व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पवित्र आत्मा तुम्हाला हवी असलेली शक्‍ती

पवित्र आत्मा तुम्हाला हवी असलेली शक्‍ती

पवित्र आत्मा तुम्हाला हवी असलेली शक्‍ती

“तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नको; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको.” (स्तोत्र ५१:११) राजा दाविदाच्या हातून घडलेल्या एका भयंकर चुकीनंतर त्याने अशी कळकळीने प्रार्थना केली होती.

दाविदाला त्याच्या आयुष्यात अनेकदा पवित्र आत्म्याच्या शक्‍तीचा अनुभव आला होता. तो अद्याप कुमारच होता तेव्हा याच पवित्र आत्म्याच्या शक्‍तीने त्याने गल्याथ नावाच्या एका धिप्पाड सैनिकाला ठार मारले होते. (१ शमुवेल १७:४५-५०) याच पवित्र आत्म्याच्या शक्‍तीने तो, आजपर्यंत रचलेल्या स्तोत्रांपैकी काही सुरेख स्तोत्रे लिहू शकला होता. त्याने म्हटले: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.”—२ शमुवेल २३:२.

दाविदाच्या जीवनात पवित्र आत्मा कार्यरत होता याची स्वतः येशू ख्रिस्ताने पुष्टी दिली. एके प्रसंगी त्याने आपल्या श्रोत्यांना असे सांगितले: “दावीदाने स्वतः पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, ‘परमेश्‍वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’” (मार्क १२:३६; स्तोत्र ११०:१) दाविदाने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसारच स्तोत्रे लिहिली हे येशूला माहीत होते. हाच पवित्र आत्मा आज आपल्याला देखील मिळू शकतो का?

‘मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल’

तुम्ही कदाचित दाविदाप्रमाणे स्तोत्र रचणार नाही. पण, धिप्पाड गल्याथासारख्या भासणाऱ्‍या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागेल. इंदूचे * उदाहरण घ्या. एका तरुण स्त्रीकरता तिच्या नवऱ्‍याने तिला सोडून दिले. त्याच्यावर खूप कर्ज होते. ते सर्व कर्ज इंदूला फेडावे लागले. तो सोडून गेला तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली लहान होत्या. त्यांचे पालनपोषण करण्यासाठी त्याने काहीच आर्थिक मदत केली नाही. ती म्हणते: “माझी खूप मोठी फसवणूक झाल्याचं, पायातल्या पायताणासारखं मला वागवलं गेल्याचं वाटलं. पण देवाच्या पवित्र आत्म्यानं मला आधार दिला. माझा नवरा मला वाऱ्‍यावर सोडून गेला पण पवित्र आत्म्यानं मला सांभाळलं.”

पण इंदूला ही शक्‍ती आपोआप मिळाली होती का? नाही. तिने दररोज देवाला त्याची शक्‍ती मिळावी म्हणून विनवणी केली. भविष्याचा सामना धैर्याने करण्याकरता, आपल्या मुलींची योग्य काळजी घेण्याकरता, गमावलेला स्वाभिमान पुन्हा मिळवण्याकरता पवित्र आत्म्याची गरज आहे, हे तिला माहीत होते. म्हणून तिने, ‘मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोकत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल,’ या येशूच्या शब्दांचे पालन केले.—मत्तय ७:७.

रमेशला देखील, देवाच्या पवित्र आत्म्याची गरज भासली, पण ती वेगळ्या कारणांसाठी. त्याला तंबाखू आणि गांजा ओढण्याचे व्यसन जडले होते. तो सतत या मादक पदार्थांचे सेवन करत असे. ही सवय सोडण्याचा त्याने दोन वर्ष प्रयत्न केला; पण अनेकदा त्याचे प्रयत्न निकामी ठरले. रमेश म्हणतो: “अंमली पदार्थ घ्यायचं तुम्ही थांबवता तेव्हा तुम्ही खूप निराश होता. तुमचं शरीर दररोज अंमली पदार्थ घेण्यासाठी तरसत असतं.”

“पण, मला देवाची स्वीकारयोग्य मार्गाने सेवा करायची होती, म्हणून मी काहीही करून ही सवय सोडणारच, असा मनाशी निश्‍चय केला होता. मी माझं मन बायबलमधील सुविचारांनी भरू लागलो. मला माझं जीवन सुधारण्यास मदत करावी म्हणून मी देवाला दररोज अगदी कळकळीनं प्रार्थना करायचो. स्वतःच्या बळावर मला यश मिळणार नाही हे मला माहीत होतं. मी जेव्हा पुन्हा एकदा या सवयीकडं वळालो तेव्हा मला स्वतःचीच खूप लाज वाटली. याच वेळेला मला, यहोवानं माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिल्याचं जाणवलं. यामुळं माझी पक्की खात्री पटली आहे, की देवाच्या पवित्र आत्म्यानंच मला नवीन शक्‍ती दिली. त्याचं साहाय्य मला मिळालं नसतं तर मी माझ्या सवयीवर कधीच मात करू शकलो नसतो,” असे रमेश म्हणतो.—फिलिप्पैकर ४:६-८.

