समाधानदायी मातृत्त्व
समाधानदायी मातृत्त्व
आज सबंध जगात बहुसंख्य स्त्रिया घराबाहेर काम करू लागल्या आहेत. औद्योगीकरण झालेल्या राष्ट्रांत नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच आहे. विकसनशील देशांतही बऱ्याच स्त्रिया आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी कित्येक तास शेतांत राबतात.
एकीकडे कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करण्याशिवाय पर्याय नसतो आणि दुसरीकडे कुटुंबाची व घरादाराची देखभाल करण्याचीही ओढ असते, अशा परिस्थितीत बऱ्याच स्त्रियांची अक्षरशः ओढाताण होते. कुटुंबाला अन्न, वस्त्र व निवारा पुरवण्यासाठी पैसा कमावून आणण्यासोबतच स्वयंपाक करणे, कपडे धुणे व घर स्वच्छ ठेवणे ही कामेही या स्त्रियांना करावी लागतात.
याव्यतिरिक्त यहोवाची सेवा करणाऱ्या आईवर आणखी एक जबाबदारी असते. ती म्हणजे आपल्या मुलांना देवासोबत एक चांगला नातेसंबंध जोडण्यास मदत करणे. दोन लहान मुलींची आई क्रिस्टीना म्हणते: “प्रामाणिकपणे सांगायचं तर, नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणं अतिशय कठीण आहे. त्यातल्या त्यात मुलं लहान असल्यास हे आणखीनच कठीण होऊन बसतं. कधीकधी इच्छा असूनही मुलांसोबत हवा तितका वेळ घालवता येत नाही.”
पण आईला नोकरी करण्यासाठी घराबाहेर का पडावे लागते? तिच्यापुढे कोणकोणती आव्हाने येतात? आणि नोकरी-व्यवसाय केल्यानेच तिचे जीवन सार्थक होते का?
आईला काम का करावे लागते?
बऱ्याच मातांना पूर्ण वेळेची नोकरी करणे भागच असते. काही स्त्रियांना नवऱ्याचा आधार नसल्यामुळे एकटीलाच कुटुंबाचा गाडा ओढावा लागतो. तर काही कुटुंबांत, फक्त नवऱ्याच्या पगारात घरचा खर्च भागत नाही.
अर्थात, सगळ्याच स्त्रिया आर्थिक गरजेपोटी पूर्णवेळेची नोकरी करत नाहीत. बऱ्याच जणी आपला स्वाभिमान उंचावण्यासाठी घराबाहेर पडून नोकरी करतात. काही जणी मनाप्रमाणे खर्च करण्याचे स्वातंत्र्य मिळावे या इच्छेने किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करता याव्यात म्हणून नोकरी करतात. बऱ्याच स्त्रिया आपापल्या व्यवसायात यशस्वी आणि समाधानी आहेत.
काही माता चारचौघांत आपले हसू होऊ नये म्हणून इच्छा नसताना नोकरी करण्याचा निर्णय घेतात. नोकरी करणाऱ्या मातांना तारेवरची कसरत करावी लागते; घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांची सतत दमछाक होते हे बरेच जण कबूल करत असले तरी, ज्या स्त्रिया नोकरी न करण्याचा निर्णय घेतात त्यांना सहसा नावे ठेवली जातात. कधीकधी त्यांची टिंगलही केली जाते.
एका स्त्रीने याविषयी असे म्हटले: “मी ‘घरीच असते,’ नोकरी का करत नाही याचं कारण इतरांना समजावून सांगणं कधीकधी फार कठीण जातं. जणू नोकरी केली नाही तर तुमचं जीवन व्यर्थ आहे असं काही जण त्यांच्या बोलण्यातून किंवा निदान त्यांच्या हावभावांतून तरी सुचवतात.” दोन वर्षांच्या मुलीची आई रिबेका म्हणते: “आपल्या समाजात मुलांचं संगोपन करणं ही आईची जबाबदारी आहे हे कबूल केलं जात असलं तरी, ज्या स्त्रिया नोकरी करत नाहीत त्यांना समाजात खालचा दर्जा दिला जातो असं मला वाटतं.”गैरसमज विरुद्ध वस्तुस्थिती
जगातील काही भागांत, प्रसार माध्यमांनी “आदर्श स्त्रीचे” एक वेगळेच चित्र रेखाटले आहे. ही स्त्री आपण निवडलेल्या व्यवसायात यशस्वी असते, तिला लठ्ठ पगार मिळतो, तिचा पेहराव, हेअरस्टाईल सगळे अतिशय आकर्षक असते आणि तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा आत्मविश्वास असतो. कामावरून घरी परत आल्यावरही तिचा उत्साह कायम असतो. मुलांच्या समस्या सोडवणे असो, पतीच्या चुका सुधारणे असो किंवा कोणताही घरगुती पेचप्रसंग सोडवणे असो, सर्व काही ती अगदी चुटकीसरशी करते. पण, वास्तविक जीवनात फार कमी स्त्रियांना अशी “आदर्श स्त्री” होणे जमते.
