व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“भग्न व अनुतप्त हृदय” क्षमेची याचना करते तेव्हा देव ती ऐकतो का?

“भग्न व अनुतप्त हृदय” क्षमेची याचना करते तेव्हा देव ती ऐकतो का?

देवाच्या जवळ या

“भग्न व अनुतप्त हृदय” क्षमेची याचना करते तेव्हा देव ती ऐकतो का?

२ शमुवेल १२:१-१४

आपण सर्व जण अनेकदा पाप करतो. आपल्याला नंतर कितीही वाईट वाटत असले तरी, आपल्या मनात असा विचार डोकावतच राहतो, ‘मी अगदी मनापासून पश्‍चात्ताप करून देवाला प्रार्थना करतो पण तो त्या ऐकतो का? तो मला क्षमा करेल का?’ बायबलमध्ये एका सांत्वनदायक सत्याची शिकवण दिली आहे: यहोवा कोणतेही पाप खपवून घेत नसला तरी, मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पापी व्यक्‍तीला क्षमा करण्यास तो तयार आहे. प्राचीन इस्राएलमधील राजा दाविदाच्या बाबतीत हे सत्य स्पष्ट दिसून आले. बायबलमधील दुसरे शमुवेल याच्या १२ व्या अध्यायात याबद्दलचे वर्णन आहे.

जे काही झाले होते त्याची कल्पना करा. दावीद गंभीर पापांबद्दल दोषी आहे. त्याने बथशेबाबरोबर व्यभिचार केला आणि मग हे पाप लपवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न निकामी ठरले तेव्हा त्याने बथशेबाच्या पतीला ठार मारण्याची व्यवस्था केली. दावीद पापे करून शांत राहिला. आपण फार साळसूद आहोत, असा अनेक महिन्यांपर्यंत त्याने आव आणण्याचा प्रयत्न केला. पण यहोवा सर्व काही पाहत होता. त्याने दाविदाची पापे पाहिली होती. पण दाविदाला जर त्याची पापे लक्षात आणून दिली तर तो पश्‍चात्ताप करेल, हेही यहोवाला माहीत होते. (नीतिसूत्रे १७:३) यहोवाने मग काय केले?

यहोवाने नाथान संदेष्ट्याला दाविदाकडे पाठवले. (वचन १) देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार, नाथान दाविदाशी बोलायला जातो. व्यवहार-कुशलतेचा उपयोग करून व अतिशय काळजीपूर्वक आपण राजाबरोबर बोलले पाहिजे, हे त्याला माहीत आहे. दावीद स्वतःचीच फसवणूक करत होता आणि त्याने केलेली पापे किती गंभीर होती, हे तो दाविदाला कशा प्रकारे सांगणार होता?

दाविदाने कोणत्याही सबबी देऊ नयेत म्हणून नाथान त्याला एक गोष्ट सांगतो. पूर्वी मेंढपाळ असलेल्या दाविदाला या गोष्टीचे मर्म नक्कीच कळेल, याची नाथानाला खात्री होती. ही गोष्ट, श्रीमंत व गरीब अशा दोन पुरुषांची होती. श्रीमंत माणसाकडे “मेंढरे व गुरे विपुल” होती पण गरीब माणसाकडे “एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते.” एकदा, त्या श्रीमंत माणसाकडे एक पाहुणा आल्यामुळे त्याला त्याच्यासाठी जेवण तयार करायचे असते. आपल्या कळपातील एखादे मेंढरू घेण्याऐवजी तो त्या गरीब माणसाची एकुलती एक मेंढी घेतो. दावीद ही गोष्ट लक्ष देऊन ऐकतो. त्याला ही गोष्ट खरी आहे असे वाटते. त्याला खूप राग येतो आणि तो म्हणतो: “ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे.” का? “कारण त्याला काही दयामाया वाटली नाही,” असे दावीद म्हणतो. *—वचने २-६.

नाथानाने ज्या हेतूने तो दृष्टांत दिला होता तो हेतू साध्य झाला होता. दाविदाने स्वतःहूनच स्वतःला दोषी ठरवले होते. नाथान आता त्याला म्हणतो: “तो मनुष्य तूच आहेस.” (वचन ७) नाथान संदेष्टा देवाच्या वतीने बोलत होता. त्यामुळे दाविदाने केलेली कृत्ये जणू यहोवाविरुद्ध होती. देवाचा नियम तोडून दाविदाने, नियम देणाऱ्‍याबद्दल घोर अनादर दाखवला होता. देव त्याला म्हणतो: ‘तू मला तुच्छ मानले आहेस.’ (वचन १०) हे शब्द दाविदाच्या जिव्हारी लागतात. तो कबूल करतो: “मी परमेश्‍वराविरुद्ध पातक केले आहे.” नाथान दाविदाला असे आश्‍वासन देतो, की यहोवा त्याला क्षमा करेल; पण त्याच्या कृत्यांचा परिणाम त्याला भोगावा लागेल.—वचन १३, १४.

दाविदाचे पाप उघड केल्यानंतर त्याने आता ज्याला स्तोत्र ५१ म्हटले जाते ते रचले. या स्तोत्रात त्याने आपल्या मनातल्या सर्व गोष्टी व्यक्‍त केल्या, त्याला किती पश्‍चात्ताप झाला ते सांगितले. पाप करून दाविदाने यहोवाला तुच्छ लेखले होते. पण, देवाची क्षमा अनुभवल्यानंतर पश्‍चात्ताप करणारा हा राजा यहोवाला असे म्हणू शकला: “भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” (स्तोत्र ५१:१७) यहोवाची दया मिळवू पाहणाऱ्‍या एका पश्‍चात्तापी पातक्याचे हे किती सांत्वनदायक शब्द! (w१०-E ०५/०१)

[तळटीप]

^ परि. 7 घरी आलेल्या पाहुण्यासाठी मेंढीच्या मटणाचे जेवण बनवणे ही आदरातिथ्य दाखवण्याची रीत होती. पण, मेंढरू चोरणे हा एक गुन्हा होता ज्याच्यासाठी चोरी करणाऱ्‍याला चौपट भरपाई द्यावी लागत होती. (निर्गम २२:१) दाविदाच्या नजरेत, मेंढरू घेणारा तो श्रीमंत मनुष्य निर्दयीपणे वागला होता. कारण, या मेंढीमुळे त्या गरीब माणसाच्या कुटुंबाला दूध व लोकर मिळाली असती. एवढेच नव्हे तर या मेंढीद्वारे तो आपला कळप वाढवू शकला असता, पण आता असे होणे शक्य नव्हते.