जागतिक समस्यांवर एकमेव उपाय
जागतिक समस्यांवर एकमेव उपाय
दुःख आज सगळीकडे दिसून येते आणि अनेक लोक दुःखात असलेल्या लोकांना मदत करायला दयाळूपणे पुढे येतात. उदाहरणार्थ डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटलमधील इतर कर्मचारी हे सर्व आजारी किंवा जखमी लोकांना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेतात, वेळेचे त्यांना भानच नसते. अग्नीशामक दलात काम करणारे, पोलीस, पुढारी, बचावकार्यात भाग घेणारे इतरांचे दुःख कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी सतत झटत असतात. अशा प्रकारच्या मदतीमुळे एखाद्याला वैयक्तिक पातळीवर बरीच मदत मिळते पण कोणतीही व्यक्ती किंवा संघटना संपूर्ण पृथ्वीवरचे दुःख काढून टाकण्यास समर्थ नाही. या उलट देव समर्थ आहे. त्याच्याकडे विश्वव्यापी समस्यांवर एक तोडगा आहे.
बायबलमधील शेवटच्या पुस्तकात आपल्याला याची खातरी मिळते: “[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) देवाने दिलेल्या या वचनाचा फायदा किती लोकांना होऊ शकतो याकडे लक्ष द्या. देवाचा उद्देश सर्व दुःखांचा अंत करण्याचा आहे हे या वचनात सारांशात सांगितले आहे. जगातून वाईट लोकांसोबतच युद्ध, उपासमार, आजारपण, अन्याय काढून टाकण्याद्वारे देव असे करेल. कोणीही मानव असे करू शकत नाही.
देवाचे राज्य काय साध्य करेल
जगातील दुसरी महासामर्थ्यवान व्यक्ती अर्थात देवाने ज्याला मृत्यूतून पुन्हा जिवंत केले त्या येशूमार्फत देव आपल्या वचनांची पूर्णता करेल. लवकरच अशी वेळ येईल जेव्हा येशू राजा या नात्याने संपूर्ण पृथ्वीवर बिनविरोध कार्य करेल. मानवजातीवर यापुढे मानवी राजे, राष्ट्रपती किंवा पुढारी राज्य करणार नाहीत. याउलट त्यांच्यावर फक्त एकच राजा व एकच सरकार अर्थात देवाचे राज्य शासन करेल.
हे राज्य सर्व मानवी राज्यांना काढून टाकेल. हजारो वर्षांपूर्वी बायबलने असे भाकीत केले होते: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) पृथ्वीवरील सर्व लोक एकाच धार्मिक सरकाराच्या अर्थात देवाच्या राज्याच्या अधीन राहतील.
मानव म्हणून पृथ्वीवर असताना येशू अनेक प्रसंगी त्या राज्याबद्दल बोलला होता. त्याने आपल्या आदर्श प्रार्थनेतही त्याचा उल्लेख केला होता. त्याने आपल्या शिष्यांना पुढीलप्रमाणे प्रार्थना करायला सांगितले: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) या राज्याचा संबंध देवाची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होण्याशी आहे आणि संपूर्ण पृथ्वीवरील दुःख काढून टाकण्याचीच तर देवाची इच्छा आहे हे येशूने दाखवले.
कोणतेही मानवी सरकार आणू शकत नाही असे आशीर्वाद देवाचे धार्मिक सरकार मानवजातीसाठी आणेल. त्याने मानवजातीला पाप आणि मृत्युतून सोडवण्यासाठी व त्यांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी आपल्या प्रिय पुत्राला अर्पण केल्याचा आपण आधी केलेला उल्लेख आठवा. या दयाळू राज्य सरकाराच्या अधिपत्याखाली लोक हळूहळू परिपूर्ण होत जातील. याचा काय परिणाम होईल? यहोवा ‘मृत्यू कायमचा नाहीसा करेल, तो सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसेल.’—यशया २५:८.
काही जण म्हणतील: ‘मग देव आत्तापर्यंत शांत का बसला आहे? तो कशाची वाट पाहात आहे?’ यहोवाला केव्हाच सर्व दुःख काढून टाकता आले असते किंवा ते टाळता आले असते. पण त्याने तसे केले नाही. यापाठीमागे त्याचा कोणताही स्वार्थी हेतू नव्हता तर पृथ्वीवरील आपल्या मुलांना सार्वकालिक फायदा मिळावा या हेतूनेच त्याने असे केले. एखाद्या त्रासामुळे जर आपल्या मुलांचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे, हे प्रेमळ पालकांना माहीत असेल तर ते त्यांना तो त्रास सहन करू देतील. त्याचप्रमाणे यहोवाने मानवांना काही काळ दुःख का सहन करू दिले आहे याची काही चांगली कारणे आहेत व ती बायबलमध्ये सांगण्यात आली आहेत. या कारणांमध्ये, इच्छा स्वातंत्र्य, पाप, यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराबद्दलचा वादविषय यांचा समावेश होतो. काही काळासाठी एका दुष्ट आत्मिक प्राण्याला या जगावर राज्य करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचेही बायबल स्पष्ट करते. *
आपण या लेखात सर्वच कारणांची चर्चा करू शकत नाही; तरी अशा दोन गोष्टी आहेत ज्यांमुळे आपल्याला आशा व उत्तेजन मिळते. पहिली ही की आपल्याला जे काही सहन करावे लागले आहे त्याची यहोवा कैक पटीने भरपाई करणार आहे. शिवाय देवाने आश्वासन दिले आहे की: “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत.” (यशया ६५:१७) थोड्या काळासाठी वाईट गोष्टींना राहू दिल्यामुळे आलेले दुःख व हाल-अपेष्टा यहोवा पूर्णपणे व कायमच्या काढून टाकेल.
दुसरी गोष्ट ही आहे की देवाने दुःख काढून टाकण्यासाठी एक नियोजित वेळ ठरवली आहे जी बदलणार नाही. संदेष्टा हबक्कूकने यहोवाला, तो किती काळ जुलूम व वाद सहन करणार हा प्रश्न विचारला होता हे आठवा. त्याचे उत्तर देताना यहोवाने म्हटले “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे . . . त्याला विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) तो ‘नेमलेला समय’ जवळ आला आहे हे आपण पुढील लेखात पाहणार आहोत. (w०९-E १२/०१)
[तळटीप]
^ परि. 9 देव दुःख काढून का टाकत नाही याच्या कारणांची विस्तृत चर्चा बायबल नेमके काय शिकवते? या यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या ११ व्या अध्यायात करण्यात आली आहे.
[७ पानांवरील चौकट]
उज्ज्वल भविष्याची आशा देणारी बायबल वचने
युद्धे नसतील:
“या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.”—स्तोत्र ४६:८, ९.
प्रिय जन परत येतील:
“नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
सर्वांसाठी अन्न असेल:
‘भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल.’—स्तोत्र ७२:१६.
आजारपण नसेल:
“मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” —यशया ३३:२४.
दुष्ट लोक नसतील:
“दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यांतून निर्मूलन होईल.”—नीतिसूत्रे २:२२.
न्याय प्रकट होईल:
“पाहा, राजा [ख्रिस्त येशू] धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील.”—यशया ३२:१.
[७ पानांवरील चित्रे]
देवाचे राज्य आपल्या दुःखांवरील एकमेव उपाय आहे