व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहातील वचनबद्धता टिकवून ठेवणे

विवाहातील वचनबद्धता टिकवून ठेवणे

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

विवाहातील वचनबद्धता टिकवून ठेवणे

ती: “काही दिवसांपासून मी पाहत होते, की माझा नवरा, मायकल माझ्यापासून दूर चाललाय. तो मुलांबरोबरही व्यवस्थित वागत नव्हता. * आम्ही घरात इंटरनेट कनेक्शन घेतल्यापासूनच तो असं वागू लागला होता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो कंप्युटरवर पोर्नोग्राफी तर पाहत नसावा! एकदा रात्री मुलं झोपल्यावर मी त्याला सरळसरळ विचारलं आणि त्यानं कबूल केलं की तो वेबसाईटवर असलेली पोर्नोग्राफी पाहत होता. माझ्या पायांखालची जमीन सरकल्यासारखं मला वाटलं. माझ्या बाबतीत असं होईल, यावर माझा विश्‍वासच बसेना. त्याच्यावरचा माझा विश्‍वासच उडाला. आणि अलिकडेच, माझ्या ऑफिसातला एक जण माझ्यावर फिदा होऊ लागला होता.”

तो: “काही दिवसांपूर्वी, माझी बायको मारिया हिला आमच्या कंप्युटरवर असलेलं एक चित्र सापडलं आणि तिनं मला त्याच्याविषयी विचारलं. मी वेबसाईटवर असलेली पोर्नोग्राफी पाहत होतो, असं जेव्हा मी कबूल केलं तेव्हा ती रागानं लालबुंद झाली. मला स्वतःची किळस वाटू लागली आणि अपराध्यासारखं वाटू लागलं. आमचा विवाह मोडतोय की काय असं मला वाटू लागलं.”

मायकल आणि मारिया यांच्या वैवाहिक नातेसंबंधाला काय होऊ लागले होते, असे तुम्हाला वाटते? तुम्ही म्हणाल, मायकल पोर्नोग्राफी पाहू लागला होता म्हणून ते एकमेकांपासून दुरावले होते. पण, मायकलला ही सवय लागण्याचे खरे कारण तो विवाह सोबत्याप्रती वचनबद्ध असण्याच्या बाबतीत उणा पडत होता, असे त्याला जाणवले. * मायकल आणि मारिया यांचे लग्न झाले होते तेव्हा, आपण मरेपर्यंत एकमेकांवर प्रेम करू व सर्व काही मिळून करू असा त्यांनी विचार केला होता. पण हळूहळू अनेक जोडप्यांप्रमाणे एकमेकांप्रती त्यांची वचनबद्धता कमी होऊ लागली होती व ते एकमेकांपासून दुरावत होते.

तुमचे लग्न झाले होते तेव्हा जसे तुम्ही एकमेकांच्या जवळ होता तसे आता अनेक वर्षे उलटल्यानंतर नाहीत, असे तुम्हाला वाटत आहे का? तुम्हाला पुन्हा एकदा पूर्वीसारखे व्हायचे आहे का? मग तुम्हाला पुढील तीन प्रश्‍नांची उत्तरे माहीत करून घ्यावी लागतील: वैवाहिक जीवनात वचनबद्ध असण्याचा अर्थ काय होतो? कोणकोणत्या कारणांमुळे विवाहातील वचनबद्धता कमकुवत होऊ शकते? तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याला दाखवत असलेली वचनबद्धता आणखी मजबूत कशी करू शकाल?

वचनबद्ध असणे म्हणजे काय?

