व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘प्रार्थना ऐकणारा’ देव

‘प्रार्थना ऐकणारा’ देव

देवाच्या जवळ या

‘प्रार्थना ऐकणारा’ देव

१ इतिहास ४:९, १०

यहोवा देव भक्‍तिमान उपासकांनी केलेल्या प्रामाणिक प्रार्थनांचे उत्तर देतो का? या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला, बायबलमधील याबेस नावाच्या एका मनुष्याच्या अहवालावरून कळून येते. याबेसविषयी बायबलमध्ये जास्त माहिती दिलेली नाही. पण त्याच्या अहवालावरून कळून येते, की यहोवा खरोखरच ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे. (स्तोत्र ६५:२) याबेसची थोडक्यात दिलेली माहिती, आपण विचारही करणार नाही अशा ठिकाणी दिली आहे. बायबलमधील पहिले इतिहास नावाच्या पुस्तकाच्या सुरुवातीला असलेल्या वंशावळीच्या यादीत हा अहवाल दिला आहे. चला आता आपण १ इतिहास ४:९, १० याचे जरा परीक्षण करू या.

याबेसबद्दल आपल्याला जे काही माहीत आहे ते या दोन वचनांतच सापडते. नवव्या वचनात म्हटले आहे, की त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले कारण, ‘त्यास प्रसवताना तिला फार क्लेश झाले.’ * पण तिने याबेस हेच नाव का निवडले? मुलांना जन्म देताना होणाऱ्‍या वेदनांपेक्षा तिला जास्त वेदना झाल्या होत्या का? ती एक विधवा होती का? व तिचे बाळ या जगात आले तेव्हा तिचा नवरा तिथे नव्हता म्हणून ती दुःखाने व्याकूळ झाली होती का? बायबल आपल्याला काहीही सांगत नाही. पण या आईचे ऊर एक न्‌ एक दिवशी गर्वाने फुगणार होते. याबेसची भावंडे कदाचित धार्मिक असावीत. पण याबेस “हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता.”

याबेस यहोवाला सातत्याने व मनापासून प्रार्थना करीत असे. देवाच्या आशीर्वादांची विनंती करूनच त्याने त्याच्या प्रार्थनेची सुरुवात केली. त्यानंतर त्याने देवाकडे तीन मागण्या केल्या ज्यावरून, त्याचा विश्‍वास किती भक्कम होता, हे कळते.

याबेसने देवाला पहिली विनंती अशी केली: ‘माझ्या मुलुखाचा विस्तार वाढव.’ (वचन १०) हा प्रतिष्ठित मनुष्य इतरांच्या गोष्टींची हाव बाळगणारा, लोकांच्या जमिनी बळकावणारा मनुष्य नव्हता. त्याने केलेली विनंती, जमिनीपेक्षा माणसांशी संबंधित असावी. तो कदाचित देवाला अशी विनंती करत असावा, की आपल्या मुलुखाचा शांतीने विस्तार होऊ दे, जेणेकरून अधिकाधिक लोक खरा देव यहोवा याची उपासना करू लागतील. *

मग याबेसने देवाला दुसरी विनंती अशी केली, की ‘तुझा हात माझ्यावर सदोदित ठेव.’ देवाचा हा हात लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आला आहे. व हा हात त्याच्या शक्‍तीला सूचित करतो. आपल्या उपासकांना मदत करण्यासाठी तो या शक्‍तीचा उपयोग करतो. (१ इतिहास २९:१२) आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची याबेसने यहोवाला विनंती केली कारण त्याला माहीत होते, की यहोवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या कोणाच्याही इच्छा पूर्ण करण्यात यहोवाचा हात तोकडा नसतो.—यशया ५९:१.

याबेसची तिसरी विनंती अशी होती: ‘मजवर कोणतेहि अरिष्ट येऊ देऊ नकोस ज्यामुळे मी दुःखी होईन.’ ‘मी दुःखी होईन’ या याबेसच्या वाक्यांशाचा अर्थ, तो संकटापासून पळ काढत होता असा नव्हे तर, त्याच्यावर आलेल्या अरिष्टांमुळे त्याने दुःखी होऊ नये, असा होतो.

याबेसच्या प्रार्थनेवरून, खऱ्‍या उपासनेबद्दल त्याला असलेली चिंता तसेच प्रार्थना ऐकणाऱ्‍या देवावर असलेला त्याचा विश्‍वास आणि भरवसा व्यक्‍त होतो. याबेसच्या प्रार्थनेचे यहोवाने उत्तर दिले का? याबेसच्या या संक्षिप्त अहवालाचे शेवटचे शब्द आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर देतात: “त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला.”

प्रार्थना ऐकणारा देव बदललेला नाही. आजही त्याला, त्याच्या उपासकांच्या प्रार्थना ऐकून आनंद होतो. त्याच्यावर भरवसा व विश्‍वास ठेवणारे ही खात्री बाळगू शकतात, की “आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.”—१ योहान ५:१४. (w१०-E १०/०१)

[तळटीपा]

^ याबेस या शब्दाचा मूळ अर्थ “वेदना” असा होतो.

^ टारगम या पवित्र शास्त्रवचनांच्या यहुदी अनुवादात, याबेसच्या या शब्दांचा अनुवाद अशा प्रकारे करण्यात आला आहे: “माझ्या मुलांवर तुझा आशीर्वाद असू दे आणि माझ्या शिष्यांची संख्या वाढवून माझ्या सीमा वाढव.”