मुख्य विषय | तुम्ही देवाचे मित्र बनू शकता
देवासोबत तुमची मैत्री आहे का?
“आपण देवाला आपला मित्र बनवतो तेव्हा आपल्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही असं वाटतं. जणू देव सतत आपल्या भल्याचा विचार करतो.”—क्रिस्टोफर, घानातील एक तरुण.
“देव आपल्या दुःखात सावलीसारखा आपल्यासोबत असतो आणि अपेक्षाही केली नसेल इतकं आपल्याला सांभाळतो.”—१३ वर्षांची हाना, अलास्का, अमेरिका.
“देवासोबत आपली घनिष्ठ मैत्री आहे ही जाणीवच मुळात खूप दिलासा देणारी आहे; यापेक्षा अधिक मोलाचं काय असू शकतं!”—जीना, जमैकात राहणारी चाळीशीतील एक स्त्री.
क्रिस्टोफर, हाना आणि जीना केवळ या तिघांनाच असे वाटते असे नाही. जगातील अनेक जण खातरीने म्हणू शकतात की देव त्यांना आपले मित्र मानतो. तुमच्या बाबतीत काय? देवासोबत तुमची मैत्री आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला त्याच्याशी मैत्री करायची आहे का? किंवा त्याच्यासोबतची मैत्री आणखी वाढवायची आहे का? तुम्ही कदाचित विचार कराल, की ‘एका सर्वसामान्य माणसाला सर्वशक्तिमान देवाशी घनिष्ठ मैत्री करणं खरंच शक्य आहे का? असल्यास, ती कशी करता येईल?’
देवाशी मैत्री करणे शक्य आहे
देवाशी घनिष्ठ मैत्री करणे शक्य आहे असे बायबल म्हणते. त्यात म्हटले आहे, की देवाने हिब्रू कुलप्रमुख अब्राहाम याला “माझा मित्र” असे म्हटले. (यशया ४१:८) याशिवाय, याकोब ४:८ या वचनात देवाने दिलेले मनःपूर्वक निमंत्रणही विचारात घ्या: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” यावरून स्पष्ट होते, की देवासोबत जवळचे म्हणजेच मैत्रीचे नाते जोडणे शक्य आहे. पण, देवाला तर आपण पाहू शकत नाही. मग, त्याच्याशी मैत्री करणे कसे शक्य आहे?
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी दोन व्यक्तींमधील मैत्री कशी बहरते त्याचा विचार करा. सहसा एकमेकांची नावे जाणून घेण्याद्वारे त्यांच्यातील मैत्रीची सुरुवात होते. पुढे ते वेळोवेळी एकमेकांशी संवाद साधतात, विचारांची व भावनांची देवाणघेवाण करतात तेव्हा त्यांच्यातील मैत्री बहरत जाते. तसेच, ते एकमेकांसाठी छोट्या-मोठ्या गोष्टी करतात तेव्हा त्यांच्या मैत्रीची वीण आणखीनच घट्ट होते. देवाशी घनिष्ठ मैत्री करण्यासाठी याच गोष्टींची गरज आहे. त्या कशा करता येतील ते आपण पाहू या. (w14-E 12/01)