वास्तवात, स्त्रिया करत असलेल्या बऱ्याच नोकऱ्या अतिशय नीरस आणि कमी पगाराच्या असतात. आपल्या नैसर्गिक कौशल्यांचे चीज होईल अशी अपेक्षा करून व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या बऱ्याच स्त्रियांच्या पदरी निराशाच पडते कारण त्यांच्या नोकरीत या कौशल्यांचा उपयोग करण्याची त्यांना तितकी संधी मिळत नाही. सोशल सायकॉलॉजी हे पुस्तक असे म्हणते: “स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या आहेत हे खरे असले तरी, चांगल्या पगाराच्या आणि जास्त प्रतिष्ठेच्या पदांवर अजूनही पुरुषच असल्याचे दिसून येते. त्यामुळे ज्या स्त्रिया नोकरी करून आपला स्वाभिमान उंचावण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकरता ‘स्त्री असणे’ हे यश मिळवण्याच्या मार्गात एक अडथळा ठरते.” स्पॅनिश वृत्तपत्र एल पाईस यात असे म्हणण्यात आले: “पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया ताणतणावांमुळे निर्माण होणाऱ्या चिंतेने ग्रस्त होण्याची शक्यता तीनपट जास्त आहे कारण बहुतेक स्त्रिया एकाच वेळी जणू दोन नोकऱ्या सांभाळत असतात, एक बाहेर आणि एक घरी.”
पती कशा प्रकारे मदत करू शकतात?
यहोवाची सेवा करणाऱ्या आईने नोकरी करावी किंवा नाही हा अर्थातच एक वैयक्तिक निर्णय आहे. तरीपण, तिने आपल्या पतीसोबत मिळून या विषयावर चर्चा केल्यानंतर आणि सर्व संबंधित बाबींचा विचार केल्यानंतरच हा निर्णय घ्यावा.—नीतिसूत्रे १४:१५.
पण आर्थिक गरजेपोटी दोघांनाही नोकरी करावी लागेल असे एखाद्या जोडप्याला वाटत असेल तर? अशा परिस्थितीत, कोणताही सुजाण पती बायबलच्या या सल्ल्याकडे विशेष लक्ष देईल: “पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींबरोबर समंजसपणाने राहा. त्या जरी अबला असल्या तरी त्या देवाच्या कृपेमध्ये तुमच्याबरोबरच वारस आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याविषयी आदर बाळगा.” (१ पेत्र ३:७, ईझी टू रीड व्हर्शन) पती आपल्या पत्नीची शारीरिक प्रकृती व मनःस्थिती लक्षात घेऊन वागण्याद्वारे तिच्याविषयी आदर दाखवतो. असा पती त्याला जेव्हाही शक्य होईल तेव्हा घरकामांत तिला मदत करेल. येशूप्रमाणे हा पती अगदी साधी कामे देखील करण्यास तयार असेल. ही कामे पुरुषाने करण्याजोगी नाहीत किंवा हलक्या दर्जाची आहेत अशी मनोवृत्ती तो बाळगणार नाही. (योहान १३:१२-१५) उलट, आपल्या कष्टाळू पत्नीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची संधी समजून तो ही कामे करेल. त्याच्या या मदतीची ती मनापासून कदर करेल यात शंका नाही.—इफिसकर ५:२५, २८, २९.
