नम्र लोकांना यहोवा मौल्यवान समजतो
देवाच्या जवळ या
नम्र लोकांना यहोवा मौल्यवान समजतो
गर्व, ईर्ष्या व महत्त्वाकांक्षा. हे असे गुण आहेत जे जगात पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळतात. पण या गुणांमुळे आपल्याला देवाशी जवळचा नातेसंबंध जोडता येईल का? मुळीच नाही. यहोवा त्याच्या उपासकांची नम्रता मोलाची समजतो. गणनाच्या १२ व्या अध्यायातील अहवालामधून हे स्पष्ट होते. इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका झाल्यावर सीनायच्या अरण्यात घडलेल्या घटनेचा हा अहवाल आहे.
मिर्याम व अहरोन मोशेची मोठी भावंडे होती. ते “त्याच्याविरुद्ध बोलू लागले.” (वचन १) प्रत्यक्ष मोशेशी बोलण्याऐवजी ते त्याच्या विरुद्ध बोलू लागले, कदाचित छावणीतल्या इतरांकडे ते त्याच्याविषयी कुरकुर करू लागले. या अहवालात मिर्यामचे नाव पहिले आले आहे त्यामुळे तिनेच कदाचित कुरकुर करायला सुरुवात केली असावी. मोशेने एका कूशी स्त्रीबरोबर विवाह केला होता, हेच तिच्या कुरकुर करण्याचे पहिले कारण होते. सर्वांचे लक्ष आता या गैर इस्राएली स्त्रीकडे जाईल व आपल्याकडे दुर्लक्ष होईल म्हणून तर मिर्याम तिच्यावर जळत नसावी?
कुरकुर करण्यामागे आणखीही काही कारणे होती. मिर्याम व अहरोन म्हणत राहिले: “परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला?” (वचन २) कुरकुर करण्यामागचा त्यांचा खरा हेतू आणखी अधिकार व नाव मिळवणे हा होता का?
अहवाल सांगतो की मोशेने या तक्रारीचे स्वतः उत्तर दिले नाही. तर तो निमूटपणे सहन करत राहिला. कोणतीही तक्रार न करता तो शांत राहिल्यामुळे, बायबल त्याचे वर्णन “भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र” असे जे करते ते खरे ठरले. * (वचन ३) यहोवा फक्त त्याचाच उपयोग का करत होता हे मोशेला लोकांना सांगावे लागले नाही. यहोवा देखील हे सर्व ऐकत होता व त्याने मोशेची बाजू मांडली.
यहोवाने मोशेविरुद्धची तक्रार जणू स्वतःविरुद्धची तक्रार होती अशी समजली. कारण त्यानेच तर मोशेची नियुक्ती केली होती. कुरकुर करणाऱ्यांना त्याने खडसावले व मोशेसोबत त्याचा अनोखा नातेसंबंध होता याची आठवण त्याने त्यांना करून दिली. तो त्यांना म्हणाला: “मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो.” मग यहोवाने मिर्यामला व अहरोनाला विचारले: “मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हाला भीति कशी नाही वाटली?” (वचन ८) मोशेविरुद्ध बोलण्याद्वारे ते खरेतर देवाविरुद्ध बोलणारे ठरले होते. या गंभीर पापासाठी त्यांना देवाच्या क्रोधाला तोंड द्यावे लागणार होते.
चिथावणी करण्यात पुढाकार घेणाऱ्या मिर्यामला कोड झाला. अहरोनाने लगेच, देवाने तिला क्षमा करावी म्हणून मोशेकडे गयावया केली. कल्पना करा, मिर्यामने ज्याच्याविरुद्ध तक्रार केली होती त्या मोशेच्याच मदतीची तिला आता गरज होती. मोशेने नम्रपणे त्याची विनंती ऐकली. या अहवालात मोशे प्रथमच बोलला. त्याने त्याच्या बहिणीसाठी देवाला प्रार्थना केली. मिर्याम बरी झाली पण सात दिवस तिला छावणी बाहेर राहण्याची लाजिरवाणी परिस्थिती पत्करावी लागली.
या अहवालातून आपल्याला कळते की यहोवा कोणत्या गुणांची कदर करतो व कोणत्या प्रकारच्या मनोवृत्तीचा तो विरोध करतो. आपल्याला देवासोबत जवळचा नातेसंबंध जोडायचा असेल तर आपण आपल्यातल्या गर्व, ईर्ष्या व महत्त्वाकांक्षा या दुर्गुणांना मुळासकट काढून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. यहोवाला लीन व नम्र लोक आवडतात. तो वचन देतो की “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११; याकोब ४:६. (w०९ ०८/०१)
[तळटीप]
^ परि. 7 नम्रता हा असा एक जबरदस्त गुण आहे की ज्यामुळे एखादी व्यक्ती खुन्नस न बाळगता, सहनशीलतेने अन्यायाचा सामना करू शकते.