योशीयाने योग्य ते करण्याचे ठरवले
आपल्या मुलांना शिकवा
योशीयाने योग्य ते करण्याचे ठरवले
तुम्हाला काय वाटते, योग्य ते करणे सोपे असते का? कदाचित नाही. *— बहुतेकांना तुमच्याप्रमाणेच ते सोपे वाटत नाही. मोठ्यांना देखील योग्य काय आहे ते माहीत असते पण ते करणे कठीण जाते. योग्य ते करण्याची निवड करणे खासकरून योशीयाला कठीण का गेले हे आपण पाहू या. तो कोण होता हे तुम्हाला माहीत आहे का?—
योशीया यहुदाचा राजा आमोन याचा मुलगा होता. आमोन केवळ १६ वर्षांचा असताना त्याला योशीया झाला होता. आमोन त्याचे वडील, राजा मनश्शे यांच्याप्रमाणेच खूप वाईट होता. खरे तर मनश्शे राजाने अनेक वर्षे दुष्ट कृत्ये केली. पण नंतर अश्शुरी लोकांनी त्याला पकडून दूर बॅबिलोनला कैदी म्हणून नेले. तुरुंगात असताना मनश्शेने यहोवाला क्षमा मागितली व यहोवाने त्याला क्षमा केली.
बंदिवासातून मनश्शेची सुटका झाल्यावर तो पुन्हा जेरूसलेमला गेला व तेथे पुन्हा राज्य करू लागला. पूर्वी करत असलेल्या वाईट गोष्टी त्याने लगेच सोडून दिल्या आणि यहोवाची उपासना करण्यास लोकांना मदत केली. पण त्याचा मुलगा आमोन याने त्याच्या या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण न केल्यामुळे त्याला किती वाईट वाटले असेल. एव्हाना योशीयाचा जन्म झाला होता. मनश्शेने त्याच्या नातवाला, योशीयाला काय काय शिकवले असेल याविषयी बायबल काही सांगत नाही. पण मनश्शेने यहोवाची उपासना करण्यास त्याला मदत केली असावी असे तुम्हाला वाटते का?—
योशीया सहा वर्षांचा असतानाच मनश्शे मरण पावतो व त्याचा बाप आमोन राज्य करू लागतो. पण आमोनाने केवळ दोनच वर्षे राज्य केले कारण त्याच्या सेवकांनी त्याला ठार मारले. यानंतर योशीया यहुदावर राज्य करू लागला. त्यावेळी तो आठ वर्षांचा होता. (२ इतिहास अध्याय ३३) मग पुढे काय झाले? योशीयाने कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण केले? त्याचे वडील आमोन यांच्या वाईट उदाहरणाचे की त्याचे पश्चात्तापी आजोबा मनश्शे यांच्या चांगल्या उदाहरणाचे?—
योशीया लहान होता तरीसुद्धा आपण यहोवाची सेवा केली पाहिजे हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या वडिलांचे मित्र असलेल्या लोकांऐवजी त्याने जे यहोवावर प्रेम करत होते त्यांचे ऐकले. योशीया फक्त आठ वर्षांचा होता तरीसुद्धा देवावर प्रेम करणाऱ्यांचेच ऐकणे योग्य आहे हे त्याला माहीत होते. (२ इतिहास ३४:१, २) योशीयाला ज्यांनी चांगला सल्ला दिला व त्याच्या समोर ज्यांनी आपले चांगले उदाहरण मांडले अशा लोकांविषयी काहीतरी तुम्हाला आणखी जाणून घ्यायचे आहे का?—
योशीयासमोर चांगले उदाहरण मांडणाऱ्या लोकांपैकी एक होता संदेष्टा सफन्या. तो योशीयाच्या नात्यातलाच होता. कदाचित, मनश्शेचा बाप राजा हिज्किया याच्या वंशातला होता. राजा हिज्किया एक चांगला राजा होता. योशीयाने जेव्हा राज्य करायला सुरुवात केली तेव्हा सफन्या याने बायबलमध्ये आपल्या नावाने असलेले पुस्तक लिहिले. जे योग्य आहे ते न करणाऱ्या लोकांचा नाश होईल अशी सफन्याने ताकीद दिली. योशीयाने सफन्याच्या या इशाऱ्यांकडे नक्कीच लक्ष दिले असावे.
आणखी एक जण होता ज्याचे चांगले उदाहरण योशीयासमोर होते. तो होता यिर्मया. याच्याविषयी तुम्ही कदाचित पूर्वी ऐकले असावे. यिर्मया आणि योशीया हे दोघेही तरुण होते. ते एकाच ठिकाणी लहानाचे मोठे झाले होते. यहोवाने यिर्मयाला, बायबलमध्ये त्याच्या नावाने असलेले पुस्तक लिहायला प्रेरणा दिली. योशीया जेव्हा युद्धात मरण पावला तेव्हा यिर्मया याने, शोक व्यक्त करण्यासाठी एक खास शोकगीत लिहिले. (२ इतिहास ३५:२५) यहोवाशी विश्वासू राहण्यास त्यांनी एकमेकांना किती उत्तेजन दिले असावे याची आपण कल्पना करू शकतो!
योशीयाच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता?— योशीयासारखे तुमचेही वडील यहोवाची उपासना करणारे नसतील तर यहोवाविषयी तुम्हाला शिकवू शकेल, असे इतर कोणी आहे का? कदाचित तुमची आई, तुमचे आजी-आजोबा किंवा कोणी नातेवाईक? किंवा मग, तुमच्या नात्यातले नव्हेत पण यहोवाची सेवा करणारे कोणी तरी ज्याच्याबरोबर तुमची आई तुम्हाला बायबलचा अभ्यास करण्याची परवानगी देईल?
ते कोणीही असले तरी चालेल. तुम्ही योशीयाचे अनुकरण करू शकता. तो लहान होता तरीपण, आपण यहोवाची उपासना करणाऱ्या लोकांबरोबरच मैत्री केली पाहिजे हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते. तुम्हीही जे योग्य आहे ते करण्याचे ठरवा! (w०९ २/१)
[तळटीप]
^ तुम्ही हा लेख जर एखाद्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबायचे आहे आणि मुलाला त्याचे मत व्यक्त करण्यास वाव द्यायचा आहे.
प्रश्न:
❍ योशीयाच्या वडिलांचे व आजोबांचे काय नाव होते आणि ते कशा प्रकारचे लोक होते?
❍ योशीयाच्या आजोबांनी स्वतःत कोणते बदल केले?
❍ योशीयासमोर चांगले उदाहरण मांडलेल्या दोन संदेष्ट्यांची नावे काय आणि तुमचे मित्र देखील त्यांच्यासारखेच का असले पाहिजे असे तुम्हाला वाटते?
[२३ पानांवरील चित्रे]
सफन्या आणि यिर्मया या दोघांनी योशीयाला जे योग्य आहे ते करण्याचे प्रोत्साहन कसे दिले असावे?