दोघांनाही नोकरी करावीच लागते अशा कुटुंबांत, पतीने पत्नीला घरकामांत मदत केलीच पाहिजे. एबीसी या स्पेनमधील दैनिकात प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तातून ही गोष्ट स्पष्ट होते. इंस्टिट्यूट ऑफ फॅमिली मॅटर्स या संस्थेने केलेल्या एका अभ्यासाच्या निष्कर्षांविषयी या वृत्तात असे म्हणण्यात आले की स्पेनमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढण्याचे कारण फक्त “धार्मिक व नैतिक मूल्यांचा ऱ्हास” हे एकच नसून “नोकरीव्यवसायाच्या क्षेत्रात स्त्रियांचा प्रवेश आणि पुरुषांनी घरकामांत स्त्रियांना मदत न करणे” ही कारणे देखील त्याकरता तितकीच जबाबदार आहेत.
आईची भूमिका महत्त्वाची
मुलांना वळण लावण्याची जबाबदारी यहोवाने प्रामुख्याने पित्यावर सोपवली असली तरी, विशेषतः बाळपणात मुलांवर संस्कार करण्याची महत्त्वाची जबाबदारी आईवर असल्याचे त्या जाणतात. (नीतिसूत्रे १:८; इफिसकर ६:४) यहोवाने इस्राएल लोकांतील माता व पिता दोघांनाही संबोधून त्यांना अशी आज्ञा दिली की त्यांनी त्याचे नियमशास्त्र आपापल्या मुलांच्या मनावर बिंबवावे. मुलांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत तरी, आईवडिलांना अतिशय धीराने व सहनशीलतेने त्यांना वळण लावावे लागेल हे यहोवाला माहीत होते. म्हणूनच, घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता मुलांना शिक्षण द्यावे असे त्याने आईवडिलांना सांगितले.—अनुवाद ६:४-७.
देवाचे वचन मुलांना अशी आज्ञा देते: “आपल्या आईचा नियम सोडू नको.” (नीतिसूत्रे ६:२०, पं.र.भा.) असे म्हणून बायबल, आईच्या महत्त्वपूर्ण व आदरणीय भूमिकेवर भर देते. अर्थात, मुलांकरता कोणतेही नियम बनवण्याआधी विवाहित स्त्री नक्कीच आपल्या पतीचा सल्ला घेईल. तरीपण मुद्दा असा, की या वचनात म्हटल्याप्रमाणे आईलाही मुलांकरता नियम बनवण्याचा हक्क आहे. आणि आपल्या देवभीरू आईने शिकवलेल्या आध्यात्मिक व नैतिक नियमांचे मनापासून पालन केल्यास मुलांना नक्कीच जीवनात फायदा होईल. (नीतिसूत्रे ६:२१, २२) दोन लहान मुलांची आई टेरेसा, नोकरी करत नाही. याचे कारण सांगताना ती म्हणते: “माझ्या मुलांनी देवाची सेवा करावी म्हणून त्यांच्यावर योग्य संस्कार करणं हेच माझ्या मते सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि मला ते अगदी चांगल्या प्रकारे करायचं आहे.”
उल्लेखनीय ठरलेल्या माता
इस्राएलचा राजा लमुएल याला त्याच्या आईच्या मनस्वी प्रयत्नांमुळे नक्कीच फायदा झाला. तिने त्याला “शिकविलेली देववाणी” देवाच्या प्रेरित वचनात समाविष्ट करण्यात आली आहे. (नीतिसूत्रे ३१:१; २ तीमथ्य ३:१६) लमुएलाच्या आईने सद्गुणी स्त्रीचे जे वर्णन केले होते ते आजही अनेक तरुणांना विवाह जोडीदाराची निवड करताना योग्य निर्णय घेण्यास मदत करते. तसेच, अनैतिकता आणि दारूडेपणाविषयी तिने ज्या सूचना दिल्या होत्या त्या आजही तितक्याच उपयोगी आहेत.—नीतिसूत्रे ३१:३-५, १०-३१.
पहिल्या शतकात, युनीके नावाच्या एका आईने आपला मुलगा तीमथ्य याच्यावर केलेल्या उत्तम संस्कारांची प्रेषित पौलाने प्रशंसा केली. युनीकेचा पती यहोवाचा उपासक नव्हता. कदाचित तो ग्रीक देवतांची पूजा करत असावा. त्यामुळे, तीमथ्याने ‘पवित्र शास्त्रावर’ विश्वास ठेवावा म्हणून युनीकेला त्यातील शिकवणी तीमथ्याला पटवून सांगाव्या लागल्या असतील. तिने तीमथ्याला शास्त्रवचनांतून शिकवण्यास केव्हा सुरुवात केली? बायबलमधील प्रेरित अहवाल आपल्याला सांगतो की तिने त्याला “बालपणापासूनच” म्हणजे तीमथ्य तान्हे बाळ होता, तेव्हापासूनच शिकवण्यास सुरुवात केली. (२ तीमथ्य १:५; ३:१४, १५) तिच्या शिकवणीसोबतच तिचा स्वतःचा विश्वास आणि उदाहरणही अतिशय प्रभावी होते. हे उत्तम बाळकडू मिळाल्यामुळेच तीमथ्य भविष्यात मिशनरी सेवा करण्याकरता योग्य बनला.—फिलिप्पैकर २:१९-२२.