‘गरुडांप्रमाणे पंखांनी’ वर उडणे

इंदू व रमेश यांच्यासारख्याच लाखो यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या जीवनात यहोवाच्या पवित्र आत्म्याची शक्‍ती अनुभवली आहे. या विश्‍वाची निर्मिती करण्यासाठी यहोवाने ज्या शक्‍तीचा उपयोग केला ती कार्य करणारी शक्‍ती तुमची इच्छा असेल तर तुम्हालाही मिळू शकेल. ही शक्‍ती मिळण्यासाठी तुम्ही जर देवाला अगदी मनापासून विनंती केली तर तो ती तुम्हाला देण्यास तयार आहे, नव्हे इच्छुक आहे. पण त्याआधी तुम्हाला त्याच्याविषयीचे सत्य शिकावे लागेल आणि त्याच्या इच्छेनुसार प्रामाणिकपणे वागावे लागेल.—यशया ५५:६; इब्री लोकांस ११:६.

या बलाढ्य शक्‍तीने तुम्हाला देवाची सेवा करण्याकरता ताकद मिळेल आणि जीवनात येणाऱ्‍या कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात करू शकाल. बायबलमध्ये हीच खात्री आपल्याला देण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे: “[यहोवा] भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. . . . परमेश्‍वराची आशा धरून राहणारे नवीन शक्‍ती संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.”—यशया ४०:२८-३१. (w०९-E १०/०१)

[तळटीप]

^ परि. 6 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘मला माझं जीवन सुधारण्यास मदत करावी म्हणून मी देवाला दररोज अगदी कळकळीनं प्रार्थना करायचो. स्वतःच्या बळावर मला यश मिळणार नाही हे मला माहीत होतं. त्यानं माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याचं मला जाणवलं’

[१३ पानांवरील चौकट/चित्रे]

पवित्र आत्म्याची कार्ये

पृथ्वी आणि या विश्‍वाची निर्मिती करण्यासाठी देवाने पवित्र आत्म्याचा उपयोग केला. “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे,” असे स्तोत्रकर्त्याने म्हटले. त्याने पुढे असेही म्हटले: “तू आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्‍न होतात.”—स्तोत्र १०४:२४, ३०; उत्पत्ति १:२; ईयोब ३३:४.

पवित्र आत्म्यामुळे धार्मिक पुरुष बायबल लिहिण्यास प्रेरित झाले. “संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे, आणि तो . . . उपयोगी आहे,” असे प्रेषित पौलाने लिहिले. (२ तीमथ्य ३:१६, पं.र.भा.) “देवाने प्रेरलेला” असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या ग्रीक शब्दांचा अक्षरशः अर्थ, “देवाने श्‍वास घातलेला” असा होतो. यहोवाच्या श्‍वासाने किंवा आत्म्याने बायबल लेखकांच्या विचारांना मार्गदर्शन दिले व त्यामुळे ते “देवाचे वचन” लिहू शकले.—१ थेस्सलनीकाकर २:१३.

पवित्र आत्म्यामुळे देवाचे सेवक अचूकपणे भविष्य वर्तवू शकले. प्रेषित पेत्राने असे स्पष्टीकरण दिले: “शास्त्रांतील कोणत्याहि संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”—२ पेत्र १:२०, २१; योएल २:२८.

पवित्र आत्म्यामुळे येशू आणि इतर विश्‍वासू पुरुषांना देवाच्या राज्याचा प्रचार करण्यास व चमत्कार करण्यास मदत झाली. येशूने म्हटले: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ ह्‍यांची घोषणा करावी.” —लूक ४:१८; मत्तय १२:२८.

[१५ पानांवरील चौकट/चित्रे]

पवित्र आत्मा पुढील मार्गांनी आपली मदत करू शकतो

पवित्र आत्मा तुम्हाला मोहांचा प्रतिकार करण्याचे व हानीकारक सवयींवर मात करण्याचे बळ देऊ शकतो. प्रेषित पौलाने असे म्हटले: “देव विश्‍वसनीय आहे तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३.

पवित्र आत्मा तुम्हाला देव ज्यामुळे संतुष्ट होईल असे गुण विकसित करण्यास मदत करू शकतो. “आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे.”—गलतीकर ५:२२, २३.

पवित्र आत्म्याच्या मदतीने तुम्ही परिक्षांचा धैर्याने सामना करू शकाल. “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.