व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्व वाईट कृत्यांचा अंत ठरलेला आहे!

सर्व वाईट कृत्यांचा अंत ठरलेला आहे!

सर्व वाईट कृत्यांचा अंत ठरलेला आहे!

देवाने त्याच्या पवित्र आत्म्याने प्रेरित केलेल्या वचनात, लोक वाईट कृत्ये का करतात त्याची कारणे सांगितली आहेत. त्याने आपल्याला इच्छा-स्वातंत्र्य आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची कुवतही दिली आहे ज्यामुळे आपण वाईट कृत्ये न करण्याची निवड करू शकतो. (अनुवाद ३०:१५, १६, १९) त्यामुळे, आपल्यातील कोणतीही वाईट प्रवृत्ती लगेच ओळखून ती सुधारण्यासाठी आवश्‍यक ती पावले आपण उचलू शकतो. परिणामतः, वाईट कृत्ये करण्यापासून मागे हटल्यामुळे आपल्याला स्वतःला आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही आनंद होतो.—स्तोत्र १:१.

तरीपण, आपण प्रत्येकाने वाईट कृत्ये न करण्याचे कितीही ठरवले असले तरीसुद्धा बहुतेक लोक मानवजातीला लाजविणारी कृत्ये करतातच. बायबल अशी ताकीद देते: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे.” शेवटल्या काळचे दिवस “कठीण” आहेत कारण “माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी” अशी ती होतील; त्यांच्यापासूनहि दूर राहा.”—२ तीमथ्य ३:१-५.

वरील भविष्यसूचक वचनात आलेल्या “शेवटल्या काळी” या वाक्यांशाचा काय अर्थ असावा, असे तुम्हाला वाटते? ‘शेवटला काळ’ यावरून असेच सूचित होते, की कशाचा तरी शेवट होणार आहे. कशाचा शेवट होणार आहे? देवाने आपल्या वचनात कोणते अभिवचन दिले आहे ते पाहा.

दुष्ट लोकांचा कायमचा नाश केला जाईल.

“थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”स्तोत्र ३७:१०, ११.

“परमेश्‍वर आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो, पण सर्व दुर्जनांचा नाश करितो.”स्तोत्र १४५:२०.

जुलूमाचा अंत होईल.

“धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील.”स्तोत्र ७२:१२, १४.

“सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.”रोमकर ८:२१.

लोकांच्या सर्व गरजा पूर्ण होतील.

“ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”मीखा ४:४.

“ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.”यशया ६५:२१, २२.

न्यायाचा विजय होईल.

“देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? . . . मी तुम्हांस सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील.”लूक १८:७, ८.

“परमेश्‍वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्‍तांस सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते.”स्तोत्र ३७:२८.

स्वार्थी होण्याऐवजी लोक धार्मिक बनतील.

‘जगात राहणारे धार्मिकता शिकतील.’यशया २६:९.

“ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.”२ पेत्र ३:१३.

आजही लोकांमध्ये बदल होत आहेत!

देवाने दिलेली ही अभिवचने वाचून आपल्याला आनंद होतो, नाही का? पण ही अभिवचने पूर्ण होतील, याची काय हमी आहे? खरे तर, देवाने दिलेली अभिवचने नक्की पूर्ण होतील याचा पुरावा आज आपल्याजवळच आहे. कोणता पुरावा? संपूर्ण जगातील, कोट्यवधी लोकांनी स्वार्थी मनोवृत्ती, अनैतिक आचरण किंवा हिंसक स्वभावात बदल केले व आता ते ईमानदार, शांतीप्रिय व दयाळू बनले आहेत; हाच तो पुरावा आहे. आज, सबंध जगात ७० लाखांपेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांचा आंतरराष्ट्रीय बंधूसमाज आहे. संपूर्ण इतिहासात वांशिक, जातीय, राष्ट्रीय, राजकीय व आर्थिक भेदांमुळे द्वेष, हिंसा व रक्‍तपात घडला आहे; पण यहोवाच्या साक्षीदारांच्या बंधूसमाजात हे भेदभाव नाहीत. * आज लोकांच्या व्यक्‍तिमत्त्वात व मनोवृत्तीत होत असलेले हे बदल, देवाने दिलेली अभिवचने मोठ्या प्रमाणावर पूर्ण होतील, असा विश्‍वास बाळगण्यास पुरेसे कारण देतो.

पण लोकांमध्ये हा बदल कसा काय घडून येतो? बायबलमध्ये दिलेल्या आणखी एका अभिवचनात या प्रश्‍नाचे उत्तर आहे. संदेष्टा यशया याने याच्याविषयी असे लिहिले:

“लांडगा कोंकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांस लहान मूल वळील. . . . सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यशया ११:६-९.

