कोणत्याही प्रकारे केलेली उपासना देवाला मान्य आहे का?
कोणत्याही प्रकारे केलेली उपासना देवाला मान्य आहे का?
लोक देत असलेली सर्वसामान्य उत्तरे:
▪ “सर्व धर्म एकाच देवाकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.”
▪ “तुम्ही कोणत्याही धर्माचे असला तरी तुमची उपासना मनापासून असली पाहिजे.”
येशूने काय म्हटले?
▪ “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) सर्व धर्म एकाच देवाकडे जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, असा येशूचा विश्वास नव्हता.
▪ “त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.” (मत्तय ७:२२, २३) येशू त्याचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांनाच स्वीकारत नाही.
अनेक धार्मिक लोकांना त्यांचा धर्म व त्यांच्या रूढीपरंपरा प्रिय आहेत. परंतु या रूढीपरंपरा देवाचे वचन, बायबल याच्या सामंजस्यात नसल्यास काय? येशूने मनुष्यनिर्मित रूढीपरंपरा पाळण्यात धोका आहे हे दाखवून दिले. त्याच्या दिवसातील धार्मिक नेत्यांना त्याने म्हटले: “तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे.” त्यानंतर त्याने देवाच्या शब्दांचा उल्लेख करीत म्हटले: “हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करितात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम.”—मत्तय १५:१-९; यशया २९:१३.
धर्मासोबत आपले वर्तनही महत्त्वाचे आहे. देवाची उपासना करत असल्याचा दावा करणाऱ्या काही लोकांविषयी बायबल म्हणते: “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात; परंतु कृतींनी त्याला नाकारितात.” (तीत १:१६) एवढेच नव्हे तर आपल्या काळातील लोकांविषयी बायबल असे सांगते की ते ‘देवाऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे होतील. ते धार्मिकपणाचा देखावा करतील परंतु त्यांच्या आचरणात धर्माची सत्यता व्यक्त होणार नाही. अशा सर्व लोकांपासून दूर राहा.’—२ तीमथ्य ३:४, ५, सुबोध भाषांतर.
तुमची उपासना फक्त मनापासून असणे पुरेशी नाही. का नाही? कारण एखादी व्यक्ती मनापासून उपासना करत असेल पण ती चुकीची असेल. त्यासाठी देवाविषयी अचूक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. (रोमकर १०:२, ३) अचूक ज्ञान घेतल्याने आणि बायबल जे शिकवते त्यानुसार कार्य केल्याने आपण देवाला संतुष्ट करू शकतो. (मत्तय ७:२१) म्हणजे खऱ्या धर्माचे पालन करण्यात योग्य हेतू, योग्य धार्मिक विश्वास आणि योग्य कृती गोवलेली आहे. आणि योग्य कृतीचा अर्थ देवाच्या इच्छेप्रमाणे दररोज चालणे.—१ योहान २:१७.
देवाविषयी बायबल काय शिकवते हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर मोफत गृह बायबल अभ्यासाकरता यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा. (w०९ २/१)
[९ पानांवरील संक्षिप्त आशय]
खऱ्या धर्माचे पालन करण्यात योग्य हेतू, योग्य धार्मिक विश्वास आणि योग्य कृती गोवलेली आहे