तुम्ही देवाच्या जवळ कसे येऊ शकता?
देवाच्या वचनातून शिका
तुम्ही देवाच्या जवळ कसे येऊ शकता?
तुमच्या मनात उद्भवलेले प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे वाचायला मिळतील हे या लेखात सांगितले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.
१. देव सर्वच प्रार्थना ऐकतो का?
यहोवा सर्व राष्ट्रांच्या लोकांना प्रार्थनेद्वारे त्याच्याजवळ येण्याचे आमंत्रण देतो. (स्तोत्र ६५:२) पण तो सर्वच प्रार्थना ऐकत नाही. जसे की, प्राचीन इस्राएलमधील लोक जेव्हा वाईट कामे करत राहिले तेव्हा देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या नाहीत. (यशया १:१५) तसेच, जो माणूस आपल्या पत्नीला गैरवागणूक देतो त्याच्या प्रार्थनांमध्येदेखील व्यत्यय येऊ शकतो. (१ पेत्र ३:७) पण तेच, घोर पापे करणाऱ्यांनी जर पश्चात्ताप केला तर देव त्यांच्या प्रार्थना ऐकेल.—२ इतिहास ३३:९-१३ वाचा.
२. आपण प्रार्थना कशी केली पाहिजे?
प्रार्थनेद्वारे देवाशी बोलण्याचा आपल्याला बहुमान मिळाला आहे आणि प्रार्थनेद्वारे आपण त्याची उपासनादेखील करतो; त्यामुळे फक्त यहोवालाच आपण प्रार्थना केली पाहिजे. (मत्तय ४:१०; ६:९) आपण सर्वच अपरिपूर्ण असल्यामुळे व स्वतःहून “पित्याकडे येऊ शकत” नसल्यामुळे येशूच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे कारण देवाने येशूलाच “मार्ग” म्हणून निवडले आहे. (योहान १४:६) आपण पाठांतर केलेल्या किंवा लेखी प्रार्थनांची घोकंपट्टी केलेली यहोवाला नकोय तर स्वतःच्या शब्दांत व्यक्त केलेल्या प्रार्थना तो स्वीकारतो.—मत्तय ६:७; फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.
आपण मनातल्या मनात केलेल्या प्रार्थनादेखील यहोवाला ऐकू येतात. (१ शमुवेल १:१२, १३) आपण हरप्रसंगी, जसे की दिवसाच्या सुरुवातीला व शेवटी, जेवणाच्या वेळी आणि आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा त्याला प्रार्थना करावी, असे तो आपल्याला आमंत्रण देतो.—स्तोत्र ५५:२२; मत्तय १५:३६ वाचा.
३. खरे ख्रिस्ती एकत्र का जमतात?
देवावर विश्वास नसलेल्या व पृथ्वीवर शांती आणण्याच्या त्याने दिलेल्या वचनाची थट्टा करणाऱ्या लोकांमध्ये आपण राहत असल्यामुळे देवाच्या जवळ येणे इतके सोपे नाही. (२ तीमथ्य ३:१, ४; २ पेत्र ३:३, १३) म्हणून आपल्याला, आपल्यासारखाच विश्वास करणाऱ्यांबरोबर सहवास ठेवण्याची व एकमेकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.—इब्री लोकांस १०:२४, २५ वाचा.
देवावर प्रेम करणाऱ्यांबरोबर तुम्ही मैत्री केली तर तुम्ही देवाच्या जवळ येऊ शकाल. यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये इतरांच्या विश्वासातून लाभ मिळवण्याच्या संधी मिळतात.—रोमकर १:११, १२ वाचा.
४. तुम्ही देवाच्या जवळ कसे येऊ शकता?
देवाचे वचन बायबल यातून शिकलेल्या गोष्टींवर मनन करून तुम्ही यहोवाच्या जवळ येऊ शकता. देवाची कार्ये, त्याने दिलेली मार्गदर्शने व अभिवचने यांवर मनन करा. अशा प्रार्थनापूर्वक मननाद्वारे देवाचे प्रेम व त्याची बुद्धी यांबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता वाढेल.—यहोशवा १:८; स्तोत्र १:१-३ वाचा.
तुम्ही जर देवावर भरवसा व विश्वास ठेवला तरच त्याच्याजवळ येऊ शकाल. पण तुम्हाला तुमचा विश्वास जिवंत ठेवावा लागेल. यासाठी तुम्हाला नेहमी, शिकलेल्या गोष्टींवर मनन करत राहावे लागेल.—१ थेस्सलनीकाकर ५:२१; इब्री लोकांस ११:१, ६ वाचा.
५. देवाच्या जवळ आल्याने तुम्हाला काय फायदा होईल?
यहोवावर प्रेम करणाऱ्यांची तो काळजी घेतो. त्यांचा विश्वास व सार्वकालिक जीवनाची त्यांची आशा ज्यांमुळे धोक्यात येऊ शकते अशा सर्व गोष्टींपासून तो त्यांचे संरक्षण करतो. (स्तोत्र ९१:१, २, ७-१०) आपले आरोग्य व आनंद धोक्यात आणणाऱ्या जीवनशैलीविषयी तो आपल्याला इशारा देतो. तो आपल्याला जीवनाच्या सर्वोत्तम मार्गाविषयी शिकवतो.—स्तोत्र ७३:२७, २८; याकोब ४:४, ८ वाचा. (w११-E ०९/०१)
जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय १७ पाहा. बायबल नेमके काय शिकवते?