पती-पत्नीने एकमेकांशी वचनबद्ध असले पाहिजे, हे तुम्ही कसे समजावून सांगाल? पुष्कळ जण म्हणतील, की पती-पत्नीने जर कर्तव्याची जाणीव बाळगली तर ते एकमेकांशी वचनबद्ध राहतील. जसे की, नवरा-बायको मुलांमुळे एकमेकांशी वचनबद्ध राहतील किंवा विवाहाचा जनक देव याला आपल्याला जाब द्यायचा आहे असे समजून ते वचनबद्ध राहतील. (उत्पत्ति २:२२-२४) एकमेकांशी वचनबद्ध राहण्याकरता असलेली ही कारणे खरोखरच कौतुकास्पद आहेत. शिवाय, असे केल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्‍या वादळांतही ते टिकाव धरू शकतील. पण वैवाहिक जीवनात खरोखर आनंदी राहण्याकरता, एकमेकांबद्दल केवळ कर्तव्याची भावना बाळगणे पुरेसे नाही.

यहोवा देवाचा पुरुषाला व स्त्रीला विवाहाद्वारे एकत्र आणण्याचा हेतू, त्यांनी, मनापासून आनंदी व समाधानी राहावे हा होता. पुरुषाने “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट” राहावे व स्त्रीने आपल्या पतीवर जिवापाड प्रेम करावे आणि तोही तिला आपलेच शरीर समजून तिच्यावर प्रेम करतो या जाणीवेने तिने सुखावून जावे, असा यहोवाचा हेतू होता. (नीतिसूत्रे ५:१८; इफिसकर ५:२८) आणि पती-पत्नीने एकमेकांवर भरवसा ठेवायला शिकल्यावरच त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दलची ही ओढ निर्माण होऊ शकते. तसेच त्यांच्यातील मैत्री त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे. पतीपत्नीला जेव्हा एकमेकांचा भरवसा वाटू लागतो व ते एकमेकांचे सच्चे मित्र बनतात तेव्हा त्यांच्या विवाहातील वचनबद्धता आणखी मजबूत होते. त्यांच्यातील बंधन इतके घनिष्ठ होते, की ते दोन भिन्‍न व्यक्‍ती असूनही बायबलच्या भाषेत जणू “एकदेह” होतात.—मत्तय १९:५.

यास्तव, वचनबद्धतेची तुलना, वाळू, सिमेंट आणि पाणी मिसळून तयार केलेल्या मिश्रणाशी करता येईल. ज्याप्रमाणे हे मिश्रण एका मजबूत घराच्या विटांना एकमेकांशी घट्ट चिकटून ठेवते त्याप्रमाणेच कर्तव्य, भरवसा आणि मैत्री यांच्या मिश्रणाने तयार झालेली वचनबद्धता पती-पत्नीला एकमेकांशी जडून ठेवते. पण कोणकोणत्या कारणांमुळे पतीपत्नीतील हे बंधन कमजोर होऊ शकते?

कमकुवत करणारी कारणे

आपली वचनबद्धता पाळण्याकरता पती व पत्नीला बरेच परिश्रम घ्यावे लागतात, त्याग करावा लागतो. आपल्या सोबत्याला संतुष्ट करण्याकरता तुम्हाला काहीवेळा आपल्या आवडीनिवडींची आहुती द्यावी लागेल. पण आज, स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा दुसऱ्‍याच्या आवडीनिवडींना स्थान देण्याची प्रवृत्ती नाही. उलट, अनेकांना तर अशा आत्म-त्यागी वृत्तीची चीडही येते. ‘मला काय मिळणार मग?’ हीच अनेकांची प्रवृत्ती झाली आहे. पण स्वतःला विचारा: ‘अशा किती स्वार्थी लोकांना मी ओळखतो ज्यांचे वैवाहिक जीवन सुखी आहे?’ फार कमी, किंबहुना नाहीच. का बरे? कारण स्वार्थी व्यक्‍तीला, खासकरून जेव्हा तिच्या त्यागामुळे लगेचच काही फायदा होणार नसतो अशा वेळी, छोटे-मोठे त्याग करावे लागतात तेव्हा ती आपल्या विवाहाशी वचनबद्ध राहत नाही. एखाद्या जोडप्याचे नवीन नवीन लग्न झाल्यावर ते एकमेकांवर कितीही प्रेम करत असले तरीसुद्धा, जर त्यांच्यात वचनबद्धता नसेल तर त्यांच्यातील नातेसंबंध बिघडतीलच.

