व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘तुझे राज्य अढळ राहील’

‘तुझे राज्य अढळ राहील’

देवाच्या जवळ या

‘तुझे राज्य अढळ राहील’

२ शमुवेल ७:१-१६

इतिहासात अनेक नेत्यांना त्यांच्या पदावरून काढण्यात आले आहे. काहींना कमी मते मिळाल्यामुळे पदावरून हटवले जाते तर काहींना जबरदस्तीने काढून टाकले जाते. परंतु देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा येशू ख्रिस्त याच्याविषयी काय म्हणता येईल? देवाचा नियुक्‍त राजा या नात्याने राज्य करण्यासाठी त्याला कोणती गोष्ट रोखू शकते का? याचे उत्तर आपल्याला यहोवाने प्राचीन इस्राएलाचा राजा दावीद याला जे सांगितले त्यातून मिळू शकते. हा अहवाल दुसरे शमुवेल याच्या ७ व्या अध्यायात दिलेला आहे.

या अध्यायाच्या सुरुवातीच्या शब्दांवरून आपल्याला दाविदाला एका गोष्टीचे वाईट वाटत असल्याचे कळते. तो म्हणतो की तो एक राजा असला तरी एक साधाच मनुष्य आहे पण एका सुंदर राजमहालात राहत आहे आणि देवाचा कोश मात्र एका साध्याशा तंबूत आहे. * म्हणून दाविदाने यहोवासाठी एक निवासस्थान किंवा मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्‍त केली. (वचन २) परंतु तो ते मंदिर बांधणार नव्हता. ते मंदिर त्याचा पुत्र अर्थात शलमोन बांधणार असल्याचे यहोवा नाथान संदेष्ट्याकरवी दाविदाला सांगतो.—वचने ४, ५, १२, १३.

दाविदाला मंदिर बांधण्याची मनापासून इच्छा असल्याचे पाहून यहोवाला आनंद झाला. दाविदाची श्रद्धा पाहून व यहोवाने केलेल्या एका भविष्यवाणीच्या अनुषंगाने यहोवा दाविदाशी असा करार करतो की तो त्याच्या राजघराण्यातूनच एक जण उभा करील जो सदासर्वकाळ राज्य करेल. देवाने दिलेले हे महत्त्वपूर्ण अभिवचन नाथान दाविदाला अशा प्रकारे सांगतो: “तुझे घराणे व तुझे राज्य ही तुजपुढे अढळ राहतील; तुझी गादी कायमची स्थापित होईल.” (वचन १६) या करारात सांगितलेला सदासर्वकाळ राज्य करणारा कायमचा वारस कोण आहे?—स्तोत्र ८९:२०, २९, ३४-३६.

नासरेथचा येशू दाविदाच्या वंशातून आला. येशूच्या जन्माची घोषणा करताना एका देवदूताने म्हटले: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्‍याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) यहोवाने दाविदाबरोबर केलेल्या कराराची पूर्णता येशू ख्रिस्तामध्ये झाली. यास्तव, येशू हा कोणा मानवाने त्याला निवडल्यामुळे राज्य करत नाही तर देवाने त्याला तो सदासर्वकाळ राज्य करण्यास योग्य आहे असे महत्त्वपूर्ण अभिवचन दिल्यामुळे करतो. देवाची अभिवचने नेहमीच खरी ठरतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.—यशया ५५:१०, ११.

दुसरे शमुवेलाच्या ७ व्या अध्यायातून आपण दोन मोलाचे धडे शिकू शकतो. पहिला धडा म्हणजे, येशू ख्रिस्ताला राज्य करण्यापासून कोणतीही गोष्ट आणि कोणीही प्रतिबंध करू शकत नाही हा भरवसा आपण बाळगू शकतो. यास्तव, ज्या उद्देशासाठी तो राज्य करणार असल्याचे त्याने सांगितले आहे त्या उद्देशाची पूर्तता अर्थात जसे स्वर्गात देवाच्या इच्छेप्रमाणे होत आहे तसेच पृथ्वीवरही होण्याविषयीच्या त्याच्या उद्देशाची पूर्णता होईल अशी खात्री आपण बाळगू शकतो.—मत्तय ६:९, १०.

दुसरा, हा अहवाल आपल्याला यहोवाविषयी आपल्या अंतःकरणाला स्पर्शून जाणारा धडा शिकवतो. यहोवाने दाविदाच्या मनातील इच्छा पाहून ती मोलाची लेखली, याची आठवण करा. यहोवा आपण त्याची करत असलेली उपासना पाहतो व ती मोलाची लेखतो, हे खूप दिलासा देणारे आहे. काही बाबतीत पाहू जाता, आपल्या आटोक्याबाहेर असलेली परिस्थिती जसे की आजारपण किंवा उतारवय यामुळे कदाचित आपल्याला वाटते तितकी आपण देवाची सेवा करू शकत नाही. असे असल्यास, यहोवाची उपासना करण्याची व त्याची सेवा करण्याची आपल्या मनातील तळमळही तो पाहू शकतो, हे जाणल्याने आपल्याला सांत्वन मिळू शकते. (w१०-E ०४/०१)

[तळटीप]

^ परि. 2 कराराचा कोश एक पवित्र पेटी होती जी यहोवाच्या मार्गदर्शनानुसार आणि त्याने दिलेल्या नमुन्याप्रमाणे तयार करण्यात आली होती. प्राचीन इस्राएलात ती पेटी यहोवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधीत्व करत होती.—निर्गम २५:२२.