प्राणीसुद्धा मानवांबरोबर शांतीने राहतील, फक्‍त एवढेच या भविष्यवाणीत सांगितले आहे का? नाही. या भविष्यवाणीत आणखी काहीतरी सांगितलेले आहे. त्या भविष्यवाणीच्या शेवटल्या भागात काय म्हटले आहे ते पाहा: “परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” देवाच्या या ज्ञानामुळे प्राण्यांच्या स्वभावात बदल होतात का? नाही. पण माणसांच्या जीवनात बदल होऊ शकतात व तसे झाले आहे! या भविष्यवाणीत अशा एका काळाविषयी भाकीत केले होते जेव्हा, बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी शिकून त्यांचा आपल्या जीवनात अवलंब करून जनावरांसारखी प्रवृत्ती असलेले लोक ख्रिस्तासारखी मनोवृत्ती विकसित करतील.

प्रदीपचे * उदाहरण घ्या. तो जेव्हा एका दहशतवादी संघटनेत सामील झाला तेव्हा त्याला वाटत होते, की तो न्याय मिळण्यासाठी झगडत आहे. प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्याला, पोलिसांची एक बराक उडवण्याचा हुकूम मिळाला. या तयारीत असतानाच तो पोलिसांच्या हाती लागला. त्याने तुरुंगात १८ महिने काढले. तेथेही त्याची दहशतवादी कृत्ये चालूच होती. या दरम्यान, त्याची बायको यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करू लागली. तुरुंगातून सुटल्यावर प्रदीपनेही बायबलचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासात त्याने यहोवा देवाविषयी शिकलेल्या गोष्टींनी प्रेरित होऊन स्वतःच्या मनोवृत्तीत बदल केला आणि जीवनाकडे पाहायचा त्याचा दृष्टिकोनही बदलला. तो म्हणतो: “दहशतवादी असताना माझ्या हातून कुणाचीही हत्या झाली नाही, म्हणून मी यहोवाचे उपकार मानतो. आता मी देवाच्या आत्म्याची तलवार अर्थात बायबलद्वारे लोकांना खऱ्‍या शांतीचा व न्यायाचा संदेश, म्हणजे देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत आहे.” शांतीचा व हिंसा नसलेल्या जगाविषयीचा संदेश सांगण्याकरता प्रदीप तर त्या पोलीस बराकीतही गेला जी उडवण्याचा त्याने आधी बेत आखला होता.

देवाचे वचन बायबल याचा लोकांच्या जीवनावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो ही गोष्टच आपल्याला, सर्व वाईट कृत्यांचा अंत ठरलेला आहे या देवाने दिलेल्या अभिवचनावर विश्‍वास ठेवण्यास सबळ कारण देते. होय, लोक कायम वाईट कृत्ये करत राहणार नाहीत तर त्यांच्यात नक्की बदल होतील ज्याचा त्यांना फायदा होणार आहे. लवकरच यहोवा देव, सैतानाचा अंत करणार आहे. कारण तोच पडद्यामागे राहून लोकांकडून सर्व वाईट कृत्ये करवून घेत आहे. बायबल याविषयी असे म्हणते: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) म्हणून लवकरच सैतानाचा नाश केला जाणार आहे. तसेच जे लोक आपल्या वाईट मार्गांपासून मागे वळण्यास हट्टीपणे नकार देतात त्यांचाही नाश केला जाणार आहे. असे घडल्यावर तो काळ किती उत्तम असेल!

पण आपल्याला जर तो काळ पाहायचा असेल तर आपण काय केले पाहिजे? आपण आधी पाहिल्याप्रमाणे, ‘परमेश्‍वराचे ज्ञान’ घेतल्यामुळे आज लोकांच्या व्यक्‍तिमत्त्वात व मनोवृत्तीत बदल होत आहे व भविष्यातही असे बदल मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. तेव्हा, प्रदीपने जसे केले तसे तुम्हीही बायबलचे ज्ञान घेऊन त्याचा आपल्या जीवनात अवलंब करून त्या जगाची वाट पाहू शकता जेथे ‘नीतिमत्त्व’ अर्थात धार्मिकता असेल. (२ पेत्र ३:१३) म्हणून, देव आणि येशू ख्रिस्त यांच्याबद्दलचे ज्ञान घ्यायची संधी उपलब्ध आहे तोपर्यंत तिचा फायदा घेण्याचा आग्रह आम्ही तुम्हाला करत आहोत. असे केल्याने तुम्हाला सदा सर्वकाळचे जीवन मिळू शकेल!—योहान १७:३. (w१०-E ०९/०१)

[तळटीपा]

^ अधिक माहितीकरता, यहोवाचे साक्षीदार—ते कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे? हे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले माहितीपत्रक पाहा.

^ नाव बदलण्यात आले आहे.

[९ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘नीतिमत्त्व’ अर्थात धार्मिकता असलेल्या जगात राहण्याचे तुम्हीही स्वप्न पाहू शकता.—२ पेत्र ३:१३