कमालीच्या दारिद्र्यात जगणे म्हणजे काय?
कमालीच्या दारिद्र्यात जगणे म्हणजे काय?
कमालीचे दारिद्र्य जीवघेणे आहे. कमालीच्या दारिद्र्यात जगणाऱ्या लोकांना पुरेसे अन्न, पाणी, इंधन मिळत नाही; त्यांना राहायला व्यवस्थित घर नसते, आरोग्याची व शिक्षणाची सोय नसते. शंभर कोटी लोक, म्हणजे, अंदाजे भारताच्या एकूण लोकसंख्येएवढे लोक कमालीच्या दारिद्र्यात जगत आहेत. तरीपण, पश्चिम युरोप व उत्तर अमेरिका यांसारख्या ठिकाणांतील लोक, कमालीच्या दारिद्र्यात जगणाऱ्या कोणाला ओळखत नसावेत. चला भेटूयात त्यांपैकी काहींना.
म्बारुशिमा आफ्रिका खंडातील रुआंडा येथे आपली पत्नी व पाच मुलांसह राहतो. त्याचे सहावे मूल मलेरियामुळे दगावले. तो म्हणतो: “माझ्या वडिलांनी आम्हा सहा भावंडांमध्ये जमिनीची वाटणी केली. माझ्या वाट्याला आलेली जमीन कमी असल्यामुळे ती काही कामाची नव्हती; म्हणून मग आम्ही एका शहरात राहायला गेलो. आम्ही दोघं नवरा-बायको, दगड, वाळूच्या गोण्या वाहायचं काम करतो. आमच्या घराला खिडक्या नाहीत. पिण्याचं पाणी आम्ही जवळच्या एका पोलीस स्टेशनमधून आणतो. आम्हाला दिवसाला सहसा एकाच वेळेचं जेवण मिळतं. काम नसलं तर तेही मिळत नाही. असं झालं तर मग मी घरात राहात नाही. माझी मुलं भुकेनं रडत असतात तेव्हा त्यांचं रडणं मला ऐकवत नाही.”
बक्तोर व कार्मन हे दोघे नवरा-बायको चांभार आहेत. बोलिव्हियातील एका दूरच्या शहरात ते आपल्या पाच मुलांबरोबर राहतात. पत्र्याचे गळके छप्पर असलेल्या एका मातीच्या घरात ते राहतात. त्यांच्या घरात लाईट नाही. त्यांच्या भागातल्या शाळेत मुले बेंचवर बसतात. पण या शाळेत मुले इतकी खचाखच भरली होती, की बक्तोरला आपल्या मुलीसाठी एक बेंच बनवावा लागला, नाहीतर तिला शाळेत जाता आले नसते. स्वयंपाकासाठी व पाणी उकळण्यासाठी लागणारे सरपण गोळा करण्याकरता बक्तोर आणि कार्मनला दहा किलोमीटरपर्यंत चालत जावे लागते. कार्मन म्हणते: “आमच्या इथं शौचालये नसल्यामुळे, नदीच्या काठी जावं लागतं. तिथंच लोकांच्या आंघोळी चालतात व कचराही टाकला जातो. त्यामुळे पुष्कळदा मुलं आजारी पडतात.”
फ्रान्सेस्कू व इलिड्या मोझंबिकच्या एका ग्रामीण भागात राहतात. त्यांना पाच मुले होती. त्यांपैकी एकाला मलेरिया झाला होता आणि उपचारासाठी त्याला दवाखान्यात घेतले नाही म्हणून ते मूल दगावले. त्यांच्या लहानशा जमिनीवर ते तीन महिने पुरेल इतके भाताचे व रताळ्याचे पीक काढतात. फ्रान्सेस्कू म्हणतो: “कधीकधी पाऊस पडत नाही किंवा मग आलेले पीक चोरटे घेऊन जातात. मग मी बांधकामासाठी लागणाऱ्या बांबूच्या चिरफळ्या कापून थोडेफार पैसे जमवतो. आमच्या घरापासून दोन तासांवर जंगल आहे,
तिथून मी आणि माझी बायको सरपण गोळा करून आणतो. सरपणाच्या दोन मोळ्या आम्ही आणतो, एक आठवडाभराच्या स्वयंपाकासाठी ठेवतो आणि दुसरी मोळी विकतो.”जगातील प्रत्येक ७ लोकांपैकी १ जण म्बारुशिमा, बक्तोर व फ्रान्सेस्कू यांच्यासारखे कमालीच्या दारिद्र्यात जगतोय तर बाकीचे कोट्यवधी लोक श्रीमंतीत लोळण घेत आहेत, म्हणजे नक्कीच कुठेतरी काहीतरी बिघडलेले आहे व हा घोर अन्यायदेखील आहे, असे पुष्कळांना वाटते. त्यामुळे काही लोकांनी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील लेखात त्यांनी केलेल्या प्रयत्नांची व त्यांना असलेल्या आशेची चर्चा करण्यात आली आहे. (w११-E ०६/०१)
[२, ३ पानांवरील चित्र]
नदीतून पाणी घेणारी कार्मन आपल्या दोन मुलांसह