येशू ख्रिस्त त्याच्या शिकवणींचा लोकांच्या जीवनावर कितपत प्रभाव पडला?
येशू ख्रिस्त त्याच्या शिकवणींचा लोकांच्या जीवनावर कितपत प्रभाव पडला?
येशूच्या पृथ्वीवरील जीवनाचा आजही लोकांवर प्रभाव पडत आहे व यावरून दिसते, की तो खरोखरच एक महापुरुष होता, अशी लेखक ग्रेग इस्टरब्रुक टिप्पणी करतात.
शब्दांमध्ये शक्ती असते. विचारपूर्वक निवडलेले शब्द लोकांच्या अंतःकरणाला स्पर्श करू शकतात, त्यांच्या मनात आशा जागृत करू शकतात व त्यांचे जीवन बदलू शकतात. या पृथ्वीवर आजपर्यंत असा एकही मनुष्य होऊन गेला नाही ज्याने येशू ख्रिस्तापेक्षा जास्त प्रभावी गोष्टी सांगितल्या. त्याच्या अनेक लोकप्रिय प्रवचनांपैकी एक प्रवचन ऐकलेल्या व्यक्तीने नंतर असे लिहिले: “येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.”—मत्तय ७:२८.
आजही जगातील लोकांना येशूची अनेक सुवचने माहीत आहेत. अर्थभरीत सुवचनांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत, त्यांचा विचार करा:
“तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.”—मत्तय ६:२४.
“लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्तय ७:१२.
“कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला” द्या.—मत्तय २२:२१.
“घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
पण येशूने लोकांना, फक्त लक्षात राहतील अशी सुवचनेच सांगितली नाहीत तर त्याने त्यांना एक संदेशही सांगितला. त्याच्या संदेशात शक्ती होती. कारण या संदेशामुळे लोकांना देवाविषयीचे सत्य समजले, जीवनात खरा आनंद कसा मिळवायचा हे ते शिकले आणि मानवांच्या सर्व दुःखांवरचा एकमेव उपाय असलेल्या देवाच्या राज्याविषयी त्यांना माहिती मिळाली. या संदेशाची सविस्तर चर्चा पुढील लेखांमध्ये करण्यात आली आहे. या माहितीचे परीक्षण करताना आपल्याला कळेल, की आजही येशूचा लोकांवर प्रभाव का पडत आहे. (w१०-E ०४/०१)