बायबलमध्ये खूप व्यावहारिक सल्ला देण्यात आला आहे. त्यात असे कबूल करण्यात आले आहे, की विवाह टिकवून ठेवण्याकरता पतीला व पत्नीला खूप परिश्रम घ्यावे लागतात. ते असे म्हणते: “विवाहित पुरूष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे, अशी जगाच्या गोष्टीविषयीची चिंता करितो” आणि “विवाहित [स्त्री] . . . आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करिते.” (१ करिंथकर ७:३३, ३४) दुःखाची गोष्ट म्हणजे, निःस्वार्थ पतीपत्नी सुद्धा सहसा एकमेकांच्या चिंता ओळखत नाहीत किंवा आपल्या सोबत्याने केलेल्या त्यागांची किंमत करत नाहीत. पतीपत्नीने जर एकमेकांची कदर केली नाही तर “संसारात [त्यांना जितक्या] हालअपेष्टा भोगाव्या” लागतात त्याच्यापेक्षा अधिक हालअपेष्टा भोगाव्या लागतील.—१ करिंथकर ७:२८.

जीवनाच्या चढ-उतारांतही तुमचा विवाह टिकून राहावा आणि सुकाळात तो आणखी सुखी व्हावा, अशी तुमची इच्छा असेल तर, आपला हा नातेसंबंध कायमचा नातेसंबंध आहे, असा तुम्ही विचार केला पाहिजे. असा विचार तुम्ही कसा करू शकाल आणि आपल्या विवाह सोबत्यालाही तुमच्याशी वचनबद्ध राहण्यास कसे प्रोत्साहित करू शकाल?

वचनबद्धता मजबूत करणे

पतीपत्नीने सर्वात आधी, देवाचे वचन बायबल यातील सल्ल्याचे नम्रपणे पालन केले पाहिजे. कारण बायबलमधला सल्ला, तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत्यासाठी “हितकारक” आहे. (यशया ४८:१७) तुम्ही दोन व्यावहारिक पावले उचलू शकता.

१. आपल्या विवाहाला प्राधान्य द्या. प्रेषित पौलाने असे लिहिले: “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे.” (फिलिप्पैकर १:१०) पतीपत्नी एकमेकांशी करत असलेला व्यवहार देवाच्या नजरेत महत्त्वाचा आहे. जो पती आपल्या पत्नीचा आदर करतो त्याचा देव आदर करतो. आणि जी स्त्री आपल्या पतीचा आदर करते ती “देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे.”—१ पेत्र ३:१-४, ७.

तुमच्या विवाहाला तुम्ही किती महत्त्व देता? सहसा, ज्या गोष्टीला तुम्ही जास्त महत्त्वाचे समजता त्या गोष्टीकरता तुम्ही जास्त वेळ काढता. स्वतःला विचारा: ‘गेल्या एक महिन्यापासून मी माझ्या बायकोबरोबर/नवऱ्‍याबरोबर किती वेळ घालवला? आपण अजूनही एकमेकांचे पक्के मित्र आहोत, याची तिला/त्याला खात्री देण्यासाठी मी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या आहेत?’ तुम्ही जर तुमच्या सोबत्यासाठी फार कमी वेळ बाजूला ठेवला असेल किंवा कदाचित ठेवलाच नसेल तर, तुमच्या वचनबद्धतेशी तुम्ही एकनिष्ठ आहात, यावर तुमचा विवाह सोबती कदाचित विश्‍वास ठेवणार नाही.

तुमच्या वचनबद्धतेशी तुम्ही एकनिष्ठ आहात असे तुमच्या सोबत्याला वाटते का? हे तुम्हाला कसे कळेल?

