व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला कधी कोणाचा हेवा वाटतो का? योसेफाच्या भावांना वाटला होता

तुम्हाला कधी कोणाचा हेवा वाटतो का? योसेफाच्या भावांना वाटला होता

आपल्या मुलांना शिकवा

तुम्हाला कधी कोणाचा हेवा वाटतो का? योसेफाच्या भावांना वाटला होता

हेवा करणे म्हणजे काय, ते आपण आधी पाहू या. दुसऱ्‍यांनी कधी तुमच्यासमोर एखाद्या व्यक्‍तीला ती खूप चांगली आहे, सुंदर आहे किंवा हुशार आहे असे म्हटले तर तुम्ही लगेच नाराज होता का? *—यालाच म्हणतात हेवा.

घरात, जर आईवडील एकाच मुलाचा जास्त लाड करत असतील तर इतर मुलांमध्ये ही भावना उत्पन्‍न होऊ शकते. बायबलमध्ये एका कुटुंबाची गोष्ट सांगितली आहे. या कुटुंबातील मुलांनी हेवा दाखवल्यामुळे एक खूप मोठी समस्या निर्माण झाली होती. नेमके काय झाले होते आणि जे काही झाले त्यातून आपण काय धडा शिकू शकतो ते आपण पाहुया.

योसेफ हा याकोबाचा ११ वा मुलगा होता. आणि योसेफाच्या सावत्र भावांना त्याचा हेवा वाटायचा. माहीत आहे का?— कारण, त्यांचा बाप याकोब, योसेफाचा जास्त लाड करायचा. याकोबाने योसेफासाठी एक सुंदरसा पट्टेरी झगा बनवला होता; पण दुसऱ्‍यांसाठी त्याने बनवला नव्हता. आणि याकोबाचा योसेफावर जास्त जीव होता कारण तो, “त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता” आणि याकोबाची प्रिय पत्नी राहेल हिचा मोठा मुलगा होता.

‘आपला बाप आपल्यापेक्षा योसेफावर अधिक प्रीति करितो हे पाहून [योसेफाचे सावत्र भाऊ] त्याचा द्वेष करु लागले,’ असे बायबलमध्ये म्हटले आहे. एकदा, योसेफाने त्याला पडलेले स्वप्न घरातल्या सर्वांना सांगितले. घरातले सर्व जण म्हणजे त्याचे वडीलसुद्धा त्याला नमन करत आहेत, असे त्याने स्वप्नात पाहिले. मग काय, बायबल म्हणते, की त्याचे भाऊ “त्याचा अधिकच द्वेष करु लागले.” त्याच्या बापानेही त्याला, तुला अशी कशी स्वप्नं पडतात, म्हणून रागवले.—उत्पत्ति ३७:१-११.

या घटनेनंतर काही काळाने, म्हणजे जेव्हा योसेफ १७ वर्षांचा होता तेव्हा त्याचे भाऊ शेरडे-मेंढरे चारायला खूप दूर गेले होते. ते सर्व ठिकठाक आहात की नाही हे पाहून येण्यासाठी याकोबाने योसेफाला पाठवले. पण, योसेफाला त्याच्या भावांनी पाहिले तेव्हा बहुतेक भावांच्या मनात काय विचार आला माहीत आहे?— त्याला ठार मारण्याचा विचार त्यांच्या मनात आला! पण त्याच्या दोघा भावांनी म्हणजे रऊबेन व यहुदा यांनी त्याला मारायचे नाही असे ठरवले.

तेवढ्यात तिथून काही व्यापारी इजिप्तला चालले होते. यहुदा आपल्या भावांना म्हणाला: ‘आपण त्याला या लोकांना विकून टाकू या.’ आणि त्यांनी त्याला खरेच विकून टाकले. मग त्यांनी एक बकरा कापला आणि त्याच्या रक्‍तात योसेफाचा झगा बुडवला. नंतर मग घरी गेल्यावर त्यांनी तो झगा आपल्या बापाला दाखवला तेव्हा त्यांचा बाप रडत रडत म्हणाला: ‘अरे, त्याला कुठल्यातरी हिंस्र पशूने मारलं असावं!’—उत्पत्ति ३७:१२-३६.

