिथं सुचवत नव्हता. त्याच प्रकारे, दहा कुमारींच्या दाखल्यातून खरंतर येशूनं एक धोक्याचा इशारा दिला. दाखल्यातील पाच कुमारी मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. त्याचप्रमाणे, येशूच्या येण्यासाठी तयार व सतर्क राहण्याच्या बाबतीत निवड करण्याची संधी प्रत्येकाजवळ आहे. नाहीतर, तो किंवा ती मूर्ख व अविश्वासू ठरू शकते. पौलानंही आपल्या अभिषिक्त भावांना व बहिणींना अशाच प्रकारची ताकीद दिली होती. (इब्री लोकांस ६:४-९ वाचा; अनुवाद ३०:१९ पडताळून पाहा.) त्यानं अगदी स्पष्ट शब्दांत ताकीद दिली असली, तरी त्या बांधवांना त्यांचं स्वर्गीय प्रतिफळ मिळेल याची खात्रीही त्याला होती. त्याचप्रमाणे, दहा कुमारींच्या दाखल्यातून जरी येशू ताकीद देत असला, तरी त्यालाही अभिषिक्तांबद्दल अशीच खात्री असल्याचं दिसून येतं. त्याच्या अभिषिक्त सेवकांपैकी प्रत्येकाला विश्वासू राहून स्वर्गीय जीवनाचं अद्भुत प्रतिफळ मिळवणं शक्य आहे याची त्याला जाणीव आहे.
ठरतील असं येशू सुचवत होता का? नाही. आपणख्रिस्ताच्या ‘दुसऱ्या मेंढरांना’ कोणता फायदा होऊ शकतो?
१४. दहा कुमारींच्या दाखल्यातून ‘दुसऱ्या मेंढरांनाही’ कसा फायदा होऊ शकतो?
१४ येशूचा हा दाखला खरंतर अभिषिक्त जनांना उद्देशून होता. पण, या दाखल्यापासून ‘दुसऱ्या मेंढरांनाही’ काही फायदा होऊ शकतो का? (योहा. १०:१६) हो, निश्चितच! या दाखल्यातून येशूनं दिलेला सल्ला अगदी साधा व स्पष्ट आहे: “जागृत राहा.” एकदा येशूनं असं म्हटलं होतं: “जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.” (मार्क १३:३७) त्याअर्थी, येशू आपल्या सर्वच शिष्यांना तयार व जागृत राहण्याची आज्ञा देतो. आणि या बाबतीत सर्व ख्रिस्ती, अभिषिक्त जनांच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. अभिषिक्त जनांप्रमाणेच, त्यांनीदेखील ख्रिस्ती सेवाकार्याला आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. मूर्ख कुमारींनी शहाण्या कुमारींना तेल मागितलं पण त्यांना ते देण्यात आलं नाही. यावरून आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण होते. ती म्हणजे, देवाला विश्वासू राहण्याची, आध्यात्मिक रीत्या तयार असण्याची आणि जागृत राहण्याची आपल्यापैकी प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. दुसरं कुणीही आपल्यासाठी हे करू शकत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला, नीतिमानपणे न्याय करणारा न्यायाधीश येशू ख्रिस्त याला जाब द्यायचा आहे. आणि तो न्याय करण्यासाठी लवकरच येणार आहे. त्यामुळे, आपण सर्वांनी तयार असणं किती महत्त्वाचं आहे!
इतर कुणीही आपल्यासाठी जागृत किंवा विश्वासू राहू शकत नाही
१५. यहोवाच्या खऱ्या उपासकांना ख्रिस्त व त्याच्या वधूच्या लग्नाची उत्कंठा का लागून आहे?
१५ येशूच्या दाखल्यात उल्लेख केलेल्या लग्नाबद्दल यहोवाच्या सर्वच खऱ्या उपासकांना उत्कंठा लागून आहे. भविष्यात, हर्मगिदोनाची लढाई झाल्यानंतर अभिषिक्त जन ख्रिस्ताची वधू बनतील. (प्रकटी. १९:७-९) तेव्हा, स्वर्गात होणाऱ्या त्या लग्नामुळे पृथ्वीवर असलेल्या सर्वांना अनेक आशीर्वाद मिळतील. असं आपण का म्हणू शकतो? कारण या लग्नामुळे ख्रिस्त व त्याची वधू यांचं मिळून बनलेलं एक परिपूर्ण सरकार सर्व मानवांवर राज्य करेल. तेव्हा, आपली आशा स्वर्गातील जीवनाची असो किंवा पृथ्वीवरील; आपण सर्व जण तयार असण्याचा आणि जागृत राहण्याचा निश्चय करू या. असं केल्यामुळे, यहोवानं आपल्यासाठी तयार केलेलं अद्भुत जीवन उपभोगण्याची संधी आपल्याला मिळेल!
^ परि. 9 दाखल्यात, “पाहा, वर आला आहे!” अशी हाक येते (६ वं वचन) तेव्हापासून प्रत्यक्ष ‘वर’ येतो (१० वं वचन) तोपर्यंत मध्ये काही काळ जातो. अभिषिक्त जनांनी शेवटल्या काळाची सुरवात झाली तेव्हापासूनच जागृत राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी येशूच्या उपस्थितीचं चिन्ह ओळखलं आहे. त्यामुळे, देवाच्या राज्याचा राजा या नात्यानं तो आज स्वर्गात राज्य करत आहे याचीही त्यांना जाणीव आहे. तरीसुद्धा, तो प्रत्यक्ष येईपर्यंत त्यांनी जागरूक राहणं अतिशय महत्त्वाचं आहे.