पैशानेच खरा आनंद मिळतो का?
पैशानेच खरा आनंद मिळतो का?
सोनियाचा जन्म स्पेनमध्ये झाला होता. ती लहान होती तेव्हा आपल्या आईबरोबर यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना जायची. पण मोठी झाल्यावर ती लंडनला राहायला गेली व एका आर्थिक कंपनीत कामाला लागली.
सोनियाला आपले काम मनापासून आवडायचे. ती भरपूर पैसाही कमवत होती आणि तिच्या ग्राहकांच्या पैशांची मोठी रक्कम हाताळायची. आपल्या कामावर ती खूश होती आणि यशस्वी देखील होती. ती दिवसाचे १८ तास सलग काम करायची आणि कधीकधी रात्रीची तर तिला फक्त दोन किंवा तीन तासांचीच झोप मिळायची. तिचे कामचं तिचे सर्वस्व होते. पण अचानक चित्र बदलले. तिच्या या दगदगीच्या जीवनशैलीमुळे की काय तिला अंर्धांगवायूचा झटका आला. ती तेव्हा फक्त ३० वर्षांची होती.
अंर्धांगवायूमुळे सोनिया पुन्हा बोलू शकेल की नाही याबद्दल डॉक्टरांना खात्री वाटत नव्हती. तिची काळजी घेण्यासाठी तिची आई लगेच लंडनला आली. सोनिया हळूहळू चालायला लागल्यावर तिची आई तिला म्हणाली, “मी मंडळीच्या सभांना चाललेय. पण मी तुला घरी एकटीला सोडून जाऊ शकत नाही तेव्हा तुलाही माझ्याबरोबर यावं लागेल.” सोनिया जायला तयार झाली. याचा परिणाम काय झाला?
सोनिया म्हणते: “सभांमध्ये मी जे जे ऐकत होते ते सर्व मला पटत होतं. मला ते खूप भावलं. मी राज्य सभागृहात पहिल्यांदा गेले होते तेव्हा माझं स्वागत करणाऱ्यांपैकी एका बहिणीसोबत मी बायबलचा अभ्यास करायला तयार झाले. माझ्या पूर्वीच्या मित्रमैत्रिणींनी माझ्याकडं यायचं सोडून दिलं पण मला मिळालेले नवीन मित्र प्रेमळ व काळजी घेणारे होते.”
हळूहळू सोनियाला पुन्हा बोलता येऊ लागले आणि ती आध्यात्मिक प्रगतीही करू लागली. वर्षाच्या आतच तिचा बाप्तिस्मा झाला. तिला लाभलेल्या नवीन मित्रांपैकी अनेक जण पूर्ण वेळेच्या ख्रिस्ती सेवेत होते आणि ते किती आनंदी आहेत हे ती पाहत होती. ‘मलाही यांच्यासारखंच बनायचंय. मला माझ्या परीने होता होईल तितकी यहोवा देवाची सेवा करायची आहे,’ असे विचार तिच्या मनात आले. आता सोनिया पूर्ण वेळची सेवा करत आहे.
सोनिया तिला आलेल्या अनुभवावरून काय शिकली? ती म्हणते: “मी रग्गड पैसा कमवत होते पण कामावरील ताण व असुरक्षितेच्या भावनेमुळे मला चिंता वाटायची. मी आनंदी नव्हते. माझा स्वर्गीय पिता यहोवा याच्याबरोबर एक चांगला नातेसंबंध असणे, ही जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, याचा प्रत्यय मला आला. आता मी खऱ्या अर्थानं आनंदी आहे.”
प्रेषित पौलाने लिहिले: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:१०) हे शब्द किती खरे आहेत यांची खात्री सोनिया स्वतःच्या अनुभवावरून देऊ शकते. (w०९ ०९/०१)