इकडे, योसेफ इजिप्तमध्ये होता तेव्हा इजिप्तच्या राजाला योसेफ आवडू लागला. कारण, तो इजिप्तचा राजा फारो याला पडलेल्या दोन स्वप्नांचा अर्थ देवाच्या मदतीमुळे सांगू शकला. पहिल्या स्वप्नात फारो सात धष्ठपुष्ठ गायी पाहतो आणि त्यानंतर सात हडकुळ्या गायी पाहतो. तर दुसऱ्‍या स्वप्नात, दाण्यांनी भरलेली सात कणसे पाहतो आणि त्यानंतर अगदी वाळून गेलेली सात कणसे पाहतो. योसेफ फारोला सांगतो, की दोन्ही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. सात वर्षे खूप धान्य निघेल पण त्यानंतरची सात वर्षे दुष्काळ असेल. मग फारो योसेफालाच, सात वर्षांच्या सुकाळात भरपूर अन्‍न-धान्य गोळा करून ठेवण्यासाठी नेमतो, म्हणजे दुष्काळाच्या सात वर्षांत त्यांच्याकडे भरपूर धान्य असेल.

मग खरोखरचा दुष्काळ पडला तेव्हा, योसेफाचे घरचे जे खूप दूर राहत होते त्यांनाही खायला अन्‍न नसते. म्हणून मग याकोब योसेफाच्या दहा भावांना अन्‍न-धान्य आणण्यासाठी इजिप्तला पाठवतो. तिथे ते योसेफाच्या समोर येतात पण त्याला ओळखत नाहीत. योसेफ मात्र त्यांना ओळखतो. पण तो त्यांना ओळख दाखवत नाही. तो त्यांची परीक्षा घेतो. आणि परीक्षेनंतर त्याला कळते, की त्याच्या भावांनी त्याला दिलेल्या वाईट वागणुकीचा आता त्यांना पस्तावा होत आहे. मग योसेफ त्यांना, तो कोण आहे हे सांगतो. हे सांगितल्याबरोबर सर्वांच्या डोळ्यांत पाणी येते, ते त्याला आनंदाने घट्ट मिठी मारतात!—उत्पत्ति अध्याय ४० ते ४५.

बायबलमधल्या या गोष्टीवरून आपण हेवा करण्याविषयी काय शिकतो?— हेव्यामुळे खूप वाईट परिणाम होतात. एखाद्या व्यक्‍तीने हेवा दाखवला तर ती तिच्या भावाचे बरे-वाईट करायलाही मागे पुढे पाहत नाही, नाही का? आपण प्रेषितांची कृत्ये ५:१७, १८ आणि ७:५४-५९ ही वचने वाचून पाहुया. तिथे, लोकांना येशूच्या शिष्यांचा हेवा वाटत असल्यामुळे त्यांनी त्यांना काय केले ते सांगितले आहे.— हे वाचल्यावर, आपण इतरांचा हेवा का करू नये हे तुम्हाला समजले का?—

योसेफ ११० वर्षं जगला. त्याला मुलं झाली, नातवंडं, पतवंडं झाली. योसेफाने या सर्वांना, एकमेकांवर प्रेम करायला आणि कुणाचाही हेवा करू नये असे नक्कीच शिकवले असेल.—उत्पत्ति ५०:२२, २३, २६. (w०८ १०/१)

[तळटीप]

^ तुम्ही हा लेख जर आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबायचे आहे आणि तुमच्या मुलाला त्याचे मत व्यक्‍त करण्यास वाव द्यावा.

प्रश्‍न:

○ हेवा करणे म्हणजे काय?

○ हेव्यामुळे योसेफाच्या भावांनी काय केले?

○ योसेफाने आपल्या भावांना क्षमा का केली?

○ योसेफाच्या या गोष्टीवरून आपण काय शिकू शकतो?