हे करून पाहा: एका कागदावर पुढील पाच गोष्टी लिहा: पैसा, नोकरी, विवाह, मनोरंजन आणि मित्र. आता, तुमचा विवाह सोबती कोणत्या गोष्टींना प्रथम स्थान देतो त्या गोष्टी एका पाठोपाठ लिहा. तुमच्याविषयी देखील त्याला/तिला असेच लिहायला सांगा. लिहून पूर्ण झाल्यावर कागदाची अदलाबदल करा. वैवाहिक जीवनात तुम्ही पुरेसा वेळ किंवा शक्‍ती खर्च करत नाही, असे जर तुमच्या सोबत्याला वाटत असेल, तर एकमेकांशी असलेली वचनबद्धता आणखी मजबूत करण्याकरता तुम्हाला कोणकोणते बदल करावे लागतील, यावर चर्चा करा. तसेच स्वतःलाही असे विचारा: ‘माझ्या बायकोला किंवा नवऱ्‍याला आवडणाऱ्‍या गोष्टींमध्ये मीही आवड घेण्यासाठी काय करू शकतो/शकते?’

२. सर्व प्रकारचा अविश्‍वासूपणा टाळा. येशू ख्रिस्ताने म्हटले: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८) विवाहबाह्‍य लैंगिक संबंध ठेवणारी व्यक्‍ती, वैवाहिक एकतेचा जबरदस्त भंग करते, आणि बायबल असेही म्हणते, की यामुळे पतीपत्नीत घटस्फोटही होऊ शकतो. (मत्तय ५:३२) पण येशूच्या वरील शब्दांवरून दिसून येते, की एखाद्याच्या हातून जारकर्मासारखे पाप घडण्याआधी त्याच्या अथवा तिच्या मनात ती चुकीची इच्छा कैक दिवसांपासून घुटमळत असते. या चुकीच्या इच्छेला खतपाणी घालणेच मूळात विश्‍वासघात आहे.

आपल्या वैवाहिक सोबत्याला वचनबद्ध राहण्याकरता पोर्नोग्राफी कधी पाहणार नाही असे स्वतःला वचन द्या. लोक काहीही म्हणत असले तरी, पोन्रोग्राफी ही विवाहात विष कालवते. पोर्नोग्राफी पाहण्याची सवय जडलेल्या एका माणसाची बायको कोणत्या शब्दांत तिच्या भावनांचे वर्णन करते ते पाहा: “पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे आपले कामजीवन आणखी सुखकर होते, असं माझा नवरा म्हणतो. पण मला वाटतं, त्याला माझी काही किंमतच नाहीए. मी त्याच्यासाठी पुरेशी नाहीए. तो पोर्नोग्राफी पाहत असतो त्या रात्री मी रडत रडतच झोपी जाते.” हा मनुष्य त्याच्या विवाहाची वचनबद्धता मजबूत करतोय असे तुम्ही म्हणाल, की तो ती कमकुवत करतोय, असे म्हणाल? आपल्या बायकोला विवाहाशी वचनबद्ध राहायला तो प्रोत्साहन देतोय, असे तुम्हाला वाटते का? तो आपल्या बायकोला आपली सर्वात जवळची मैत्रीण समजतोय का?

ईयोब नावाच्या एका विश्‍वासू माणसाने, “आपल्या डोळ्यांशी करार” करून तो आपल्या विवाहाशी तसेच देवाशी एकनिष्ठ आहे असे बोलून दाखवले. “मी कोणा कुमारीवर नजर” जाऊ देणार नाही, अशी त्याने शपथ घेतली होती. (ईयोब ३१:१) तुम्हीही ईयोबाचे अनुकरण करू शकता का?