देवाच्या विश्वासू सेवकांचा पाहुणचार करणाऱ्या मातांचाही बायबलमध्ये उल्लेख आढळतो. त्यांच्या आतिथ्यशील वृत्तीमुळे त्यांच्या मुलांना, जीवनात उत्तम आदर्श ठरू शकतील अशा व्यक्तींसोबत सहवास करण्याची संधी मिळाली. उदाहरणार्थ, शुनेम येथे राहणारी एक स्त्री संदेष्टा अलीशा याला नेहमी आपल्या घरी राहण्याचा आग्रह करत असे. नंतर, तिच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा अलीशाने त्याचे पुनरुत्थान केले. (२ राजे ४:८-१०, ३२-३७) बायबलचा एक लेखक मार्क याची आई मरीया हिचेही उदाहरण पाहा. पहिल्या शतकातील शिष्यांना प्रार्थनेसाठी एकत्र जमण्याकरता तिने जेरूसलेममधील आपल्या घराचा वापर करण्याची परवानगी दिली होती. (प्रेषितांची कृत्ये १२:१२) आपल्या घरी नेहमी येणाऱ्या प्रेषितांच्या व इतर ख्रिस्ती बांधवांच्या सहवासाचा मार्कला नक्कीच फायदा झाला असेल.
तात्पर्य असे, की आपल्या मुलांच्या मनात यहोवाचे विचार रुजवण्यास प्रयत्नशील असलेल्या विश्वासू स्त्रियांची तो मनापासून कदर करतो. या स्त्रियांच्या सात्विक वृत्तीमुळे आणि आपल्या घरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे यहोवाला त्या प्रिय वाटतात.—२ शमुवेल २२:२६; नीतिसूत्रे १४:१.
सर्वात समाधानदायक निवड करणे
कुटुंबाची शारीरिक, आध्यात्मिक व भावनिक दृष्टीने चांगली काळजी घेतल्यामुळे अनेक आशीर्वाद मिळतात हे आपण आताच पाहिलेल्या बायबलमधील उदाहरणांवरून स्पष्ट होते. पण असे करणे नेहमीच सोपे नसते. किंबहुना, आईचे काम हे कधीकधी एखाद्या मोठ्या कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कामापेक्षाही जास्त मेहनतीचे व कौशल्याचे असू शकते.
आपल्या पतीचा सल्ला घेतल्यावर जर एखाद्या आईने नोकरी सोडून द्यायचे किंवा अर्धवेळेची नोकरी करायचे ठरवले तर तिच्या कुटुंबाला कदाचित साध्या राहणीमानाची सवय करून घ्यावी लागेल. काही जण तिच्या या निर्णयाबद्दल
तिची थट्टाही करतील. पण कोणतेही त्याग करावे लागले तरी असा निर्णय घेतल्यामुळे त्यांना अनेक आशीर्वाद मिळतील हे नक्की. पॉकी नावाच्या एका स्त्रीला तीन मुले आहेत आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे तिला अर्धवेळेची नोकरी करावी लागते. ती म्हणते: “मुलं शाळेतून परत येतात तेव्हा त्यांच्याशी बोलायला आपण घरी असावं असं मला वाटतं.” तिच्या मुलांना यामुळे कसा फायदा होतो? ती सांगते, “मी त्यांना गृहपाठ करायला आणि काही अडचणी आल्यास त्या सोडवायला लगेच मदत करू शकते. दररोज मुलांसोबत वेळ घालवल्यामुळे ते जास्त मोकळेपणानं आपले विचार व्यक्त करतात. मला माझ्या मुलांसोबतचा हा वेळ इतका महत्त्वाचा वाटतो की पूर्णवेळेच्या नोकरीची ऑफर मिळूनही मी ती स्वीकारली नाही.”