पोर्नोग्राफी टाळण्यासोबतच तुम्ही, भिन्‍न लिंगी व्यक्‍तीबरोबर अयोग्य जवळीक टाळून आपल्या हृदयाचे रक्षण केले पाहिजे. भिन्‍न लिंगी व्यक्‍तींबरोबर प्रणयचेष्टा केल्याने वैवाहिक संबंध तुटत नाहीत, असे अनेकांना वाटते. पण देवाचे वचन आपल्याला अशी ताकीद देते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?” (यिर्मया १७:९) तुमच्या हृदयाने कधी तुम्हाला धोका दिला आहे का? स्वतःला विचारा: ‘माझे सर्वात जास्त लक्ष कोणाकडे असते—माझ्या सोबत्याकडे किंवा भिन्‍न लिंगी व्यक्‍तीकडे? मला जर कुठली आनंदाची बातमी सांगायची असते तर मी सर्वात आधी ती कोणाला सांगतो/सांगते—माझ्या नवऱ्‍याला/बायकोला की तिला/त्याला? माझी बायको/माझा नवरा मला जेव्हा विरुद्ध लिंगी व्यक्‍तीबरोबर जास्त घसिट ठेवायची नाही, असे सांगते/सांगतो तेव्हा माझी प्रतिक्रिया काय असते? मला राग येतो किंवा मी आनंदाने तिचे/त्याचे म्हणणे ऐकतो/ऐकते?’

हे करून पाहा: तुमच्या सोबत्याव्यतिरिक्‍त तुम्हाला कोणी आवडू लागले असेल तर त्या व्यक्‍तीबरोबर नावापुरता संपर्क ठेवा आणि कामापुरते बोला. ही व्यक्‍ती कोणकोणत्या बाबतीत तुमच्या सोबत्यापेक्षा वरचढ आहे, यावर विचार करत बसू नका. उलट, स्वतःच्या सोबत्यातील चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. (नीतिसूत्रे ३१:२९) तुम्ही तुमच्या सोबत्याच्या प्रेमात का पडला होता, ती कारणे आठवा. स्वतःला विचारा, ‘माझ्या सोबत्यातले हे गुण खरोखरच नाहीसे झाले आहेत का, की मीच या गुणांना आंधळा झालो/झाले आहे?’

स्वतःहून विषय काढा

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या मायकल व मारियाने, त्यांच्यात उद्‌भवलेली समस्या कशी सोडवता येईल म्हणून सल्ला विचारला. अर्थात सल्ला विचारणे ही तर पहिली पायरी झाली. पण, आपली समस्या ओळखण्याची तयारी दाखवून व मदत स्वीकारून मायकल व मारियाने स्पष्टपणे दाखवून दिले, की ते दोघेही आपल्या विवाहाशी वचनबद्ध आहेत व तो यशस्वी करण्याकरता ते दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास तयार आहेत.

तुमचा विवाह स्थिर असो अथवा अस्थिर असो, तुमच्या सोबत्याला हे जाणवले पाहिजे, की तुम्हा दोघांचा विवाह यशस्वी करण्याचे तुम्ही मनापासून ठरवले आहे. आपल्या सोबत्यालाही ही खात्री पटवून देण्याकरता तुम्हाला जी जी पावले उचलावी लागतात ती उचला. असे करायला तुम्ही तयार आहात का? (w०८ ११/१)

[तळटीपा]

^ नावे बदलण्यात आली आहेत.

^ येथे पोर्नोग्राफी पाहणाऱ्‍या पुरुषाचे उदाहरण देण्यात आलेले असले तरीसुद्धा, एखाही स्त्रीही पोर्नोग्राफी पाहत असेल तर ती देखील वचनबद्धता दाखवण्यात उणी पडू शकते.

स्वतःला विचारा . . .

▪ माझ्या नवऱ्‍याबरोबर किंवा बायकोबरोबर जास्त वेळ घालवण्याकरता मी कोणकोणत्या गोष्टी कमी करू शकतो?

▪ मी विवाहाशी वचनबद्ध आहे ही खात्री माझ्या सोबत्याला कोणकोणत्या प्रकारे देऊ शकतो?

[१४ पानांवरील चित्र]

आपल्या सोबत्यासाठी वेळ काढा

[१५ पानांवरील चित्र]

अविश्‍वासूपणाची सुरुवात हृदयात होते