बऱ्याच मातांना हे आढळले आहे, की त्यांनी नोकरी सोडून दिली किंवा अर्धवेळेची नोकरी स्वीकारली तेव्हा कुटुंबातील सर्वांनाच यामुळे फायदा झाला. क्रिस्टीना, जिचा आधी उल्लेख करण्यात आला आहे, ती सांगते, “मी नोकरी सोडल्यानंतर आमच्या कुटुंबात सर्वकाही पूर्वीपेक्षा जास्त सुरळीत झालंय असं मला वाटू लागलं. आता मुलांशी बोलायला तसंच माझ्या पतीला लहानमोठ्या कामांत मदत करायला माझ्याजवळ भरपूर वेळ होता. मुलींना शिकवणं आणि त्यांची हळूहळू प्रगती होताना पाहणं अतिशय आनंददायक होतं.” एक घटना क्रिस्टीनाला नेहमी आठवणीत राहील. ती सांगते, “माझी मोठी मुलगी पाळणाघरातच चालायला शिकली. पण माझ्या दुसऱ्या मुलीला मी स्वतः चालायला शिकवलं. ती पहिल्यांदा दुडुदुडु पावलं टाकत मला येऊन बिलगली तो क्षण मी कधीच विसरणार नाही. त्याक्षणी मला जे समाधान मिळालं त्याचं मला वर्णन करता येणार नाही.”
आणखी एक लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की आईने नोकरी सोडली किंवा अर्धवेळेची नोकरी स्वीकारली तर आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खूपच तंग होईल असे काहींना वाटत असते. पण मुळात तसे घडत नाही. क्रिस्टीना सांगते, “माझा अर्धाअधिक पगार पाळणाघराच्या आणि येण्याजाण्याच्या खर्चातच जात होता. आम्ही नीट विचार करून पाहिला, तेव्हा माझ्या पगारामुळे फारसा आर्थिक हातभार लागतच नव्हता असं आमच्या लक्षात आलं.”
पत्नीने घरी राहून कुटुंबाच्या देखभालीकरता पूर्ण वेळ दिल्याने किती फायदे होतात हे लक्षात घेतल्यानंतर बरीच जोडपी, यामुळे थोडेफार आर्थिक नुकसान झाले तरी ते झेलण्यास तयार होतात. क्रिस्टीनाचा पती पॉल म्हणतो, “माझी पत्नी घरी राहून आमच्या दोन मुलींची काळजी घेते याचा मला खूप आनंद वाटतो. ती नोकरीसाठी बाहेर जायची तेव्हा तिच्यावर आणि माझ्यावरही खूप ताण येत होता.” या निर्णयाचा त्यांच्या दोन मुलींवर काय परिणाम झाला? पॉल म्हणतो, “त्यांना स्वतःला तर आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित वाटतंच, पण आम्हालाही वाटतं की या कोवळ्या वयात बऱ्याच वाईट प्रभावांपासून त्यांचं रक्षण होतंय.” आपल्या मुलींना जास्तीतजास्त वेळ देणे या जोडप्याला महत्त्वाचे का वाटते? पॉल उत्तर देतो: “माझं नेहमीच असं मत राहिलं आहे, की पालक या नात्यानं जर आपण आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला नाही तर दुसरं कोणीतरी देईल.”
साहजिकच प्रत्येक जोडप्याला स्वतःच्या परिस्थितीचे परीक्षण करावे लागेल. आणि याबाबतीत कोणीही इतरांच्या निर्णयाची टीका करू नये. (रोमकर १४:४; १ थेस्सलनीकाकर ४:११) तरीसुद्धा, आईने पूर्णवेळेची नोकरी न केल्यास कुटुंबाला किती फायदा होतो यावर प्रत्येक कुटुंबाने विचार करून पाहावा. टेरेसा जिचा याआधी उल्लेख करण्यात आला, ती याबाबतीत आपले मत पुढील शब्दांत मांडते: “आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी शक्य तितका वेळ देण्यातंच खरं समाधान आहे. हे समाधान इतर कशानेही मिळू शकत नाही.”—स्तोत्र १२७:३. (w०८ २/१)
[२१ पानांवरील चित्र]
मुलांना वळण लावण्याच्या कार्यात आईची महत्त्वाची भूमिका आहे